Features

आजी माजी शिक्षणमंत्री…

दोघांच्या दोन तऱ्हा !

(उत्तरार्ध )
 
या लेखाच्या पूर्वार्धात आपण आताचे गृहमंत्री आणि आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमधील माजी तंत्रशिक्षणमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांची एक तऱ्हा पाहिली. आता दुसरी तऱ्हा पहा महाविकास आघाडीचे सध्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची !
 
यंदाचे विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन २० मार्चच्या सुमारास रत्नागिरीच्या थिबा पॅलेस इथं भरलं होतं. या प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या उत्साहानं आपल्या यु ट्यूब चॅनलवर टाकला आहे. त्यामुळेच हा सोहळा मुंबईत बसून पाहता आला. याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. पण हेच त्यांच्या भाषणाबद्दल देखील म्हणता आलं असतं तर बरं झालं असतं असं विधान मात्र अतिशय खेदानं करावं लागतंय. 
राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांचा शिक्षण क्षेत्राशी किती संबंध असतो असा प्रश्न त्यांचं भाषण पाहून पडला. १६५ वर्ष वयाच्या ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ या प्रख्यात संस्थेचा उच्चार हे सद्गृहस्थ सतत जेजे स्कूल ऑफ ‘आर्टस्’ असा करत होते. जे जे स्कूल ऑफ आर्टचा त्यांनी वारंवार केलेला उच्चार ऐकून माझ्यासारख्या जेजेत शिकलेल्या विद्यार्थ्यांची तळपायाची आग मस्तकात जात होती. उच्च शिक्षणमंत्री म्हणवता आणि १६५ वर्ष वयाच्या कलामहाविद्यालयाचं नाव देखील तुम्हाला धडपणे उच्चारता येऊ नये ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे ! हा लेख वाचल्यानंतर तरी किमान उच्च शिक्षणमंत्र्यांनी आर्ट आणि आर्टस् मधला फरक जाणून घ्यायला हरकत नाही. त्यांना ते शक्य नसेल तर किमान चुकीचे उच्चार तरी टाळावेत अशी अपेक्षा केली तर ती चुकीची ठरेल का ? 
 
आपल्या भाषणाच्या प्रारंभापासूनच श्री उदय सामंत यांनी असंख्य चुकीचे पायंडे पाडले. खरं तर मंत्र्यांनी आपल्या खात्यातील नोकरी करणाऱ्या उच्च पदस्थांखेरीज अन्य कुणाचाही उल्लेख जाहीरपणे करू नये असा अलिखित नियम आहे. पण तो सरळ सरळ धाब्यावर बसवून भाषणाच्या प्रारंभीच व्यासपीठावर बसलेल्यांची नामावली वाचून दाखवली. त्याविषयी नंतर ओघानं लिहीनच. 
 
पण आपल्या भाषणाच्या प्रारंभीच सामंत यांनी ‘दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्र्यांची भेट घेतली’ हा जो उल्लेख केला, तो एक महाराष्ट्र अभिमानी म्हणून माझ्यासारख्या कुणालाही दुखावणाराच होता. जेजेचा माजी विद्यार्थी म्हणून संताप आणणारा होता. काय तर म्हणे, शैक्षणिक दृष्ट्या ज्यांनी सुधारणा केल्या अशा राज्यांना ते पहिले भेट द्यायला गेले ! ते राज्य म्हणजे अर्थातच दिल्ली असणार. कारण अन्य कुठेही शैक्षणिक दृष्ट्या काही सुधारणा झाली असेल याविषयी माझ्यातरी ऐकिवात नाही. ‘आप’ने केलेल्या दिल्लीतल्या प्रयोगाविषयी मात्र मी खूप ऐकून-वाचून आहे. ज्यांनी केवळ दोन टर्ममध्येच एवढी मोठी क्रांती करून दाखवली, त्यांचं कौतुक करायलाच हवं, पण आपण आणि आपल्या सहकारी पक्षांनी इतक्या वर्षात आपल्या राज्यामध्ये काय दिवे लावले हेही जाणून घेणं आवश्यक होतं. ते घेतलं असतं तर ‘आप’च्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा मूर्खपणा त्यांनी निश्चित केला नसता. नेमकं काय साधलं या भेटीनं त्यांनी ? 
 
