Features

तंत्रज्ञान कलाकाराला हरवेल?

‘चिन्ह’ कायमच कलाक्षेत्रातील बदल, नवे ट्रेंड यावर लक्ष ठेवून असते. कलाक्षेत्रातील प्रश्नांना आम्ही कायम वाचा फोडली आहे.  कला क्षेत्रातील आव्हाने शोधताना आमची नजर पडली ती एका फेसबुक पोस्टवर. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान हे अतिशय  सुंदर चित्रं  फक्त काही कीवर्डसच्या साहाय्याने  काढू शकते आणि भविष्यात त्याचा चित्रकारांच्या  उपजीविकेवर गंभीर परिणाम होऊ शकतो या आशयाची ती पोस्ट बघून आम्हाला धक्का बसला.  मग आम्ही पोस्टकर्ते सुनील गजकोश यांच्याशी दीर्घ चर्चा केली. यातून समजले की हा विषय चित्रकारांनी समजून घेणे गरजेचे आहे.

औद्योगिक क्रांतीच्या आधी लोकांना सकाळी झोपेतून उठवण्यासाठी काही लोक नेमले जात. त्यांना ‘नॉकर अप’ असे म्हटले जाई. हे लोक घरोघरी जाऊन जोपर्यंत घरातला माणूस मी उठलो आहे हे सांगत नसे तोपर्यंत त्याचे दार ठोठावत असत. मग अँटवान रेडिअर या शास्त्रज्ञाने अलार्म घड्याळाचा शोध लावला आणि हे नॉकर अप लोक बेकार झाले! म्हणजे बघा तंत्रज्ञान एक झटक्यात काय करू शकते. औद्योगिक क्रांतीत तरी बदलाचा वेग धिमा होता आज मात्र  कम्प्युटरचा वेग दर १८ ते २४ महिन्यात दुप्पट होत असतो.  आज तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रांवर अतिक्रमण केले आहे. मग कलेच्या क्षेत्रावरही याचे परिणाम होणारच. AI आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चे तंत्रज्ञान आज कला क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवत आहे. साइन बोर्ड पेंटिंग जाऊन फ्लेक्स आले त्याहीपेक्षा कितीतरी आश्चर्यकारक. कलाक्षेत्राला मुळापासून हादरवेल  असे काही. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे हे तंत्रज्ञान कलाकाराला हरवेल की कलाकार या AI वर मात करेल? याचा आढावा सुनील गजकोश यांनी घेतला आहे.

काही दिवसांपुर्वी मला कला निर्मिती AI संगणक प्रणाली पैकी एका प्रणालीचा वापर  करण्याची संधी मिळाली होती. त्यात मी काही चित्रे बनविण्याच्या आज्ञा दिल्या आणि त्यातून निर्माण झालेली चित्रे पाहून मी आवाक झालो आणि ते मी फेसबुकवर टाकून लिहिलं की… AI जर ह्या गुणवत्तेची कला निर्मिती करू शकते तर कला निर्मिती करणाऱ्यांच्या पोटावर पाय येऊ शकतो. यावर चर्चा सुरू झाली, काहींना भिती वाटली, काहींनी हे शक्य नाही म्हणून सांगितलं, काहींनी चिंता व्यक्त केली, काहींना भविष्याबाबत उत्सुकता निर्माण झाली, तर काहींनी कलेचे लोकशाहीकरण होईल असे ही नमूद  केलं. 

हि सगळी चर्चा अनेक मान्यवर लोक पाहत होते त्यात ‘चिन्ह’ आर्ट न्यूज कडून ही याबाबत अधिक माहितीसाठी चौकशीचा फोन आला, त्यांच्याशी बोलून मला कळले की कला निर्मिती करणाऱ्या AI मुळे कलाक्षेत्राला पुढचे भविष्य काय असेल व यामुळे भविष्यात कोणते बदल वा परिणामांना कलाकारांना सामोरे जावे लागेल यावर सगळ्यांना अजून खोलवर माहिती मिळायला हवी, त्यासाठी हा लेखनप्रपंच !

प्रथम AI म्हणजे काय आणि कलाक्षेत्रात AI कसे काम करतं हे समजावून घेवू.

