Features

अमूर्त चित्रकलेचा मूळ पुरुष पीएत मॉंन्ड्रिआन

आज रंगपंचमीचा सण आहे आणि रंगांना त्यांच्या विशुद्ध रूपात मांडणाऱ्या पीएत मॉंन्ड्रिआन याचा जन्मदिवसही आहे. मॉंन्ड्रिआनच्या एका चित्रविषयी काही महिन्यापूर्वी प्रचंड चर्चा सुरु झाली होती. कारण न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये हे चित्र चक्क उलटे लागले होते आणि कितीतरी काळ ते तसेच होते. यानिमित्ताने मॉडर्न आर्टविषयीही प्रचंड वादावादी कला जगतात झाली. पण कितीही वादावादी झाली तरी मॉंन्ड्रिआनने पिकासोच्या पुढची पायरी गाठून दृश्यांमधील अमूर्त सौंदर्य शोधले, ते ‘दृश्य म्हणजे काय’ या प्रश्नाच्या मुळाशी जात असताना. दृश्य अनुभवांना निश्चित रूप देणारे घटक म्हणजे रेषा, आकार आणि रंग. त्यांना त्यांच्या विशुद्ध स्वरूपात शोधण्याचे काम त्याने केले. ‘दृश्यातील विशुद्धता शोधणे म्हणजेच अमूर्त चित्रकला’, हे तथ्य त्याने प्रस्थापित केले. हे आधुनिक काळातील चित्रकलेतील सर्वात मोठे स्थित्यंतर आहे.

जगप्रसिद्ध डच चित्रकार पीएत मॉंन्ड्रिआन (जन्म ७ मार्च १८७२ – मृत्यू १ फेब्रुवारी १९४४) याचा आज १५१ वा जन्मदिवस! त्याने चित्रकलेच्या विचाराला जी वेगळी निर्णायक दिशा दिली त्यामधून अमूर्त चित्रकलेचा खऱ्या अर्थाने जन्म झाला आणि पुढे अनेक चित्रकारांच्या योगदानाने तिचा विकास झाला. त्यामुळे मॉंन्ड्रिआनच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्याचे आधुनिक कलेमध्ये असलेले स्थान आणि अमूर्त चित्रकलेच्या मागे असलेल्या विचारप्रक्रियेच्या जडणघडणीमध्ये असलेले अनन्यसाधारण योगदान नेमके काय आहे, हे समजावून घेण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केला आहे. अमूर्त चित्रकला म्हणजे कॅनव्हासवर केवळ काहीतरी असंबद्ध रेघोट्या ओढणे नसून त्यामागे खूप गंभीर आणि सखोल चिंतन असते हे यामधून लक्षात येईल.

MoMA च्या Modern Art and Ideas या अभ्यासक्रमात आधुनिक कलेकडे कसे बघावे, हे शिकवले जाते. मला वाटतं की नेमकं हेच शिकण्याची गरज असते आणि ते सहसा कोणी शिकवत नाही. या अभ्यासक्रम मला Piet Mondrian या जगप्रसिद्ध डच चित्रकाराच्या ‘Broadway Boogie Woogie’ या चित्राबद्दल शिकायला मिळाले. दुसऱ्या महायुद्धात स्वत:च्या देशातून परागंदा होण्याची वेळ आलेला हा कलाकार अमेरिकेतील न्यूयॉर्क इथे आला तेव्हा तिथले मनमोकळे वातावरण, काटकोनात वळणारे आणि समांतर जाणारे भव्य रस्ते आणि गगनचुंबी इमारती, तिथल्या हवेत जाणवणारे स्वातंत्र्य, ऊर्जा, तिथल्या ब्रॉडवे थिएटर मधील उत्फुल्ल असे, ‘बूगी-वूगी’ गाणारे जॅझ संगीत या सर्वांचे प्रतिबिंब या चित्रात अगदी आपसुकपणे पडले आहे.

Piet Mondrian. ‘Broadway Boogie Woogie’, 1943

अभ्यासक्रमात या असामान्य कलाकाराची ओळख झाल्यावर साहजिकच त्याच्या कामाबद्दल स्वतःहून अधिक अभ्यास करत गेलो. त्याबद्दल सांगण्याचा हा प्रयत्न. मॉंन्ड्रिआनने त्याच्या चित्रांमध्ये जे नवनवीन प्रयोग केले त्यामधून पुढे जगप्रसिद्ध झालेली त्याची अमूर्त चित्रशैली त्याला गवसली. त्या शैलीचे मूळ त्याला कुठेतरी पिकासोच्या चित्रांमधून प्रेरणा घेताना सापडले होते, असे मानले जाते. त्याने मूळ चित्र-संवेदनांचे अधिकाधिक अमूर्त स्वरूप शोधण्याचा प्रयत्न केला. चित्रामधील प्रत्येक रेषा काहीतरी व्यक्त करते, त्याचे मूळ तिच्या भौमितिक आकारात दडलेले असते आणि प्रत्येक रंग काहीतरी व्यक्त करतो, ते तो रंग ज्या तीन मूळ रंगांपासून तयार झालेला असतो त्यांच्यामध्ये दडलेले असते, हे त्याच्या लक्षात आले आणि या गोष्टीचा सखोल शोध घ्यायचा असे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने त्याच्या palette मध्ये रंगांची निवड अतिशय मर्यादित केली. त्यात केवळ लाल, पिवळा, निळा हे तीन मूळ रंग आणि कुठल्याही रंगाला ठळकपणाच्या ज्या तीन पातळ्या असतात त्या, म्हणजेच पांढरा, करडा आणि काळा इतकेच रंग ठेवले. त्याचबरोबर त्याने रेषा व आकार यांना अतिशय काटेकोर भौमितिक स्वरूप दिले.

यामधून त्याची खास शैली निर्माण झाली. या शैलीचा प्रभाव पुढे अनेक चित्रकारांवर पडला आणि Color field painting, Abstract expressionism, Minimalism अश्या अनेक कला-चळवळींवरदेखील पडला. इतकेच नव्हे, तर स्थापत्यशास्त्र, फर्निचर व फॅशन डिझाईन अश्या अनेक क्षेत्रांमधील कलाकारांनी त्याच्या चित्रांमधून प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात नवनिर्मिती केली. त्यामुळे मॉंन्ड्रिआनला १९४० च्या दशकाच्या मध्यापासून निर्माण होऊन नंतर स्थिरावलेल्या अमूर्त चित्रकलेचा मूळ पुरुष, असे मानले जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चित्रकलेच्या प्रस्थापित संकेतांची अक्षरश: तोडफोड करून चित्रकलेचे पूर्णपणे नवीन मापदंड बनवणारी पिकासोची शैली आणि विसाव्या शतकाच्या मध्यानंतर अनेक कलाकारांनी विशुद्ध अमूर्ततेमध्ये स्वत:ला झोकून देऊन निर्माण केलेल्या वर उल्लेख केलेल्या अनेक कला-चळवळी, या दोन पर्वांना जोडणारे महत्त्वाचे स्थित्यंतर मॉंन्ड्रिआनने घडवून आणले, हे त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.

मॉंन्ड्रिआनने पिकासोकडून प्रेरणा घेतली, ही संकल्पना मांडणारे एक छायाचित्र (छायाचित्र: Getty Images)

