No products in the cart.
- Home
- Uncategorized
- आज घडीला जे जे स्कूल अनधिकृतच !
आज घडीला जे जे स्कूल अनधिकृतच !
जे जे स्कूल ऑफ आर्टला डिनोव्हा दर्जा दिला गेल्याची बातमी अलीकडेच वृत्तपत्रात ( देखील ) ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. ‘चिन्ह’नं तर सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल केली होती. त्यानंतर गेल्या शनिवारी जमशेदजी जीजीभॉय यांच्या २४० व्या वाढदिवसानिमित्त जेजेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्या बातमीचं सेलिब्रेशन केल्याचं देखील आपण वाचलं होतं.
ज्या व्यक्तीला जे जे स्कूल ऑफ आर्ट हे नाव ठाऊक आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या नजरेखालून ही बातमी निश्चितपणे गेली असणार ! पण आश्चर्याची गोष्ट अशी की जेजेचं अधिष्ठाता पद भूषवणाऱ्या प्राध्यापक (?) विश्वनाथ साबळे यांना मात्र ती बातमी ठाऊक नसावी असे दिसते. तसे नसते तर त्यांनी एमएफए प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आखलाच नसता. नाही का ? या साऱ्या प्रकारची बातमी ‘चिन्ह’नं प्रकाशित करताच जेजेच्या परिसरात आणि कला शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
खरं तर जेजेच्याच परिसरात असलेल्या जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर यांनी खूप चांगलं पाऊल उचललं. त्यांनी कला संचालकांना पत्र पाठवून यंदा फक्त बीएफएचे वर्ग सुरु करायचे एमएफएचे वर्ग सुरूच करायचेच नाही असा निर्णय घेऊन टाकला. कारण पुढील शैक्षणिक वर्षांपासून डिनोव्होचे नवे कोरे अभ्यासक्रम सुरु होणार. मग या जुन्या अभ्यासक्रमांना विचारणार तरी कोण ? आणि यंदा एमएफएचे वर्ग सुरु करून अपुऱ्या मनुष्यबळामध्ये पुढली दोन वर्ष ते चालवायचे तरी कसे ? बहुदा असाच विचार करून त्यांनी हा निर्णय घेऊन टाकला असावा. असो.
पण सुरुवातीपासूनच डिनोव्होला कडाडून विरोध करणाऱ्या साबळे यांनी राष्ट्रीय वृत्तपत्रात डिनोव्होसंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेतलीच नाही. इतकंच नाही तर शासनानं जो जीआर काढला, खरं तर तो जीआर श्री साबळे यांना सरकारनं पाठवलाच असणार. कारण निर्णय प्रक्रियेत अधिष्ठाता या नात्यानं त्यांचंच नाव होतं. पण तरी देखील त्या जीआरकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून साबळे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये यंदा देखील बीएफए आणि एमएफए यांचे वर्ग सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या.
खरं तर हा निर्णय कला संचालकांच्या किंवा वरिष्ठांच्या मान्यतेवाचून त्यांना घेता येत नाही. पण तरीही त्यांनी तो घेतला असेल तर ही अतिशय गंभीर घटना आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. आणि तसं जर असेल तर म्हणजे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी जर त्यांना परवानगी दिली असेल तर ती देखील अतिशय गंभीर बाब आहे. कारण डिनोव्हो कार्यप्रवण करण्यासाठी सरकारने जी समिती स्थापन केली होती त्या समितीत देखील श्री साबळे यांच्या सोबत श्री राजीव मिश्रा हे देखील प्रमुख अधिकारी सदस्य होते.
याचा अर्थ उघड आहे की कला संचालनालयातील वरील दोन्ही ज्येष्ठ अधिकाऱ्यांचं आपल्या कामात लक्ष नव्हतं. अन्यथा असा उडपटांग निर्णय त्यांनी घेतलाच नसता. या निर्णयामुळे नव्या डिनोव्हो प्रणित अभ्यासक्रमाचे वर्ग सुरु करण्यासाठी जागेची मोठी अडचण उभी राहणार आहे. डिनोव्होचे अभ्यासक्रम सुरु झाल्यावर नव्या विद्यार्थ्यांची व्यवस्था कुठे लावली जाणार आहे. याचा कुठलाच विचार श्री साबळे यांनी केलेला नाही किंवा कला संचालक श्री राजीव मिश्रा यांनी देखील केलेला नाही हे स्पष्ट दिसतं.
ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुरेशी जागा नाही. लेडीज टॉयलेट, कॉमनरूम, कॉम्प्युटर लॅब यासारख्या प्राथमिक सोयी सुविधा देखील जिथं नाहीत आणि जिथं लवकरच बहुचर्चित डिनोव्होचे अभ्यासक्रम सुरु होणार आहेत. तिथं कुणीतरी सुजाण व्यक्ती जुने अभ्यासक्रम सुरु ठेवण्याचा निर्णय घेऊ शकेल का ? पण श्री साबळे यांनी आचरटपणे असा निर्णय घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे. हा लेख लिहीत असताना जेजेत एमएफए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती देखील चालू होत्या.
पावसाने महाराष्ट्रभर हाहा:कार उडवला आहे. दळणवळण व्यवस्था देखील नेस्तनाबूत करून टाकली आहे. अशा पार्श्वभूमीवर जेजेच्या अधिष्ठाता साहेबानी महाराष्ट्र भरातून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं आहे. आणि या मुलाखती घेणार तरी कोण ? तर ज्यांचा पदवी ( डिग्री ) शिक्षणाशी दूरान्वयानं देखील संबंध नाही असे शिक्षक. आहे ना गंमत ? पण अशा गंमती जमती जेजेमध्ये सातत्यानं सुरूच असतात. आणि त्यांना आम्ही सातत्यानं प्रसिद्धी देखील देतच असतो. या प्रसिद्धीमुळे समाजात संबंधितांच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे निघतात ( उदाहरणार्थ नुकतेच जेजेमधले एक माजी शिक्षक मृगांक जोशी यांचं निधन झालं. तर त्यांच्या शोकसभेचं जे पोस्टर जेजेनं काढलं त्यात त्यांचा उल्लेख ‘मृगांग’ असा करून ठेवला होता. आता बोला ! त्यावर समाजमाध्यमातून प्रचंड टीका झाली. ) काय लायकीचे शिक्षक जेजेत शिकवत असतील याचं भेसूर दर्शन त्यातून घडत असतं, पण तरी देखील असे प्रकार घडण्याचे काही थांबत नाही.
सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे हे सारं चालू असताना महाराष्ट्राचे प्रभारी कला संचालक दिल्लीत पोहोचले होते. कशाला ठाऊक आहे ? भारतातल्या शिक्षण व्यवस्थेचं सूत्र संचालन करणाऱ्या एआयसीटीईनं म्हणे जे जे स्कूल ऑफ आर्टला अभ्यासक्रम चालवण्यासाठी जी परवानगी दिली होती ती अलीकडेच काढून टाकली आहे. ती पुन्हा मिळवण्यासाठी म्हणे राजीव मिश्रा सचिवांचं पत्र घेऊन तिथं गेले होते. किती भयंकर गोष्ट आहे ही ?
जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या १६६ वर्ष जुन्या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये कसा कारभार चालला आहे ? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काय लायकीच्या उमेदवारांच्या नेमणुका गेल्या अनेक वर्षांमध्ये जेजेमध्ये केल्या आहेत त्याचंच भेसूर दर्शन घडवणारी ही घटना आहे. या संदर्भात अधिक चौकशी केली असता असं कळलं की ही काही अपघातानं पहिल्यांदाच घडलेली घटना नव्हे. ही अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांची तिसरी खेप आहे. पहिली घटना ज्यावेळी घडली तेव्हा श्री सौरभ विजय हे अधिकारी शिक्षण खात्याचे सचिव होते. त्यांनी बाबापुता करून ही परवानगी परत मिळवली होती. नंतर विनय रस्तोगी हे शिक्षण सचिवपदी विराजमान झाले. पुन्हा जे जे स्कूल ऑफ आर्टची परवानगी याच कारणामुळे काढून घेतली. श्री रस्तोगी यांनी पुन्हा बाबापुता करून ती परवानगी मिळवली. या दोन वेळा घडलेल्या घटनांमुळे जेजेचे अधिष्ठाता श्री साबळे यांनी शहाणं होणं अपेक्षित होतं. पण तसं घडलं नाही. पुन्हा तीच चूक साबळे यांनी केली. त्यामुळे एआयसीटीईनं पुन्हा तिसऱ्यांदा जेजेची शैक्षणिक मान्यता काढून घेतली. पुन्हा एकदा शिक्षण सचिवांनी कला संचालक राजीव मिश्रा यांना आपलं पत्र घेऊन दिल्लीला पाठवलं. पण दिल्लीवरून ते हात हलवत परत आले अशी आमची माहिती आहे.
आता तिसऱ्यांदा पुन्हा जेजेला मान्यता मिळणे कितपत शक्य आहे कुणास ठाऊक ? कारण इथं ज्या संस्थेनं पाचर मारून ठेवली आहे त्या संस्थेचं नाव आहे सुप्रीम कोर्ट. होय ! ज्यांच्या कडून संपूर्ण भारत अपेक्षा करतो आहे त्या सुप्रीम कोर्टानेच जो निर्णय आधी जाहीर केला आहे तो पाळणं आता ए आय सी टी ई ला देखील पूर्णपणे बंधनकारक असणार आहे. आधी जे चालत होतं ते आता चालणार नाहीये. त्यामुळे आधी जशी बाबापुता करून दोन तीन दिवसात परवानगी आणली जात असे तशी आता मिळण्याची कुठलीही शक्यता उरलेली नाही. तुमची संस्था महाराष्ट्र सरकारची असल्यामुळे तुमचे चाळे आतापर्यंत खपवून घेतले गेले पण आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशासमोर त्यांना देखील नतमस्तक व्हावे लागणार आहे. कुणालाही मॅनेज करण्यामध्ये पटाईत असलेल्या कला संचालक राजीव मिश्रा यांना दिल्लीवरून हात हलवत, चेहरा पाडून परत यावं लागलं याचं हे खरं कारण आहे.
आता पुढे काय होणार ? एआयसीटीईकडून जेजेला शैक्षणिक परवानगी मिळणार का ? मिळाली तर ती किती दिवसात मिळणार ? किती आठवड्यात मिळणार ? का महिना लागणार ? या साऱ्याच प्रश्नांची उत्तरं आता आणखी किती काळ अनुत्तरित राहतील या प्रश्नांची उत्तरं आता कुणीही देऊ शकणार नाही हे उघड आहे. पूर्वी सारं चालत होतं. बाबापुता करून कामं होत होती. पण आता ते चालणार नाहीये. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवमानना होणार असल्यामुळे एआयसीटीईचा कुणीही अधिकारी त्या भानगडीत पडणार नाही हे निश्चित.
आणि इकडे मुंबईत जेजेचे अधिष्ठाता साबळे एमएफएच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्याचा फार्स करण्यात मश्गुल आहेत. फाईन आर्ट, आर्ट अँड क्राफ्ट, शिल्पकला आणि शिक्षण प्रशिक्षण वर्गाचे सारे मिळून सुमारे चारशे विद्यार्थी जेजेमध्ये सध्या शिक्षण घेत आहेत. पण हा लेख लिहीत असताना या घडीला किंबहुना उद्या रविवारी देखील हेच विधान लागू होईल की ‘जेजेमधलं शिक्षण अनधिकृत आहे’.
साबळे साहेब हे अत्यंत नशीबवान आहेत. ज्या पद्धतीनं ते जेजेत आले आणि नंतर एका पाठोपाठ एक प्रमोशन्स मिळवत गेले. ती त्यांची सारीच वाटचाल आपल्या सारख्या सामान्य माणसाला थक्क करून टाकणारी आहे. जेजेमध्ये गेल्या दीड दोन दशकात त्यांनी जे कर्तृत्व गाजवलं आहे त्याची नोंद वेळोवेळी वृत्तपत्रांनी घेतलेली आहे. ‘चिन्ह’नं देखील या संदर्भात वेळोवेळी त्यांचं ‘कर्तृत्व’ समाजासमोर आणलं आहे. पण साम दाम दंड भेद वापरण्याची त्यांची शिताफी प्रत्येक वेळी त्यांच्या कामी आली. मध्यंतरीचा सहा सात वर्षाचा कालखंड सोडला तर त्यांचे पोशिंदे सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि आता तर त्यांचे पोशिंदे मंत्रिमंडळात देखील आले आहेत. राज्यकर्त्या पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आहेत. त्यामुळे कुणी सांगावं ते हालचाल करतील आणि साबळ्यांसाठी जेजेला शैक्षणिक मान्यता मिळावी म्हणून धावपळ देखील करतील. पण आता गाठ सुप्रीम कोर्टाशी आहे. हे सर्वानीच लक्षात ठेवलेलं बरं. सुप्रीम कोर्टानं भल्या भल्याना आतापर्यंत सरळ केलं आहे. आता देखील करत आहे. आणि हो लवकरच सर्वोच्च भल्या भल्याना देखील ते करणार आहे. त्यामुळेच आता जेजे आणि कला संचालनालय श्वास रोखून पुढील घटनांकडे पाहू लागलं आहे.
एवढं मात्र निश्चित आहे की या क्षणाला जे जे स्कूल ऑफ आर्ट या १६६ वर्ष जुन्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे अ न धि कृ त आहेत. किती भयंकर गोष्ट आहे ही ? लाज वाटली पाहिजे जेजेच्या अधिष्ठात्यांना, कला संचालकांना आणि ज्यांच्या अखत्यारीत हे विभाग येतात त्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्लज्ज अधिकाऱ्यांना.
समजा उद्या एआयसीटीईनं परवानगीच दिली नाही तर काय शोभा होणार आहे यांची, याची थोडी तरी जाणीव यांना आहे का ? विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी असा खेळ करताय ? थोडी सुद्धा लाज कशी वाटत नाही तुम्हाला ? तुमच्या अशा या निर्लज्ज कारभारामुळं जेजेत शिकणाऱ्या ४०० ते ४५० विद्यार्थ्यांची आयुष्यं तुम्ही धोक्यात आणली आहेत याची तरी कल्पना तुम्हाला आहे का ?
आम्ही ४०० ते ४५० विद्यार्थी जेजेत शिकत आहेत असे अंदाजाने लिहितो आहोत. यालाही कारणीभूत तुम्हीच आहात. कारण जेजेत नेमके किती विद्यार्थी शिकतात हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. या संदर्भात काल परवा आमच्या प्रतिनिधीने लिहिलेल्या लेखात इंटेकचा उल्लेख केला आहे. त्या इंटेकपेक्षा जास्त विद्यार्थी जेजेत शिकत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. देणार या आरोपांना उत्तर ? कुणी घेतले हे निर्णय ? त्या मागे किती पैसा मोजला गेला असेल ? आणि तो पैसा कुठे कुठे गेला असेल ? आहेत या प्रश्नांची उत्तरं तुमच्यापाशी ? एका सुंदर शिक्षण संस्थेचं गेल्या ३५ वर्षात तुम्ही अक्षरशः मातेरं करून टाकलं आहे. जे जे स्कूल तुमच्या पित्त्यांनी देवनारच्या खाटीकखान्या जवळ नेण्याचा कट रचला होता. तो माध्यमांनीच उधळून लावला होता. आठवतंय ना ?
विशेष करून गेल्या वर्षा दोन वर्षात जेजेतल्या इतक्या भानगडी आम्ही पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणल्या. काय केलीत तुम्ही कारवाई ? कलेच्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात देखील तुम्ही भ्रष्टाचाराचं विष कालवलत. आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या जागतिक दर्जा लाभलेल्या संस्थेची देखील तुम्ही अक्षरशः दशादशा करून टाकलीत. गेली तीस चाळीस वर्ष आम्ही या संदर्भात अक्षरशः टाहो फोडतो आहोत पण त्या कडेही तुम्ही दुर्लक्ष केलंत. अखेरीस जमशेदजी जीजीभॉय यांची पुण्याई कामी आली आणि जेजेला डिनोव्हो दर्जा मिळाला. म्हणून ते तुमच्या तावडीतून बचावलं आहे.
ज्यांच्या कारकिर्दीत जेजेच्या वाताहातीला सुरुवात झाली त्या काँग्रेस पक्षाला आता विरोधी पक्षांत आल्यावर जाग आली आहे. पण ‘देर से आये दुरुस्त आये’ याच भावनेनं आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यातल्या एक नाही, दोन नाही, तब्बल आठ दहा आमदारांनी ( त्यातले काही माजी मंत्री देखील आहेत.) लक्षवेधी प्रश्न विचारल्यानंतर तरी का तुम्ही आता जागे होणार आहात ? खरं तर ही सुरुवात आहे. कालचक्र आता उलटं फिरू लागलं आहे. हे लक्षात ठेवा. अन्यथा…………
***********
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
www.chinha.in
लेखातील सर्व फोटो गीता कुलकर्णी यांच्याकडून साभार.
Related
Please login to join discussion