AI च्या निर्मितीच्या इतिहासात न जाता एक समजून घेऊ या की, जेव्हा मशिन लर्निंगचे प्रयोग यशस्वी झाले म्हणजे संगणक प्रणाली जेव्हा लिखाण, चित्र, आवाज, रंग, संगीत, व्हिडीयो इत्यादी गोष्टींबाबत शिकून त्याचा विशिष्ट डेटा-सेट्स बनवून त्याची आधीच्या डेटा-सेट्सशी तुलना करून ekhaadi वस्तू ओळखू लागला आणि त्यात ती प्रणाली अधिक प्रगत होत जाऊन त्यातील चुका कमी होत गेल्या. तेव्हा AI अनेक क्षेत्रात वापराची प्रक्रिया सुरू झाली.

म्हणजे AI जर चित्र, लाईन, रंग, रचना इत्यादी ओळखू शकतो तर, ती पुन्हा रचूही शकतो आणि त्याची सरमिसळ करून नवीन काही बनवू ही शकतो. या शक्यता निर्माण झाल्या आणि त्याच पायावर इतर क्षेत्रात AI वापरण्यासाठी “नैसर्गिक भाषा प्रक्रिया (natural language processing),” “सखोल शिक्षण (deep learning)” आणि “भविष्यसूचक विश्लेषण (predictive analytics)” इत्यादी तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आणि त्यामुळे कला क्षेत्रात Generative AI प्रणाली (algorithm) ही पुढे येऊ लागली, आणि इथेच कला क्षेत्रात AI चे अनेक प्रयोग होऊ लागले.

आता DALI-2, Midjourney, Imagen इत्यादी AI वापरून text to image पद्धतीने कला निर्मितीच्या सेवा देणारे प्रकल्प सुरू झाले आहेत, आता तुम्ही महिन्याला माफक किंमतीत  त्याचा वापर करून कला निर्मिती करू शकता.

AI कसे काम करते.

वरील प्रकल्पातील AI अजूनही स्वता विचार करून शकत नाही, पण तुम्ही लिहिलेली आज्ञा पाळून तुम्हाला काही चित्रे काढून देऊ शकतो. उदाहरण म्हणजे मी Midjourney वर Van Gogh Style, Slum ह्या दोन आज्ञा टाकल्या तर त्यांनी खालील चित्र काही सेकंदात तयार करून दिले. मग मी एक निवडून त्याच्या  अजून प्रती  काढण्याची आज्ञा दिली तर त्यांनी अजून काही प्रती  निवडलेल्या चित्रातून निर्माण केल्या, त्यातील एक मी निवडले.

आता विचार करा की कोणत्याही व्यक्तीने आज्ञा दिली तर वरील AI आपल्या डेटा-बेस मधून आणि सखोल शिक्षणाच्या आधारे कोणत्याही प्रकारची कला निर्मिती करीत असेल तर, आणि त्याची गुणवत्ता चांगली असेल तर, अनेक कलाकारांना त्याबाबत भीती वाटणे शक्य आहे. आपला पुढचा मुद्दा हाच आहे.

 If Monalisa is man अशी कमांड दिल्यावर हे वरील चित्र पर्याय येतात. यात केसांसाठी खास curly hair hee कमांड दिली होती. बॅकग्राऊंडला जंगल म्हणजे forest असावे अशी कमांड दिली यानंतर हे चित्र आले. हे एक दुसरे उदाहरण आहे, मिडजर्नी बॉट (bot) काम कसे करते याचे. 

अशा दोन चार प्रकारच्या आज्ञा दिल्यानंतर हे फायनल चित्र मिळाले. आणि आश्चर्य म्हणजे हे मोनालिसाचे पुरुष रूप बऱ्यापैकी मूळ मोनालिसा सारखे दिसते. 

आज असंख्य प्रकाराचे कला प्रकार, स्टाईल, सुप्रसिद्ध पेंटर्स, महान पेन्टिंग्ज, रंगसंगती, मटेरीयल, प्रकाश योजना, काळ, छायाचित्रे, पोत, पॅटर्न्स, शैली, भौगोलिक माहिती, सांस्कृतिक माहिती; वातावरणाची माहिती इत्यादी प्रकाराची माहिती  शिकून AI कोणतीही निर्मिती करण्यास सज्ज आहे. 

आता तुम्ही काय कराल? एखादा कलाकार आपली सर्जनशीलता वापरून जर एखादी कला निर्मिती करण्यासाठी त्याला सुचलेल्या संकल्पना पूर्णत्वास  येण्यासाठी त्याला अभ्यास करावा लागतो. मग तो ती कला निर्मिती करू शकतो, एखादे पात्राचे चित्र काढायचे असेल तर त्यालाही हा अभ्यास करावा लागतो. हेच कलाकार आपल्या कल्पना निर्माण करण्यासाठी जर AI वापरू लागले तर त्यांना खूपच  मदत होईल.

