Features

कला संचालनालयाची सीईटी संशयास्पद?

आज  शिक्षक दिनाच्या दिवशी ही स्टोरी लावताना आम्हाला प्रचंड दुःख होत आहे. दरवर्षी जेजे स्कुल ऑफ आर्ट आणि जे जे स्कुल ऑफ अप्लाइड आर्ट, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय औरंगाबाद आणि नागपूरचे शासकीय चित्रकला महाविद्यालय आणि पदवीचे शिक्षण देणारे अन्य कला महाविद्यालय यांचे  प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येते. यावर्षी या परीक्षेला ३००० विद्यार्थी बसले होते. येत्या बुधवारी या परीक्षेचे रिझल्ट लागतील आणि जेजे सारख्या महत्वाच्या संस्थेतील प्रवेश निश्चित होतील. तत्पूर्वी या परीक्षेत गैरव्यवहार होत आहेत ही दबक्या आवाजातील चर्चा खरी आहे का हे जाणून घेण्यासाठी या रिझल्टचा आढावा आम्ही घेतला. यावर्षीचे रिझल्ट बघून ही निवडप्रक्रियाच आम्हाला संशयास्पद वाटत आहे. कलेचे विद्यार्थी निवडण्याची वेळ येते तेव्हा काही निश्चित नियम असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे काम कसे आहे हे बघून अंतिम प्रवेश यादी निश्चित करणे महत्वाचे आहे. पण प्रथम क्रमांक ज्या मुलीला मिळाला आहे तिचे काम बघितले की  प्रश्न पडतो ही सीईटी निवडप्रक्रिया नक्की कशी झाली? प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी निवडताना विद्यार्थ्यांचे काम पाहिले गेले की काही वेगळेच निकष लावले गेले?

विद्यार्थ्यांमध्येही  दबक्या आवाजात चर्चा चालू आहे की कला संचालकांनी आयत्यावेळी ज्युरी बदलून डिप्लोमाचे शिक्षक का नेमले? हे आयत्या वेळचे बदल का झाले याचा खुलासा कला संचालकच करू शकतील. विद्यार्थ्यांकडून आम्हाला जे पत्र मिळाले, त्यात कला संचालकांना काही प्रश्न विचारले आहेत. याही प्रश्नांची उत्तरे कला संचालकानी दिली तरच या परीक्षेच्या निवड समितीभोवती जे संशयाचे धुके निर्माण झाले आहे ते दूर होईल. महत्वाचे म्हणजे हा प्रश्न लायक विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय का हा आहे, आणि ‘चिन्ह’ची तळमळ हीच आहे की  कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. 

विद्यार्थ्यांनी कला संचालकांना पाठवलेले पत्र

या सीईटीमध्ये बरेच गैरव्यवहार चालतात हे आमच्या कानावर आले होते. त्यामुळे सूत्रांकडून आम्ही यावर्षीच्या रिझल्टचा जरा आढावा घेतला. आणि आमचा संशय खरा आहे की काय असे वाटू लागले. विद्यार्थ्यांना मिळणारे मार्क्स आणि त्यांचे काम याची तुलना करण्यासाठी आम्ही पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची लिस्ट पाहिली. इथे आपण पहिल्या आणि सहाव्या  क्रमांकांच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांचीच चर्चा करू. 

प्रथम क्रमांकावर आहे ख़ुशी राजेश जैन ही विद्यार्थिनी. खरे तर पहिल्या चार क्रमांकावर विद्यार्थिनी बघून आम्हाला आनंदच झाला होता. पण जेव्हा त्यांचे काम समोर आले तेव्हा मात्र हा आनंद क्षणाधार्थ मावळला. 

खुशीला १९० पैकी एकूण गुण  मिळाले आहेत १६९. यात १० मार्क हे इंटरमिजिएट परीक्षेचे धरले जातात. म्हणजे तिला मिळालेले मार्क १५९. आता या गुणांबरोबर तिची उत्तरपत्रिकाही आपण https://mahcetaac.azurewebsites.net/?did=2309 या वेबसाईटवर बघू शकतो. या वेबसाईटवर सर्वच विद्यार्थ्यांचे मार्क्स उपलब्ध आहेत. त्यांचा ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकली की कोणालाही ते बघता येईल. 

खुशीची पूर्ण उत्तरपत्रिका

खुशीची उत्तरपत्रिका बघा. तिचे काम बघा, खरंच ते पहिला क्रमांक यावा या दर्जाचे आहे का?

खुशीची ऑब्जेक्ट ड्रॉईंग विषयाची उत्तरपत्रिका. खुशीच्या वांग्यावर प्रकाशच नाहीये. 

खुशीचे डिझाईन प्रॅक्टिकल. यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. जाणकार स्वतःच हे काम कसे आहे ते ठरवतील 

आणि हे खुशीचे मेमरी ड्रॉईंग. याची गुणवत्ता पहिल्या क्रमांकाची आहे का?

आता यादीमध्ये सातव्या स्थानी असलेल्या तेजस उजगावकरचे काम बघा. तेजसला १६३ गुण आहेत. यात त्याचे १० मार्क इंटरमिजिएट परीक्षेचे ऍड झाले आहेत. 

तेजसने केलेलं डिझाईन प्रॅक्टिकल 


तेजसने केलेलं ऑब्जेक्ट ड्रॉईंग. 


तेजसने केलेलं मेमरी ड्रॉईंग

आता हे काम बघूनही कोणीही सांगेल की ते पहिल्या क्रमांकाचे जे काम आहे त्यापेक्षा उत्तम आहे. 

आता यावर कुणाला असेही वाटू शकते की सर्वच मुलांचे काम खराब आहे आणि त्यातल्या त्यात खुशीचे काम बरे म्हणून ती पहिल्या क्रमांकावर! तर इथे आता विक्रम अय्यंगार या मुलाचे कामही बघा. हा मुलगा गुणवत्ता यादीत सहाव्या क्रमांकावर आहे! त्याला मिळालेले एकूण गुण आहेत १५४. यात त्याने बहुधा इंटरमिजिएट परीक्षा दिली नसावी म्हणून ते गुण त्याला मिळाले नाहीत. यात हे  समजत नाही की जर सीईटीसाठी इंटरमिजिएट परीक्षा अनिवार्य नाहीये तर मग ज्यांनी ती परीक्षा दिली आहे त्यांचे १० गुण ऍड का केले जातात? जर इंटरमिजिएट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार असतील तर ती परीक्षाच अनिवार्य करावी. 

 

विक्रमची पूर्ण उत्तरपत्रिका

 विक्रमचे डिझाईन प्रॅक्टिकल 

विक्रमचे ऑब्जेक्ट ड्रॉईंग. आता या कामाची गुणवत्ता खरंच सहाव्या क्रमांकावर
जाण्यासारखी आहे का? हा आमचा प्रश्न आहे

विक्रमचे मेमरी ड्रॉईंग. 

ही फक्त तीन तुलनात्मक उदाहरणे आम्ही घेतली आहेत. पूर्ण ३००० विद्यार्थ्यांचे रिझल्ट बघितले  तर अजून चांगली कामे खाली फेकलेली सापडू शकतात. 

२००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने कला महाविद्यालय प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. खरं  तर निर्णय चांगला होता. यात वशिल्याने प्रवेश मिळवण्याची शक्यता शून्य होती. पण आजचे हे रिझल्ट बघून आम्हाला असा प्रश्न पडला की ज्यांना पळवाटा शोधायच्या आहेत ते कसेही शोधू शकतात? या क्षेत्रातील जाणकारांनाही आम्ही या गुणवत्तायादी बाबत प्रश्न विचारले. त्यातून बरीच धक्कादायक माहिती मिळाली. अर्थात ही माहिती आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीवर मिळाली. सीईटी परीक्षेचे सर्व काम खरे तर कला संचालकाने जबाबदार शिक्षकांकडून (कायमस्वरूपी प्राध्यापक) करून घ्यायचे असते. पण ही कामे करून घेतली जातात ती कंत्राटी प्राध्यापकांकडून! आता कंत्राटी प्राध्यापकांची परिस्थिती आज आहे तर उद्या नाही अशी, मग ते यात गैरव्यवहार करू शकणार नाहीत का? अख्या महाराष्ट्रात हे काम करण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षक मिळू शकत नाहीत का? आणि ते मिळत नसतील तर सरकारी महाविद्यालयांचा उपयोग काय? 

सीईटी परीक्षेचे सर्व पेपर हे विभागवार तपासायला जातात. या पेपरवर नंबर दिसू नये म्हणून कार्बन शीटही लावल्या जातात. शेवटी सर्व पेपर हे जेजे मध्ये टीचर्स डिप्लोमा कॉलेज आहे तिथे अंतिम यादी बनवण्यासाठी येतात. आता तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असणारच. पण जर अंतिम यादी बनवणाऱ्यांनी नंबर बघून काही फेरफार केले तर त्याला कोण जबाबदार असणार? सीसीटीव्हीमध्ये एवढे बारीक तपशील दिसतात कुठे? अर्थात हा आमचा आरोप नसून एक शंकाच आहे. 

महाराष्ट्रात जेजे मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी खूप विद्यार्थी धडपडतात. साम, दाम, दंड, भेद यापैकी कुठलाही मार्ग वापरण्याची अनेकांची तयारी असते. विद्यार्थ्यांना सीईटी पास करून देण्यासाठी महाराष्ट्रात अनेक क्लासेसही आहेत. ते भली मोठी फीही आकारतात. त्यामुळे एकेकाळी पेपर चेकिंगवर असणाऱ्या जाणकार प्राध्यापकांनी तर आम्हाला आश्चर्यकारक माहिती दिली. विशिष्ट क्लासेसचे विद्यार्थी आपल्या पेपरवरील चित्रामध्ये सांकेतिक खुणा बेमालूमपणे मिसळतात. योगियाच्या खुणा योगी जाणे या उक्तीप्रमाणे समजणाऱ्याला बरोब्बर इशारा कळतो आणि हळूच त्या पेपरला गुणवत्ता यादीत वर आणले जाते! उदाहरणार्थ काही मुले जर डोंबिवलीच्या एखाद्या क्लासला जात असतील तर तिथून येणाऱ्या मुलांच्या पेपरमध्ये मेमरी ड्रॉइंगमध्ये मांजर हमखास दिसेल. तिऱ्हाईताला  वाटेल एवढ्या सगळ्या चित्रात मांजरी कशा? पण समजणाऱ्यासाठी तो इशारा असतो! अशा या गुणवत्ता यादीच्या सुरस कथा आहेत. आणखीही बऱ्याच कथा आमच्याकडे आल्या त्या क्रमश: आम्ही देणार आहोत. 

या सीईटी गुणवत्ता यादीचा अजून एक पैलू आहे. इतर कोर्सेस प्रमाणे कलेची सीईटी ही वस्तुनिष्ठ होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याला जे काम आवडेल ते दुसऱ्याला आवडू शकणार नाही. प्रत्येक चित्राबाबत पाहणाऱ्यांचे मत वेगळे असू शकेल. त्यामुळे पेपर जेव्हा विभागवार तपासायला जातात तेव्हा त्या विभागात खुशीचे काम सर्वोत्तम असू शकते. विक्रमच्या बाबतीत शक्यता ही आहे की विक्रमचा पेपर ज्या विभागात तपासणीसाठी गेला तिथे त्याचे काम सर्वोत्तम नसणार.त्यामुळे तो गुणवत्ता यादीत खाली फेकला गेला असेल का?  शिवाय जनरल  नॉलेज या पेपरमध्ये तुम्हाला किती गुण  मिळतात यावरही तुमचे रँकिंग ठरते. ज्या विद्यार्थ्याला जनरल नॉलेजमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात त्याची एकूण टोटल वाढते आणि तो गुणवत्ता यादीत वर जातो. त्यामुळे सीईटी घेताना हा परीक्षा पद्धतीचा दोष असू शकतो. (खुशीलाही जनरल नॉलेज या विषयात चाळीस पैकी चाळीस गुण मिळाले आहेत) इथे हे ठरवणे महत्वाचे आहे की कला महाविद्यालयाची सीईटी घेताना निकष काय असावेत. त्यांची निवड ही त्याच्या कामाच्या दर्जावरून व्हावी की जनरल नॉलेजवरून? 

‘चिन्ह’ची भूमिका 

हा विषय लावून धरण्यामागे फक्त सनसनाटी निर्माण करणे हा उद्देश बिलकुल नाही. तर महाराष्ट्रातले कलाशिक्षण वाचवावे ही आमची तळमळ आहे.  कंत्राटी पद्धतीच्या हातात महाराष्ट्राचे शिक्षण गेले तर ते वाचणार कसे. अर्थात कंत्राटी प्राध्यापकांना आम्हाला बिलकुलच दोष द्यायचा नाहीये. दोष असेल तर तो व्यवस्थेचा आहे. आणि ही व्यवस्था तेव्हाच बदलेल जेव्हा जेजे डीनोवो स्टेटसकडे  वेगाने जाईल. एकदा हे झाले की इतर सरकारी कला महाविद्यालयांनाही स्वायत्तता मिळण्याचे प्रयत्न सुरु होतील. आज आय आय टी सारखी संस्था स्वतःच्या आय डी सी (इंडस्ट्रिअल डिझाईन सेंटर) या संस्थेची प्रवेश परीक्षा ज्या पारदर्शकतेने घेते तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. केवळ सीईटी न ठेवता स्टुडिओ टेस्टचाही समावेश या प्रवेश परीक्षेत करणे गरजेचे आहे. योग्य त्या सुधारणा करून जर सीईटी घेण्यात आली तरच होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. दर्जेदार काम असलेल्या मुलांना जर कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर शिक्षणाचीही गुणवत्ता आपोआप वाढेल. 

आजच्या या स्टोरीमधून आम्ही कला संचालक आणि सर्व ज्युरी यांना आवाहन करतो की  त्यांनी विद्यार्थी व आम्ही विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करावा. तरच आमच्या आणि महाराष्ट्रातील तमाम कलाप्रेमी आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होतील. आणि जिथे गरज असेल तिथे निवड प्रक्रिया सुधारावी. 

 सरतेशेवटी ‘चिन्ह’च्या  वाचकांना नम्र  विनंती, आपण ही स्टोरी पूर्ण वाचली म्हणजे आपल्याला कला विद्यार्थी आणि कला शिक्षण याबद्दल तळमळ आहे हे दिसून येते. तेव्हा आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवा. जेणेकरून या  महत्वाच्या प्रश्नावर सर्वांच्या सूचना जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि काही सकारात्मक बदल घडून येतील. तसेच आमची महाराष्ट्र शासनाचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आवाहन आहे की या प्रकरणात जातीने लक्ष घालावे. योग्य ते निर्णय घेऊन निवडप्रक्रिया सुधारित करावी. 

– कनक वाईकर. 

७७३८९५०२१६

****

चिन्हचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.