Editorial

नवी सुरुवात !

‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या वाचकांना आज इंग्रजी मजकूर पाहून कदाचित धक्का बसला असेल. पण गेल्या अनेक दिवसापासून आम्ही त्याची तयारी करीत होतो. या येत्या पंधरा वीस दिवसात ‘चिन्ह’ आर्ट न्यूजचा इंग्रजी अवतार देखील दिसू लागेल. आणखीन काही दिवसांनंतर हिंदी अवतार देखील सुरु करायचा विचार आहे. अर्थात तो कधी सुरु होईल या विषयी आताच सांगता येणार नाही. पण इंग्रजी अवतार मात्र येत्या पंधरा दिवसात सुरु होईल हे नक्की. त्याचीच चाचपणी करण्यासाठी आजपासून काही पोस्ट इंग्रजीमधून देखील देत आहोत. त्यासंदर्भात वाचकांकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

एकाच होम पेजवर मराठी आणि इंग्रजी मजकूर हा प्रकार कदाचित काही वाचकांना रुचणार नाही. पण हे थोड्या काळासाठीच आहे हे कृपया लक्षात घ्या. फार फार तर दहा ते पंधरा दिवसांसाठी. नंतर मात्र विशेष बटनाद्वारे वाचकांना मराठी, इंग्रजी अथवा हिंदी विभागात प्रवेश करता येईल आणि बातम्या वाचता येतील, लेख वाचता येतील. मराठीतलाच मजकूर तिथं अनुवादित केला जाईल असे मात्र निश्चितपणे नाही. मात्र मराठीत प्रसिद्ध झालेल्या ज्या  मजकुराची व्याप्ती राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल तो मजकूर इंग्रजी किंवा हिंदी विभागात देखील दिसू शकेल.

मराठीत ज्याप्रमाणे आम्ही वाचकांना कला विश्वाची सफर घडवून आणतो आहोत तशीच सफर आम्ही इंग्रजीत देखील घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. चित्रकलेच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, अहमदाबाद आणि  बडोदा, हैद्राबाद तसेच पुणे, पणजी इत्यादी शहरात चालणाऱ्या सर्वच चित्रकला विषयक घडामोडींचा आढावा इथं आम्ही घेणार आहोत. ज्यात प्रामुख्यानं तिथं चालणाऱ्या कला प्रदर्शनांचा समावेश असेल. त्याच बरोबर व्याख्यानं, चर्चा , परिसंवाद यांना देखील आम्ही प्रसिद्धी देणार आहोत. अर्थातच हे सारे बदल हळूहळू होत जातील. आज सुरु केलं आहे आणि उद्या लगेचच सारं काही देता येईल या भ्रमात आम्ही नाही. बदल हे सतत घडणारी प्रक्रिया असते याचं भान आम्हाला आहे. पण एवढं मात्र निश्चित की कला क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घटनेची नोंद इथं केली जाईल हे मात्र निश्चित.

या इंग्रजी विभागाच्या संपादनाची संपूर्ण जबाबदारी सोनाली कोठाळे – घड्याळपाटील यांनी स्वीकारली आहे. त्या मूळच्या ठाण्याच्या, पण आता अलीकडेच त्या
नवी दिल्लीत स्थायिक झाल्या आहेत. त्यांना पत्रकारितेचा आणि अनुवादाचा चांगलाच अनुभव आहे. त्या ही नवी जबाबदारी यशस्वीपणे पेलतील याची खात्री आहे.
आमचा हा नवीन प्रयोग आणि आजपासून सुरु झालेला प्रयत्न कसा वाटतो या विषयी आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागतच असेल.
*****
– सतीश नाईक 
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 3

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.