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रफिक अनादोल या आर्टिस्टने बनवलेली कलाकृती

AI कडे जर एक साधन म्हणून पाहिले  तर आपल्या नव निर्मितीसाठी ते खूपच उपयोगी ठरेल, जसे इतर क्षेत्रात AI चा वापर करून आपण असंख्य शोध लावत आहोत, ब्रम्हांडाचे गुपित शोधत आहोत, औषधांचे शोध लावत आहेत, उर्जेचे नवीन साधने शोधत आहोत, तेच यातून अपेक्षित आहे.

जगात अनेक कलाकार आहेत जे AI चा वापर करून आश्चर्यचकीत करणारी कला निर्मिती करीत आहेत, म्हणून कलाकारांनी अभ्यास करून याचा वापर करण्याकडे लक्ष द्यावे.

म्हणजे AI उदयामुळे, कलाकृती तयार करण्याच्या प्रक्रियेतून न जाता कलाकारांना स्वतःला व्यक्त करणे सोपे होते. ती कशी वापरली जाते यावर सारे  अवलंबून आहे, lकाही लोक याकडे सकारात्मकतेने पाहतील तर काही नकारात्मकतेने बघतील. कला निर्मितीमध्ये AI ची भूमिका आणि कलाकार व AI यांच्यातील संबंध अजूनही विकसित होत आहेत. ही एक मोठी प्रक्रिया आहे.

AI चा कलाविश्वावर प्रभाव

काही लोकांचा असा विश्वास आहे की हे नवीन प्रकारचे तंत्रज्ञान समाजात माणसांची जागा घेईल आणि त्यामुळे मानवावर आधारित कलेची गरज भासणार नाही.  AI हे रेखाचित्र किंवा चित्रकला यासारखी काही महागडी कामे देखील करू देते, त्यामुळे ज्यांची उपजीविका अशा स्कील्ड कलाकारावंर आहे त्यांचे काम कमी होऊ शकतं.

AI ची अजून एक गोष्ट लोकांना भितीदायक वाटते ती म्हणझे त्याची गती, काही सेकंदात  कोणतंही  आर्टवर्क माणूस तयार करू शकत नाही, असंख्य कोटीलीत प्रोसेसिंग पॉवर असणारी साधनेच अतिशय वेगाने चित्र, फोटो, पेंटींग काढू शकते, त्यामुळे वेगात काही तयार करायचे असेल  तर लोक माणसापेक्षा AI ला निवडतील.

आयडा ही एक रोबोट स्वरूपातील स्त्री चित्रकार आहे. तिने तयार केलेलं चित्र. सोबत एडन मिलर हा तिचा संशोधक.

जसे AI मुळे अगदी IT क्षेत्रातील एकसारखी कामे करणाऱ्या नोकऱ्या कमी झाल्या, बँकींग, अकाऊंटींग, कार निर्मितीचे कारखाने व अशा अनेक क्षेत्रात नोकऱ्यांचे automation किंवा यांत्रिकीकरण झाले त्यामुळे अनेक नोकऱ्या गेल्या तसे इथे होऊ शकते, हा धोका जवळजवळ सगळ्याच क्षेत्राला आहे.

भूतकाळात सिनेमाचं पोस्टर रंगविणारे कलाकार होते ते आता दिसत नाहीत, कारण डिजीटल तंत्रज्ञान आणि फ्लेक्स सारखी मोठ्या फॉरमॅटवर प्रिंटींग करण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले तसेच, या क्षेत्रातही होईल.

मिडजर्नी या बॉटमध्ये एम एफ हुसेन, भारतमाता असे किवर्डस टाकले असता हे चित्र तयार होते. या चित्राचे मूळ कलाकृतीशी काहीही साम्य नाही पण एक स्वतंत्र कलाकृती म्हणून हे उत्तम काम आहे.

नवीन संधी 

तंत्रज्ञानाच्या नाविन्यामुळे अनेक नोकर्‍या जातात पण नवीन संधी निर्माण होतात, जगात ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या NFT तंत्रज्ञानामुळे आता मूळ निर्मिती करणाऱ्यां कलाकारांना पूर्ण श्रेय मिळू शकते, त्यात कोणीच बदल करू शकत नाही, ही आर्टिस्ट लोकांसाठी चांगली गोष्ट आहे.

