No products in the cart.
सीईटीचा पेपर फुटला ?
महाराष्ट्राला पेपरफुटी काही नवीन नाही. दहावी, बारावीचे पेपर्स, वेगवेगळ्या पदव्यांचे पेपर्स इथं नेहमीच फुटत असतात. आणि आपणही पेपरमध्ये येणारी एक बातमी म्हणून ते वाचून चक्क सोडून देत असतो. या फुटाफुटीमध्ये आता कलाशिक्षणक्षेत्र देखील मागे राहिलेलं नाही. जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या १६६ वर्षाच्या जागतिक दर्जा लावलेल्या शिक्षणसंस्थेत देखील असे प्रकार घडावेत ही महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची दारुण शोकांतिकाच आहे. गेल्या आठवड्यात अत्यंत घाईघाईनं घेतलेल्या सीईटी परीक्षेचे पेपर्स व्हाट्सअपवरुन परीक्षेच्या आदल्याच रात्री संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते अशी माहिती पुराव्यानिशी आमच्यापर्यंत आली आहे. तिचाच समाचार घेणारा हा विशेष लेख.
दि २४ एप्रिल २०२३ रोजी ‘चिन्ह’ने कला शिक्षक पदविकेच्या परीक्षेत जेजेमध्ये सामूहिक कॉपी करण्यात आल्याची बातमी दिली होती. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण खातं किंवा कला संचालनालय यांनी काय कारवाई केली ते माहित नाही, किंवा करण्याच्या मनस्थितीमध्ये तरी ती सरकारी खाती आहेत की नाही हे देखील कळावयास मार्ग नाही. कला संचालनालयातल्या सावळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक शैक्षणिक घोटाळा उघडकीला आला आहे.
ज्या सीईटी परीक्षेच्या आधारावर महाराष्ट्रातील जेजेसारख्या पदवी देणाऱ्या कला महाविद्यालययांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, त्या प्रवेश परीक्षेचा पेपर अर्थात सीईटीचा एक पेपर आधीच फुटला असल्याची माहिती पुराव्यानिशी आमच्या हातात आली आहे.
खरं तर मागच्या वर्षी सीईटी परीक्षेच्या वेळी अनेक भयंकर गोंधळ झाले होते. अत्यंत सुमार दर्जाचं काम असलेली मुलगी प्रवेश परीक्षेत चक्क पहिली आली होती. तर अनेक चांगली काम असलेले विद्यार्थी खालच्या क्रमांकावर घसरले होते. याचा संपूर्ण पाठपुरावा ‘चिन्ह’ने केला होता आणि हा विषय बराच काळ लावून धरला होता. पण त्यातून सीईटीवाल्याना किंवा कला संचालनालयाला कोणताही शहाणपणा शिकता आला नव्हता त्यामुळे यावर्षी हा गोंधळ अगदी सीईटीच्या आयोजनापासूनच सुरु झाला आहे.
सगळ्यात मोठा गोंधळ आणि ढिसाळ नियोजनाचं उदाहरण म्हणजे सीईटीची परीक्षा – जी अगदी घाईघाईने १६ एप्रिल रोजी उरकण्यात आली. सीईटी सेलने जी तारीख तात्पुरते वेळापत्रक म्हणून दिली होती त्या तारखेलाच परीक्षा उरकून घेतली गेली. साहजिकच नुकतीच बारावीची परीक्षा संपलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं नियोजन करायलाही वेळ मिळाला नाही. अनेक उच्च कला विद्यार्थ्यांच्या तर परीक्षा सुरु असताना मध्येच ही सीईटीची महत्वाची परीक्षा समोर आली. अशा वेळी उच्च कलेचा पेपर द्यावा की सीईटीचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला.
अशा वेळी जे व्हायचं तेच होतं. अनेक विद्यार्थी सीईटीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगळे मार्ग शोधू लागतात. आणि त्यांना क्लासेस हमखास यशाची हमी देणारे गैरमार्ग सुचवू लागतात. असाच एक प्रकार टू – डी डिझाईनचा पेपर परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे १५ तारखेला व्हाट्सअप वरून विद्यार्थ्यांमध्ये पसरला गेला होता असे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये जी कुजबुज सुरु आहे त्यातून असे कळले की १६ मार्चच्या सीईटी परीक्षेत टू – डी या विषयासाठी म्युझिक इंस्ट्रुमेंट्स अर्थात संगीत वाद्ये हा विषय देण्यात आला होता. पण हा विषय येणार आहे याची माहिती अनेक विद्यार्थ्यांना आधीच होती. सोशल मीडियावर हा पेपर कसा सोडवायचा याची उत्तरपत्रिका वेगवेगळ्या डिझाइन्सच्या माध्यमातून प्रसारित देखील झाली होती.
(आता हा वरचा स्क्रिनशॉट बघा. व्हाट्सअपवरून व्हायरल झालेले हे टू – डी डिझाईन. या स्क्रीनशॉटमध्ये तो मेसेज पाठवण्याची तारीख आणि वेळ स्पष्ट दिसते. नेमका हाच विषय प्रात्यक्षिक परीक्षेत यावा हा योगायोग कसा? याचबरोबर या विषयाची अनेक डिझाइन्सही या मेसेजबरोबर पाठवण्यात आली होती. हा मेसेज मग नियोजित ग्रुप आणि निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. त्या विद्यार्थ्यांनी हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवला. आणि पेपर चक्क व्हायरल झाला. याचा सांकेतिक अर्थ असा होता का की आता मर्जीतल्या विद्यार्थ्यांना विषय माहित झाला आहेच आता या सॅम्पल म्हणून पाठवलेल्या डिझाइन्सच अनुकरण करून पेपर सोडवा म्हणजे मर्जीतले विद्यार्थी लक्षात येतील? अर्थात या सर्व शंका आहेत. कारण परीक्षेच्या आधीच जर अशी डिझाइन्स मिळत असतील आणि नेमके म्युझिक इंस्ट्रुमेंट्स हाच विषय पेपरमध्ये येत असेल तर हा योगायोग नक्कीच नाही हे निश्चित.)
लक्षात घ्या हा प्रात्यक्षिकाचा पेपर असल्यामुळे थेट विषय न लिहिता सांकेतिक भाषेत पेपर फोडता येतो. म्हणजे आपल्या निवडक ‘अर्थ’पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत केवळ डिझाइन्स पोचवायची. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये, वेगवेगळ्या रंगसंगतीत. अशी ७,८ सॅम्पल डिझाइन्स व्हाट्सअपच्या माध्यमातून परीक्षार्थींपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज समजते की प्रात्यक्षिक परीक्षेत नेमका कुठला विषय असणार आहे ते. १५ मार्च किंवा त्या आधीच व्हाट्सअप वरून ही डिझाइन्स प्रसारित झाली होती.
पण परीक्षार्थीना ही माहिती पोहोचवणाऱ्या अनेक समाजकंटकांना हे समजत नाही की हा पेपर प्रात्यक्षिकाचंच असल्यामुळे आज न उद्या हा गैरप्रकार उघडकीस येणार आहे. मागील वर्षीही ‘चिन्ह’ने पुराव्यानिशी दाखवून दिले होते की अनेक उत्तर पत्रिका या एकाच व्यक्तीने सोडवल्या आहेत की काय असे वाटावे एवढे साम्य उत्तरपत्रिकेत होते. मागील वर्षी ऑब्जेक्ट ड्रॉईंग या विषयात ‘वांगं’ ही वस्तू देण्यात आली होती. त्या वांग्याची प्रकाश योजना, रेखाटण्याची शैली अगदी एकाच व्यक्तीने काढली असावी एवढे साम्य अनेक उत्तरपत्रिकांमध्ये होते. ज्यांना विश्वास बसत नसेल त्यांनी खालील लिंकवर क्लीक करून आम्ही केलेली ‘कला संचालनालयाची सीईटी संशयास्पद’ ही मागील वर्षीची स्टोरी जरूर वाचावी.
खरं तर होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सीईटी परीक्षेचा मार्ग तयार करण्यात आला. यातही ज्यांना सोप्या मार्गाने कला महाविद्यालयात विशेषत: जेजेमध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्यांनी गैरमार्ग शोधलाय. मधल्या काळात सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी अनेक खाजगी क्लासेसचे पेव फुटले. हे क्लासेस चालवणारी मंडळी आणि यंत्रणेतल्या लोकांचे संगनमत आहे अशी कुजबुज अनेक विद्यार्थी पालकांकडून ‘चिन्ह’पर्यंत पोहोचत आहे.
याचं उदाहरण म्हणजे मागील वर्षी अत्यंत सुमार काम असलेल्या एका मुलीला चक्क सीईटी परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला होता. याबद्दल ‘चिन्ह’ने जाहीरपणे प्रश्न विचारला असता सीईटी सेल ने हे नजरचुकीने झालं अशी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. एवढी मोठी घोडचूक नजरचुकीने होणं शक्य नाही. यासाठी योजनाबद्ध रीतीने खाजगी क्लास आणि यंत्रणा काम करते असेच दिसून येते. अनेक क्लासेसचे संचालक हे सीईटीच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या शिक्षकांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध ठेऊन असतात. खाजगी क्लासचे संचालक शासकीय कला महाविद्यालयांचा दौराही त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित करतात. याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले जातात. या सगळ्यातून काय सूचित होते ? याचा अर्थ काय ? हे आम्ही लिहिण्यापेक्षा सुजाण वाचकांनी लावावा.
‘चिन्ह’ खाजगी क्लासेसच्या विरोधात मुळीच नाही. पण त्या माध्यमातून जर काही गैरप्रकार होत असतील तर ते महाराष्ट्राच्या कला शिक्षणाचा विनाश करणारेअसल्याने त्यांच्या विरोधात ‘चिन्ह’ आहे आणि नेहमीच राहील. या सीईटी परीक्षेच्या माध्यमातून १६६ वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या जेजे स्कूल ऑफ आर्टचे प्रवेश निश्चित होतात. पण जेव्हा परीक्षेचं आयोजन ढिसाळ होतं, किंवा पेपर आधीच आपल्या मर्जीतल्या विद्यार्थ्यांना पोहोचवले जातात, इतकंच नाही तर रिझल्टमध्ये अक्षम्य चुका करून वारंवार ती यादी सुधारित करण्यात येते तेव्हा अनेक होतकरू ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. हातात कला असलेले अनेक विद्यार्थी जेजेमधील शिक्षणापासून वंचित राहतात.
जेजेमधलं आजच शिक्षण कितीही वाईट का असेना, पण जेजेचा परिसरात विद्यार्थी म्हणून शिकता येणं हीच एक मोठी संधी आहे. अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य या परिसराने घडवलं आहे. अनेक हिऱ्यांना या संस्थेने पैलू पडले आहेत. पण सीईटीमध्ये जर गैरप्रकार करून मूठभर धनदांडग्यांना प्रवेश देण्याची तजवीज केली जात असेल तर हा महाराष्ट्राच्या कला शिक्षणाचा दिवसाढवळ्या केलेला खून आहे. वर्षनुवर्षे सिस्टीम नियोजनबद्ध रीतीने सडवण्यात आल्याने जेजेची आज संपूर्ण वाताहत झाली आहे. सुमार दर्जाचे शिक्षक आणि सुमार दर्जाचे विद्यार्थी इथे निवडले जात आहेत. त्यामुळे नावाजलेल्या या संस्थेत कला शिक्षणाचं सातत्यानं मातेरं होत आहे. उच्च शिक्षण खातं असो किंवा कला संचालनालय वेळोवेळी ‘चिन्ह’ने विचारलेल्या प्रश्नांपासून वारंवार आपले हात झटकून घेत आहे. सारं काही आलबेल आहे असं भासवण्यात येतं, पण ते तसं मुळीच नाहीये हे कला वर्तुळ आणि परीक्षार्थी, पालक यांना चांगलंच ठाऊक आहे, दबक्या आवाजात ते कुजबुजही करत असतात. पण दुर्दैवानं ते पुढाकार घेऊन जाब विचारायला पुढं येत नाहीत त्यामुळेच काळ सोकावतोय.
‘चिन्ह’च्या माध्यमातून अनेक पालक, परीक्षार्थी सीईटी सेल, कला संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण खातं यांना आम्ही चार प्रश्न जाहीरपणे विचारत आहोत आणि या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यावीत असं आवाहन जाहीरपणे करीत आहे. ( आवाहन हा शब्द ‘आव्हान’ असा वाचायला देखील आमची काहीच हरकत नाही )
१. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणारी सीईटी परीक्षा यावर्षी एवढ्या घाईने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच का घेण्यात आली? जर परीक्षा एप्रिल महिन्यात घ्यायची होती तर विद्यार्थ्यांना याची सूचना किमान सहा महिने आधीच देणे अपेक्षित होते. ती का नाही दिली गेली ?
२. परीक्षेच्या आदल्या दिवशी सोशल मीडियावरून सांकेतिक भाषेत कुठला विषय येणार आहे ते प्रसारित करण्यात आले याची कुठलीही चौकशी सीईटी सेल किंवा संबंधित खात्याने केली आहे का ? नसतील तर आता आम्ही पुराव्यानिशी हे सारं दाखवून दिल्यावर आता तरी ते करणार आहेत का ?
३. परीक्षेचं व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ पद्धतीने करण्यात येतं. सुमार काम असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश यादीत वर ढकलण्यात येतं तर चांगलं काम असलेले अनेक विद्यार्थी खालच्या स्थानावर फेकले जातात तर अनेक जण प्रवेश यादीच्या बाहेरच फेकले जातात. त्यामुळे परीक्षेचे हे नियोजन कुठल्या निकषांवर केलं जातं ते आता तरी जाहीर केलं जाणार आहे का ?
४. गेल्यावर्षी ‘चिन्ह’ने लावलेल्या निकालाचे जे पुराव्यानिशी वाभाडे काढले होते त्यावर सीईटी सेल आणि कला संचालनालय यांनी काय कारवाई केली ? गेल्यावर्षी इतकं सारं रामायण घडल्यावर देखील परीक्षेचं सूत्रसंचालन करणारा अधिकारी यंदा का बदलला गेला नाही ?
या प्रश्नांची उत्तर दिली जातील अशी अपेक्षा करायची का ?
*****
फिचर इमेजमधील फोटो प्रतिनिधिक आणि इंटरनेटवरून साभार.
Related
Please login to join discussion