No products in the cart.
कोरोनोत्तर जेजे !
जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये सध्या भरलेल्या यंदाच्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा, पालकांचा तसेच प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळतो आहे. जेजेच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन सारख्या कठीण काळाच्या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडून एवढ्या तीन महिन्यांच्या कालावधीत निर्माण केलेल्या कलाकृती प्रेक्षकांना भारावून टाकत आहेत. चित्रकला, शिल्पकला, मेटल – क्राफ्ट, सिरॅमिक, टेक्सटाईल, इंटेरियर इत्यादी अनेक कलाकृती तिथं पाहायला मिळाल्या आणि त्यात प्रचंड नाविन्य सुद्धा आढळलं. या प्रदर्शनात चित्रकला विभागात भावेश जाधव यांना प्रथम शासकीय पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांनी मेयो मेमोरियल, क्रांतीबा ज्योतिबा फुले ही दोन पारितोषिकं देखील पटकावली. शासकीय पुरस्काराचा दुसरा मानकरी शमीम खान ठरला असून ग्लॅडस्टन सॉलोमन ( रोख बक्षीस ), मेयो मेमोरियल, गॅलरी आर्ट अँड अप्रोच अशी बक्षिसं देखील त्यांनी पटकावली. चित्रकार रिया चंदवानी यांना तिसरा शासकीय पुरस्कार मिळाला असून त्यांना गॅलरी आर्ट अँड अप्रोच या पुरस्काराचा मान देखील त्यांना मिळाला. हे तीनही विद्यार्थी चित्रकलेच्या चौथ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.
मेटल वर्क विभागात ऋषिकेश चांदगुडे पहिला तर संकेत चौगुले दुसऱ्या शासकीय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. टेक्सटाईल डिझाईन विभागात अस्मिता सासमल हिला पहिला तर काव्या घरत हिला दुसऱ्या पुरस्काराचा मान मिळाला आहे. इंटेरियर डेकोरेशन विभागात वेदिका सनदी ही पहिल्या आणि साहिल जोशी हा दुसऱ्या पुरस्काराचे मानकरी ठरला आहे. सिरॅमिक आणि पॉटरी विभागात अश्वथी अविनाश आणि मृणाल बांदेकर हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या शासकीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर शिल्पकला विभागात चेतन डोईफोडे याला पहिला, वैभव खांडे याला दुसरा आणि शेखर साळुंखे याला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत त्यांच्या कामातून आढळून येत होती. ३० मे रोजी सुरु झालेलं हे प्रदर्शन ५ जूनपर्यंत असणार आहे. कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन ‘चिन्ह’नं केलं आहे.
– गीता कुळकर्णी
Related
Please login to join discussion