No products in the cart.
कलेचा महाप्रवासी : भाग ४
जामिनी राय यांचे चित्र विषय कधीच कुठल्या एका विशिष्ठ कालखंडाकरिता मर्यादित नव्हते. जामिनी यांच्या इतर उल्लेखनीय कलाकृती म्हणजे ‘मदर अँड चाइल्ड’, ‘पिझन्ट’, ‘संथाल डान्स’. पिझन्ट या कलाकृतीत जामिनी यांनी तीव्र सामाजिक भेदभाव दर्शविला असून चित्रातील साधेपणाचा प्रभाव त्यांनी स्वनिर्मित रंगांच्या योग्य आणि संयमित उपयोगाने साध्य केला आहे. संथाल डान्स या कलाकृतीत रचनेचे नाट्य अनुभवण्यास मिळते. पुढील ‘कीर्तन’ मालिकेचा पाया आपल्याला याच कलाकृतीत अनुभवयास मिळतो. या मालिकेतील कलाकृती आपल्याला जणू नादमय अनुभूती प्रदान करतात. ही मालिका जामिनी यांच्यातील श्रेष्ठतम चित्रकाराची जाणीव करून देणारी आहे.
जेव्हा आपण जामिनी यांच्या चित्रातील रेषेच्या लयदार, नादमय तत्त्वांविषयी बोलतो तेव्हा निश्चितच त्यांच्या रेखाटनांना दुर्लक्षून चालणार नाही. केवळ दृष्य परिणामांचा विचार केला असता जामिनी यांची रेखाटने त्यांच्या चित्रांशी साधर्म्यच दर्शवितात. अवकाश, त्याची हाताळणी, रेषांचा वापर, आकारांचा उपयोग, सपाट पृष्ठभागावर रेषा आणि आकार यांचा परस्परपूरक वापर, इंद्रियगोचर विश्वाचे चित्रण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने त्यांच्या चित्रांत अवतरतात त्याच पद्धतीने त्या त्यांच्या रेखाटनातही अवतरतात. तरीही त्यांची रेखाटने त्यांच्या चित्रांपेक्षा निराळी ठरतात. रंगलेपनाच्या दृष्टीने चित्रातील रेषा बंदिस्त आणि निश्चित असतात. हे बंधन रेखाटनांमध्ये नसल्याने साहजिकच रेखाटनांमधील रेषा मुक्त असतात.
चित्रांप्रमाणे रेखाटनांमधील रेषा आकार आणि रचनेला स्पष्ट रूप देत असल्या तरी रेखाटनांमध्ये रूपाची स्पष्टता साधणे इतकाच त्यांचा हेतू निश्चितच नसतो. त्यामुळे जामिनी यांच्या रेखाटनांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी सलग नसलेल्या,तुटक, मध्येच सोडून दिलेल्या रेषा आढळतात. रेखाटनांमधील रेषा लक्षपूर्वक, हळुवार, वळणदार, सातत्यपूर्वक जाड-बारीकपणा सांभाळून काढलेल्या नसून त्या ठळक आणि आत्मविश्वासाने काढलेल्या तरीही काहीशी अनिश्चितता दर्शविणाऱ्या आहेत. जरी त्यांचे अवकाशातील स्थान परस्पर पूरक, मोजून मापून ठरवलेले आणि आलंकारिक असले तरी त्यात एक मोघमता आणि प्रवाहीपणा आहे. रेषांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळे आकार आणि आकारांच्या संचयाला एक प्रकारची लवचिकता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. कधीतरी तिरप्या दिशेने शेवटाला सहज सोडून दिलेल्या या रेषा किंवा आकार, काहीशा ताठर भासणाऱ्या रचनेत रेषांच्या तुटकपणामुळे, असलगतेमुळे एक प्रकारची गतिशीलता साधतात.
