Features

आधुनिक कलेविषयी आधुनिक अभ्यासक्रम

तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर कला क्षेत्रातीलही अनेक कोर्सेस हे आपल्या हातातल्या लॅपटॉपमध्ये एका क्लिक सरशी उपलब्ध झाले आहेत. अनेकांना आर्थिक किंवा इतर अडचणीमुळे परदेशात जाऊन कलेचे अद्ययावत शिक्षण घेता येत नाही. पण तंत्रज्ञानाने हे शिक्षण घरबसल्या घेणे सहज साध्य झाले आहे. म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट (MOMA ) न्यूयॉर्क, कला संबंधित अनेक कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने शिकवते. यापैकी काही कोर्सेस हे विनील भुर्के यांनी विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहेत. या दूरस्थ शिक्षणाचा अनुभव आणि या कोर्समुळे लेखकाच्या कला जाणिवेत आलेली प्रगल्भता याविषयी या दीर्घ लेखात माहिती मिळेल. त्याचबरोबर या कोर्सेसची संपूर्ण माहितीही या लेखातून वाचकांना मिळेल. अनेकदा माहितीच्या अभावी अनेक कोर्सेस कला विद्यार्थ्यांना माहित नसतात. अशा कला विद्यार्थी किंवा कला रसिक यांच्यासाठी हा लेख नक्कीच मार्गदर्शक ठरेल. चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी हा लेख तीन भागात देत आहोत याची वाचकांनी नोंद घ्यावी.

स्वयंशिक्षित कलाकार म्हणून चित्रकला शिकत असताना, तसेच एकंदरीतच कलेविषयी जाणून घेत असताना जे जे काही चांगले सापडेल, ते ते शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी उत्तम ग्रंथ वाचणे, निरनिराळ्या वेबसाइटच्या माध्यमातून माहिती घेणे, विविध कला प्रदर्शनांना भेटी देणे, कलाकारांशी संवाद साधणे यातून खूप काही शिकायला मिळते. आपल्या नियमित कामाचा व्याप सांभाळून हा अभ्यास करणे सोपे नाही. त्यासाठी कलेचे सर्वांगीण आकलन करून घेता येईल अशी शिकण्याची नवनवीन संसाधने शोधणे सतत चालूच असते. असा शोध घेत असताना MoMA – Museum of Modern Art या अमेरिकेतील जगविख्यात कलासंस्थेने कला शिक्षणासाठी जी अनेक संसाधने उपलब्ध करून दिली आहेत त्यांची माहिती मिळाली.

MoMA ची स्थापना १९२९ साली झाली ती जगभरातील लोकांना कलेशी जोडणे हे उद्दिष्ट ठरवून. त्यासाठी कलेमध्ये नवनवीन प्रयोग करणे, शिकणे, नवसर्जन करणे या सर्व गोष्टींना प्रेरणा देणे, तसेच कलाकारांसाठी आणि त्यांच्या कला-कल्पनांसाठी एक हक्काचे ठिकाण बनणे, या दिशेने त्यांचे कार्य चालते. MoMA ची ओळख खरंतर काही काळापूर्वी झाली होती ती त्यांचे कलाविषयक उद्बोधक व्हिडिओ यूट्यूबवर बघून. जगातील अनेक महान कलाकारांच्या कामांची त्यातून ओळख होत गेली, कलेचं रसग्रहण कसं करावं याची समज येत गेली. असा अभ्यास अजून सखोल प्रकारे कसा करता येईल याचा शोध घेताना MoMA ने तयार केलेला Modern Art & Ideas (आधुनिक कला आणि संकल्पना)  हा ऑनलाइन अभ्यासक्रम सापडला. त्यांनी Coursera या Online learning platform वर हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. त्याचा अभ्यास आपण घरबसल्या संगणकावर किंवा आपल्या मोबाईलद्वारे तर अगदी कुठूनही करू शकतो. त्यासाठी कलाक्षेत्रातील पूर्वानुभव किंवा शिक्षण प्रशिक्षण असायला हवे अशी अट नाही. त्यामुळे कलेचे शिक्षण घेतलेल्या किंवा न घेतलेल्या सर्वांसाठीच, त्यातही विशेषतः स्वयंशिक्षित कलाकारांसाठी, तसेच आधुनिक कलेविषयी कुतूहल असलेल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

“आधुनिक कला आणि संकल्पना”

साहजिकच, इतक्या सोयीस्कर पद्धतीने शिकायला मिळते आहे, म्हणून मी अतिशय उत्साहाने अभ्यासाला सुरुवात केली. गेली २० वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केलेले असल्यामुळे सर्वात अगोदर मला काय भावले असेल तर या अभ्यासक्रमाचा आराखडा (Teaching plan), जो अतिशय पद्धतशीरपणे तयार केलेला आहे. या अभ्यासाचा कालावधी ५ आठवडे आहे. परंतु आपल्या शिकण्याच्या वेगानुसार आपण हा कालावधी कमी-जास्त करू शकतो. प्रत्येक आठवड्यात शिकण्याची कोणती उद्दिष्टे साध्य करायची आहेत, त्यासाठी काय शिकायचे आहे, ते कश्या प्रकारे शिकायचे आहे, त्यासाठी किमान किती वेळ द्यायचा आहे, कोणती साधने वापरायची आहेत, या सर्व सूचना सुस्पष्टपणे दिलेल्या असतात. त्यांचे पालन करत ठरवून दिलेला अभ्यास करत गेल्यास कुठलीच अडचण येत नाही. प्रत्येक आठवड्यात आधुनिक कलेसंबंधी काही मूलभूत संकल्पना, आधुनिक कलेचा इतिहास, नावाजलेल्या काही कलाकारांचा आणि कलाकृतींचा परिचय करून दिला जातो. त्यासाठी नेमून दिलेले वाचन, व्हिडिओ पाहणे इत्यादी करायचे असते. त्यावर आधारित प्रत्येक आठवड्याला एक अश्या चाचण्या आणि assignments पूर्ण करायच्या असतात. Assignments मध्ये काही कलाकृतींचे समीक्षण किंवा त्यासंबंधी लेखन करावे लागते. तसेच अन्य विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचेही समीक्षण करावे लागते. या सर्व गोष्टींना गुण दिले जातात. अश्या विविध प्रकारे शिकायला मिळत असल्यामुळे एकट्याने शिकायचे असले, तरी हा अभ्यासक्रम कंटाळवाणा होत नाही. विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजे यात चित्र कसे काढावे, याबद्दल तांत्रिक भाग अजिबात शिकवला जात नाही. मात्र आधुनिक कला म्हणजे काय? त्यातील संकल्पना, आणि आधुनिक कलेकडे कसे बघावे, हे शिकवले जाते. मला वाटतं की नेमकं हेच शिकण्याची गरज असते आणि ते सहसा कोणी शिकवत नाही.

Piet Mondrian. “Broadway Boogie Woogie”,1943

याचे एकच उदाहरण देतो. या अभ्यासक्रमात Piet Mondrian या जगप्रसिद्ध डच चित्रकाराच्या “Broadway Boogie Woogie” या चित्राबद्दल शिकायला मिळाले. दुसऱ्या महायुद्धात स्वत:च्या देशातून परागंदा होण्याची वेळ आलेला हा कलाकार अमेरिकेतील न्यूयॉर्क इथे आला तेव्हा तिथले मनमोकळे वातावरण, काटकोनात वळणारे आणि समांतर जाणारे भव्य रस्ते आणि गगनचुंबी इमारती, तिथल्या हवेत जाणवणारे स्वातंत्र्य, ऊर्जा, तिथल्या Broadway theatre मधील उत्फुल्ल असे, “Boogie Woogie” गाणारे जॅझ संगीत या सर्वांचे प्रतिबिंब या चित्रात अगदी आपसुकपणे पडले आहे. गंमत म्हणजे, मी हा अभ्यास करत असतानाच कलाजगताला धक्का देणारी एक बातमी आली. ती अशी होती की, Mondrian चे त्याच काळातील “Broadway Boogie Woogie” सारखेच दिसणारे “New York City 1″ हे चित्र कलासंग्रहालयात गेली ७५ वर्षे चक्क उलट अवस्थेत (जणू काही खाली डोके वर पाय अवस्थेत) लावले गेले आहे, असे एका कला-तज्ञ व्यक्तीला लक्षात आले. त्यावरून जगभर खूपच गोंधळ माजला, की इतकी वर्षे सर्वांनी हे चित्रं उलटे बघितले, कोणाच्याही लक्षात आले नाही, आणि आता पुढे काय करायचे? ते सुलट करायचे का? आधुनिक कलेला नावे ठेवणाऱ्यांनी तर या संधीचा फायदा घेऊन आधुनिक कला किती निरर्थक असते आणि त्यातून लोकांना कसे मूर्ख बनवले जाते पहा, असा सूर लावला. परंतु माझे नशीब थोर म्हणून मी हा अभ्यास केलेला होता. त्यामुळे हे चित्र उलट किंवा सुलट असण्याने काहीच फरक पडत नाही, त्यात कलाकाराला जे काही व्यक्त करायचे होते, ते अगदी व्यवस्थित व्यक्त झाले आहे, उलट लावले गेल्याने त्यातील कला-संवेदनेची कुठलीच हानी झालेली नाही, हे मी समजून घेऊ शकलो. त्यामुळे माझ्या मनात कुठलाही अनावश्यक संभ्रम निर्माण झाला नाही. उलट आधुनिक कलेविषयी माझी आस्था अजूनच वाढली. पहिला अभ्यासक्रम शिकतानाच पुढे अजून काय शिकता येईल, त्याचा शोध सुरू झाला होता. त्यातून “What is Contemporary Art?” नावाचा समकालीन कलेची ओळख करून देणार दुसरा अभ्यासक्रम सापडला. त्याबद्दल पुढील लेखामध्ये लिहिणार आहे.

MoMA ने तयार केलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची अधिक माहिती मिळवण्यासाठी ही लिंक पहा: https://www.moma.org/research-and-learning/classes#courses 

****

विनील भुर्के
कृषी-उद्यानविद्या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी – शिक्षण व संशोधन केल्यानंतर, कृषी-व्यापार व ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्रातील २० वर्षांचा कार्यानुभव. त्यापैकी गेली ९-१० वर्षे स्वयंशिक्षित कलाकार म्हणून कलेचा अभ्यास करत आहेत. व्यापार-व्यवस्थापन शिक्षण या क्षेत्रात कार्यरत असतानाच्या सहयोगी अधिष्ठाता या पदाचा त्यांनी स्वेच्छेने त्याग केला असून आता पूर्णवेळ कलेचा विद्यार्थी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.