No products in the cart.
- Home
- Uncategorized
- सापशिडीच्या खेळातलं प्यादं !
सापशिडीच्या खेळातलं प्यादं !
चित्रपट कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या एनडी स्टुडिओमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आली आहे. नितीन मूळचा मुलुंडकरच. मी ९० मध्ये मुलुंडमध्ये राहावयास आलो. आम्ही एकाच क्षेत्रातले. म्हणजे चित्रकला क्षेत्रातले. मी जेजेचा आणि तोही एक वर्ष आधी जेजेत होता पण नंतर वांद्र्याच्या रहेजामध्ये शिकायला गेला.
त्याचे आणि माझे कॉमन मित्र होते. माझे एक नातेवाईक देखील त्याचे अगदी जवळचे मित्र होते. पण कसं कुणास ठाऊक त्याचा माझा कधीही फारसा संबंध आला नाही. नीतिन आरेकर यांच्यासारखे त्यांचे मित्र किंवा खरं तर कर्जतमधले शेजारी, – मला अनेकदा म्हणत असत की तुमची आणि नितीनची भेट घालून देतो. एकदा कर्जतला या, स्टुडिओही पाहता येईल, गप्पाही मारू वगैरे. पण नाही जमलं ते कधी कारण मी माझ्याच व्यापांमध्ये अतिशय गुंतलेलो किंवा कदाचित असंही असेल की हे चित्रपट वगैरे ग्लॅमरचं क्षेत्र मला फारसं आवडत नाही आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रवासाचा मनोमन असलेला कंटाळा. त्यामुळे देखील असू शकेल.
पण नितीनला मी प्रारंभापासूनच फॉलो करत होतो. नितीनच असं नाही चित्रकलेच्या क्षेत्रातल्या नाव मिळवणाऱ्या, वेगळं काम करणाऱ्या लोकांवर आणि त्यांच्या कर्तृत्वावर माझं बारीक लक्ष होतं. कदाचित मी पत्रकारितेत असल्यामुळे असेल किंवा ‘चिन्ह’ची निर्मिती सततच डोक्यात विषय घोळत असल्यामुळं देखील असू शकेल.
नितीनचा या इंडस्ट्रीमध्ये झालेला प्रवास माझ्या डॉ प्रकाश सारंग सारख्या अनेक मित्रांनी अगदी जवळून पाहिला होता. मला वाटतं ‘चाणक्य’चा सारा प्रवास प्रकाशनं जवळून पाहिला होता. आणि त्या विषयी तो सतत सांगत देखील असे. पण त्या काळात नेमकं ‘चिन्ह’चं प्रकाशन थांबलं होतं. ‘चिन्ह’चं दुसरं पर्व सुरु झालं तोपर्यंत ‘नितीन चंद्रकांत देसाई’ हे नावं फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं झालं होतं.
दुसऱ्या पर्वात ‘चिन्ह’चे जे दहा अकरा अंक प्रसिद्ध झाले त्यातले बहुतेक अंक हे विशेष अंक होते. पण जे अंक विशेष अंक नव्हते त्या अंकात ‘जे जे जगी जगले’ हे सदर आम्ही चालवलं होतं, जे खूप लोकप्रिय झालं होतं. पण कसं कुणास ठाऊक त्याच्याशी संपर्क साधण्यात आम्ही कमी पडलो साहजिकच त्याची मुलाखत घेताच आली नाही. अगदी अंकाचं प्रकाशन बंद होईपर्यंत तो योग आलाच नाही.
तो योग आला तो मात्र ‘जे जे जगी जगले’ या ‘चिन्ह’च्या आगामी ग्रंथाच्या निमित्तानं. ‘चिन्ह’चे एक चाहते आणि माझे नंतर मित्र झालेले प्रा. नीतिन आरेकर यांनी या ग्रंथातील नामवंतांनाच्या शब्दांकनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आणि त्यांनी पहिलं शब्दांकन कुठलं केलं असेल तर ते नितीन देसाई यांचंच. पण त्याचा पहिला खर्डा मला तितकासा रुचला नाही. आरेकरांनी मात्र नंतर तो मला जसा हवा होता तसा करून दिला. पण अगदी खरं सांगायचं झालं तर आरेकरांनी जी नंतर ‘जे जे जगी’मधली सुमारे पंधरा सोळा शब्दांकनं केली ती मात्र केवळ अप्रतिम होती. म्हणजे एकदा वाचायला सुरुवात केली की ती संपेपर्यंत थांबता येत नसे. कितीही वेळा वाचा तुम्ही त्यात हमखास गुंतून पडताच.
पण मग नितीन देसाई यांच्या शब्दांकनाच्या बाबतीत असं का व्हावं ? असा प्रश्न मला पडला. त्यावर आरेकर सरांशी चर्चा करतानाच मला त्या प्रश्नाचं उत्तर देखील सापडलं. ते उत्तर असं होतं, की नितीन देसाई यांनी जेजेमध्ये फक्त एकच वर्ष शिक्षण घेतलं होतं आणि त्या नंतर त्यानं व्हिटीचा प्रवास त्रासदायक वाटतो म्हणून आपलं पुढलं शिक्षण रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून पूर्ण केलं होतं. त्यामुळेच जेजे विषयी तो काही फारसं सांगू शकला नसणार. यावर माझी आणि आरेकरांची खूप चर्चा झाली. पण आरेकर म्हणाले तो लेख आपण देसाई यांच्याशी बोलून पुन्हा लिहू. पण ‘जे जे जगी’मधली आरेकरांची शब्दांकनं खूप रेंगाळत गेली. कारण त्यांच्या घरात आलेली आजारपणं, जिवलगांचे मृत्यू आणि त्यांच्या पीएचडीची धावपळ, कोरोना लॉकडाउन यात बराचसा वेळ गेला आणि पुस्तकाचं प्रकाशन लांबत गेलं.
