No products in the cart.
पुण्यात कलामहर्षी प्रदर्शनात महागोंधळ !
कलामहर्षी बाबुराव पेंटर कला प्रदर्शन आणि स्पर्धेची दि. 04 जून रोजी सांगता झाली. या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित चित्रकारांनी सहभाग घेतला होता. पण स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन ढिसाळ असल्यानं कलाकारांना याचा खूप मानसिक त्रास झाला, असे कला वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेवरून दिसून येतं.
या स्पर्धेची सुरुवात अत्यंत गाजावाजा करून करण्यात आली होती. महाराष्ट्रातच्या कलाक्षेत्रातलं एक आदरणीय नाव म्हणजे बाबुराव पेंटर. त्यांच्या नावे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यानं अनेक स्पर्धकांनी यात भाग घेतला. अगदी स्पर्धेच्या माहिती पत्रकावरही मेस्त्री कुटुंबातील सदस्यांची नावं होती. त्यामुळे ही स्पर्धा अधिकृत आहे असं मानून अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. या स्पर्धेचं प्रवेश शुल्क 700 रुपये होतं. असं असूनही अनेक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
स्पर्धेसाठी खूप जास्त प्रवेशिका आल्यानं आयोजकांना व्यवस्थापन करणं खूप कठीण गेलं. विशेष म्हणजे स्पर्धकांना प्रदर्शनाच्या एक दिवस आधी कळवून ऐनवेळी प्रदर्शन स्थळ बदलण्यात आलं. आधीचं प्रदर्शन स्थळ हे राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी हे होतं. नंतर ते बदलून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह करण्यात आलं. त्यामुळे मुळातच ढिसाळ असलेल्या नियोजनाचा पूर्णपणे बट्याबोळ झाला. प्रदर्शनासाठी उपलब्ध जागा आणि आलेल्या प्रवेशिका यांचं प्रमाण व्यस्त असल्याने अनेक कलाकृती ठेवण्यासाठी जागाच नव्हती. त्यामुळे कलाकृती कुठेही आणि कशाही पद्धतीने ठेवल्या गेल्या. एका चित्रकर्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला माहिती दिली की, “कलाकृती चक्क जमिनीवर ठेवल्यानं अनेक कलाकृतींना प्रेक्षकांचे पाय लागत होते. आम्ही चित्रकार कलेला देव मानतो पण आयोजकांनी आमच्या कलाकृतींना जी वागणूक दिली ते पाहून खूपच धक्का बसला.” आपल्या कलाकृतींची ही अवस्था पाहून अनेक चित्रकार प्रदर्शन संपायच्या आधीच आपल्या कलाकृती घेऊन गेले. या कलाकृती घेऊन जाताना कोणी त्यांना अडवतही नव्हतं. या गोंधळात कलाकृतीचा चित्रकारच ती कलाकृती घेऊन जात आहे की दुसरा कोणी याचीही माहिती आयोजकांना नव्हती.
Video Player
Media error: Format(s) not supported or source(s) not found
Download File: https://chinha.in/wp-content/uploads/2023/06/WhatsApp-Video-2023-06-08-at-12.40.51-PM.mp4?_=1या स्पर्धेचं परीक्षक म्हणून ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर उपस्थित होते. त्यांनी या प्रदर्शनाचं उदघाटनही केलं. त्यामुळे या घटनेबद्दल पाडेकर सरांना त्यांचं मत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ” या स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजक अर्जुन मेस्त्री (बाबुराव पेंटर यांचे नातू) यांनी उत्साहाने आयोजन तर केलं पण ते वयाने अत्यंत लहान आहेत. त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम हाताळायचा कसा ? याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. त्याचबरोबर मला खटकलेली अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी सरळ सरळ हे प्रदर्शन आयोजन करण्याचं काम एका इव्हेंट मॅनेजरला दिलं. मुळातच इव्हेंट मॅनेजरचा कलेशी काही संबंध नसतो. त्यामुळे केवळ पैसे कमावण्याचं साधन म्हणून हे मॅनेजर्स या सगळ्याकडे बघतात. केवळ हेच प्रदर्शन नाही तर हल्ली अनेक मोठी प्रदर्शनं आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजरकडे दिली जातात. आणि मग अशी फसगत होते. चित्रकारांनाही या घटनेचा मनस्ताप होतो. ” या बरोबर पाडेकर असंही म्हणाले की त्यांनी आयोजक अर्जुन मेस्त्री यांच्याशी दीर्घ संवाद साधला आणि प्रदर्शन किंवा स्पर्धा आयोजित करताना काय काय काळजी घ्यावी याची माहितीही दिली. यापुढं चित्रकलेशी संबंधित कुठलाही कार्यक्रम आयोजित करताना योग्य काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही मेस्त्री यांनी दत्तात्रय पाडेकरांना दिली.
या प्रदर्शनाचं आयोजन इतकं ढिसाळ होतं की, उदघाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचं भाषणही मध्येच चिठ्ठ्या पाठवून थांबवण्यात आलं. चित्रकार संजय शेलार हा प्रकार पाहून प्रचंड चिडले होते ही माहिती उपस्थितांकडून कळाली.
खरं तर आयोजकांनी उत्साहात या स्पर्धेचं आयोजन केलं पण नियोजन कसं करावं याचा अंदाज त्यांना मुळीच नव्हता. त्यामुळे जेव्हा या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला तेव्हा त्यांनी हळूच हे आयोजन दुसऱ्याच्या हातात दिलं. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर कुप्रसिद्ध गोवा आर्ट फेस्टिवलचं आयोजन करणारे अतुल काटकर हेच होते. खरं तर या काटकरांची एवढी कीर्ती ठाऊक असतानाही प्रस्तुत स्पर्धेच्या आयोजकांनी हे नियोजन त्यांच्या हातात का दिलं ? हा मोठा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर अतुल काटकरचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काटकर हे या प्रदर्शनामध्ये जो गोंधळ झाला त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो असं जाहीरपणे सांगत आहेत. असं असलं तरी स्पर्धेचे मुख्य आयोजक मेस्त्री कुटुंब विशेषतः ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ते अर्जुन मेस्त्री यातून आपले हात झटकून घेऊ शकत नाहीत. स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. तेव्हा अंतिम जबाबदारी ही त्यांचीच होती. एका मोठ्या आणि महान कलाकाराचं नाव वापरून त्यांनी चित्रकारांशी जो खेळ केला आहे त्याला खुद्द बाबुराव पेंटरही माफ करणार नाहीत. ज्येष्ठ चित्रकार संजय शेलार यांचंही नाव या स्पर्धेसोबत जोडलं गेलं होतं. त्यांनी खरं तर बाबुराव पेंटर यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेतून या स्पर्धेशी स्वतःला जोडून घेतलं होत. तेही या सगळ्या गैरप्रकारामुळे नाराज झाले अशी माहिती दत्तात्रय पाडेकर यांनी दिली.
शेवटी कलाकारांना एक सूचना द्यावीशी वाटते की आम्ही ‘चिन्ह’च्या माध्यमातून नेहमी कळकळीनं सांगत असतो की ‘कलाकारांनो वाचत जा’. या चित्रकारांनी जर ‘चिन्ह आर्ट न्यूज’ वर प्रसिद्ध झालेला ‘सगळा दोष आयोजकांचा कसा ?’ हा लेख वाचला असता तर नक्कीच अशा फसवणुकीतून ते बचावले असते. कारण या लेखात अशा स्पर्धांची संपूर्ण मोडस ऑपरेंडी आम्ही मांडली होती. पण असो, आता तरी चित्रकार वाचन वाढवतील अशी आम्हाला आशा आहे. शेवटी म्हणतात ना “वाचाल तर वाचाल.”
*****
– कनक वाईकर
चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion