Features

कलेचा महाप्रवासी भाग ३

कलेचा महाप्रवासी या दीर्घ लेखाच्या तिसऱ्या भागात आपण जामिनी राय यांनी आपल्या अभिव्यक्तीसाठी पट चित्रशैली का निवडली? आणि पट चित्रशैलीची वैशिष्ट्ये याबद्दल जाणून घेऊया. सुस्थापित कला  शैली सोडून जामिनी या नवीन  शैलीकडे वळले होते. जामिनींच्या ऍकॅडमिक शैलीच्या आश्रयदात्यांना या शैलीत रस नव्हता. तरीही आपल्या या नव्या शैलीवर विश्वास ठेऊन आर्थिक अडचणीच्या काळातही जामिनीनी आपली ही नव्या पद्धतीची कला अभिव्यक्ती सुरु ठेवली. आर्थिक मर्यादेमुळे जामिनी स्वस्तातले साहित्य वापरत, आणि त्यांनी आपली कलर पॅलेटही मर्यादित रंगांची ठेवली होती. यामुळे जामिनी राय यांची कला संकुचित न होता अधिकच बहरली आणि अभिजात कलेचे परिमाण तिला लाभले. 

स्वतः जामिनी यांचे पटुआ कलेबद्दल काय म्हणणे होते हे जाणून घेणे विशेष रोचक ठरेलया संदर्भात ते म्हणतात, पटुआ कलेकडे केवळ बंगाली कलेतील महत्त्वाचा आणि अपरिहार्य टप्पा म्हणून बघणे योग्य नाही. कला इतिहासातही या कलेला महत्त्वाचे स्थान आहे. सर्वच ठिकाणच्या प्रागैतिहासिक कलांमध्ये आपल्याला हीच तत्त्वे आढळून येतात. परंतु पुढील काळात इतर देशातील कलांनी मात्र आपला वेगळा मार्ग निवडला आणि परिणामी प्राचीन परंपरा अस्ताला गेल्या. मात्र कुठल्याही देशाची प्राचीन कला बघितल्यास त्यातील मुलभूत सत्याची प्रचिती सर्वत्र सारखीच असते आणि बंगालच्या पटुआ कलेत आपल्याला हेच तत्त्व जोपासलेले आढळून येते. कलेचे दोन पैलू असतात एक जो सांगितला जातो आणि दुसरा म्हणजे तो सांगण्यासाठी वापरलेली भाषा. यातील पहिला भाग म्हणजे संकल्पना तर दुसरा भाग म्हणजे तंत्र. दोन्ही दृष्टिकोनातून पटुआ कलेचे विश्लेषण केले असता ही कला केवळ कला इतिहासातील अपरिहार्य टप्पा नसून त्या विशिष्ट टप्प्यातील कलेतली मुलभूत सत्याचे सूचन करणारी अनुभूती होती असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.”

पटुआ कला काय अभिव्यक्त करू इच्छिते? निश्चितच ते निसर्गाचे बारकाव्यांनिशी केलेले चित्रण नव्हे. पण त्यातील साराचे तत्त्व मात्र त्यातून उलगडले आहे. पटुआ कलेचे मुख्य ध्येय आजूबाजूच्या निसर्गातून ग्रहण केलेल्या वैश्विक सारामुळे निर्माण होणाऱ्या भावनांचे थेट अभिव्यक्तिकरण करणे  हे होते. पटुआंनी चित्रित केलेले झाड हे झाडच वाटते परंतु आपल्या साकार अनुभव पातळीवर ते कुठले विशिष्ट असे झाड आहे असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर झाड म्हणून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव त्यात आहे परंतु एका  विशिष्ट झाडाची ओळख देण्याइतकेच मर्यादित स्वरूप त्या रूपाचे नाही आणि म्हणूनच बंगालची पटुआ कला इतर कुठल्याही देशातील प्राचीन कलेशी साधर्म्य दर्शवते. कुठल्याही वस्तूतील सारतत्त्व दर्शविणे याच तत्त्वावर प्राचीन कलांचे संवर्धन झाले आहे. असे असले तरी त्याचवेळी इतर देशातील प्राचीन कलांपेक्षा पटुआ कला ही वेगळी ठरते याला कारण म्हणजे ,बंगालमधील पटुआ चित्रकारांचे भावनात्मक भरण पोषण- परंपरागत समजुती, विश्वास यांच्यावर होत असे आणि शिवाय देशातील समांतर उच्चभ्रू कलाप्रकारांचीही त्यांना ओळख होती.

पटुआ कलेचे संवर्धन परंपरागत मिथक आणि  विश्वास या गोष्टींवर आधारित होते. परंतु इतर देशातील प्राचीन कलांच्या बाबतीत असे करणे कलाकारांना न जमल्यामुळे त्यांचे मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहिले. इतर देशातील प्राचीन कलांमधील मानव अथवा हरणांच्या आकृतीमध्ये तालाचे प्रगटीकरण जाणवते परंतु ते देखील पूर्णपणे साधले गेले नसून त्यात एकसंघता आणि सुसंबद्धता यांचा अभाव आढळतो. तेथे एकमेकांना बांधून ठेवणारी अशी विचारधारा अस्तित्वात नसल्याने असे घडले. तर ज्या वैश्विक सारतत्त्वाच्या पायावर आधारित चित्रनिर्मिती पटुआ करत होते त्याला सुसंगत अशा विचारधारेचा आधार त्यांना लाभला होता. येथील महाकाय जटायू हा या पृथ्वीलोकात कुठेही न आढळणारा पक्षी असला तरी तो निव्वळ एक पक्षीच आहे. या चित्रांमध्ये साकारलेला हनुमान हा आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्याला  कुठेही न आढळणारा असा कपि वंशीय आहे. त्याचा जन्म, त्याच्या क्रिया नव्हे तर त्याच्याशी संबंधित प्रत्येकच गोष्ट यांचा या भूतलावरील कुठल्याही गोष्टीशी प्रत्यक्ष संबंध नाही. तरीही त्याच्यातील कपि तत्त्व ओळखण्यास आपण चुकत नाही. पटुआ कलेतील येथे म्हटलेला पक्षी, तो कपि, राक्षस आणि इतरही सगळीच रूपे यांचे अस्तित्व आंतरसंबंधित तर आहेच शिवाय इतर प्रत्येक गोष्टीशी सुसंगत आहे. आपल्या जगतापेक्षा मिथकाचे जग भिन्न आहे. वैश्विक सारतत्त्वाचे ते जग आहे, ज्याला स्वतःची अशी एक सुसंगती आहे आणि याच जगतावर विश्वास ठेवून त्याला  निश्चित असे रूप पटुआंनी आपल्या कलेत प्रदान केले आहे.

अशा  विश्वासाच्या पायावरच कलेचे संवर्धन होत असते. उदाहरणादाखल जसे युरोपातील उच्चभ्रू कला बऱ्याच कालखंडापर्यंत  ख्रिस्ताच्या मिथकावर आधारली होती आणि तिचे संवर्धनही झाले होते.मात्र ही परिस्थिती शांतता असे पर्यंतच कायम होती. परंतु पुढे बदलत्या सामाजिक वातावरणात अशा मिथकांवरील  विश्वासाला तडा गेला. कलेने  विश्वासापासून फारकत घेतली आणि अशांतता अनुभली. गोगॅ आणि व्हॅन गॉग या दोन चित्रकारांनी  ख्रिस्ताच्या मिथकाला पुनरूज्जीवीत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. युरोपातील समकालीन कलेने कुठल्याना कुठल्या  विश्वासधारेला आपले करण्याचा प्रयत्न केला मात्र आधुनिकतेनी भारावलेल्या वातावरणात तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही आणि अशांततेचे पर्व सुरूच राहिले.

सुस्थापित कला  शैली सोडून जामिनी या नवीन  शैलीकडे वळले होते. जामिनींच्या ऍकॅडमिक शैलीच्या आश्रयदात्यांना या शैलीत रस नव्हता. शिवाय जुन्या कोलकत्यातील उच्चभ्रू वर्गातील जे लोक कलेचे आश्रयदाते होते हळूहळू त्यांचा कल व्यावसायिक पुंजीपतींकडे वाढू लागला होता. याच दरम्यान जामिनी यांच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची मालमत्ता तीन भावंडांमध्ये विभागल्या गेली. जामिनी यांच्या वाट्याला आलेला हिस्सा वाढत्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी जेमतेमच होता. शिवाय जमीनदारी करणे आपल्याला जमणार नाही असे वाटून जामिनी यांनी उपजीविकेचे साधन म्हणून चित्रकारितेलाच झुकते माप दिले होते. त्यामुळे साहजिकच जामिनी यांची आर्थिक परिस्थिती खालावली परिणामी बदलत्या मूल्यांमुळे जामिनी संवेदनशील झाले होते. त्यामुळे तत्त्वांना, मूल्यांना जोपासणाऱ्या अशा बुद्धिजीवी वर्गाचे महत्त्व त्यांना जाणवू लागले.

