No products in the cart.
- Home
- Uncategorized
- पाहायलाच हवं असं ‘एअर इंडिया’ प्रदर्शन !
पाहायलाच हवं असं ‘एअर इंडिया’ प्रदर्शन !
१३ जूनपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयासमोरच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये एक जबरदस्त मोठं प्रदर्शन भरलं आहे. हे प्रदर्शन आहे एअर इंडियाच्या संग्रहालयातील चित्रं किंवा शिल्पांचं. कोणे एके काळी एअर इंडियानं भारतीय चित्रकार – शिल्पकारांच्या कलेला वाव मिळावा यासाठी कलाविभागाची स्थापना केली. या कलाविभागाचे प्रमुख होते चित्रकार सच्चीदानंद दाभोळकर. ते देखील जेजे स्कूल ऑफ आर्टचेच विद्यार्थी. चित्रकार गायतोंडे जेव्हा जेजेमध्ये एक वर्षासाठी कलाशिक्षक म्हणून रुजू झाले त्याचं वर्षी दाभोळकर त्यांच्याच वर्गात शिकायला होते. प्रफुल्ला डहाणूकर, शरद पाळंदे, मनोहर म्हात्रे असे नंतर चित्रकार म्हणून नाव कमावलेले अनेक जण त्यांचे सहाध्यायी होते.
दाभोळकर हे पक्के गिरगावकरच. मूळचे गर्भश्रीमंत. उंचपुरे आणि दिसायला अतिशय हँडसम. टाय किंवा बो बांधलेले दाभोळकर एअर इंडियाचे कला दिग्दर्शक म्हणून जेव्हा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रवेश करीत तेव्हा प्रदर्शन भरवलेल्या साऱ्या चित्रकारांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असत. दाभोळकर आपल्या दालनात कधी येतात आणि आपल्या चित्राची निवड कधी करतात याची सर्व चित्रकारांना उत्सुकता असे. आणि दाभोळकर देखील चांगलं काम करणाऱ्या चित्रकारांना निराश करत नसत.
या दाभोळकरांनीच एअर इंडियाचा कलासंग्रह उभा केला. पण राष्ट्रीयकरण झाल्यानंतर एअर इंडियानं प्रकाशित केलेल्या एका कॅलेंडरवरुन भला मोठा वाद झाला आणि त्यांच्या वर्ग मैत्रिणींनच उभ्या केलेल्या त्या वादाचा फटका दाभोळकरांना बसला. त्यांना त्यांचं पद सोडावं लागलं. पुढं या संदर्भात सांगण्यासारखं काहीच नाही.
त्या संग्रहाची जवळ जवळ रयाच गेली. अनेक चित्रं खराब झाली. त्याची दुरुस्ती देखील नीटशी केली गेली नाही. त्यातली अनेक चित्रं एक तर नष्ट झाली किंवा लंपास तरी केली गेली. काही चित्रांच्या तिथं प्रतिकृती ठेवल्या गेल्या. अशा बऱ्याच गाव गप्पा नंतरच्या काळात ऐकू आल्या. त्यात किती तथ्य होतं कुणास ठाऊक ? आणि याची चौकशी तरी कशी केली जाणार ? कुणाचं लक्ष होतं एअर इंडिया नीट चालवण्याकडे ? एअर इंडिया संदर्भात नंतर काय थेरं झाली हे आपण वृत्तपत्रातून वेळोवेळी वाचतच आलो आहोत. साहजिकच एअर इंडिया पुन्हा टाटांकडे जातंय ही बातमी आल्यावर अतिशय आनंद झाला होता. आणि अपेक्षेप्रमाणेच घडलं. आता तो संग्रह राष्ट्रीय संपत्ती म्हणूनच जपला जाईल.
काय नाहीये या संग्रहात. गायतोंडे यांचे दोन दुर्मिळ कॅनव्हास. हुसैन, रझा यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांपासून सतीश गुप्ता यांच्यापर्यंतच्या नानाविध कलावंतांच्या कलाकृती या संग्रहात आहेत. आवर्जून पाहावं असं हे प्रदर्शन आहे. एक प्रकारे हा भारतीय चित्रकलेचा इतिहासच आहे. गायतोंडे यांना का श्रेष्ठ भारतीय चित्रकार मानलं जातं हे त्यांच्या या प्रदर्शनातल्या दोन कॅनव्हॉसवरुनच लक्षात येतं. निमंत्रणामध्ये प्रदर्शनाची शेवटची तारीख दिलेली नाही. पण हे प्रदर्शन दीड दोन महिने नक्कीच चालणार आहे. तेव्हा आठवणीनं मुंबईला जा आणि हे प्रदर्शन पाहा.
कालच्या उद्घाटन प्रसंगी मी सतत न्याहाळत होतो ते दाभोळकरांनाच पण शेवटपर्यंत ते काही दिसले नाहीत. चौकशी केली तेव्हा असं कळलं की त्यांना या उदघाटन समारंभाचं म्हणे निमंत्रणच गेलं नव्हतं. असं घडलं असेल तर ही खूप वाईट गोष्ट झाली. दाभोळकरांच्या आयुष्यात देखील नंतर अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. त्यांच्या तरण्याताठ्या मुलाचा अपघातात झालेला मृत्यू देखील त्यांना पाहावा लागला. पण नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेला हा गडी अजूनही ताठ आहे. एनजीएमएच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आपली चूक दुरुस्त करायला हवी. हे संपूर्ण प्रदर्शन दाभोळकरांना अतिशय आनंद देऊन जाईल याची मला खात्री आहे.
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion