Features

‘फोर्ब्स’ मानांकित फोटोग्राफर विकी राय

‘निवडुंगाची फुलं’  लेखमालेच्या चौथ्या भागात आपण विकी राय यांच्या फोटोग्राफी बद्दल वाचणार आहोत. विकी यांची छायाचित्रं ही प्रत्यक्ष जगण्याच्या अनुभवातून आलेली होती, त्यात केवळ तंत्र नव्हतं तर भावनाही होत्या. त्यामुळे त्यांच्या फोटोग्राफीला जगभरातून दाद मिळाली. अनेक पुरस्कार मिळाले. आपण जे शिकलो ते केवळ स्वतःपुरतं न ठेवता इतरांनाही त्यांनी कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता विनामूल्य वाटलं. इथंच विकी राय यांचं वेगळंपण सिद्ध होतं.  

विकी रॉय याला फोटोग्राफर म्हणून घडवणारे दिल्लीचे ख्यातनाम फोटोग्राफर श्री. अनय मान.

२००७ साली विकीनं दोन वर्षातील आपल्या फोटोंमधल्या काही उत्तम फोटोंचं पहिलं सोलो ( एकल ) प्रदर्शन, ‘स्ट्रीट ड्रीम्स’ या नावानं दिल्लीतील ‘इंडिया हॅबिटेट सेंटर’ इथं आयोजित केलं. विकीनं काढलेल्या फोटोंतील विषयांचं नाविन्य आणि कलात्मक दर्जा पाहून प्रभावित झालेल्या ब्रिटीश हाय कमिशननं  या प्रदर्शनाला आर्थिक पाठबळ पुरवलं . या मोठ्या प्रदर्शनामुळे विकीनं खऱ्या अर्थानं जागतिक फोटोग्राफीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. दिल्ली पाठोपाठ लंडन येथे या प्रदर्शनाचे तीन शोज आयोजित केले गेले. साऊथ आफ्रिका आणि व्हिएतनाम इथंही या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विकीला निमंत्रित केलं गेलं‌. यातल्या बऱ्याच फोटोंची विक्री झाली, आणि त्याआधी महिना तीन हजाराची नोकरी करणाऱ्या विकी यांचा बँक बॅलन्स काही लाखांवर गेला. आता आपणही मोठे फोटोग्राफर झालो आहोत ही हवा विशीतल्या विकीच्या डोक्यात जायला लागली. हे पाहून एकदा अनय सरांनी विकीला शूट आधीच बोलावलं आणि अतिशय शांतपणे व प्रेमानं त्याची जाणीव करुन दिली. हे समजावून सांगितलं की, आधी तू माझ्याशी कसा वागायचास, बोलायचास ते आठव व आता तू सगळ्यांसमोर मला कशी दुरुत्तरं करायला लागला आहेस हे योग्य नाही. विकीला आपली चूक समजली. सरांची माफी मागून त्यानं परत अशी चूक होणार नाही हा शब्द दिला.

अनय मान सरांकडून फोटोग्राफीचं शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने फोटोग्राफी विश्वावर स्वत: चा ठसा उमटवायला सज्ज झालेले विकी रॉय.

जागतिक पातळीवर स्वत:चं नाव, ठसा उमटवलेल्या विकी रॉय यांनी नंतर कधीच यशाची हवा आपल्या डोक्यात जाऊ दिली नाही. आजही त्यांच्याशी बोलताना हे पदोपदी जाणवतं. बघता, बघता विकी यांनी अनय मान सरांच्या हाताखाली तीन वर्ष पूर्ण केली.

विकीनं मला सांगितलं की मी ‘स्टीट ड्रीम्स’ या प्रदर्शनातून माझं आयुष्य उलगडत होतो. मी तेव्हा कसा रहायचो, फुटलेल्या पाईपाखाली कसा आंघोळ करायचो, हे सगळे अनुभव मी कॅमेऱ्यानी वस्त्यांमध्ये जाऊन टिपलं होतं. समाजानी अशा मुलांकडे समाजाचा एक घटक म्हणून, मानवतेच्या दृष्टीकोनातून पहावं, त्यांना हाडतूड न करता आधार द्यावा हाच या फोटोंमागचा उद्देश होता. ”

“स्टिट ड्रिम्स”, विकी यांच्या या पहिल्या पुस्तकातून दिल्लीतलं आपलं रस्त्यावरचं भणंग आयुष्यचं उलगडलं…जगभरातू या पुस्तकाला खूप मोठी मागणी आली.

विकी राय यांची छायाचित्रं पाहताना काही वैशिष्टय ठळकपणं जाणवतात. त्यांचा एक फोटो खूप बोलका आहे. एका ठिकाणी तारेला लहान मुलांच्या अंडरवेअर एका ओळीत आणि एका खाली एक तारांवर वाळत घातल्याचं विकीनं पाहिलं.  हे दृश्य बघून त्यांना आपले पूर्वीचे ‘सलाम बालक’ सेंटरचे दिवस आठवले. तेव्हा सगळी मुलं अशीच आपापल्या अंडरवेअर धुऊन वाळत घालायची. हे दृश्य विकीनं आपल्या कॅमेऱ्यात  कलात्मक पद्धतीनं टिपलं. मी जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा माझ्यातला कलाकार, कला दिग्दर्शक थक्क झाला. हा फोटो नाविन्य, कंपोझिशन, विषयातला बेधडकपणा, लहान वयातली निरागसता हे सगळं दाखवतोय. म्हणजे बघा, जर मोठ्या वयाच्या पुरुषांच्या अंडरवेअर लटकवलेल्या दाखवल्या तर ते पहाणाऱ्याला घाणेरडं वाटेल. जर महिलांची अंतर्वस्त्र दाखवली, तर ते अश्लील वाटेल. पण लहान, लहान मुलांच्या अंडरवेअर जर एका ओळीत सुकवताना पहिल्या तर आपल्या चेहऱ्यावर नवलाई आणि स्मित येईल. यातून एक गोष्ट लक्षात येईल, इथं आसपासच  कुठं तरी निरागस बालकांचं एखादं केंद्र, सेंटर, निवारा घर नक्की आहे. म्हणजे हे एक छायाचित्र आपल्यासाठी एका सिंबॉलचं काम करतं. फोटो काढताना अशी ‘नजर’ असणं खरं तर अचंबित करणारं आहे. कलेचं, डिझाईनचं आणि कॉंपोझिशनचं, जाहिरात संकल्पनांचं शिक्षणही न घेतलेल्या विकी यांना ही कलात्मक दृष्टी निसर्गदत्त देणगी म्हणूनच लाभली असावी.

लहान मुलांच संगोपन करणारं केंद्र आजुबाजुला असल्याचं दर्शवणारा विकी यांचा कल्पक फोटो.

फोटोग्राफीचं प्रत्यक्ष शिक्षण घेताना तीन वर्षात इन्डोर, आऊटडोअर फोटोग्राफीतले सगळे बारकावे विकीनं आत्मसात केले आणि तो स्वत:ची दिशा, स्वत:चा मार्ग शोधायला, अनय सरांकडून बाहेर पडला.

२००८ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर एक फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली गेली. विकीनं आजवर गल्ली, मोहल्ल्यात फिरू काढलेल्या असंख्य फोटोमधून काही फोटो निवडले आणि या स्पर्धेसाठी आपली प्रवेशिका पाठवली. त्यापैकी एक फोटोचा विषय होता ‘कंस्ट्रक्शन साईटवर घमेलं उचलून नेणारी आई आणि तिचा पदर धरुन मागून चालणारं तिचं लेकरु’. हा फोटो परीक्षकांना बेहद्द आवडला असावा कारण पाच हजार प्रवेशिकांमधून मधून फक्त चार जणांची निवड करण्यात आली. दोन युरोपियन, एक हॉंगकॉंगचा आणि एक फोटोग्राफर भारतीय होता तो म्हणजे आपला विकी राय ! हा बहुमान आपल्या देशाला मिळवून देणारे विकी राय हे  पहिले भारतीय कलाकार ठरले.

ट्वीन टॉवरच्या पुनर्निर्माणाचे फोटो काढण्याचा बहुमान मिळालेल्या जगातील चार फोटोग्राफर्समधे विकी यांनी स्थान पटकावलं, आणि देशाची शान वाढवली.

या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिकही उत्तम आणि अभिनव मिळालं. ते म्हणजे विजेते सहा महिने अमेरिकेत राहिले आणि त्यांनी अतिरेकी हल्ल्यात उद्धवस्त  झालेल्या ट्वीन टॉवर्सची जी नव्यानं उभारणी सुरु होती त्याचं छायाचित्रणही केलं. त्याच बरोबर या चार विजेत्यांना अमेरिकेतल्या जगद्विख्यात फोटोग्राफी इन्स्टिट्यूट IPC, ईंटरनॅशनल फोटोग्राफी सेंटर इथं सहा महिन्याचं विशेष प्रशिक्षण देखील मिळालं. या प्रशिक्षणामुळे विकीच्या आजवरच्या अनुभवातून आलेल्या कामाला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचीही जोड मिळाली. विकी यांनी या संस्थेतच डॉक्युमेंट्री फोटोग्राफीचंही प्रशिक्षण घेतलं. याच वर्षी विकी यांना अजून एक नवीन संधी मिळाली. “ईंटरनॅशनल ऍवॉर्ड फॉर यंग पीपल” हा अमेरिकन पुरस्कार विकी यांना मिळाला. या पुरस्काराच्या ‘गोल्ड ऍवॉर्ड’नी त्यांना सन्मानित केलं गेलं. हा बहुमान एवढा प्रतिष्ठित होता की इंग्लंडचे युवराज प्रिन्स एडवर्ड यांनी विकी राय यांना चक्क ‘रॉयल डिनर’साठी ‘बकिंगहॅम पॅलेस’मध्ये आमंत्रित केलं.

आता विकी यांचा विजयरथ सुसाट निघाला होता. वाटेत येणारे अनेक अडथळे ते लीलया पार करत होते. आणि नवनव्या विजयाची नोंद करत होते. असं असलं तरी अनय सरांना दिलेला शब्द विकी यांनी कायम लक्षात ठेवला. या सगळ्या मानसन्मानांनी त्यांना उन्मत्त नाही तर लीन, विनम्र केलं.

विकी राय यांना अमेरिका, ग्रेट ब्रिटनसह अनेक युरोपीयन देशांमधून मोठमोठ्या संधी मिळत होत्या. पण ‘सारें जहांसे अच्छा हिंदोस्तां हमारा’ या उक्तीला प्रमाण मानून, विकी यांनी आपली मायभूमी हीच आपली कर्मभूमी म्हणून निवडली. ज्या दिल्ली शहरानं त्यांना घडवलं, त्या दिल्ली शहराची त्यांनी आपल्या पुढील वाटचालीसाठी निवड केली.

वेगवेगळे प्रोफेशनल फोटोग्राफी प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स एका बाजूला सुरु असताना विकीला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. ज्या समाजानं, देशानं आपल्याला रस्त्यावरच्या घाणीतून बाहेर काढून इतकं सुंदर आयुष्य दिलं, त्याचं ऋण कसं फेडणार ? हा विचार विकीच्या मनात येत असे. हा विचार सुरु असतानाच विकीच्या मनात एक नवीन कल्पना सुचली. ती म्हणजे ज्यांना फोटोग्राफी शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मोफत फोटोग्राफी शिक्षण देण्याची. या संकल्पनेतून विकी राय यांनी आपला सहकारी चंदन गोम्स याच्यासोबत दिल्लीमध्ये ‘रंग ओपन लायब्ररी’ची सुरुवात २०११ मध्ये केली. या लायब्ररीसाठी जगभरातल्या श्रेष्ठ फोटोग्राफर्सना विकी यांनी त्यांची फोटोग्राफीवरील उत्तमोत्तम पुस्तकं मागितली. या आवाहनाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि जगभरातल्या साडेचारशे पेक्षा जास्त नामांकित फोटोग्राफर्सनी आपली फोटोग्राफीवरील पुस्तकं भेट म्हणून पाठवली‌. बघता बघता फोटोग्राफी या विषयावरचं एक अद्ययावत वाचनालय तयार झालं. ही लायब्ररी ज्यांना फोटोग्राफी शिकायची इच्छा आहे अशा सर्वांसाठी दर रविवारी मोफत खुली असे. त्याच बरोबर दर रविवारी या शिकाऊ उमेदवारांशी संवाद साधायला एक नामांकित फोटोग्राफरही इथं भेट देत असे. देशभरातील अनेक फोटोग्राफर्स या प्रकल्पाचे सदस्य बनले. विकी यांनी हिमाचलच्या स्पिती व्हॅली इथं अनेक कार्यशाळांचं आयोजनही केलं. तिथंही या लायब्ररीतील निवडक पुस्तकं विकी नेत असत.

हा  प्रकल्प विकी राय यांनी सतत सात वर्ष नेटानं चालवला. पण विकी यांची कामाची व्यग्रता एवढी होती की पुढं हा प्रकल्प एका दिल्लीच्या लजपतराय रोडवरील बुक मॉलमध्ये हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता ‘रंग ओपन लायब्ररी’ इथं नेहमीसाठी खुली झाली आहे. या लायब्ररीची देखभाल शोरूम तर्फे केली जाते. आजही ही पुस्तकं वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत.

क्रमश:
**

– प्रतोद कर्णिक,
लेखक हे चित्रकार आणि जाहिरातकर्मी आहेत.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.