गंमत म्हणजे, मी हा अभ्यास करत असतानाच कलाजगताला धक्का देणारी एक बातमी आली. ती अशी होती की, मॉंन्ड्रिआनचे ‘Broadway Boogie Woogie’ सारखेच दिसणारे ‘New York City 1’ हे १९४१ मध्ये काढलेले परंतु काही कारणाने अपूर्ण राहिलेले चित्र, १९४४ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर १९४५ पासून MoMA च्या कलासंग्रहालयात आणि त्यानंतर अन्य ठिकाणी लावले गेलेले हे चित्र गेली ७५ वर्षे चक्क उलट अवस्थेत (जणू काही खाली डोके वर पाय अवस्थेत) लावले गेले आहे, असे एका कला-तज्ञ व्यक्तीच्या लक्षात आले. त्यावरून जगभर खूपच गोंधळ माजला, की इतकी वर्षे सर्वांनी हे चित्रं उलटे बघितले, तरी कोणाच्याही लक्षात कसे आले नाही, आणि आता पुढे काय करायचे? ते सुलट करायचे का? असे एक ना दोन, अनेक प्रश्न उद्भवले. आधुनिक कलेला नावे ठेवणाऱ्यांनी तर या संधीचा फायदा घेऊन आधुनिक कला किती निरर्थक असते आणि त्यातून लोकांना कसे मूर्ख बनवले जाते पहा, असा सूर लावला. परंतु माझे नशीब थोर म्हणून मॉंन्ड्रिआनच्या चित्रांबद्दल थोडासा अभ्यास केलेला होता. त्यामुळे हे चित्र उलट किंवा सुलट असण्याने काहीच फरक पडत नाही, त्यात कलाकाराला जे काही व्यक्त करायचे होते, ते अगदी व्यवस्थित व्यक्त झाले आहे, ते उलट लावले गेल्याने त्यातील कला-संवेदनेची कुठलीच हानी झालेली नाही, हे मी समजून घेऊ शकलो. त्यामुळे माझ्या मनात कुठलाही अनावश्यक संभ्रम निर्माण झाला नाही. उलट आधुनिक कलेविषयी माझी आस्था अजूनच वाढली.

Piet Mondrian. ‘Composition No. II’, 1930 (छायाचित्र: Sotheby’s)

या सगळ्या प्रकारामुळे आणि एकंदरीतच मॉंन्ड्रिआनच्या चित्रांबद्दल कुतूहल आणि आवड निर्माण झाल्यामुळे की काय, याच दरम्यान आंतरराष्ट्रीय कला-बाजारात घडत असलेल्या काही घडामोडींवर देखील माझे लक्ष गेले. ऑक्टोबर २०२२ मध्ये कला-बाजारातील तज्ज्ञांनी, २०२२ वर्षाअखेरीस होणार असलेल्या Sotheby’s या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या लिलावामध्ये मॉंन्ड्रिआनच्या ‘Composition No. II’ या १९३० मध्ये काढलेल्या चित्राला साधारण ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी किंमत मिळून विक्री होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. हे चित्र याअगोदर विकले गेले होते ते चाळीस वर्षांपूर्वी १९८२ मध्ये, Christie’s या न्यूयॉर्क मधील आंतरराष्ट्रीय लिलाव संस्थेमार्फत. त्यावेळी त्याला २.२ दशलक्ष डॉलर्स इतकी, म्हणजे त्यावेळपर्यंतची कुठल्याही अमूर्त चित्राला मिळालेली सर्वाधिक विक्रमी किंमत मिळाली होती. तर त्याच चित्रमालिकेतील ‘Composition No. III’ या १९२९ साली काढलेल्या चित्राला २०१५ साली Sotheby’s या आंतरराष्ट्रीय लिलाव संस्थेमार्फत सर्वाधिक म्हणजे तब्बल ५०.६ दशलक्ष डॉलर्स इतकी किंमत मिळाली होती. त्यावरून ‘Composition No. II’ साठी २०२२ सालासाठी तज्ज्ञांनी बांधलेला अंदाज योग्यच होता, हे लक्षात आलं. गेल्या महिन्यात, नोव्हेंबर २०२२ मध्ये Sotheby’s लिलावामध्ये ‘Composition No. II’ ला अंदाजाप्रमाणे खरोखरच ५१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी विक्रमी किंमत मिळून ते विकले गेले. मॉंन्ड्रिआनच्या कुठल्याही चित्राला आजवर मिळालेल्या किमतींमध्ये ही सर्वाधिक रक्कम आहे. परंतु अमूर्त चित्रकलेच्या विकासात मॉंन्ड्रिआनचे जे अमूल्य असे योगदान आहे, त्याचे मूल्य पैशात करता येणार नाही. कला-बाजार ही एक वेगळी दुनिया आहे. तिथली गणिते वेगळी असतात. कलाकारांच्या कामाच्या गुणवत्तेचे मोजमाप तिथे पैशाच्या स्वरुपात केले जाते. सर्वसामान्य कलारसिक मात्र कुठल्याही महान कलाकाराच्या कामाचे रसग्रहण आणि कौतुक करण्यासाठी त्या मोजपट्टीवर अवलंबून नसतो. तर मग मॉंन्ड्रिआनचे योगदानाचे महत्त्व मोजायचे तरी कसे?

Piet Mondrian. ‘New York City 1’ (1941) (‘उलट’ अवस्थेतील चित्र)

चित्रकलेच्या अविरत प्रवाहामध्ये प्राचीन गुंफा-चित्रांपासून आताच्या काळातील कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या चित्रांपर्यंत जी असंख्य स्थित्यंतरे होत गेलेली आहेत, त्यामध्ये काही स्थित्यंतरे मैलाचा दगड म्हणावीत अशी आहेत. ‘हे जग डोळ्यांना जसे दिसते तसे रंगवणे’, हा एका युगातील चित्रकलेचा मापदंड होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सेझानने ‘दृश्य म्हणजे डोळ्यांवर येणारा प्रकाश’ या तथ्याचा पाठपुरावा केला आणि प्रकाशाच्या परावर्तनानुसार दृश्य कसे बदलते, ते चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पिकासोने आणि त्याच्या समकालीन चित्रकारांनी त्यापुढे जाऊन दृश्याच्या बाबतीत घडणारी हीच प्रक्रिया व्यक्तींच्या आणि अन्य चित्र-विषयांच्या अंतरंगाच्या बाबतीत घडली, तर काय दिसेल त्याचे चित्रीकरण केले आणि त्यातून क्युबिझमची निर्मिती केली. इथपर्यंत जे काही चालले होते ते कला-विषयांचे किंवा दृश्यांचे मूर्त चित्रण होते. परंतु मॉंन्ड्रिआनने पिकासोच्या पुढील पायरी गाठत दृश्यांमधील अमूर्त सौंदर्य शोधले, ते ‘दृश्य म्हणजे काय’ या प्रश्नाच्या मुळाशी जात असताना. दृश्य अनुभवांना निश्चित रूप देणारे घटक म्हणजे रेषा, आकार आणि रंग. त्यांना त्यांच्या विशुद्ध स्वरूपात शोधण्याचे काम त्याने केले. ‘दृश्यातील विशुद्धता शोधणे म्हणजेच अमूर्त चित्रकला’, हे तथ्य त्याने प्रस्थापित केले. हे आधुनिक काळातील चित्रकलेतील सर्वात मोठे स्थित्यंतर आहे. म्हणूनच पीएत मॉंन्ड्रिआन अमूर्त चित्रकलेचा मूळ पुरुष ठरतो.

या संदर्भात चिन्ह मध्ये अलिकडेच प्रकाशित झालेले दोन लेख ‘कलेचे स्वयंशिक्षण घेताना’ या लेखमालिकेतील लेख पहिला – ‘मॉडर्न आर्ट अँड आयडियाज – आधुनिक कलेविषयी आधुनिक अभ्यासक्रम’ आणि लेख दुसरा – ‘समकालीन कला म्हणजे काय?’ हे अवश्य वाचावेत.

आधुनिक कलेविषयी आधुनिक अभ्यासक्रम

समकालीन कला म्हणजे काय?

*****

– विनील भुर्के,
लेखक कलेचे अभ्यासक आणि विद्यार्थी आहेत.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.