जामिनी राय यांच्या चित्रातील आणि रेखाटनातील आकृत्यांमधील गतिशीलतेची तुलना करणे येथे संयुक्तिक ठरेल. जामिनी आपल्या चित्रांमध्ये स्थिर आकृत्या दर्शविण्यात पूर्णतः यशस्वी ठरले होते परंतु आकृत्यांचे गतिशील हावभाव किंवा चित्रात गतिमानता निर्माण करण्यात अयशस्वी ठरले. परंतु त्यांनी रेखाटनांमध्ये रेषांची आणि आकारांची शैली बदलून त्यात प्रशंसनीय अशी गतिशीलता साध्य केलेली आपल्याला दिसून येते. राय यांची रेखाटने ही त्यांच्या चित्रांप्रमाणेच इंद्रियगोचर विश्वाच्या दृष्य प्रेरणेवर आधारित आहेत. परंतु या रेखाटनांमध्ये त्यांनी बंदिस्त, निश्चित, सुनियोजित, स्वयंपूर्ण असे आलंकारिक विश्व साकारले नाही. जीवनात आढळणारे चैतन्य आणि अपूर्णता, त्रुटी या रेखाटनातील रेषांमध्ये आढळते.
त्यांच्या आजूबाजूला आढळणाऱ्या जगतातील वस्तू त्यांच्या रेखाटनात अवतरत. या रेखाटनात रेषांच्या लवचिकतेने आणि आलंकाराच्या तरलतने रूपाला सत्त्व प्रदान केले आहे परिणाम स्वरूप या आकृत्या जिवंत वाटू लागतात. रेखाटनांना जामिनी यांनी सहज सुलभतेने हाताळल्यामुळे कल्पना शक्तीचा खेळ साकारण्यास त्यांना बराच वाव मिळाला, जो त्यांच्या चित्रांमध्ये आढळत नाही. सतत चालणाऱ्या या कल्पनेच्या खेळामुळे तयार होणारे रूप आणि इंद्रियगोचर जगताच्या वस्तूंच्या प्रतिबिंबातील फरक लक्षणीय ठरतो. जामिनी यांनी आपल्या रेखाटनांमध्ये जणू बंगाली ग्रामीण रूपात एका मिथकीय जगताची निर्मिती केली आहे.
जामिनी राय यांच्यातील घडत जाणाऱ्या चित्रकाराचा वेध घेतला असता सुरुवातीला पक्षी, फुले, प्राणी यांसारख्या चित्रणापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मानवी सौंदर्य, आत्मभान दर्शवणाऱ्या विषयानंतर शेवटी ख्रिस्ताच्या जीवनावर केंद्रित झालेला दिसतो. हा प्रयत्न म्हणजे आपल्या कलाकृतींमार्फत निश्चित पणे कुठला संदेश देण्यासाठी केलेले मार्गक्रमण आहे असे ठामपणे म्हणता येत नसले तरी जाणतेपणी स्वतःला प्रश्न विचारून केलेला तो एक प्रयत्न निश्चितच आहे. हे प्रश्न आहेत: हे आम्हाला काय झाले आहे? का आम्ही एवढे पीडित आहोत? आणि आम्ही कुठे जात आहोत?
1929 मध्ये अल्फ्रेड हेन्री वॅटसन ¼Alfred Henry Watson½ या ‘स्टेटस्मन’ वृत्तपत्राच्या संपादकांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात जामिनी यांनी प्रथमतःच लोककलेवर आधारित आपले विविध प्रयोग लोकांसमोर प्रदर्शित केले. या नंतर थोड्याच अवधीत म्हणजे 9 जुलै 1930 रोजी त्यांचे पुढील प्रदर्शन ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरियंटल आर्ट’ येथे भरविण्यात आले. या प्रदर्शनातून प्रेक्षकांनी पौर्वात्य कलेनी प्रेरित चित्रकार ते लोककलेतील खंदे चित्रकार, असा जामिनी राय यांच्यातील झालेला बदल अनुभवला.रूपाचे ठळक सरलीकरण, कुंचल्याच्या सहाय्याने उत्स्फूर्ततेने रेखाटलेली जाड बाह्य रेषा या भारतीय चित्रशैलीला नवीन असलेल्या गोष्टी आपल्याला जामिनी यांच्या कलाकृतीत आढळून येतात.
त्यांच्या कलाकृतीतील निस्तेज पिवळ्या, करड्या, हिरव्या रंगाच्या आकृत्या आणि विटांप्रमाणे भासणारी लाल रंगाची पार्श्वभूमी आपल्याला बांकुडा गावातील टेराकोटा उठावचित्रांची आठवण करून देतात. या प्रदर्शनातून आपल्याला राय यांची स्वतःची लोकचित्रकार म्हणून ओळख प्रस्थापित करण्याच्या जाणतेपणी केलेल्या प्रयत्नांची झलक पहावयास मिळते. व्यावहारिक आणि क्रियाशील अनुभव प्राप्त करण्यासाठी जामिनी यांनी लोकचित्रकारांसोबत काम केले होते. शिवाय आपल्या या प्रदर्शनात त्यांनी या चित्रकारांद्वारे चित्रीत तीन फलक प्रदर्शित केले होते. मात्र काही ठिकाणी त्या कलाकृतीत सुधारणा करून त्यांना काहीसे नियंत्रणातही ठेवले होते. पटचित्रांच्या विरुद्ध जामिनींची स्वतःची चित्रे प्रदर्शित करणे ही कृती प्राचीन विचारधारेला अधोरेखित करणारे मूलत्त्त्व ठरले.
पुढे 1931 मध्ये जामिनी आपली विचारधारा लोकांसमोर मांडण्यास तयार होते. उत्तर कोलकत्यातील त्यांच्या निवासस्थानी आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन अमेरिकन इतिहास तज्ज्ञ, संग्रहाध्यक्ष आणि भारतीय कला अभ्यासिका स्टेला क्रॅमरिश (Stella Kramrisch) यांनी केले. हे प्रदर्शन म्हणजे जणू राजकीय जाहीरनामाच होता. राष्ट्रवादी पत्रकार रामानंद चॅटर्जी यांची कन्या शांता देवी यांनी प्रदर्शनाच्या जागेचे पारंपरिक बंगाली वातावरणात झालेले रूपांतर त्यांच्या कलाकृतींसाठी पूरक असल्याचे मत नोंदवले. या संदर्भात त्या म्हणतात :
“मंच व्यवस्थापनाच्या पद्धतीला चित्रकाराने या प्रदर्शनात पूर्णविराम दिलेला दिसतो. गावातील पटांची आठवण करून देणारी चित्रे तीन खोल्यांमध्ये प्रदर्शित केली असून …….गावातील मूळ पट त्यांना लागून असलेल्या खोलीत लावले आहेत. खोल्यांमध्ये छोटे-छोटे दिवे आणि धूप प्रज्वलित केले असून जमिनीवर पारंपरिक बंगाली अल्पना चित्रण केले आहे आणि युरोपीयन बैठक पद्धतीच्या खुर्च्यांच्याऐवजी बंगाली पद्धतीची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.”
जामिनी यांचा उद्देश गावातील चित्रकारांचे अनुकरण करणे हा नव्हता तर त्यांच्या रेषेतील अभिव्यक्तिकरणाचे सामर्थ्य शिकणे हा होता. आकारांच्या सुलभीकरणाच्या शोधात राय यांनी रंगांपेक्षा रेषेवर अधिक भर दिला. त्यासाठी पांढऱ्या कागदावर कुंचल्याच्या सहाय्याने काळ्या बाह्य रेषांचा उपयोग जामिनी यांनी केलेला दिसतो. जामिनी यांची चकित करणारी अस्सलता बघून शांता देवी यांनी नंदलाल बोस यांनी थोडेफार पटचित्रण हाताळले असले तरी त्यांच्याकलेवरील उच्च कलांचा जसे अजिंठा कलेचा प्रभाव झटकण्यास ते अयशस्वी ठरले हे मान्य केले. शिवाय राय यांच्या स्थानीय वैशिष्ट्यांना राष्ट्रीय ओळख देण्याच्या राजकीय कृतीचीही त्यांनी विशेष दखल घेतली.
1930 च्या दशकात जामिनी यांच्या कलाकृती लोकांसमोर आल्या आणि त्यांचा विभिन्न स्तरातील चाहता वर्ग तयार झाला. त्यावेळी नुकतेच काव्य जगतात उदयाला आलेले विष्णू डे यांनी आणि आधुनिक काव्य जगतातील प्रचलित कवी सुधीन्द्रनाथ दत्ता, जे प्रसिद्ध बंगाली मासिक ‘परिचय’ चे संपादक होते, त्यांनी आपल्या मासिकात जामिनी यांची आधुनिकतावादी संवेदनशीलता आणि रूपासंबंधीचे प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले होते. मृणालिनी इमरसन (यांचे वडील प्रख्यात काँग्रेस नेते होते.) व त्यांचे इंग्रज पती देखील जामिनी यांचे निस्सीम चाहते होते.
****
– पल्लवी पंडित
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion