Features

‘मुंगी डान्स’ आणि सुंदरबन

धाडसी प्रतीक आता आपल्या सायकल प्रवासात ओरिसामार्गे सुंदरबनात पोचला आहे. मागच्या भागात त्याने मुंग्यांच्या चटणीचा उल्लेख केला होता. त्याप्रमाणे त्याने ती आदिवासींबरोबर बनवून खाल्लीही! आपण खातो तेच सात्विक हा आपला मोठा गैरसमज असतो. खाण्याच्या सवयीवरून सुध्दा भेदभाव होतो.
त्यानंतर सुंदरबनातला विलक्षण अनुभवही या लेखात वाचायला मिळेल. काही अनुभव एवढे सूक्ष्म, नाजूक असतात की ते तुम्ही फक्त डोळ्यात साठवू शकता. आणि डोळ्यातून ते कायमचे मनात उतरतात. सुंदरबन येथे प्रतिकने जे अनुभवलं ते एखाद्या काल्पनिक जादुई दूनियेसारखच होतं. प्रतिकने सुंदरबनचा अनुभव इतक्या सुंदररीतीने मांडला आहे की ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

मागचे पाच दिवस सतत ढगाळ वातावरण होतं. मी इथल्या लोकांच्या बिडी पिण्याच्या सवयींवर एक टेराकोटा शिल्प बनवायला सुरू केलय. एका कुंभाराकडून माती आणली. पण वातावरणामुळे लवकर ते शिल्प सुकेल असं काही वाटत नाही. आणि मुंग्यांची अंडी पकडायला जायचा पण बेत आहे. त्यासाठी पण उन हवं असं कृष्णाचे बाबा सांगत होते. अखेर आज उन चांगलं पडलं आणि आम्ही पाच जण जंगलाच्या रस्त्याने निघालोय. रस्त्यात एक जण ताजी ताडी काढत होता. कृष्णाच्या बाबांनी लगेच घटघट ताडी घशाखाली उतरवली आणि आम्ही पुन्हा चालू लागलो. रस्त्यात काय काय किडे, प्राणी, पक्षी खाल्ले याचं वर्णन कृष्णा करत होता. यावरून एक लक्षात आलं की जे पाण्यात पोहतात, जे आकाशात उडतात आणि जमिनीवर चालतात ते सगळं आदिवासी खातात. माणूस सोडून.

मुंग्यांची चटणी

बराच वेळ चालून आम्ही जंगलात आत घुसलोत. दाट निलगिरीच्या झाडांमधून आम्ही पुढे सरकत होतो. माझं लक्ष आम्ही मागे सोडत चाललेल्या वारुळांवर होतं. इथली वारूळं माणसांपेक्षा खूप उंच होती. मला वाटलं त्यातून अंडी पकडायची आहेत. पण असं नव्हतं. मध्ये मध्ये मोठी आंब्याची झाडं होती. झाडावरच्या मुंग्यांची अंडी खाल्ली जातात. ज्या मुंग्या पानाला पान जोडून आत घरटे करतात आणि त्यात अंडी घालतात. लाल रंग आणि एक सेंटीमीटर पर्यंत लांब मुंग्या. घरट्यात लांब बांबूने खालून भोक पाडायचं आणि बांबू त्यातून आरपार घालून झटके द्यायचे. पाऊस पडावा तशी टपटप मुंग्यांची पांढरी अंडी बांबूच्या खाली लटकलेल्या झोळीत पडू लागतात. यावेळी बांबूवरून चालत हातावर आलेल्या मुंग्या कडाडून चावतात. आणि बांबू पकडणारा नाचू लागतो. खाली जमिनीवर लाल मुंग्याचा सडा पडतो आणि उभे राहून पाहणाऱ्याच्या अंगावर धावा करतात. दोन तीन तास मुंगी डान्स करून बांबूच्या झोळीत बरीच अंडी जमा झाली होती.

