No products in the cart.
जेजेत चित्रांना सुद्धा बांबू लागतो तेव्हा …..
‘ गच्चीवरील गप्पा ‘ या कार्यक्रमाच्या १०० भागानंतर काय करणार ? असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता . काहींचं म्हणणं असं होतं की हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा . तर काही म्हणत होते तो १५ दिवसातून एकदा करावा . कुणी काही – कुणी काही , सांगतच होते . मला मात्र शंभरावा कार्यक्रम कधी संपतो आणि आपण थोडीशी का होईना विश्रांती कधी घेतो असं काहीसं झालं होतं . कारण तब्बल दोन वर्ष या कार्यक्रमामुळं मी कुठल्याच शनिवारी घराबाहेर पडू शकलो नव्हतो .अगदी आर्ट गॅलरीला देखील जाऊ शकलो नव्हतो . नाही म्हणायला अच्युतच्या कार्यक्रमाच्या वेळी मी तो कार्यक्रम आधी रेकॉर्ड करून अजिंठयाच्या सेमिनारला गेलो होतो . तेव्हडाच काय तोच अपवाद . साहजिकच १०० कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन शनिवारी मी शांत बसून राहणंच पसंत केलं .
दोन तीन आठवड्याच्या विश्रांती नंतर मात्र डोकं चालू लागलं . ‘ गप्पा’च्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मी दीड दोन तासांच्या कार्यक्रमाचा चांगलाच अनुभव घेतला होता .समोरचा कलावंत काही एक पोज घेऊन बोलू लागला किंवा रटाळ उत्तर देऊ लागला की काही वेळा कानकोंडं वाटू लागे . वारंवार सुचवून देखील त्यात सुधारणा ना झाल्यास क्वचित प्रसंगी लाईव्ह कार्यक्रमात चक्क डुलकी लागण्याची आफत देखील मी अनुभवली होती . साहजिकच नवा कार्यक्रम फार तर ३० मिनिटापेक्षा जास्त काळ न चालणारा असावा हे मनाशी आधीच पक्कं झालं होतं . त्यात करंट टॉपिक्स असतील हे देखील मनाशी आधीच पक्कं झालं होतं . त्या कार्यक्रमाला ‘ पॅलेट ‘ हे शीर्षक देखील असंच पटकन सुचून गेलं .
तर असा तो ‘ पॅलेट ‘ नावाचा नवा कोरा कार्यक्रम येत्या बुधवार पासून तुमच्या भेटीला येतो आहे . युट्यूबच्या थंबनेल मध्ये जे शीर्षक दिलं आहे ते कदाचित अनेकांना खटकेल ,रस्त्यावरची भाषा वापरायला नको होती असेही काहींना वाटू शकेल . काहींना तर ते अश्लील देखील वाटण्याची शक्यता आहे , पण घडले अगदी असेच असल्यामुळे त्याला माझा नाईलाज आहे . काय ते मात्र मी आता सांगणार नाही . त्या साठी तुम्हाला तो कार्यक्रमच पाहावा लागेल .
गेली ३०-३५ वर्षे कला संचालनालय आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट यांच्यात मंत्री संत्रीआणि त्यांचे खासगी सचिव , शासकीय अधिकारी यांनी संगनमतानं केलेल्या अफाट अशा भ्रष्टाचारासंदर्भात ‘ चिन्ह ‘नं जो आवाज उठवला होता तो किती रास्त होता , त्याचा हा कार्यक्रम जिता जागता पुरावाच ठरणार आहे .
गेल्या तीन दशकात या साऱ्या भ्रष्ट यंत्रणेनं पैसे खाऊन ( आणि माती देखील खाऊन ) एकाहून एक नालायक माणसांच्या नेमणुका जेजे आणि कला संचालनालयात घडवून आणल्या परिणामी महाराष्ट्र शासनाला आता कला संचालक पद देखील भरणं दुरापास्त होऊन बसलंय . जेजेत शिकलेल्या उमेदवारांना कटाक्षानं टाळून अनुदानित आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयातील आचरट आणि बेअक्कल शिक्षकांच्या नेमणुका लोकसेवा आयोगाकडून जेजेत केल्या गेल्यानं १६५ वर्ष जुन्या जेजेच्या व्यवस्थापनात अभूतपूर्व गोंधळ माजवला गेला .
परिणामी हॉबी क्लासमध्ये प्रवेश घेण्याची देखील पात्रता नसलेल्या एका परदेशी वकिलातीच्या अधिकाऱ्याच्या मुलीला थेट मुंबई विद्यापीठाच्या बीफए- एमएफएच्या वर्गात प्रवेश दिला गेला .’चिन्ह’नं प्रकरण बाहेर काढलं . कारवाई नाही !
दुसऱ्या एकानं तर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकात दुय्यम दर्जाचं मेटल मिसळलं , प्रकरण बाहेर आलं . विधानसभेत मुख्यमंत्र्याना माफी मागावी लागली . कारवाई नाही !
आणखी एकानं जातीचा खोटा दाखला दाखवून उपकलासंचालकाचं पद ढापलं . कारवाई नाही !
शासकीय नोकरीत निलंबित झालेल्या आणखी एका बेशरम अधिकाऱ्यानं उप कला संचालकपद पटकावून प्रचंड भ्रष्ट्राचार केला . कारवाई नाही !
आणखी एकानं तर जेजेच्या हेरिटेज इमारतीत नको नको ते बदल केले , कारवाई नाही !
याच इसमानं जेजेच्या संग्रहातली आज कोट्यवधी रुपयांची किंमत असलेली शेदीडशे दुर्मिळ चित्रं साबणाच्या पाण्यानं धुवून काढली आणि खराब झाली म्हणून नंतर जाळून टाकली. ‘चिन्ह ‘ नं प्रकरण बाहेर काढलं . कारवाई नाही !
याच बेअक्कल माणसानं गायतोंडे यांचं विद्यार्थी दशेत रंगवलेलं एक दुर्मिळातलं दुर्मिळ मोठं चित्रं छोट्या फ्रेममध्ये बसवण्याच्या अट्टाहासाने करवतीने कापून टाकलं आणि कापताना ते दुभंगलं . प्रकरण बाहेर आलं . कारवाई नाही !
आणि आता तर याच कालावधीत दुबई निवासी चित्रकार संतोष मोरे यांनी सुमारे २५ -३० वर्षांपूर्वी विद्यार्थीदशेत रंगवलेल्या भल्याथोरल्या म्हणजे सात बाय नऊ किंवा दहा फूट इतक्या विशाल चित्राच्या चिंध्या झाल्याचे उघडकीला आलं आहे . जवळ जवळ २५ वर्षे झाली या चित्राची दुर्दशा होण्यास सुरवात झाल्याला पण एकाही अधिष्ठात्याला वाटू नये की त्या चित्राचं काही तरी करावं ? जिथं चित्रकला शिकवली जाते तिथल्या एकाही शिक्षकाला वाटू नये की आपल्याच एका माजी विद्यार्थ्यांच्या चित्रासाठी आपण काही तरी करावं ! इतकी वर्ष काय डोळे बांधून जेजेतला सारा व्यवहार करत होते काय ? काय आहे का उत्तर ? ‘चिन्ह’चा अंक वाचणाऱ्या विद्यार्थ्याला नापास करुन टाकण्याची धमकी देणारे ते बाणेदार शिक्षक देणार आहेत का आमच्या या प्रश्नाची उत्तरं ?
कार्यक्रमाचं रेकॉर्डिग चालू असताना चित्रकार संतोष मोरे यांना आपल्या भावना लपवता आल्या नाहीत . झाला प्रकार कथन करताना त्यांना अश्रू आवरता येईना . कसाबसा मी तो कार्यक्रम आवरता घेतला . नंतर ते रेकॉर्डिंग देखील मी पाहू शकलो नाही . पण तुम्ही मात्र कार्यक्रम कसा वाटला ते कळवायला विसरु नका ! येत्या बुधवारी म्हणजे २ नोव्हेम्बरला सायंकाळी ७ वाजता ‘ चिन्ह ‘च्या यूट्यूबचॅनलवर तुम्हाला या कार्यक्रमाचा प्रीमियर पाहता येईल !
*****
– सतीश नाईक,
मुख्य संपादक,
chinha.in
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion