No products in the cart.
‘फोर्ब्स’ मानांकित फोटोग्राफर विकी राय
2013 साली, ‘होम, स्ट्रीट होम’ या विकी रॉय यांच्या पहिल्या फोटोग्राफी बुकचं थाटात प्रकाशन झालं. या पुस्तकाचं देश विदेशातून जोरदार स्वागत झालं. 2019 साली ‘द गार्डियन’च्या जो ग्रिफीन यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सुरु असलेल्या त्यांच्या, ‘ग्लोबल डेव्हलपमेंट्स’ या लोकप्रिय स्तंभातून विकी राय यांच्यावर एक प्रदीर्घ लेख लिहिला. यामुळे पुन्हा विकी राय यांचं कर्तृत्व जगभरात पोहोचलं. विचार करताना असं जाणवतं की विकी राय एक कुशल फोटोग्राफर आहेतच पण त्यांच्या समाजसेवेमुळं जग त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतंय. त्यांची ही समाजसेवा बेगडी नाही तर ती स्वानुभवातून आलेली आहे. परिस्थितीचे जे दाहक चटके विकी यांना भोगावे लागले ती परिस्थिती इतर लहानग्यांवर येऊ नये यासाठीची तळमळ विकी यांच्या प्रत्येक कार्यातून दिसते.
विकी यांनी जे उत्तुंग काम करून ठेवलंय त्यामागची प्रेरणा काय ? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “मी आजवर हे सगळं, स्वत:च्या विकासासाठी, उन्नतीसाठी करत आलो. शाळेत असताना एक प्रसंग घडला त्या प्रसंगाने मला नवी प्रेरणा दिली. शाळेत एकदा शिक्षकांनी आम्हाला विचारलं की, “देशके तरक्की के लिये आप कैसे योगदान दे सकतें है ?” आमच्यापैकी कुणाकडेही याचं उत्तर नव्हतं. मग सरांनी जे उत्तर दिलं ते आजही माझ्या मनावर कोरलं गेलं आहे. सरांचं उत्तर होतं “पहले आप अपनी तरक्की करो, तो देशका एक गरीब कम हो जायेगा। उसके बाद दुसरोंकी गरीबी खत्म करनेकीं सोचो.”
विकी राय यांनी एकदा मध्यप्रदेशातल्या ‘सावरिया आईस स्केटिंग प्रोजेक्ट’ या प्रकल्पाला भेट दिली होती. या नाविन्यपूर्ण स्केटिंग सेंटरची उभारणी एक जर्मन युवती आणि तीन भारतीय युवकांनी केली आहे. हे स्केटिंग सेंटर पर्यटकांना सेवा देतानाच गरीब आदिवासी मुलांना या खेळाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी विनामूल्य देतं. विकी 2015 साली या सेंटरला फोटोग्राफी करण्यासाठी गेले होते. तिथं खेळणाऱ्या लहान लहान आदिवासी मुलांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही मुलं दारिद्र्यात वाढत असली तरी स्केटिंग करताना त्यांच्या डोळ्यात निर्व्याज हसू आणि चमक असे. या हास्यानं विकी यांच्या मनावर मोहिनीचं घातली. आपलं व्यावसायिक काम पूर्ण करून विकी त्या मुलांमध्ये मिसळायचे. या मुलांचं निरागस हसू त्यांनी कॅमेऱ्यात तर टिपलंच, पण मनांतही साठवून ठेवलं. या मुलांशी दोस्ती झाल्यानंतर विकी यांना या मुलांबद्दल, त्यांच्या गावाबद्दल बरीच माहिती मिळाली.
मध्यप्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘सावरिया’ या नाविन्यपूर्ण स्केटिंग सेंटरची उभारणी एक जर्मन युवती आणि तीन भारतीय युवकांनी केली आहे. देश, विदेशातील पर्यटकांच्या गर्दीबरोबरचं, खास तिथल्या स्थानिक आदिवासी मुलांना स्केटिंगचा आनंद रोज मनमुराद लुटण्याची संधी या स्केटिंग सेंटरच्या निर्मात्यांनी विनामुल्य उपलब्ध करुन दिली आहे. इथं विकी २०१५ साली फोटोग्राफीसाठी गेले असताना, त्या लहान, लहान आदिवासी मुलांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही मुलं अतिशय दारिद्र्यात वाढत होती. पण स्केटिंग करताना त्यांच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरुन ओसंडून वहाणारं निर्व्याज हसू, यांनी विकी यांच्या मनावर जणू मोहिनीच घातली. आपली व्यावसायिक फोटोग्राफी पूर्ण करुन विकी त्या मुलांमधे मिसळले. त्यांचं ते निरागस, निर्व्याज हसू त्यांनी कॅमेऱ्यात तर टिपलचं, पण मनांतही साठवून ठेवलं. या मुलांशी मग त्यांची दोस्तीच झाली. पुढील काही दिवस त्या मुलांशी बोलत असताना विकीला त्यांच्याबद्दल, त्यांच्या गावाबद्दल बरीच माहिती मिळाली. एका छोट्या मुलीला, सीमाला त्यांनी विचारलं की तुला देवदूत भेटला तर तू त्याला काय मागशील ? त्या लहानग्या, निरागस मुलीनी पटकन सांगितलं, माझ्या वर्गात पंखा नाही, त्यामुळे वर्गात एवढ्या मुलांना एकत्र बसवलं की श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्याच वर्गातील गोविंदाला विकीनी विचारलं, तुला मोठं झाल्यावर काय व्हायची इच्छा आहे ? क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला, सरपंच. कारण दुर्गम आदिवासी पाड्यांवर वाढणाऱ्या या मुलांच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आणि मानाचं पद तेच होतं.
यातून विकी यांना एक कल्पना सुचली. मुलं जी स्केटिंग पॅड्स वापरत होती त्यावर काळ्या मार्करनं ही सगळी इच्छारुपी उत्तरं त्यांनी लिहिली. मग तयार झालेल्या त्या पाट्या हातात देऊन एकेकाचे फोटो काढले. ते विकीनी सोशल मिडियावर पोस्ट केले. ते फोटो लगेचच व्हायरल झाले. या फोटोंचा जनमानसावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की मदतीचे अनेक हात पुढे आले. सीमाच्या शाळेतल्या सगळ्या वर्गांमध्ये यातून पंखे बसवले गेले. गोविंदचा चुणचुणीतपणा आणि हजरजबाबीपणा आवडून संजय रॉय यांनी त्याच्या पुढील शिक्षणासाठी दोन लाखांची स्कॉलरशिप दिली. विकी यांच्या अनोख्या कल्पकतेतून साकारलेल्या फोटोंमुळे जगभरातल्या लाखो सुहृदांपर्यंत या मुलांची व्यथा पोहोचली आणि आवश्यक त्या मदतीचा मोठा ओघ सुरु झाला.
गेली सात वर्ष सातत्यानं विकी रॉय हे आपल्या व्यस्त व्यावसायिक कामातून सवड काढत everyoneisgoodatsomething.com या वेबसाईटसाठी काम करतात. या वेबसाईटवर दिव्यांगत्वावर मात करत, नवी उभारी घेऊ पाहणाऱ्या व्यक्तींचे फोटो, मुलाखती, माहिती यांचा अंतर्भाव असतो. यासाठी एक पैसाही न घेता विकी अशा दिव्यांगांना देशभरात ते जिथं असतील तिथं जाऊन भेटतात. मग ते कुठल्याही आर्थिक, सामाजिक स्तरातले असोत. हे काम विकी यांना आत्मिक समाधान देतं. विकी यांनी सुमारे 200 दिव्यांग व्यक्तींना डॉक्युमेंट्री फोटोग्राफी या माध्यमातून मदत केली आहे.
2016 च्या ‘मदर्स डे’ला विकी यांनी आपल्या आईला एक छान भेट दिली. त्यांच्या गावी विकी यांनी एक टुमदार बांगला बांधला नि आईला तो भेट दिला. त्या माऊलीची आयुष्यभराची वणवणं, फरफट आणि लेकरापासून झालेल्या ताटातूटीची भळभळती जखम, सगळ्यावर अशी मायेची फुंकर घालत, विकी यांनी आईला त्या आपुलकीच्या भेटीनं खऱ्या अर्थानी कृतार्थ केलं.
मध्य प्रदेशमधल्या स्केटिंग पार्कच्याच गावातील सहा वर्षाच्या सचिनला वेगळ्याच चर्मरोगाने ग्रासलं होतं. चर्मरोगाबरोबरचं त्याचे केसही मधे मधे पॅच पडावा तसे जात, तेवढा भाग पूर्ण टक्कल तयार होई. सचिनला वेदना असह्य होतं. विकींनी त्याचे फोटो काढून आपल्या दिल्लीतल्या डॉक्टर मित्राला पाठवले. सचिनला आपल्या सोबत दिल्लीला घेऊन आले आणि त्सोशल मिडियावरुन लोकांना आवाहन केलं. एक डॉक्टर पुढे आले. सचिनवर औषधोपचार करुन त्याला पूर्ण बरा करुन मगच त्याला विकी यांनी परत त्याच्या गावाला पाठवलं.
याच गावात या गरीब आदिवासींसाठी काम करणाऱ्या एका एनजीओकडून विकी यांना समजलं की त्या गावात पाणी पुरवठा करणारी पाइपलाइनच आलेली नव्हती. त्यामुळं गावात थेंबभरही पाणी नव्हतं. गावात पाणी यावं म्हणून आपल्या काही फोटोंची विक्री करून विकी यांनी तब्बल आठ लाख रुपये एनजीओकडे बोअरवेलसाठी सुपूर्त केले. यातून बोअरवेल, मोटर आणि त्यासाठी वीज पुरवठा करायला सोलर पॅनल बसवले गेले. एक हंडा पाण्यासाठी गेल्या अनेक पिढ्या मैलोनमैल पायपीट करणाऱ्या मातांना आता त्यांच्या पाड्यावरच २४ तासं पाणी मिळायला लागलं.
या लेखानिमित्त माझं आणि विकी राय यांच, ‘सलाम बालक ट्रस्ट’च्या पुढाकारानं, फोनवर अर्धा तास बोलणं झालं. या संभाषणातून विकी हे व्यक्तीमत्व किती साधं आणि मृदुभाषी आहे हे सहज कळत होतं. विकी यांनी शब्दश: भंगारात आणि उकिरड्यावर दिवस काढले पण मिळालेल्या प्रत्येक संधीच सोनं करत आपल्या फोटोग्राफीनं जग पादाक्रांत केलं. फोनवरचं संभाषण संपल्यानंतर मी डोळे मिटून बसून राहिलो. नकळत माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या…
2003 साली ज्यांना देशातला सर्वोच्च साहित्य पुरस्कार, ‘ज्ञानपीठ’ देऊन भारत सरकारने गौरवलं, त्या विं.दा. करंदीकरांच्या कवितेच्या ओळी माझ्या मनात गुंजत होत्या…
देणाऱ्याने देत जावे ,
घेणाऱ्याने घेत जावे….
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हात घ्यावेत
*****
– प्रतोद कर्णिक
लेखक हे चित्रकार आणि जाहिरातकर्मी आहेत.
Related
Please login to join discussion