No products in the cart.
राखेतून भरारी !
शिल्पांच्या अनेक व्यावसायिक कामांनी आणि मुख्य म्हणजे स्टुडियोला लागलेल्या आगीमुळे ज्याचं नाव सर्वतोमुखी झालं ते अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे हे देखील आमच्या जे जे स्कूल ऑफ आर्टचेच. मी ८१ मध्ये माझं जेजेतलं शिक्षण संपवलं आणि त्याच्याच एक वर्षाआधी प्रमोद जेजेमध्ये येऊन दाखल झाला होता. जेजेमध्ये ऍडव्हान्सलाच शिकत असताना मी पूर्णवेळ मेनस्ट्रीम पत्रकारितेत प्रवेश केला होता. त्यामुळे जेजेमध्ये त्याचा माझा फारसा संबंध कधी आलाच नाही. तो खऱ्या अर्थानं आला तो ‘चिन्ह’चं पुनःप्रकाशन सुरु झाल्यानंतरच. त्याचा कधीही फोन येई आणि मग बराच वेळ तो अंकाच्या मजकुराविषयी बोलत राही. त्याचं वाचन चांगलंच होतं. शिल्पकलेच्या क्षेत्रात काम करून देखील त्यानं आपलं वाचन अतिशय अद्ययावत ठेवलं होतं. नगरमधले काही पत्रकार देखील त्याच्या रोजच्या बैठकीतलेच होते. त्यामुळे आमचं छान जमून गेलं. कलेच्या संदर्भात भरपूर गप्पा होत फोनवर. विशेष करून ‘चिन्ह’च्या अंकातल्या लेखांवरून अधिक चर्चा होई. बोलता बोलता तो आपली मतंही सांगे आणि असंख्य आठवणी देखील !
शिल्पकार प्रमोद कांबळे हा असाच फोनवरूनच मला उलगडत गेला. एका वर्षी असाच त्याचा फोन आला. म्हणाला, मला जाहिरात द्यायची आहे ‘चिन्ह’ला. म्हटलं, दे की ! तेव्हढाच आमच्या कामाला हातभार लागेल. मग मी त्याला रेटकार्ड पाठवलं. त्या काळात नेट वगैरे नव्हतं त्यामुळे सर्व व्यवहार पोस्टानेच करावे लागायचे. रेटकार्ड मिळताच त्याचा लगेचच फोन आला. म्हणाला, बॅकपेज बुक करा. मी आपला सहज म्हणून गेलो, अरे तिथे रंगीत जाहिरात छापावी लागते आम्हाला. तर तो अगदी सहजपणे म्हणाला, काही हरकत नाही, मी रंगीत जाहिरातच देतो. असा तऱ्हेनं प्रमोद ‘चिन्ह’परिवारात येऊन दाखल झाला. मग अंक सुरु असेपर्यंत दरवर्षीच त्याच्या जाहिराती येत गेल्या.
एके दिवशी त्याची माझी जहांगीर आर्ट गॅलरीत भेट झाली. भरपूर गप्पा मारल्या आम्ही. त्याचा एकूण अवतार, प्रचंड धावपळ आणि सतत कामाविषयी बोलणं हे मला अतिशय आवडून गेलं. त्याचवेळी त्यानं मला नगरला येण्याचं निमंत्रण दिलं. पण तसाही मला फिरण्याविषयी फारसा उत्साह नसल्यामुळं मी आपला येऊ येऊ वगैरे म्हटलं. पण नंतर मात्र मला नगरला जावंच लागलं. याचं कारण त्यानं सांगितलेला अफलातून किस्सा ! तोपर्यंत नगरच्या महावीर आर्ट गॅलरीमध्ये भिंतीवर त्यानं जी रेखाटनं केली होती त्याविषयी मी ऐकून होतो, पण एके दिवशी त्यानं त्याच्या कामाविषयीचा एक अफलातून किस्सा सांगितला. आणि मग मात्र मला त्याच्याविषयी अधिक कुतूहल वाटू लागलं. तो किस्सा असा होता की, नानाजी देशमुखांच्या ‘चित्रकूट’साठी त्याला वन्य प्राण्यांची शिल्प घडवण्याचं काम मिळालं होतं. नानाजींनी त्याची स्केचेस पाहिली, काही मिनिएचर्स मॉडेल्स पाहिली आणि त्याला काम देऊनच टाकलं.
त्यासाठी पहिलंच शिल्प त्यानं घडवलं ते वाघाचं ! खूप अभ्यास करून त्यानं मातीत ते शिल्प तयार केलं. मग फायबर मोल्ड काढून फायबरमधलं शिल्प तयार झाल्यावर त्यानं ते सहज म्हणून स्टुडियोसमोरच्या शेतात ठेवलं. रात्री कुत्री प्रचंड भुंकू लागली. त्या वाघाच्या शिल्पापासून शंभर दीडशे फूट लांबून ती कुत्री घोळक्या घोळक्यानं जणू काही वाघ आला असं समजून त्या शिल्पावर भुंकत होती. दोन-तीन रात्री हाच प्रकार चालला. प्रमोद सांगत होता, ही माझ्या शिल्पाला मिळालेली पहिली खरीखुरी दाद होती.
दुसरा किस्सा देखील असाच होता. एक उंटवाला आला उंट घेऊन त्या रस्त्यावरून जात होता. उंटानं शेतात उभा असलेला वाघ पाहिला मात्र आणि तो लांब लांब तंगड्या फाकवुन उलट्या दिशेनं पळत सुटला. पुढं उंट धावतोय आणि मागे उंटवाला. अशी ती शर्यत पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचं अक्षरशः मनोरंजन झालं. तोपर्यंत फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीत प्रमोदनं मला असे असंख्य किस्से ऐकवले होते. त्यामुळे २००६ सालच्या ‘चिन्ह’च्या अंकात प्रमोदवर लेख प्रसिद्ध करायचा, असं मी ठरवलं. त्यासाठी मग मी आणि कमलेश देवरुखकर असे दोघेही नगरला गेलो. दोन-चार दिवस राहिलो. प्रमोदचा तो सारा व्याप न्याहाळला, त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या आणि मग कमलेशनं त्यावर एक प्रदीर्घ लेख लिहिला. तो ‘गायतोंडे विशेषांक’ होता आणि त्यातच प्रमोदचा हा लेख प्रसिद्ध झालेला. आणखीनही बरेच लेख त्यात होते. साहजिकच तो अंक अतिशय गाजला आणि संपून देखील गेला ( कृपया त्या अंकासंबंधी आता कुठलीही विचारणा करू नये, त्या अंकाची एकही प्रत आता शिल्लक नाही. मात्र एवढं निश्चित सांगेन की ‘व्यक्तिचित्र पण शब्दातली’ या आगामी ‘निवडक चिन्ह’च्या तिसऱ्या आणि अखेरच्या खंडासाठी तो आम्ही निवडला आहे ).
प्रमोद यशाच्या अशा असंख्य पायऱ्या चढत वर गेला. २०१८ सालातली गोष्ट. झोपायला जाण्याआधी हेडलाईन पाहण्यासाठी सहज म्हणून टीव्ही ऑन केला तर बातमी होती नगरमधल्या प्रमोद कांबळे यांच्या स्टुडियोला भीषण आग ! आगीची भीषण दृश्य पाहून अक्षरशः घाम फुटला. दुसऱ्या दिवशी प्रमोदला फोन केला, पण तो काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. खूप वाईट वाटलं होतं आणि काय बोलायचं हे देखील कळत नव्हतं. नंतर मात्र फोनवरचं बोलणं तुटलं ते तुटलंच ! त्याआधी आठवड्यातून एकदा तरी प्रमोदसोबत फोनवर बोलणं व्हायचं. पण त्या घटनेनंतर मात्र आमचा संपर्क तुटला तो तुटलाच. त्याच्या माझ्या अनेक कॉमन मित्रांकडून त्याची ख्याली खुशाली कळायची, पण का कुणास ठाऊक बोलणं थांबलं ते थांबलंच.
आता ‘गच्चीवरील गप्पां’च्या कार्यक्रमात त्याला बोलवायचं खूप आधीच निश्चित केलं होतं. पण मग मी ठरवलं की ज्यांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही अशांचीच आधी निवड करायची. प्रमोदचं नाव त्याच्या कामानं कलावर्तुळात सर्वतोमुखी झालं होतं. आणि २०१८ सालातल्या त्या आगीनं तर तो टीव्ही असलेल्या प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचला होता. एबीपी माझावरचा त्याचा ‘माझा कट्टा’ तर प्रचंडच गाजला होता. म्ह्णूनच त्याचं नाव थोडंसं मागे ठेवलं होतं. पण ७० कार्यक्रम झाल्यानंतर अलीकडंच त्याला कार्यक्रमाच्या निमंत्रणाविषयी पूर्वसूचना देणारा व्हॉट्सअप मेसेज पाठवला होता. त्यावर लागलीच त्यानंही होकार देणारा मेसेज पाठवला, आणि काय आश्चर्य बघा, त्याच आठवड्यातला आमचा एक कार्यक्रम रद्द झाला. आणि प्रमोदला फोन केला. त्यानंही लागलीच होकार दिला. येत्या शनिवारी म्हणजे १२ मार्च रोजी सायंकाळी ०५.३० वाजता ‘गच्चीवरील गप्पा’ कार्यक्रमात लाईव्ह येणार आहे. प्रमोदविषयी सांगण्यासारखं आणि लिहिण्यासारखं देखील खूप आहे. त्या भीषण घटनेनंतर त्याच्याही आयुष्यात खूप घडामोडी घडल्या आहेत. त्या साऱ्यांविषयी मी त्याला बोलतं करणार आहे. अवश्य ऐका !
Related
Please login to join discussion