काय तर म्हणे यांनी त्यांना विचारलं की, ‘त्यांनी जी शिक्षणव्यवस्था उभी केली आहे ती महाराष्ट्रात लागू करायची असेल तर काय करावं लागेल ?’ महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी असा प्रश्न काल-परवा सत्तेवर आलेल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना विचारणं हा त्या पक्षाचा / राज्याचा बहुमान असेल, पण महाराष्ट्रासारख्या प्रागतिक राज्याचा मात्र सरळ सरळ अवमान होता ! हा प्रश्न त्यांनी महाराष्ट्रातल्या असंख्य शिक्षण तज्ज्ञांना विचारला असता तर त्यांनी लगेचच उच्च शिक्षणमंत्र्यांच्या प्रश्नांचं निरसन केलं असतं. तेवढी ताकद मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद इथल्या शिक्षण तज्ज्ञांमध्ये नक्कीच आहे. पण त्याचा काहीच अभ्यास केलेला नसल्यामुळं उच्च शिक्षणमंत्र्यांनी हा प्रश्न त्या मुख्यमंत्र्यांना विचारला. आणि त्या मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते देखील त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं. काय म्हणाले ते मुख्यमंत्री ? तर ते म्हणे म्हणाले, ‘आम्ही इथं आमच्या राज्यात जे शिक्षणविषयक प्रयोग केले ते सारे आम्ही तुम्हाला देऊ, पण त्याबदल्यात म्हणे तुम्ही जे जे स्कूल ऑफ आर्ट या जागतिक दर्जाच्या संस्थेचं उपकेंद्र आमच्या राज्यात काढा. त्यासाठी आम्ही तुम्हाला जागा मोफत देऊ. तुमचे जे कुणी शिक्षक किंवा इतर स्टाफ इथं येतील त्यांचा पगार सुद्धा देऊ, तुमचंच नाव घालू. 
त्यामुळे म्हणे आमच्या शिक्षण व्यवस्थेला मोठी ताकद मिळेल वगैरे वगैरे वगैरे… त्यांचं प्रत्येक वाक्य ऐकत असताना संताप अनावर होत होता. ज्या जे जे स्कूल ऑफ आर्टची ( आर्टस् नव्हे ) महती ते कलाशिक्षक आणि कलाविद्यार्थ्यांसमोर गात होते त्या जे जे स्कूल ऑफ आर्टची त्यांनी गेल्या ३० वर्षात काय धूळधाण करून ठेवली आहे ते तरी त्यांना ठाऊक आहे का ? 
 
आज भारतात एकमेव असलेल्या कला संचालनालयाला कलासंचालक नाही. राज्यातल्या चार कलाशिक्षण महाविद्यालयांपैकी दोन कला महाविद्यालयाला अधिष्ठाता पदं वर्षानुवर्षे रिकामी आहेत. जे कुणी दोन अधिष्ठाता आहेत त्यांच्याविषयी काही बरं बोलावं अशी देखील परिस्थिती नाही. प्राध्यापकांची बहुसंख्य पदं रिकामी आहेत, व्याख्यात्यांची ९०% पदं रिकामी आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं तर मोठ्या संख्येनं रिकामी आहेत. शिपाई, हवालदार, ही पदं देखील भरली गेलेली नाहीयेत. मुलांचं जे काही शिक्षण चाललंय ते कंत्राटी शिक्षकांच्या जीवावर चालू आहे. जे काही शिक्षक या कला महाविद्यालयात कायमस्वरूपी आहेत त्यांनी जेजेची टेबल स्पेस वापरून जे जे काही उद्योग केले आहेत किंवा करत आहेत त्याविषयी काही बोलण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट हे शिकण्यासाठी आहे की सरकारी कामाची कंत्राटं घेण्यासाठी आहे ? असा प्रश्न पडावा, असं त्यांचं वर्तन आहे. अशी सारी परिस्थिती असताना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत जेजेसंदर्भात जे काही तारे तोडत होते ते ऐकवत नव्हते. ठीक आहे, रत्नागिरीकरांना हे सारं नवीन असेल, पण आमच्यासारख्यांचं काय ? आम्ही हे शांतपणे ऐकून घ्यावं अशी सामंतांची अपेक्षा आहे का ?
 
काय काय मुक्ताफळं उधळलीत त्यांनी ? एखादा मंत्री आपल्या खात्याच्या पीएलए अकाउंट संदर्भात जाहीरपणे बोलू शकतो का ? आपल्या खात्यात किती पैसे आहेत हे सांगू शकतो का ? पण तोही पराक्रम उच्च शिक्षणमंत्र्यांनी करून दाखवला. ही अत्यंत आक्षेपार्ह आहे, पण कुठलाही विधिनिषेध न बाळगता श्री सामंत आर्थिक बाबींवर बोलत राहिले. काय तर म्हणे जे जे स्कूल ऑफ आर्टला दहा कोटी दिले ! आणि त्यातले म्हणे दहा लाख देखील खर्च झाले नाहीत. खरोखरच जेजेला दहा कोटी दिलेत ? आणि त्यातले दहा लाख देखील खर्च झाले नसतील तर ती जबाबदारी देखील तुमचीच नाही का ? कारण ते खर्च करण्याची लायकी नसलेली माणसं तुम्ही तिथं नेमलीत ही तुमचीच चूक नाही का ? खरं तर गेल्या सहा-सात वर्षात अर्थसंकल्पाच्या वेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या मोठमोठाल्या रकमा वाहिन्यांनी हायलाईट केल्या होत्या. वृत्तपत्रांनी त्याच्या चौकटी केल्या होत्या. त्यातले किती पैसे जेजेच्या खात्यात पडले ? आणि किती खर्च झाले ? पडले तर का नाही पडले ? आणि पडले तर किती पडले आणि ते कुठे खर्च झाले ? हा खरोखर संशोधनाचा विषय होऊ शकतो. आहेत का या प्रश्नांची मंत्री महोदयांकडे उत्तरं ? आमची तर माहिती अशी आहे की हे पैसे कला संचालनालयाकडे किंवा जे जे स्कूल ऑफ आर्टकडे आलेच नाहीत. ( जे काही आले त्याची कशी विल्हेवाट लावली गेली हे देखील आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. ) असे असताना उच्च शिक्षणमंत्री ते आले असल्याची निखालस, खोटी ठरतील अशी विधानं कशी काय करत होते ? हे सारं भयंकर आहे ! या माध्यमातून या साऱ्याचा परामर्श लवकरच आम्ही घेणार आहोत. 
 
लिहिण्यासारखं बरंच काही आहे आणि आम्ही लिहिणार देखील आहोत. पण तूर्त इतकेच पुरे ! 
 
– सतीश नाईक 
संपादक

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.