FeaturesUncategorized

डॉट टू डॉट : बिंदू ते वर्तुळ एक देखणा प्रवास

आजपासून ‘चिन्ह ऑनलाईन आर्ट गॅलरी’मध्ये चित्रकार रुपाली ठोंबरे यांचं ‘डॉट टू डॉट’ प्रदर्शन सुरु झालं आहे. चित्र म्हणजे केवळ तंत्र शुद्ध आकारांची निर्मिती नव्हे तर त्याच्यामागे चित्रकाराचा आशयगर्भ विचार असणं खूप आवश्यक असतं. हा विचार रुपालीच्या ‘डॉट टू डॉट’ या चित्र मालिकेमागे आहे. चित्रकार जेव्हा खोलवर चिंतन करतो तेव्हा अशी आशयगर्भ निर्मिती त्याच्याकडून होते. त्यामुळेच ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी रुपाली ठोंबरे यांना ‘चिन्ह ऑनलाईन गॅलरी’चं व्यापक व्यासपीठ मिळावं आणि त्यांची ही चित्रं जगभरातील रसिकांपर्यन्त पोहोचावीत म्हणून रुपाली यांच्या या चित्रमालिकेची निवड केली आहे. ‘डॉट टू डॉट’ ही संकल्पना आणि रुपाली यांच्या चित्रांमागील विचार तुम्ही या लेखात समजून घेऊ शकता. सोबतचं त्यांचं ऑनलाईन प्रदर्शन देखील लेखासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. नरिमन पॉईंटच्या ट्रायडंट आर्ट गॅलरीमध्येही हे प्रदर्शन ०७ मे पर्यंत पाहता येईल.

‘केंद्रबिंदू गवसल्याशिवाय परिघाचं वर्तुळ हाती लागत नाही.’

शाळेत असताना मराठीच्या पाठयपुस्तकातील ही एक ओळ, आजही मनात जशीच्या तशी ठसठशीत उमटलेली आहे. ‘स्वरूप’ पहा म्हणजे विश्वरूप आपोआपच दृष्टीक्षेपात येईल हा विचार मनावर बिंबवत असताना बिंदू आणि वर्तुळ या दोहोंचा केलेला योग्य वापर त्या विशिष्ट आकाराची व्याप्ती मनाच्या गाभाऱ्यात बिंबवून जातो. या विश्वातील प्रत्येक उत्पत्ती ही एका बिंदूपासून झालेली आहे मग तो बिंदू गर्भाच्या मूळ अस्तित्वाइतका सूक्ष्म असू शकतो किंवा सुर्याइतका प्रचंड. आणि त्या जन्मापासूनच सुरु होतो एक प्रवास ज्याला आपण जीवन म्हणतो. त्या प्रवासात जे जे दृष्टीस दिसले वा न दिसले ते सारे मला या आकारातून अनुभवायला मिळाले आणि म्हणूनच ते सर्व मांडण्यासाठी हा बिंदूच सर्वार्थानं सक्षम असेल असं माझ्या मनातील वलयांकित आवर्तनांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आणि बिंदूपासून सुरु झालेला लाखो बिंदूंचा प्रवास सुरु झाला. बिंदू म्हणजे एक अस्तित्व , मग ते अगदी डोळ्यांना न दिसण्याइतपत सूक्ष्म असू शकते किंवा बुद्धीला कल्पनाही करता येणार नाही इतकं विशाल आणि अमर्याद असू शकतं. आणि याच बिंदूंचं एक रूप म्हणजे वर्तुळ… त्रिज्येच्या शिस्तीत बंदिस्त असलेला एक आकार जणू असंख्य बिंदूंची एक सलग मालिकाच , दोन विश्वांना पूर्णपणे विलग करणारी आणि तरीही स्वतःच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचण्यास सक्षम असणारी. हा बाजूविरहित आणि कोनरहित आकार अगदी बालपणापासून आयुष्यात प्रत्येक वाटेवर त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपांत येत गेला आणि प्रत्येक वेळी त्याच्याबद्दलची कुतूहलता नव्यानं वाढत गेली. त्याचा वेगवेगळ्या रूपांत घेतलेला अनुभव आज माझी कला साकारत असताना पूरक ठरत असल्याचा प्रत्यय काम करत असताना वेळोवेळी येत गेला. आकाशातलं तारांगण मला माणसामाणसात जाणवू लागलं आणि तेच आज माझ्या हातून कागदांवर उतरलं. सुख-दुःख , अनुभव, क्षण हे सर्व कागदावर मांडण्यासाठीचे माझं एकमेव माध्यम म्हणजे ठिपके… काळे . पांढरे, पारदर्शक, अपारदर्शक, रंगीत, लहान, मोठे, पोकळ, भरीव असे नाना तऱ्हेचे. ते सारे शाईच्या प्रवाहातून कागदावर सांडतात आणि माझ्या मनातल्या कल्पनांना आकार देऊन दृश्यरूप प्राप्त करून देतात.

मुलाच्या हातातला बॉल, गोट्या पाहिल्या आणि बालपणीच्या विश्वात नकळत शिरले. बालपणी हातात पडणारे पहिले आणि पुढंही कितीतरी काळ आवडीचं बनलेलं खेळणं म्हणजे चेंडू आणि तेव्हापासूनच या गोल आकाराशी गट्टी जमलेली. स्पर्शानं त्याची एक ओळख आणखी घट्ट होत गेली. त्यानंतर शाळेची पायरी चढल्यावर शिकवताना जरी रेषेपासून सुरुवात केलेली असली तरी पेन्सिलनं घेतलेल्या गोलाकार गिरकीनं काढलेला आकार मनाला अधिक भावला. नंतर थोड्याच कालावधीत ओळख झाली शून्याशी. आणि आज तोच शून्य आयुष्यासाठी महत्त्वाचा भाग बनून सोबत राहिला. कोणाचीही किंमत कमीअधिक करण्याचं सामर्थ्य या शून्यात असतं हे कळू लागलं आणि तिथूनच त्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. या शून्यातूनच विश्वाची निर्मिती होऊ शकते हा विचार मनात ठासून भरला. डोळ्यांतील बुब्बुळे, भूगोलातील ग्रह- उपग्रह, विज्ञानातील अणू- रेणू, इतिहासातील कालचक्रे या सर्वांमध्ये या आकाराचं नवं रूप दिसू लागलं. भूमितीच्या वहीत रेखाटलेल्या आकृत्यांमुळे वर्तुळ हे उत्तम रचनाकृतीचा भाग म्हणून समोर आलं. बिंदू, वर्तुळं, गोल यांच्या योग्य वापरातून किती सुंदर कॉम्पोझिशन्स तयार होतात हे निदर्शनास आलं. याच रचना आज चित्र होऊन नव्यानं आयुष्यात आल्या आहेत. त्या साकारताना रंगानं भरलेला एक ठिपकादेखील किती सुंदर असू शकतो हे प्रामुख्यानं जाणवलं आणि डॉटचं एक वेगळं स्थान मनात निर्माण झालं. शालेय आयुष्यात नवा वर्ग, नवा अभ्यास आणि शेवटी परीक्षा अशी अनेक चक्र यशस्वीरीत्या पूर्ण करत आयुष्यानं एका नव्या रिंगणात उडी घेतली. नोकरीचे रिंगण म्हणजे कुठंही न थांबता दिवसरात्र भिरभिर घेत राहिलेल्या गिरक्याच जणू. नोकरी तेल उद्योगातील असल्याकारणानं माझा आवडता डॉट तेलाचा थेंब बनून नव्यानं आयुष्यात आला. तेल विहिरींच्या योजना करत असताना लक्षात आले की विहिरीचा आकार, त्यांचा प्रारंभ आणि लक्ष्य ,त्यांची रचना , त्यांच्या मोजमापांची प्रमुख माध्यमं ही सर्व कुठंतरी मनातल्या आकारांशी मेळ घालू लागली. सॉफ्टवेअर मध्ये ‘मुंबई हाय’ सारख्या विस्तृत क्षेत्रातील तेलविहिरी जेव्हा वरून एकत्र पाहिल्या जातात तेव्हा ते सर्व दृश्य तारांगणाशी अगदी अचूक जुळत होतं. प्रत्येक नक्षत्राची एक वेगळीच रचना, वेगळाच विस्तार. हे सर्व मनात इतकी वर्षं साठून होतं. आकाशातील आणि पृथ्वीवरील सर्व तारांगणे मनाच्या अवकाशात भावनांची, विचारांची नक्षत्रं रचू लागली आणि विचारांना नवी दिशा मिळाली. नव्या कल्पनांचा उदय झाला. या विचार आणि कल्पनांना लेखणी आणि रंगांची जोड लाभली, विचार आणि कल्पना एकमेकांत गुंफून जात सर्व दिशांनी फुलू लागल्या आणि कोऱ्या कागदांवरती तारांगणं आकार घेऊ लागली. नक्षत्रांच्या अशा अनेक रचना हा माझ्या चित्रांचा एक महत्त्वाचा भाग आहे. मनात उमटणाऱ्या कल्पना ठिपक्यांचं रूप घेऊन इअरबड्स किंवा नाजूक काड्यांच्या साहाय्याने, रिकाम्या बाटल्यांच्या झाकणांनी काळ्या कागदावर पसरल्या. खरं तर इथं माझ्या चित्रांच्या बाबतीत काळा कागद म्हणणं चूकच होईल. कारण या चित्रांतील पार्श्वभूमी जरी काळी दिसत असली तरी या चित्रांमध्ये काळा कागद अजिबात वापरलेला नाही. याउलट, पांढऱ्या शुभ्र कागदावर जलमिश्रित विविध रंगांच्या शाईचे पंधराहूनही अधिक हलके थर एकमेकांवर देऊन निर्माण होणारा हा निसर्गाचा रंग आहे. त्यावर मनातील सकारात्मकता, मनाच्या वेगवेगळ्या अवस्था, नाना विचार सडा पडावा तसं अंथरलं गेलं आणि एकेक चित्र वेगवेगळ्या कल्पना दर्शवत पूर्ण झालं. जसजसा मनातील खजिना हा असा कागदांवर रिता होऊ लागला तसतशी सर्व ज्ञानेंद्रिये सतर्क होऊन आसपासच्या जगातील अनुभव पिऊन घेण्यास आतुर झाली.

रुपाली ठोंबरे यांच्या प्रदर्शनाचा व्हिडीओ.

एकदा असाच एक आलेला अनुभव इथं नमूद करावासा वाटतो. घरात लहान मूल म्हटले की अनेकदा स्वयंपाकघरातील ताट, वाट्या, पेले सारे बाहेर हॉल मध्ये आलेले असतात.एकदा हाच पसारा आवरत असताना या भांड्यांच्या मांडणीनं लक्ष वेधलं. कमी अधिक व्यासांच्या त्या चकचकीत वर्तुळांनी केलेली ती सुंदर रचना त्याच क्षणी माझ्या मनात चित्र आकारू लागली . कालवशतेमुळे नेत्रज्योती मालवून गेलेल्यांच्या आयुष्यात ज्ञानसूर्य बनून आलेली ब्रेल लिपी पाहिली आणि फिरत असलेली विचारांची चक्रे डोळ्यांच्या बाहुलीत येऊन स्थिरावली, जीवनचक्रामध्ये फिरत असताना येणाऱ्या संकटांवर मात करत सकारात्मकतेनं पुढं चालत राहण्याचा ध्यास, नात्यांतील अनुबंध अशा एक ना अनेक आयुष्यात जुळून येणाऱ्या गोष्टी ज्यांच्या अनुभवांतून कल्पनेचा विस्तार होत गेला आणि त्या कागदावरती चित्ररूप होत गेल्या. विचार चित्रांत रचत असताना अशा प्रकारे मांडलेलं आहे की पाहणाऱ्याला त्यात अनेक वेगवेगळ्या कथा दिसू लागतील. जसं माझं एक चित्र आहे जे पाहताक्षणीच वाढत जाणाऱ्या चंद्रकलांचा महोत्सव वाटेल पण त्यामागचा विचार हा केवळ चंद्राचे विविध रूपातील दर्शन घडवणे हा नसून त्या प्रत्येक रूपामध्ये प्रत्येकाची आयुष्यातील एक विशिष्ट अवस्था आहे. पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण असतो आणि त्याचं सौन्दर्य अप्रतिम असतं यात शंकाच नाही परंतु त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण होणाऱ्या चंद्रकोरीचा प्रवास हा सुद्धा सुंदरच मानला पाहिजे. इथं सांगायचं तात्पर्य असं की आज एखाद्याकडे जरी सर्व काही नसलं किंवा काही गोष्टी अपूर्ण असल्या तरी ते जीवन निरर्थक कधीच नसतं. त्या अपूर्णतेतही उद्याला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, उत्साह असतो जो आयुष्यातील त्या प्रसंगालाही सुंदर बनवतो. एकदा का प्रयत्नांच्या जोडीनं संकटांवर मात करत सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधणं रक्तात भिनत गेल की मग पहा तोच माणूस चंद्रकोरीप्रमाणे वाढत पूर्णत्त्वाकडे पोहोचतो. फक्त आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सुंदर आणि काहीतरी देणारा नक्कीच असतो हे खऱ्या अर्थानं मान्य केलं पाहिजे. त्यासाठी स्वतःवरचा विश्वास दृढ असला पाहिजे. अशाप्रकारे, दृश्य अनुभवांसोबतच अदृश्य अनुभवांना मांडण्यासाठी जेव्हा ही वलये एकत्र आली तेव्हा आलेला अनुभव हा आत्मिक समाधानाचा होता. मन, मनातील गुंतागुंत, मनात निर्माण होणारी पोकळी, सुटत असलेला गुंता, नात्यांमध्ये गुंतलेल्या भावना, आयुष्यातली ओढाताण, त्यातून शेवटी उदयास येणारे आनंदाचे क्षण हे सर्व जाणवत असतं पण त्यांना जगासमोर मांडणं… एखादा विचार, त्या भोवती फिरणारं विचारचक्र, त्यातून निर्माण होणारे सकारात्मक आणि नकारात्मक विचार, त्यांचा पडणारा प्रभाव या सर्वाना चित्ररूप देणं खरं तर अवघडच, पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणत केलेल्या आवर्तनांमुळे परिवर्तन हे घडतंच आणि त्यातूनच अशक्य ते शक्य होतं.

‘मी’ या बिंदू पासून सुरु झालेला क्षणांचा प्रवास म्हणजे जीवन ज्यात अपरिपक्वतेपासून परिपक्वतेकडे प्रत्येकजण जात असतो. वरवरून केवळ रंगहीन वाटणारा गोळा जेव्हा प्रयत्नांच्या आवर्तनांनी तडकतो तेव्हा त्यातून रंगांचं कारंजे दृष्टीस पडतं. आता त्या बिंदुला… वर्तुळाला… गोलाला एक नवं आयुष्य प्राप्त होतं. एक नवा अर्थ निर्माण होतो. अशाच अदृश्य भावनांचं दृश्य रूप म्हणजे माझी चित्रं आणि असा हा अशक्य वाटणाऱ्या रंगहीन बिंदूचा उच्च स्थळी पोहोचलेल्या , रंगांत भिजून आनंदानं चिंब झालेल्या गोलाचा प्रवास आहे … डॉट टू डॉट.

****
– रुपाली ठोंबरे

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही रुपाली ठोंबरे यांचं ऑनलाईन चित्र प्रदर्शन पाहू शकता.

DOT TO DOT

Related Posts

1 of 71

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.