जामिनी यांच्या खडतर अशा आर्थिक परिस्थितीत त्यांचे कुटुंब चांगलेच भरडले गेले. मात्र जो कुणी त्यांच्या घरी जात असे त्याला कला निर्मिती प्रक्रियेत कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याचा आनंदी सहभाग सहज जाणवत असे. त्यांच्या पत्नी म्हणजे जणू तत्कालिन आदर्श भारतीय हिंदू पत्नीचे मूर्तिमंत उदाहरण ! त्यांना कलेबद्दल ज्ञान नव्हते. मात्र त्यांच्या पतीच्या कलेचे महत्त्व त्या जाणून होत्या.  जामिनी यांना चार मुलगे आणि एक मुलगी होती.  या मुलांनी केलेल्या रेखाटनांवरून जामिनी यांना सरलीकरणाच्या विविध प्रयोगांना विशेष बळ मिळाले व त्यात सातत्य ठेवण्यात प्रोत्साहनही मिळत होते. त्यांचा मोठा मुलगा जिमत हा आनंदी आणि होतकरू तरुण होता. (पुढे त्याचा एका दुर्घटनेत दुःखद मृत्यू झाला.) रचनाकार म्हणून त्याच्यात आवश्यक असे सर्व गुण होते. त्याच्यापासूनही जामिनी शिकत होते.  पाताल हा त्यांचा चौथा मुलगा देखील आपल्या विशेष कला गुणांसह जामिनी यांची चित्रनिर्मितीमध्ये मदत करीत असे. 

चित्र निर्मितीत जामिनी यांनी माध्यम निवडताना साधेपणा या गुणधर्माला महत्त्व दिले. महागड्या तैल रंगांऐवजी त्यांनी टेम्परा आणि गावातील कारागीर वापरत असलेली स्वस्त माध्यमे वापरली. त्यांची रंग निवड बहुतांशी सात रंगापर्यंत मर्यादित असे. इंडियन रेड, यलो ऑकर, कॅडमियम ग्रीन, व्हर्मिलियन, करडा, निळा आणि पांढरा हे ते रंग. यातील प्रथम चार रंग ते स्थानिक दगडांच्या भुकटीत डिंक चिंचोका तर कधी अंड्याचे पांढरे मिसळून तयार करीत. निळी पासून निळा,गाळाच्या मातीच्या मिश्रणापासून करडा, तर खडू पासून पांढरा रंग तयार करीत. रेखाटन करण्यासाठी काजळीचा उपयोग जामिनी करीत. घरीच सूत कातून तयार होणाऱ्या कापडावर गाळाची माती आणि गाईच्या शेणाचे मिश्रण लिंपून त्यावर पांढरा थर देऊन जामिनी त्यावर चित्रनिर्मिती करीत. त्यांची ही कृती स्वदेशीवादाची निदर्शक होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये. असे नव्हते की जामिनी यांना आधुनिक जीवनातील तंत्रज्ञानाचे महत्त्व मान्य नव्हते. मात्र आधुनिकतेसाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अटळ आहे हे तत्त्व त्यांना अमान्य होते.

कधी स्वस्त अशा थ्रीप्लाय वर तर कधी हॅन्डमेड कार्डबोर्ड चा उपयोग ते चित्र निर्मितीसाठी करत. या सगळ्याच प्रयोगात त्यांना यश मिळे असे नव्हते. परंतु या विविध प्रयोगांचे फलस्वरूप म्हणजे त्यांनीवैष्णवसंकल्पनेवर निर्मिलेले चित्र फलक. या कलाकृतीत आपल्याला लय आणि तोल यांच्या सुंदर संगमातून भावनाप्रधान ताल जामिनी यांनी साधलेला दिसतो. उदा. ‘कृष्णबलरामही कलाकृती. या कलाकृतींच्या उत्कृष्ठतेविषयी बंगाली शिक्षणतज्ज्ञ, कवी, कला समीक्षक, लेखक प्रो. हसन सुरावर्दी लिहितात, या चित्रातील रेषा निव्वळ जोमदार मनगटातून साकारल्या नसून रंगकाम देखील तंतोतंत आणि अचूक साकारले आहे. आपल्या लोकसंस्कृतीतील आणि मध्ययुगीन परंपरेतील मानवाकृतीचे सार जणू या चित्रात सामावले आहे आणि या कलाकृतीत  निश्चित सुप्त जोमही जाणवतो. विषयानुरुप काही ठिकाणी आलंकारिकता येत असली तरीही कलात्मक जाणिवा जागृत ठेवून केवळ कलात्मक उद्दिष्ट गाठण्यासाठी तिचा उपयोग केलेला दिसतो. या फलकांमधील अवकाशात घनत्वाचा आभास बघता जामिनी यांच्या आकारांच्या घनत्वाच्या जाणिवेची प्रचिती आपल्याला येते तरीही चित्रातील त्यांच्या आकृत्या शिल्पातील वाटता चित्रातीलच वाटतात.”

जामिनी राय यांचे ‘कृष्ण बलराम’ हे चित्र.

क्रमश:

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.