Features

सगळा दोष एक्स्पो आयोजकांचा कसा?

11 ते 13 डिसेंबर दरम्यान गोवा येथे गोवा आर्ट एक्स्पो आयोजित करण्यात आला होता. अतुल काटकर आणि प्रमोद माने गेली तीन वर्षे आर्ट फेअर आयोजित करतात. दोन वर्षे तो पुण्यात झाला आणि यंदा गोव्यात आयोजित करण्यात आला होता. देशभरातील 100 च्या वर कलाकारांनी या एक्स्पोमध्ये सहभाग घेतला होता. पण पुरेशा आणि योग्य जाहिराती अभावी पणजी येथील डॉन बॉस्को शाळेच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पोला कला रसिकांचा थंड प्रतिसाद मिळाला. देशभरातून आलेल्या कलाकारांनी या एक्सपोमध्ये बरीच गुंतवणूक केली होती. जाण्यायेण्याचा खर्च, कलाकृती प्रदर्शनस्थळी पोहोचवण्याचा खर्च, गोव्यासारख्या महागड्या ठिकाणी राहणं खाणं, स्टॉल बुकिंग हा सगळा खर्च जमेस धरला तर प्रत्येकाने लाखभर रुपयांची गुंतवणूक केली असावी असा अंदाज काढता येतो. एवढी गुंतवणूक केल्यानंतर प्रदर्शनस्थळी कोणीच फिरकणार नसेल तर ही कलाकारांची शुद्ध फसवणूक आहे याबद्दल कसलेच दुमत नाही.  शेवटी हतबुद्ध झालेल्या कलाकारांनी आयोजकांना रिफंड मागितला पण तो ते देणार आहेत की नाही हे गुलदस्त्यात आहे.

भारतात इंडिया आर्ट फेअर आणि इंडिया आर्ट फेस्टिवल यांनी सामूहिक कला प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली. इंडिया आर्ट फेस्टिवलच्या राजेंद्र पाटील यांनी अथक मेहनतीनंतर या फेस्टिवलला एका उंचीवर पोहोचवले आहे. त्यांची सतीश नाईक यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत वाचक खालील लिंकवर पाहू शकतात. ही मुलाखत याचसाठी आवर्जून बघणे गरजेचे आहे की यातून वाचकांना समजेल की सामूहिक प्रदर्शन, एक्स्पो फेअर आयोजित करणे खायचे काम नाही. त्यासाठी अयोजकाने कला क्षेत्रात काही उंची गाठणे अपेक्षित असते. 

कलाकाराची कलाकृती विकत घेणारे कलारसिक, संग्राहक हे आयोजकांचे नाव, विश्वासार्ह्यता आणि योग्य जाहिरात बघूनच प्रदर्शनात येतात. पण हल्ली पैशाच्या लालचेने जो उठतोय तो सामूहिक प्रदर्शने आयोजित करतोय. हे मान्य आहे की कला ही आर्थिक व्यवहारातून वगळता येत नाही. कलाकारांचा उदरनिर्वाह हा कलाविक्रीतून होत असतो. त्यामुळे कलारसिक, आयोजक यांच्या भरीव साहाय्य आणि उत्साहाची गरज कलाकारांच्या कलेला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. पण कुंपणचं शेत खात असेल तर कलाकारांनी कोणाकडे बघायचे? 

या तथाकथित गोवा आर्ट फेस्टिवलमध्ये तर आयोजकांनी प्रदर्शन उदघाटनासाठीदेखील पाहुणे बोलावले नव्हते. तिथेच उपस्थित असलेल्या कलाकारांकडूनच प्रदर्शनाचे उदघाटन उरकण्यात आले.

समूह प्रदर्शक ज्या वेगवेगळ्या आकर्षक नावांनी प्रदर्शने आयोजन करतात तेवढ्या तळमळीने ते कलाकारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात का? अनेकदा प्रदर्शनात स्टॉलची किंमत ही 30 ते 50 हजाराच्या घरात असते.  प्रदर्शनाची जागा आयोजक अगदी फुटाफुटावर विकतात. पण त्याप्रमाणात प्रदर्शनाची प्रसिद्धी करत नाहीत. त्यामुळे प्रदर्शनांना अल्प प्रतिसाद मिळतो. इंडिया आर्ट फेस्टिव्हलची जाहिरात ही टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पहिल्या पानावर दिली जाते. त्यामुळे रसिकांना आयोजनाबद्दल माहिती लगेच कळते.

प्रदर्शन आयोजकांनी केवळ आपल्या नफ्याचा विचार न करता कलाकारांची चित्रे ग्राहकाच्या नजरेत कशी येतील याची योग्य स्ट्रॅटेजी आखणे गरजेचे आहे. यासाठी जाहिरात तज्ज्ञांशी व्यावसायिक भागीदारी करणे आवश्यक आहे. हल्ली सोशल मीडियामुळे जाहिरातींची जी नवमाध्यमे समोर आली आहेत त्यांचा योग्य वापर करून योग्य  ग्राहकापर्यंत पोहोचता येते. पण जिथे तिथे आयोजकांनी कॉस्ट कटिंग केली तर हे होणे अवघड आहे. 

त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता, योग्य ती गुंतवणूक न करता कुठल्याही सोम्या गोम्याने सामूहिक प्रदर्शने आयोजित करू नयेत. या अशा पैशासाठी हापापलेल्या हतोत्साही लोकांमुळे कलाकार आणि कलाक्षेत्राचे अपरिमित नुकसान होत आहे.

असे असले तरी सगळाच दोष हा आयोजकांचा आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. कलाकारांनीही योग्य शहानिशा करून प्रदर्शनात भाग घेणे आवश्यक आहे. हजारोची गुंतवणूक करून हे कलाकार प्रदर्शनात भाग घेण्यासाठी गेले पण त्यांनी जर ‘चिन्ह’वरील राजेंद्र पाटील यांची मुलाखत 2 तास गुंतवून पाहिली असती तर, त्यांना कळले असते की अशा प्रकारे प्रदर्शन आयोजित करणं  खरंच शिवधनुष्य पेलण्यासारखे असतं. त्यामुळे मोजक्या आयोजकांनाच  त्यातले व्यावसायिक गणित जमते. बाकी सर्व पैशासाठी प्रयोग करत असतात. त्यामुळेच कलाकारांनी योग्य अभ्यास करूनच कुठल्याही प्रदर्शनात सहभागी व्हावे अन्यथा फसवणूक आणि मनस्ताप अटळ आहे. 

****

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.