Features

गुढी पाडव्याला आम्ही येतोय !

आज २ मार्च… ज्या संस्थेत मी शिकलो त्या जे जे स्कूल ऑफ आर्टचा ( ‘आर्टस्’चा नव्हे ). आज वर्धापनदिन. २ मार्च १८५७ साली मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली. त्या घटनेला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. मी त्या संस्थेत शिकलो याचा मला अभिमान आहे. कलाक्षेत्रात जे काही थोडं बहुत काम केलं आहे त्याचं श्रेय मी त्या वास्तूला किंवा त्या परिसरालाच देतो. आयुष्यातली सात वर्ष मी त्या वास्तूत, त्या परिसरात काढली.

सकाळी उठायचं, अंघोळ करायची आणि थेट जे जे स्कूल ऑफ आर्ट गाठायचं आणि दिवसभर जे जे मग नाटकाच्या तालमी वगैरे आटोपून रात्री कधीतरी घरी परतायचं असा तो मंतरलेला काळ होता. खूप लिहिलं, खूप वाचलं, खूप पाहिलं, खूप ऐकलं. जे केलं ते अगदी रसरसून केलं, अनुभवलं. म्हणूनच त्या वास्तूविषयी, परिसराविषयी मी आत्यंतिक हळवा आहे.

या वास्तूत शिकत असतानाच मी थेट मेनस्ट्रीम पत्रकारितेत प्रवेश केला आणि मग या परिसरात खटकलेल्या गोष्टींना हळूहळू प्रसिद्धी देऊ लागलो. त्यावेळी दिलेल्या बातम्या कलावर्तुळात अतिशय गाजल्या. आतासारखं नव्हतं त्या काळात. त्यामुळे दिलेल्या बातमीचा खूप मोठा परिणाम व्हायचा, तात्काळ सुधारणा व्हायची. नंतर हळूहळू मोठे बदल एकूण समाजातच होत गेले. कलाक्षेत्र देखील त्याला अपवाद राहिलं नाही. पत्रकारितेचं देखील तेच झालं. चुकीच्या माणसाच्या हातात संस्था गेल्यावर जे होतं तेच जेजे परिसरात मोठ्या प्रमाणावर झालं. त्यासाठी नको नको त्या गोष्टींचा वापर केला गेला ज्यात माझ्यासारख्या माणसाला उभं राहता येणं शक्यच नव्हतं. अनेकदा बॅकफुटवर गेलो. जाऊदे, मरूदे, आपल्याला नको ती कटकट, असं म्हणत अनेकदा बाजूला देखील झालो. पण काय त्या वास्तूची मोहिनी होती की पुन्हा पुन्हा त्यात अडकतच राहिलो.

२००८ साली तर जे जे परिसराची अवस्था पाहून ‘चिन्ह’चा ३५० पानांचा अख्खा अंक काढला. संबंधितांवर अक्षरशः आसूड ओढले. सगळंच बंद झालं नाही, पण किमानपक्षी थांबलं तरी. वाताहत इतकी झाली होती की ती सावरणं नंतर कुणालाही शक्य झालेलं नाही. नंतर आणखीन एक मोठा काळ गेला. ‘चिन्ह’चं यु ट्यूब चॅनल सुरु झालं आणि या अत्यंत प्रभावी माध्यमाचा वापर यासाठी करायचं ठरलं. त्यामुळं बरंच काही घडलं, घडतं देखील आहे. पण त्याविषयी मी काही बोलणं योग्य नव्हे. ती कदाचित आत्मस्तुती ठरेल. मी जे काही केलं ते बरं असेल तर त्याची इतिहासात नोंद होईलच आणि समजा नाही झाली तर त्यामुळे माझं काहीच बिघडत नाही. ती व्हावी म्हणून मी हे सारं काही केलं नव्हतं.

बरीच वर्ष झाली या साऱ्याला. पुलाखालून खूपसं पाणी वाहून गेलं आहे. पण परिस्थिती मात्र आणखीन आणखीन वाईट होत चालली आहे. पण केंद्राच्या शैक्षणिक धोरण बदलण्याच्या निर्णयामुळं या परिसराला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि दुसरं म्हणजे याच परिसरातल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेतलेला माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे आशेला अजूनही जागा आहे. ( आशा कधीच मरत नसते )

म्हणूनच आणखीन बरोबर एका महिन्यानं म्हणजे २ एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘चिन्ह’चं नवं धाडस ‘Chinha Art News’ या पोर्टलच्या रूपानं आपल्या भेटीला येणार आहे. बरंच काही असणार आहे त्यात. जेजेवर विशेष वृत्तांत तर प्रसिद्ध होतीलच, पण त्याचबरोबर दररोज एक विशेष असं कलाविषयक फिचर आम्ही देणार आहोत. याखेरीज कलाक्षेत्रातल्या सर्वच बातम्या आपणास येथे वाचावयास मिळतील. भारतात दृश्यकलेच्या क्षेत्रात कुठं काय चाललंय ? याचं दर्शन आपल्याला एक बटन दाबताच चक्क आपल्या हातातल्या मोबाईलमध्येच होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छित असाल तर कृपया आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम यावर फॉलो करा. किंवा 90040 34903 या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर ‘BG’ हा मेसेज पाठवून ब्रॉडकास्ट ग्रुपमार्फत आमचे अपडेट्स मिळवा. फेसबुक वापरत नसाल तर ‘NOT ON FB’ एवढाच मेसेज पाठवा म्हणजे आमच्याकडून सारे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आणखीन बरंच काही सांगायचं आहे, पण तूर्त इतकंच !

सतीश नाईक

संपादक ‘चिन्ह’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.