सुपात अंडी काढली आणि मग वरून आग फिरवली काही मुंग्या पळाल्या काही त्यातच पडल्या. मी पुढे होऊन सुपाने मुंग्या पाखडल्या. अंडी सुपात, मुंग्या बाहेर. हे करतानासुद्धा काही मुंग्या हातावर चढून चावत होत्या. जेवढी मेहनत घेतली त्या मानाने खूपच कमी अन्न बनले यात. पण हौसेला कुठं अक्कल असते.

आधी मुंग्यांची अंडी खातात ऐकून विचित्र वाटले होते. पण मग विचार केला की कोंबडीचे अंडे तर आपण किती सहज खातो. ही पण तर अंडीच आहेत. आणि फरक येवढाच की आपल्याला ते पहायची संवय नाही. हल्ली माशाच्या अंड्याला मोठी डिमांड आहे . तसेच एक दिवस मुंग्यांची अंडी हॉटेलात मिळायला लागली तर लोकं ती पण हौशीने चाटून खातील. आपण खातो तेच सात्विक हा आपला मोठा गैरसमज असतो. खाण्याच्या संवयीवरून सुध्दा भेदभाव होतो. कोण काय खातो आणि कुणाच्या घरात काय शिजतंय हा तर राजकारणाचा सुध्दा मुद्दा झालाय. असो.

प्रतीकने मुंग्यांची अंडी पकडण्याचा व्हिडीओ बनवला आहे. वरील यूट्यूब लिंकवर क्लिक करून जरूर बघा.

कृष्णाच्या बाबांनी तिथेच पानापासून एक द्रोण तयार केला , त्यातून ही अंडी आम्ही घरी घेऊन आलोत. कृष्णाने मस्त चुलीवर त्याच्या पद्धतीने त्याची एक चटणी बनवली. जी आम्ही सगळ्यांनीच बोटं चाटून खाल्ली.
रायगडा जिल्ह्यातून खाली उतरून मग आता उडीसामार्गे पश्चिम बंगाल मध्ये आलोय.

पिंगळा गावात बहादुर चित्रकार या पटचित्र कलाकाराने एक पटचित्र व्हिलेज आणि संग्रहालय बनवलंय. ते पाहून भारावलो. संगीत आणि दृश्यकलेचा संगम म्हणजे बंगाली पटचित्र. आधी रामायण महाभारत यावरील पटचित्रे रंगवत आणि गावोगाव जाऊन ती चित्रे गाणे गाऊन दाखवली जात. पंधरा फुटापर्यंत लांब कागदी-कापडी पट्ट्यावर ही चित्रे रंगवून, हळूहळू उलगडून दाखवली जात. जे दृश्य समोर येईल त्याचं वर्णन गाण्यातून केलं जाई. आज या पारंपरिक कलाकारांनी आजच्या विषयावर केलेली पटचित्रे पाहून आश्चर्य वाटलं. कोरोना काळातील परिस्थिती सांगणारे पटचित्र, त्सुनामीचे अनुभव, एवढंच काय तर टायटॅनिक चित्रपटसुध्दा पटचित्रातून रंगवला आहे. रंग कसे पानाफुलांपासून बनतात हे पाहिलं. हेच कलाकार कलकत्त्याला जेव्हा स्थलांतरित झाले तेव्हा कालिघाट चित्रकला उदयाला आली. बंगाल मधील तत्कालीन बाबू कल्चर ह्या कालिघाट चित्रात प्रकर्षाने दिसून येते.

सुंदरबनच्या दिशेने निघालो पण इथे जाईपर्यंत भरपूर कसरत करावी लागली. शंभराहून जास्त बेटे मिळून सुंदरबन आहे. त्यातील फक्त 54 बेटांवर मानव वस्ती आहे. आणि जायला यायला पूल कुठेही नाही. सगळीकडे नावेने प्रवास. दरवेळी माझी सायकल सामानासोबत उचलून बोटेत चढवताना माझी चांगली फजिती होत होती.

काही अनुभव येवढे सूक्ष्म, नाजूक असतात की ते तुम्ही फक्त डोळ्यात साठवू शकता. आणि डोळ्यातून ते कायमचे मनात उतरतात.
सुंदरबन येथे मी जे अनुभवलं ते एखाद्या काल्पनिक जादुई दुनियेसारखंच होतं. सुंदरबन येथे आता मला आठवडा होत आला येऊन. काल रात्री जेवणानंतर मी आणि काही फॉरेनर मित्र रात्र सफारीला गेलोत. एक छोटी नाव आणि त्यात आम्ही सहा सात जण. इथली जंगल सफारी म्हणजे पूर्ण नावेनेच करावी लागते. आणि रात्री भरती असल्याने पाण्याची पातळी वाढली होती. पाणी पातळी खारफुटीच्या मुळाला आम्ही दिवसा पहिली होती, त्यांची शेंडेच फक्त आता पाण्यावर होते.

नदी पार करून जंगलाच्या आत पर्यंत आम्ही बोट घेऊन गेलो आणि बोट थांबली. किर्र sss काळोख आणि भयाण शांतता. फक्त पाण्याचा हलका आवाज. आमच्या नावाड्याणे पाण्यात हात घालायचा सांगितला. अनपेक्षित पणे मी पाण्यावर हात फिरवला. आणि अचानक किती तरी ठिणग्या पाण्यात चमकल्या. माझे डोळे विस्फारले. मी पुन्हा हात फिरवला पुन्हा चमचमाट. आता सगळ्यांनी पाणी ढवळायला सुरुवात केली. बोटी खाली असंख्य तारका उतरल्या सारखं वाटू लागलं होतं. ह्या आहेत अल्गाई Planktons. ज्या पाण्यात चमकतात. हे अनुभवायला मात्र पूर्ण काळोख हवा. वर पाहिलं तर निरभ्र आकाश आणि ताऱ्यांचा लुकलुकाट. जणू आकाशात तारे, पाण्याखाली तारे . आणि मधेच कुठे काजवा दिसला तर उडणारे तारे.

कोणी एक शब्द बोलत नव्हतं. सगळे शांतपणे निसर्गासमोर मूक झाले होते. थोड्या वेळाने सगळेच आम्ही बोटीत आडवे झोपलो आणि एकटक तारे पाहू लागलो. आणि मग आमची खरी दिवाळी सुरू झाली. एका पाठोपाठ एक तुटणारे तारे. विश्वास बसत नव्हता की हे स्वप्न आहे की खरंच घडतंय. सुंदरबन हे तुटणारी तारे पाहण्यासाठी सुध्दा ओळखले जाते. सुंदरबन खूप छोेट छोटी बेटं असल्याने मनोरंजनाचे इथे काही जास्त पर्याय नाहीत. आणि सतत येणारी तुफानं आणि पूर ह्यामुळे इथे कोणतीही कला विकसित व्हायला पोषक वातावरणच नाही. जिवंत राहणे हीच ह्या लोकांची मोठी कला म्हणावी लागेल.

पण कोंबड्याची झुंज इथला भारी उत्साहाचा खेळ आहे. आज छोटा बाजार भरला होता आणि बरीच लोकं आपले कोंबडे घेऊन आले होते. ज्याच्या कोंबडा जिंकतो त्याला हरलेला कोंबडा बक्षीस मिळतो. आणि जखमी झालेल्या कोंबड्याची रात्री पार्टी होते.

सुंदरबन मध्ये नरभक्षक वाघ राहतात. दर वर्षी जवळपास 35-40 माणसं शिकार होतात. तिथल्या वाघाच्या गोष्टी, बन बिबी देवीजीची पूजा इथले हिंदू मुस्लिम दोघेही करतात तिची गोष्ट, सतत येणारी वादळे आणि पूर, इतर रंजक गोष्टी पुढच्या भागात…

क्रमश:

प्रतिक
कलाप्रवास

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.