Features

‘बरवे’ : साधना, अक्षर दिवाळी आणि कोरा कॅनव्हास

चित्रकार प्रभाकर बरवे यांचं पहिलं लिखाण प्रसिद्ध झालं ते पुण्याच्या ‘साधना’ साप्ताहिकातून. १९८३ सालच्या ‘साधना’ दिवाळी अंकात बरवे यांच्या डायरीतली पहिली पानं प्रसिद्ध झाली. त्या संदर्भात बरवे यांच्याशी झालेलं बोलणं आता पुसटसं आठवतंय. ते म्हणाले होते ‘आमचे आडिवरेकर नावाचे एक चित्रकार मित्र आहेत. विव्हर्स सर्व्हिस सेंटरमध्ये ते देखील काम करतात. मी जेव्हा डायरी वगैरे लिहू लागलो तेव्हा साहजिकच मी या आमच्या मित्रांमध्ये त्यातली पाने वाचून दाखवत असे. आडिवरेकर यांना ते लेखन खूप आवडलं होतं. त्यांचं मौजेत जाणं येणं असायचं.

मौजेत या माझ्या लेखनाविषयी कधीतरी ते बोलले असावेत. कवयित्री वासंती मुजुमदार या देखील मौजेत जात येत असत. आडिवरेकर यांनी बहुदा कधीतरी वासंतीबाईंना या माझ्या लेखनाविषयी सांगितलं असावं. त्या देखील चित्र काढायच्या. आडिवरेकर यांच्या सोबत त्यांनी काही प्रदर्शनं देखील केली होती. या वासंतीबाईंनी प्रख्यात कवी वसंत बापट यांच्या कानावर या डायऱ्यांविषयी सांगितले. बापट यांना बहुदा त्या विषयी कुतूहल वाटले असावे. बापट तेव्हा ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादन करायचे. त्यांनी ते सारं लिखाण मागवून घेतलं आणि साधनेच्या १९८३ सालच्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध केलं. त्यावर्षी ते लिखाण अतिशय गाजलं.

त्या काळात दिवाळी अंकातील निवडक साहित्याचा समावेश असलेला ‘अक्षर दिवाळी’ हा ग्रंथ पुण्याच्या विश्वकर्मा साहित्यालय या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होतं असे. प्रख्यात मुद्रक वि ग माटे हा ग्रंथ प्रकाशित करत असत. त्यासाठी स शि भावे, गो म कुलकर्णी, अरुणा ढेरे, शांता शेळके आणि शांता किर्लोस्कर यांचं संपादकीय मंडळ देखील तयार केलं होतं. या संपादकीय मंडळाला बरवे यांचं हे लिखाण अतिशय आवडलं आणि १९८३ सालच्या ‘अक्षर दिवाळी’ ग्रंथात या लिखाणाचा समावेश केला.

कालांतरानं म्हणजे बहुदा नव्वदच्या दशकात मौजतर्फे ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यात या साधना मधल्या लेखनाचा समावेश होता. बरवे यांच्या डायरीतली जी आठ पानं या आधी ‘साधना’ आणि नंतर ‘अक्षर दिवाळी’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यातल्या एका पानाचा म्हणजे सात नंबरच्या लेखाचा मात्र समावेश ‘कोरा कॅनव्हास’ या पुस्तकात झाला नव्हता. तोच लेख आज इथं प्रसिद्ध करीत आहोत.

खरं तर ‘कोरा कॅनव्हास’ प्रसिद्ध होण्याआधी ‘चिन्ह’च्या १९८७ सालच्या पहिल्या अंकात बरवे यांच्या डायरीतलं काही लिखाण लेख स्वरुपात प्रसिद्ध झालं होतं. तर १९८९ सालच्या अंकात त्यांच्या डायऱ्यांमधली तब्बल २५ पानं ‘चिन्ह’नं प्रसिद्ध केली होती. ती केवळ चित्रकला वर्तुळातच नव्हे तर साहित्यविश्वात देखील अतिशय गाजली.

त्यानंतर मात्र ‘चिन्ह’चा अंक बंद झाला. १९९० साली ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. आमच्या आर्टिस्ट सेंटरने प्रख्यात चित्रकार हुसैन यांच्या हस्ते हा सोहळा घडवून आणला होता. त्या नंतरच्या पाच वर्षातच म्हणजे १९९५ साली बरवे यांचं निधन झालं. बरवे यांचं निधन झालं तेव्हा ‘चिन्ह’चं प्रकाशन बंद झालं होतं. बरवे यांच्या निधनाचा धक्का इतका मोठा होता की, अगदी न राहवून त्यांच्या अंत्ययात्रेवरुन परत आल्यावर मी रातोरात त्यांच्या वरच्या ‘चिन्ह’च्या विशेष अंकाचं प्लॅनिंग देखील केलं होतं. आणि ते केल्यावरच माझ्या लक्षात आलं की ‘अरेच्या आपण अंकाचा आराखडा तयार करुन बसलोय खरे पण अंक कुठे आहे, तो कधीच बंद झालाय.’
२००१ साली ‘चिन्ह’च दुसरं पर्व सुरु झालं. त्यावेळी देखील बरवे यांच्यावरचा अंक करायचं मी नक्की केलं होतं. पण त्यात देखील नको त्या अडचणी येत गेल्या आणि ते राहूनच गेलं. आणखी एक प्रयत्न २००९ साली केला, पण तोही अपुरा ठरला. तो विषय मात्र सतत आव्हान देत राहिला यात शंकाच नाही. त्यातूनच आता २०२३ साली पुन्हा नव्यानं संकल्प सोडलाय. कामाला सुरुवात देखील झालीय. २०२४ च्या पूर्वार्धात हा ग्रंथ निश्चितपणे प्रसिद्ध होईल.
( आपण दिलेल्या वेळा पाळू शकत नाही, आपल्याच मस्तीत काम करत जातो, निर्मिती अत्यंत निर्दोष व्हावी यासाठी अक्षरशः झटत राहतो. साहजिकच प्रकाशनाला उशीर होतो या आजवरच्या अनुभवावरुन या संदर्भात कुठलीही सवलत योजना वगैरे जाहीर करायची नाही असा ‘चिन्ह’नं निर्णय घेतला आहे. येत्या म्हणजे २०२४ च्या १६ मार्च रोजी हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना हा ग्रंथ हवा असेल त्यांनी कृपया आता कुठलाही संपर्क साधू नये . जेव्हा तो प्रसिद्ध होईल तेव्हाच तो विकत घ्यावा.)

बरवे यांचा आधी ‘साधना’ आणि नंतर ‘अक्षर दिवाळी’मध्ये प्रसिद्ध झालेला पण ‘कोरा कॅनव्हास’ मध्ये समाविष्ट न झालेला बरवे यांचा हा लेख अवश्य वाचा. बरवे यांच्या विलक्षण निरीक्षण शक्तीचा त्यातून प्रत्यय येईल यात शंकाच नाही.

७: रूप-ध्वनी संबंध
सुरूंच्या उंच उंच झाडांतून, समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकत समुद्र – किनाऱ्यावर येऊन उभं राहिलं, की समुद्राच्या लाटांच्या आवाजातून मला नेहमी वाटायचं, एखादी जलदेवता ओंजळी भरभरून मोत्ये किनाऱ्यावर वाळूत भिरकावीत आहे, त्याचाच हा आवाज आहे. विजेच्या पंख्यातून ऐकू येणारा संतत षड्ज ऐकताना मला नेहमी बाहेर पाऊस पडत असल्याचा भास होतो. रातकिड्याच्या किर्र आवाजातून, रानातल्या ओल्या पालापाचोळ्यावरून आपण अनवाणी चालतो आहोत, असे वाटते. बांगड्यांची किणकिण ऐकली की पांढऱ्या स्वच्छ कपात चहा ओतला जात असल्याचे मला जाणवते. माल- गाडीच्या धडधडीतून लाकडाचे ओंडके रचल्यासारखे वाटते. सशांच्या उड्या ऐकाव्या असा भास मला कागदावर कागद ठेवताना होतो.

लॉरीचा वातावरण चिरणारा पोंगा ऐकला की हत्तींचा कळप मस्तीत आल्यासारखा दिसतो. ध्वनिक्षेपकाच्या कर्ण्यातून दुधाचे पाट वाहत असल्याचे दिसते. नदीच्या पाण्यात वल्ह्याचा डुबुक आवाज ऐकला की आपण मासा जिवंत गिळीत आहोत, असे वाटते. रातराणीच्या सुगंधातून रेशमी वस्त्राची सळसळ ऐकल्याचा भास होतो. रात्री बेडूक ओरडत असताना वेदांचे पठण जोरात चालले आहे, असे वाटते. विमानाच्या घरघरीतून ढगाचा भुगा खाली पडत असल्यासारखे वाटते.

गाण्याची विशिष्ट ओळ ऐकली किंवा मनातल्या मनात आठवली, तर अपरात्री पावसाने ओल्याचिंब झालेल्या निर्मनुष्य रस्त्यावरून आपण चाललो आहोत आणि सगळीकडे रस्त्यावरच्या पाण्यात वरल्या दिव्यांची प्रतिबिंबं तरळत आहेत, असा भास होतो. झाडाच्या बुंध्यावर ‘टोक टोक ‘ करणाऱ्या पक्ष्याचा आवाज ऐकला की आपण पुन्हा एकदा परीक्षेचा पेपरच लिहीत आहोत, असं वाटतं. देवळात आरतीच्या वेळी घंटा वाजू लागल्या की गुलाल उधळीत मिरवणूक चालली आहे, असं दृश्य मला दिसतं !

एका विशिष्ट अत्तराचा वास आला की केळीच्या बुंध्यावरून साल काढल्यासारखं वाटतं. बकुळीच्या फुलाच्या गंधातून अनेक पक्ष्यांचे थवे उंच आकाशात गोल गोल घिरट्या घेताना दिसतात. गुलबक्षीच्या गंधातून कोणी तरी मंद आवाजात कुजबुजत असल्याचा भास होतो. हिंगाचा तीव्र वास आला, तर वाटतं की कोणीतरी भलेमोठे फत्तर मधोमध चिरीत आहे… औषधांच्या गंधामधून पांढऱ्या स्वच्छ लाद्या दिसतात, पांढरेशुभ्र पडदे फडफडत आहेत, असाही भास होतो. सनईच्या सुरांतून लवंगांचे वृक्ष फुटत असल्याचे जाणवते. मैफिलीतलं गाण रंगत चाललं की आपण पान चघळीत आहोत असं वाटतं आणि त्याचा स्वादही येऊ लागतो !

अशा तन्हेने आपल्या सर्व संवेदना एकवटून त्यांमधून कदाचित आपल्या आठवणींच्या साहाय्याने आपल्याला त्या त्या आवाजाचं किंवा गंधाचं हृदय स्वरूप दिसत असतं. सर्व आठवणी दृश्य स्वरूपातच साठवल्या जात असल्यामुळे आणि विशिष्ट आवाज किंवा गंधाशी त्या निगडित असल्यानं असं होत असावं.

****

– प्रभाकर बरवे 

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.