थोड NFT बाबत सांगतो, मोजक्याच आर्टिस्टची कला विकली जाते, त्यासाठी अनेक क्युरेटर्स आणि लिलाव करणाऱ्या संस्था आहेत, आणि त्यांच एक गणित आहे, त्याबाबत सगळ्यांना माहीत असेलच. पण NFT तंत्रज्ञान आल्यापासून अनेक आर्टिस्ट आपले आर्टवर्क त्यावर विकू लागले आहेत, त्यांची कॉपीराईट मूळ आर्टिस्टकडे तसेच ठेवून, त्याचे ऑक्शन केले जाते आणि त्याचे भाव वाढत जातात, आणि जेव्हा जेव्हा ते विकले जाते तेव्हा तेव्हा मूळ कलाकाराला काही टक्के रॉयल्टी मिळते, हे सगळं ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्यामुळे आर्टिस्ट लोकांना मोठी नवी संधी आहे, आणि तुम्ही जर AI चा वापर करून गतिने निर्मिती करून शकलात तर यात तुमचाच फायदा आहे.

तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मेटाव्हर्स तयार होत आहे, मेटाव्हर्स म्हणेज व्हर्चुअल रिऍलिटी किंवा ऑगमेंटेड रिऍलिटी  वापरून आभासी जग निर्माण करणे आणि त्यात वेगवेगळे अवतार घेवून व्यक्ती त्या जगात, काम, व्यवसाय, मनोरंजन आणि गेमींग करू शकतो. 

मेटाव्हर्स मधे अनेक प्रकारच्या रचना आहेत, गाव, शहर, ऑफिस, मॉल्स, रोड इत्यादी आणि तेथील वातावरण निर्मितीसाठी असंख्य प्रकारचे आर्ट फॉर्म वापरले जातात, त्यासाठी अनेक लोक NFT चा वापर करून आपली कला विकत आहेत. या कलाकारांसाठी नवीन संधी आहेत. 

AI ने तयार केलेल्या चित्राच्या मर्यादा

मी जवळ जवळ दोन दिवस या AI शी खेळत होतो, मला काही गोष्टी जाणवल्या त्या नमुद करतो.

AI ही गणिती यंत्रणा आहे, म्हणजे एखादे चित्र निर्माण करतांना ते आधी माणसाच्या आज्ञनेनुसार आपल्या डेटा-बेस मधे सर्च करते आणि काहीही रँडम चित्रे समोर फेकते, त्यात एखादी लॉटरी लागते.

  • AI ने काढलेल्या अनेक चित्रात  ह्युमन ऍनाटॉमीची वाट लागलेली पाहिली.
  •  AI ही खास करून पश्चिमी देशातील संदर्भ घेत असतो, म्हणून त्याला अजून शिकायचे आहे कळतं. उदाहरण म्हणून आम्ही अजंता येथील पद्मपाणी चित्राशी संबंधित किवर्डस टाकून पहिले. पण कुठलेच रिझल्ट मिळू शकले नाहीत. 
  •   या चित्रात विशिष्ट पॅटर्न्स दिसतात ते जाणकार लोकांना लगेच AI ने केल्याचे ओळखता येतं. सर्वसामान्य लोकांना मात्र कळणार नाही.
  • AI जरी काही चांगली चित्रे तयार करीत असला तरी त्यातून तुम्हाला दिसणाऱ्या भावना बरोबर असतीलच असे नाही.
  •   आज तरी  AI हा ट्रायल अँड एरर  सारखा टुल वाटला, जो सतत शिकत आहे.
  •  AI चित्रात खुपदा त्याची चित्र बनविण्याची ताकद दिसते पण खरी कलात्मकता किंवा डिझाईन किंवा त्यामागचा विचार नीट दिसत नाही.

आयडा या रोबोटने बनवलेले स्केच. यात चित्रतंत्राच्या मर्यादा दिसू शकतात.

एआय हे तंत्रज्ञानाधारित असल्याने तिथे कलाकृती बनवण्याला मर्यादा येतात.  तुम्ही हिंसा, न्यूडिटी याच्याशी संबंधित कलाकृती तयार करू शकणार नाही. कारण अशा स्वरूपाचा डेटा हा ब्लॉक केला जातो. एआयमध्ये जे सध्याचे प्रोटोकॉल आहेत त्यात फेमस पर्सनॅलिटी पण चित्रित करता येणार नाहीत.  उदाहरणार्थ  आपण जर पुतीन न्यूक्लीअर बॉम्बचे बटन दाबत आहे अशी कमांड देऊन चित्र काढायला गेलो तर असे चित्रच तयार होणार नाही, कारण अशा स्वरूपाच्या डेटाला  तंत्रज्ञान विश्वात मान्यता नाही. 

एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केले गेलेले हे चित्र २०१८ मध्ये क्रिस्टीजच्या ऑक्शनमध्ये $432,000 ला विकले गेले.

AI मुळे कायद्याच्या दृष्टीनेही बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. एआयने तयार केलेले आर्ट हे मानवनिर्मित नसून तंत्रज्ञानाने बनवलेले असल्याने त्यावर कॉपीराईट नसतो.  कुठल्याही कलाकृतीला कॉपीराईट असतो पण स्टाईल किंवा शैलीला कॉपीराईट नसतो. आणि AI तर मानव निर्मित कलाकृतीवर प्रोसेस करून आपली कलाकृती तयार करतो. इथे कायद्याचे बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. 

त्यामुळे हा टुल सतत शिकत असल्यामुळे तो खुपदा लवकर काम हवे असणार्‍या कमर्शियल आर्टिस्ट किंवा कलाकार नसलेल्या लोकांसाठी चांगला टुल आहे. पण जे कलाकार किंवा पेंटर आपले काम खूपच  मनस्वीपण करतात आणि त्यात त्यांना निर्मितीचा आनंद असतो  ते AI ला कधीच जवळ करणार नाहीत.

मानवी भावना, सर्जनशीलता, अनुभव इत्यादी घटनाचा विचार करून जर कोणी कलावंत आपल्या कलेत जीव ओत असेल आणि ते बघणाऱ्या रसिकांच्या लक्षात येत असेल आणि विकत घेणाऱ्याला त्याचे मूल्य कळत असेल तर हाडांच्या कलाकारांना AI ची भिती असण्याचे कारण नाही.

पण AI मुळे कलाकार नसलेले लोक अनेक प्रकारची कला बनवू शकतात आणि जसे माहितीची  क्रांती झाली आणि लोकांना वाटले माहीतीचे लोकशाहीकरण झाले आहे…पण काही काळातच विरोधाभासी माहीतीचा कचरा इंटरनेट द्वारे आपल्या पर्यंत येवू लागला… नेमकी हिच भीती मला रसिक म्हणून वाटते, कुणीही  कोणतीही कल्पना AI द्वारे निर्माण करून कलेचं गांभिर्य नष्ट करू शकतं.

पण काही लोक आज जसे प्रोसेस फूड  टाळून नैसर्गिक अन्नाच्या उत्पन्नाची मागणी करतात तसे, अमुक कलाकृती ही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ना बनवता माणसाने बनवली आहे याचे प्रमाणपत्र तयार होईल. आणि मेड बाय ह्युमनची  लाट येईल. पण त्या अगोदर या गोंधळाच्या काळातून कलाकारांना जावे लागेल.

कलाशिक्षणात AI चा वापर करता येईल का यावर निश्चित सांगता येणार नाही, AI कसा वापरवा यावर काही होऊ शकतं पण, एखाद्या व्यक्तीला  आर्टिस्ट व्हायचे असेल तर त्याला फक्त टूल  शिकून येणार नाही, त्याला कलाशिक्षण सतत प्रॅक्टिसद्वारेच आत्मसात करावे लागेल 

थोडक्यात एआय चा उपयोग हा फास्ट काम करण्यासाठी होईल, खास करून कमर्शील आर्टच्या नोकऱ्या घटू शकतात; पण खरी चित्रकारिता जी आहे ज्यात आर्टिस्ट रंग, टेक्श्चर यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर करून आपली खास शैली निर्माण करतो  ते अबाधित राहील. कारण इतक्या खोलवर अभिनव पद्धतीने तंत्रज्ञान सारे  काम करू शकनार नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे आज जसा ऑरगॅनिक वस्तू, खाद्यपदार्थ वापरण्याचा ट्रेंड आहे, त्याला सुखवस्तू वर्गाकडून मागणी आहे तशीच भविष्यात मानवनिर्मित चित्रांना एक खास स्थान असणार. एआय ने प्रचंड वेगाने काम करून जो कचरा निर्माण केला आहे त्यावर उतारा म्हणून ह्युमन टच असलेल्या कलाकृतींना कायमच मागणी राहील. मानवाने बनवलेल्या “मेड बाय ह्युमन” चित्रांना प्रचंड मागणी येईल! त्यामुळेच खऱ्या कलाकाराने या तंत्रज्ञानाला घाबरण्याचे कारण नाही असेच म्हणता येईल.  

– सुनील गजकोश, पुणे 

लेखक हे बर्लिन स्थित  The Cats Whiskers Agency चे सहसंस्थापक आणि डिजीटल प्रमुख. गेली ३२ वर्षे ते डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात विविध पदांवर काम करत आहेत.

****

चिन्हचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.