Features

एकाकी चित्रकाराचा अंत !

चेन्नई इथं स्थायिक अमूर्त  चित्रकार अच्युतन कुडलूर यांचं आज पहाटे चेन्नई मधल्याच इस्पितळात अचानक निधन झालं . त्यांच्या बरोबर जवळ जवळ चार दशकाची मैत्री जपलेल्या चित्रकार भगवान चव्हाण यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी . 

ऐशीच्या दशकाच्या पूर्वार्धात फ्रान्स, सोलापूर, मुंबई इथं स्थायिक होण्याच्या साऱ्या संधी सोडून इथं मद्रास मध्ये  कायमचंच स्थायिक व्हायचा मी निर्णय घेतला होता . मी मद्रास मध्ये आलो आणि राहण्याची जुळवाजुळव करू लागलो तेव्हाच माझी पहिली भेट अच्युतन सोबत झाली. त्यांच्या माझ्या वयात जवळजवळ १०- १५ वर्षाचं अंतर होतं . पण तरीही आम्ही चांगले मित्र झालो याचं कारण आम्ही दोघंही अमूर्त चित्रं काढत होतो हेच होतं . चोलामंडलमधले बहुसंख्य चित्रकार हे आकृतिवादी काम करीत असत . त्यातल्या बऱ्याच जणांना अमूर्त कलेविषयी काहीसा तिटकाराच होता , त्यातच अच्युतन मद्रासमधून येऊन चोलामंडलजवळच भाड्यानं घर घेऊन रहात होते हे देखील त्यातल्या काही जणांना पसंत नसावं . याचं  मुख्य कारण अच्युतन हे चित्रकलेचं रीतसर प्रशिक्षण घेऊन चित्रकार झाले नव्हते तर स्वयंशिक्षित चित्रकार होते . अशा चित्रकारांबद्दल प्रशिक्षित चित्रकारांच्या मनात एक किंचितशी अढी  असते तशी ती अच्युतन यांच्याबद्दल देखील असावी , किंबहुना होतीच अशी माझी ठाम धारणा आहे . हे इथंच नाही तर कुठंही असू शकतं , अगदी मुंबईमध्ये देखील खूप प्रमाणात आहे की . असो !

एक तर तेही मद्रास मधून चोलामंडल जवळ येऊन स्थायिक होत होते आणि मी सोलापूर , मुंबई सोडून चोलामंडल मध्ये येऊन राहू लागलो होतो, जम बसवण्याचं प्रयत्न करीत  होतो . त्यामुळे साहजिकच आमचं अगदी छान जुळून गेलं . रोज संध्याकाळी त्यांच्याकडे जायचं . त्यांचं काम पाहायचं . खूप गप्पा मारायच्या , चर्चा करायची असा माझा रिवाज होता . या साऱ्या भेटीगाठीमधूनच मला  त्यांच्या विषयी अधिकाधिक कळत गेलं .
उदाहरणार्थ अच्युतन मूळचे केरळचे होते .त्यांनी इंजिनियरिंग केलं होतं .  ते मद्रासच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात  सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरी करीत होते . त्यांना साहित्याची अतिशय आवड होती .त्यांच्या कार्यालयाजवळच शासकीय कला महाविद्यालय होतं , चित्रकलेविषयी देखील उपजत आकर्षण असल्यामुळं त्यांनी त्या कलामहाविद्यालयात जाऊन हॉबी क्लास मध्ये प्रवेश घेतला . बहुदा १९७५ ते १९८० असा तो कालखंड असणार . त्यातंच मग त्यांना पेंटींग या विषयाची गोडी लागली . ते सतत काम देखील करू लागले . चित्रकारांचा सहवास मिळावा म्हणून त्यांनी १९७९ साली त्यांनी चोलामंडलजवळ घर घेतलं . स्टुडिओ थाटला . मोठ्या जोमात काम सुरु झालं .
पूर्ण वेळ पेंटींग करता यावं म्हणून १९८४-८५ साली सेवानिवृत्ती घेऊन चक्क  सरकारी नोकरी त्यांनी सोडली.आता ते पूर्ण वेळ पेंटींग करू लागले .मुंबई , दिल्लीत प्रदर्शन करू लागले . मुंबईतलं तर त्यांचं प्रदर्शन अत्यन्त यशस्वी ठरलं होतं .आणि नंतर काही त्यांनी पाठी वळून पाहिलं नाही . दिवसभर स्टुडिओत पेंटींग करीत बसायचं . कंटाळा आला तर चित्रपट .   मल्याळी साहित्य आणि चित्रपट सृष्टीशी देखील त्यांचा संबंध होता , पेंटींग नसेल तेव्हा वाचन मात्र खूप करायचे . त्यांचं घर एका अस्सल चित्रकाराचंच घर होतं . त्यांनी लग्न केलंच नाही . त्यामुळे घर आणि स्टुडिओ यांच्यात त्यांनी फारसा भेदभाव असा केलाच नाही. घरात किंवा स्टुडिओत प्रचंड पसारा असायचा . सर्वत्र कॅनव्हास , चित्रचौकटी ( स्ट्रेचर्स ) रंग , पॅकिंगचं सामान , आणि पुस्तक , कॅटलॉग्ज यांचंच साम्राज्य पसरलेलं असायचं.

आपल्या इकडे महाराष्ट्रात त्यांचं  नाव फारसं झालं नसेल कदाचित पण ते एक अत्यंत  यशस्वी चित्रकार होते असं माझं ठाम मत आहे. बहुसंख्य चित्रकारांना प्रचंड प्रसिद्धी ही त्यांच्या मृत्यूनंतरच मिळते असं म्हटलं जातं . अच्युतन यांच्या बाबतीत देखील तसंच काहीसं होईल असा माझा अंदाज आहे . हा माझा चित्रकार मित्र अतिशय संवेदनशील होता . आमच्या चोलमंडलवाल्या चित्रकार मित्रांनी अच्युतन यानं रीतसर कला  शिक्षण न घेतल्यामुळे त सतत आपल्यापासून दूर ठेवलं , जवळ येऊ दिलं  नाही , सतत त्याला हिणवलं . अच्युतन त्या प्रकारानं अतिशय अस्वस्थ होत असत , घायाळ होत असत  . निराश होत असत . त्यांना  तो साराच प्रकार अतिशय दुखावून जायचा पण त्यांनी ठरवलं होतं की  मी चांगला चित्रकार होऊन दाखवेनच , आणि ते झाले देखील .

कोरोनामुळे कलाक्षेत्राचं खूपच नुकसान झालं . चित्रं स्टुडिओतच पडून राहिली . काहींची तर गॅलऱ्यांमध्ये पडून राहिली. अच्युतनच्या बाबतीत देखील असंच  घडलं  , फरक इतकाच आहे की त्या चित्रांची व्यवस्था पाहावयास आता अच्युतन या जगात नाहीये  . त्यांच्या  बंद घरात – स्टुडिओत न जाणो किती चित्रं असतील ,कमर्शियल  गॅलऱ्यांमध्ये  किती असतील ? त्या साऱ्यांचं आता काय होणार ? असा प्रश्न मला  आता भेडसावतोय . सकाळी  ती वाईट बातमी कळल्यावर हॉस्पटलमध्ये गेलो तेव्हा कळलं की तीन चार दिवसांपूर्वी बरं वाटत नव्हतं म्हणून ते हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते . आज त्याना  डिस्चार्ज देखील मिळणार होता पण अचानक आज पहाटे कार्डियाक हार्ट अटॅक म्हणतात तो आला आणि काळांनं  डाव साधला . पाच दिवसापूर्वी आम्ही भेटलो होतो तेव्हा आमचा  दोघांचा  एकत्र फोटो काढायला हवा होता असं मात्र आज राहून राहून वाटतंय .
भगवान चव्हाण
चोलामंडल  आर्टिस्ट व्हिलेज , चेन्नई

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.