आता मात्र सारं मार्गी लागलं आहे. पण ‘चिन्ह’च्या वाचकांनी मात्र ‘चिन्ह’वर पर्यायानं माझ्यावर आत्यंतिक विश्वास टाकला म्हणूनच माझ्याकडून हा महत्वाकांक्षी ग्रंथ पूर्णत्वाला जातो आहे. येत्या दिवाळीच्या सुमारास तो ग्रंथ रीतसर प्रकाशित होणार आहे. पण आता नितीन चंद्रकांत देसाई यांचा तो लेख मात्र सुधारून लिहिता येणार नाहीये. सारं काही सकाळीच संपलं आहे.
***
या संदर्भातला एक किस्सा मात्र सांगितल्या शिवाय राहवत नाही. ‘जे जे जगी जगले’ साठी आम्ही जी कॅम्पेन केली होती ती फेसबुकवर प्रसारित होताच नितीन देसाईंच्या काही जुन्या सहकाऱ्यांनी किंवा मित्रांनी फेसबुकवर प्रचंड गोंधळ घातला. मला ट्रोल देखील करण्याचा प्रयत्न झाला. कारण काय तर म्हणे नितीन देसाई जेजेत कधी शिकायलाच नव्हता. त्याचा समावेश जेजे वरच्या पुस्तकात कसा काय होऊ शकतो. वगैरे वगैरे. पण संपादक म्हणून मी या संदर्भात नितीन देसाईंची मुलाखत घेण्याआधीच पुरेशी काळजी घेतली होती. जे जे अप्लाइडचे माजी अधिष्ठाता प्रा मंगेश राजाध्यक्ष, जे जे स्कूल ऑफ आर्टमधले प्रा. प्रभाकर कोलते, रहेजा स्कूल ऑफ आर्टमधले ज्येष्ठ कला शिक्षक शिरीष मिठबावकर आणि अच्युत पालव किंवा त्या काळात शिकलेले अनेक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष बोलून मी खातरजमा करून घेतली होती. आणि मगच नितीनची मुलाखत घेतली होती.
पण त्याच्या दीड शहाण्या मित्रांनी / सहकाऱ्यांनी फेसबुकवर गोंधळ घातलाच. त्याला समर्पक उत्तर देखील मी दिलं पण त्यांना ते मान्य नसावं. कारण डिनोव्होच्या संदर्भात मी जो व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता त्यावर कालांतरानं ती जाहिरात टाकल्यानंतर तिथंही त्याच त्याच्या जुन्या मित्र सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. प्रा . राजाध्यक्ष, प्रा. कोलते, मिठबावकर सर, अच्युत पालव यांच्यावर देखील ते विश्वास ठेवायला तयार नव्हते. इतका त्यांच्या मनात नितीन बद्दल तिटकारा होता. ज्यांचा नितीनशी कधीही संबंध आला नाही अशानीही त्या वादात हात धुवून घेतले. त्या प्रकाराने मी इतका उद्विग्न झालो की मीच तयार केलेल्या त्या व्हाट्सअप ग्रुपमधून मी चक्क लेफ्ट झालो.
हे सारं काही कमी झालं म्हणून पुन्हा एकदा त्या माणसाने ( बहुदा तो चित्रपट कला दिग्दर्शक असावा, नाव आता आठवत नाही.) उचल खाल्ली आणि फेसबुकवर पुन्हा एकदा गोंधळ घातला. तेव्हा मात्र मी संतापलो आणि त्याला सणसणीत उत्तर दिलं. आणि ब्लॉक करून टाकीन म्हणून धमकी देखील दिली. त्या नंतर मात्र कधी हा प्रकार घडला नाही. पण मला खात्री आहे की ‘जे जे जगी’ची जी व्हिडीओ कॅम्पेन आम्ही १५ ऑगस्ट पासून सुरु करत आहोत त्यावेळी तो नक्की पुन्हा गोंधळ घालणार आहे. या पोस्टवर देखील त्याने तशीच प्रतिक्रिया केली तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
***
अगदी अलीकडचीच गोष्ट दूरदर्शनवर चालू असलेल्या रंगा येई वो… या कार्यक्रमात माझी मुलाखत प्रसारित होणार होती. त्याचा प्रोमो देखील आला होता. पण अचानक काय झालं कुणास ठाऊक ती रद्द केली गेली आणि तिथं सलग दोन आठवडे नितीन चंद्रकांत देसाई यांची मुलाखत सादर केली गेली. ती मुलाखत काही मला पाहायला मिळाली नाही. पण त्या निमित्तानं मुंबई दूरदर्शन कडून जो प्रोमो आला होता तो मात्र मला पाहायला मिळाला होता. त्यातलं नितीनचं झालेलं दर्शन पाहूनच मी हादरलो होतो. बापरे ! हा असा का दिसतो ? याला काय झालंय ? आधी कसा हा दिसायचा ? न राहवून मी अक्षरशः ओरडलो होतो. खूप वैभव भोगलेल्या एखाद्या जुन्या राजवाड्यात बसल्या सारख्या तो दिसत होता.
बहुदा त्या दिसण्याचा आणि आजच्या त्याच्या आत्महत्येचा जवळचा संबंध असावा.
********
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion