Features

‘यांचं डोकं ठिकाणावर आहे का?’

डॉ. संतोष क्षीरसागर यांची जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टच्या प्रभारी अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी करून महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याने आपली लायकी दाखवली आहे. ही इतकी मुजोरी यांच्याकडे कुठून आली? यावरच प्रकाशझोत टाकणारी चिन्हचे संपादक सतीश नाईक यांची लेखमाला आजपासून प्रकाशित करीत आहोत. त्या लेखमालेतला आजचा हा पहिला लेख…

———-

१९८० साली मी इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात उपसंपादक म्हणून प्रवेश केला तेव्हा मी जेजेत ऍडव्हान्सला शिकत होतो. माझ्या आयुष्यातली तब्बल  सात वर्ष मी जेजेच्या निसर्गरम्य परिसरात घालवली होती. त्यामुळे तेव्हापासूनच जेजेविषयी एक विलक्षण ओढ माझ्या मनात सतत राहिली आहे. त्या ओढीनंच मला वेळोवेळी जेजेविषयीच्या बातम्या देण्यास प्रवृत्त केलं. जेजेतून बाहेर पडल्याला आता तब्बल चार दशकं पूर्ण झाली आहेत पण तरीही  ती ओढ तशीच मनात कायम आहे.

 

लवकरच मी सत्तरीत प्रवेश करेन, पण आजही माझ्या मनात जेजेविषयी तीच ओढ आहे, त्या परिसराविषयी तीच आस्था मनात घर करून आहे. आणि म्हणूनच मी जेजेविषयी सातत्यानं -हिरिरीनं लिहितो आहे. अनेकांना या वयातही अंगावर घेतो आहे. अनेक वादळं ओढवून घेतो आहे. जेजे प्रेमापायी या वयातही आर्थिक अरिष्ट ओढवून घेऊन मोठ्या जोमानं खर्चिक  वेबसाईट चालवतो आहे. हे कशासाठी? तर पेपरवाले आपल्या पेपरमध्ये जेजे संदर्भातल्या बातम्या छापणं टाळू लागले तेव्हापासून मला हा आतबट्ट्याचा निर्णय घेणं भाग पडलं. आता माझा वृत्तपत्रसृष्टीशी दुरान्वयानेही संबंध राहिलेला नाही. मी ज्या काळात त्या क्षेत्रात वावरलो ती पिढी देखील बदलली. त्यामुळे आता पत्रसृष्टीत कुणाशीही संपर्क देखील राहिलेला नाही. समजा मी फोन करुन एखादी बातमी दिली तर ती कुणी छापेल याचीही खात्री राहिलेली नाही. किंबहुना जेजे संदर्भात काही वृत्तपत्रात जाणीवपूर्वक दिशाभूल करणाऱ्या बातम्या वारंवार दिल्या गेल्याचे माझ्या लक्षात आले. जी वृत्तपत्रं रात्रीअपरात्री फोन करुन हक्कानं जेजे किंवा चित्रकलेसंदर्भात आपल्याकडून बातम्या घेत होती ती वृत्तपत्रं अशी अचानक जेजे सुधारणेच्या ज्या चळवळीत आपण आहोत तिच्याविषयी अशी एकाएकी विरोधी बातम्या कशा देऊ लागली असा प्रश्न मला पडला, आणि  त्या संदर्भात खोलात जाऊन चौकशी केली असता ही सारी ‘पेड न्यूज’ वाल्यांची करामत असल्याचं निष्पन्न झालं. अरे कर्मा! शेवटी या क्षेत्रातही पेडन्यूजवाले घुसले तर! असं म्हटलं आणि त्यांच्याशीदेखील मुकाबला करायच्या तयारीला लागलो. ही सारी गटारगंगा पुण्यातूनच इथं येऊन पोहोचली आहे इतकंच आता सांगतो आणि वेळ येईल तेव्हा यांचाही बुरखा ओढून टराटरा फाडायला – अगदी नावानिशी, कमी करणार नाही हेही इथंच नमूद करतो.

हे सारं मी आजच का लिहितोय असा प्रश्न तुम्हाला पडेल.

 

याला कारण आहे तो उच्च व तंत्र शिक्षण खात्यानं नुकताच घेतलेला एक भयंकर निर्णय. या एका निर्णयानं जेजेसाठी इतकी वर्ष मी किंवा आम्ही सारे साठीतले माजी विद्यार्थीं  गेली वर्ष दोन वर्षं जो काही लढा लढलो किंवा शासनाच्या निर्णयानुसार जेजे कॅम्पसमधील ज्या चारपाच ज्येष्ठ अध्यापकांनी कोरोना लॉकडाऊनचीदेखील पर्वा न करता आपलं शैक्षणिक कर्तव्य चोखपणे बजावून गेली  पाचसहा वर्षातल्या  रात्री आणि दिवस  डिनोव्होची तयारी करण्यासाठी म्हणून घालवल्या – त्या साऱ्याची माती व्हायची वेळ आली आहे.

 

हे सारं वाचल्यावर ‘उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांचं डोकं तरी ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न तुम्हाला पडला तर त्यात काहीही आश्चर्य नाही. तळपायाची आग मस्तकात जावी असा हा निर्णय आहे. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संगनमतानं जे जे इन्स्टिट्यूटचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर यांचा गेम केला आहे, दोन दशकांपूर्वी मुंबईतल्या एकाहून एक नामचीन गुंडांचे जसे पोलिसांनी फटाफट गेम ‘वाजवले’ होते. नंतर त्याच पोलिसांनी संगनमताने एकमेकांचेदेखील गेम ‘वाजवले’ होते तसाच काहीसा प्रकार आता जेजेच्या (हॉस्पिटल नव्हे – स्कूल ऑफ आर्ट) परिसरात घडला आहे.

महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्यातले वरपासून खालपर्यंतचे अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी गेम वाजवला तो गेली सातआठ वर्षं जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे   प्रभारी अधिष्ठाता म्हणून काम पाहणाऱ्या जेजे अप्लाइडला  साऱ्या वाद विषयांपासून दूर ठेवणाऱ्या डॉ संतोष क्षीरसागर यांचा. एका रात्रीत त्यांनी डॉ संतोष क्षीरसागर यांची गठडी वळली आणि सापशिडीतल्या खेळात सापाने गिळल्यावर जसा खेळणारा पाचपंचवीस घरं खाली येऊन पडतो तशी काहीशी त्यांची अवस्था करुन टाकली.  त्यांना त्यांच्या मूळ पदावर म्हणजे अधिव्याख्याता पदावर आणून बसवलं आणि त्यांच्या जागी नागपूरच्या श्री गिरी नावाच्या अधिव्याख्यात्याना  (हे गृहस्थ आणखी काही महिन्यात निवृत्त होणार आहेत. हे मुळात होते औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात कार्यरत {कार्यरत म्हणजे सतत रजा घेत, त्या संदर्भात ‘चिन्ह’नंच प्रथम खरमरीत बातमी दिली होती} पण त्यांच्या वडिलाना कॅन्सर झाला असल्यानं, त्यांच्याकडं पाहता यावं म्हणून मोठया मिनतवारीनं, म्हणजे दया अनुकंपा आणि सेवानिवृत्तीला आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला शेवटच्या दोन वर्षात आपल्या मूळ गावी किंवा जवळच्या ठिकाणी बदली मागता येते वगैरे नियम, बाबींचा वापर करुन  त्यांनी अलीकडंच आपल्या मूळ गावी म्हणजे नागपूर येथे बदली करुन घेतली होती.) उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्या जागी आणून बसवलं आहे. ‘नगाला नग’ जास्त बोलायचं काम नाही.  आमचं ऐकत नाही काय? सतीश नाईक याना बातम्या पुरवून सरकारची (म्हणजे नक्की कोणाची?) बदनामी करता काय? असे म्हणे त्यांच्यावर (अलिखित) आरोप ठेवले गेले आहेत असे मी ऐकतो आहे. त्या साऱ्याच प्रकरणाचा मी माझ्या या पुढच्या लेखनातून अगदी सडेतोड समाचार घेणार आहे. अगदी काही एक शिल्लक ठेवणार नाहीये.

 

अवश्य वाचा! नुसतं वाचू नका, जेजे वाचवण्याच्या आमच्या चळवळीत सामील व्हा!

 

सतीश नाईक

संपादक, ‘चिन्ह’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.