FeaturesUncategorized

यांच्यावरचा अन्याय कधी दूर होणार?

मागील आठवड्यात ‘चिन्ह’ ने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून फोटोग्राफर कम आर्टिस्ट या पदासाठी जागा भरल्या जात आहेत अशी बातमी दिली होती. या बातमीनंतर अनेकांनी ‘चिन्ह’ला खूप प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी भरती प्रक्रिया, या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या याचा अभ्यास केल्यानंतर अनेक महत्वाचे मुद्दे लक्षात आले. आरोग्याशी संबंधित या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात मोठी तफावत आहे. खरं तर कोरोनामध्ये या फोटोग्राफर्सनी जोखीम घेऊन रुग्णांची फोटोग्राफी केली पण त्यांना या कामाचं श्रेय मात्र मिळालं नाही. कलाकारांवर अन्याय करण्याची जुनी पद्धत याही क्षेत्रात कायम आहे हेच यातून दिसून येतं.

भारताची प्रचंड वाढलेली लोकसंख्या आणि ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता नोकरी मिळणं हे काही सोपं  राहिलं  नाही. नोकरी मिळवण्यासाठी तरुणाईचा चाललेला संघर्ष पहिला का हीच का ती होऊ घातलेली महासत्ता ? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. अगदी १९९० पर्यंत लोकांना सहज नोकरी मिळत असे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुण तरुणी सहजच नोकरीला ‘चिकटले’ जात. त्यानंतर जागतिकीकरणानंतर भारतात खुलं व्यापारी धोरण आलं पण त्याबरोबर रोजगार मात्र वाढण्याऐवजी कमी कमी होत गेला असंच  दिसून येतं. याची कारणं  काहीही असोत पण तरुणाईचा संघर्ष मात्र प्रचंड वाढला आहे हे मात्र शंभर टक्के खरं ! अशा या उफराट्या काळात एक माहिती माझ्यापर्यंत पोहोचली. ती म्हणजे महाराष्ट्राचं वैद्यकीय शिक्षण संचालनालय सरळसेवा प्रक्रियेने काही जागांची भरती करत आहे. त्यामध्ये फोटोग्राफर व कलाकार (आर्टिस्ट) या पदाच्या २६ जागा भरण्यात येत आहेत. ही बातमी आम्ही लगेच ‘चिन्ह’च्या पोर्टलवर दिली.

या बातमीनंतर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊसच पडला. अनेकांना कलाकारांसाठी अशी काही शासकीय पदं असतात हेच मुळात माहित नव्हतं. अनेकांनी प्रश्न विचारला की वैद्यकीय क्षेत्रात बीएफएचं शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीचं काय काम ? काहींनी तर या पदासाठी काय तयारी करायची ? हाही प्रश्न विचारला, जणू काही ‘चिन्ह’ कोचिंग क्लास चालवत आहे. अशा प्रश्नांमुळे एवढं मात्र कळतं की वाचक हे प्रश्न ‘चिन्ह’ला हक्कानं विचारतात ते ‘चिन्ह’ला आपलं मानतात म्हणूनच !

आता या आलेल्या प्रश्नांचं शंका निरसन करणं हे आमचं कर्तव्य आहेच शिवाय या पदाविषयी माहिती घेताना शासनानं कलाकारांवर जो वेतनाबाबत अन्याय केला आहे तेही दिसून आलं. या दोन्ही गोष्टींचा उहापोह या लेखात केला आहे. सर्वप्रथम “फोटोग्राफर कम आर्टिस्ट” म्हणजेच छायाचित्रकार व कलाकार या पदावरच्या व्यक्तींच वैद्यकीय क्षेत्रात काय काम असत ते जाणून घेऊ. खरं तर काही महिन्यापूर्वीच ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी चित्रकार कृष्णा पाटील यांची मुलखत घेतली होती. कृष्णा पाटील हे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात आर्टिस्ट या पदावर काम करून निवृत्त झाले आहेत. ही मुलाखत पाहिली की रुग्णालय किंवा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कलाकाराला किती महत्वाचं स्थान असतं ते समजून येतं. त्यामुळे खालील लिंकवर क्लिक करून ही मुलाखत आवर्जून पाहावी.

तर फोटोग्राफर व कलाकार या पदावरच्या व्यक्तीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या खात्यामध्ये ढोबळमानानं पुढील जबाबदारी पार पाडावी लागते.

१. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं असतात तेथील विद्यार्थी, प्राध्यापक यांना संशोधन आणि डॉक्युमेंटेशन यासाठी फोटोग्राफी करून देणं.

२. गरज असेल तेव्हा एनाटॉमी ड्रॉइंग्ज (शरीरशास्त्रावरच्या आकृत्या) काढून देणं. विद्यार्थ्यांच्या थिसीससाठी या फोटोग्राफी आणि ड्रॉइंग्सचा उपयोग होतो.

३. वैद्यकीय परिसंवाद किंवा इतर बैठकांसाठी पीपीटी प्रेझेंटेशन्स / माहितीपत्रक बनवून देणं.

४. थोडक्यात जी काही दृश्यात्मक तांत्रिक गरज असेल तिची पूर्तता करणं.

ही माहिती जेव्हा मी या पदावर काम करणाऱ्या काही व्यक्तींकडून घेतली तेव्हा असं लक्षात आलं की हे पद अत्यंत जबाबदारीचं आहे. वैद्यकीय शिक्षण / संशोधन हा आरोग्य व्यवस्थेचा पायाच आहे. या पायाला बळकटी देण्याचं काम फोटोग्राफर कम आर्टिस्ट या पदावर काम करणारी व्यक्ती देते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कारण आपण सर्व जाणतो दृश्य माध्यम हे अत्यंत प्रभावी असतं. हजार शब्दांचं काम एक छायाचित्र किंवा चित्र करत असतं. त्यामुळे वैद्यकीय संशोधनात योग्य छायाचित्रं आणि एनाटॉमी ड्रॉईंग याचं महत्व किती आहे याचा अंदाज आपण सहज लावू शकतो.

त्यामुळे ज्या उमेदवारांनी आपलं बीएफएचं शिक्षण उपयोजित कला या शाखेतून पूर्ण केलं आहे त्यांनी जरूर या पदासाठी अर्ज भरावा. हे काम अत्यंत महत्वाचं आहे. अनेक बीएफए झालेले उमेदवार जाहिरात संचालनालय आणि गृहखात्यामध्ये फोटोग्राफर किंवा आर्टिस्ट या पदावर काम करतात. त्याच्या एवढंच किंवा त्याहूनही महत्वाचं काम हे आहे. कारण देशाची आरोग्य व्यवस्था सुधारावी आणि नवीन संशोधन पुढं यावं यासाठी एक प्रकारचा हा खारीचा वाटाच आहे.

असं असलं तरी या बातमी निमित्तानं जो अभ्यास केला त्यातून असं दिसून आलं की कलाकारांना मात्र सरकार दुजा भाव देणं काही सोडत नाही. काही वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय या विभागात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी इतर तांत्रिक पदं आणि छायाचित्रकार / कलाकार या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मिळणारी वेतनश्रेणी यातली तफावत याविरुद्ध न्याय मागण्यासाठी शासनाला एक पत्र लिहिलं. तसंच दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे छायाचित्रकार या पदावर माहिती व जनसंपर्क विभाग आणि गृह खातं या विभागातही बीएफए ही शैक्षणिक पात्रता असलेले कर्मचारी काम करतात. त्यांची वेतनश्रेणी आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय या विभागात काम करणाऱ्या फोटोग्राफरची वेतनश्रेणी यात खूप मोठा फरक आहे.

खरं तर शासनानं माहिती व जनसंपर्क विभाग आणि गृह खातं या विभागात काम करणाऱ्या फोटाग्राफर यांना एस -१० या वेतनश्रेणीवरून एस -१२ या वेतनश्रेणीमध्ये समाविष्ट केलं होतं. २०१७ मध्ये महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी जी ‘बक्षी समिती’ नेमण्यात आली त्यानुसार माहिती व जनसंपर्क विभाग आणि गृह खातं यामध्ये काम काम करणाऱ्या छायाचित्रकारांना सुधारित वेतनवाढ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ही सुधारित श्रेणी लागू करण्यात आली. मात्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात काम करणाऱ्या सारख्याच पदावरील (छायाचित्रकार) कर्मचाऱ्यांना मात्र आजही जुन्या एस-१० या श्रेणीमध्येच ठेवण्यात आले. याविरुद्ध या कर्मचाऱ्यांनी शासनाला दाद मागण्यासाठी एक पत्रही लिहिलं. मात्र शासनानं अशी कुठलीही वेतनवाढ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय या विभागात काम करणाऱ्या छायाचित्रकारांना दिली नाही. त्यासाठी पुढील कारणं देण्यात आली.

“एकच पदनाम असलेली दोन भिन्न वेतनश्रेणीतील पदे शासनाच्या अन्य कार्यालयात तसंच अन्य संवर्गात कार्यरत आहेत. कोणत्याही संवर्गाची वेतनश्रेणी निश्चीत करताना त्या संवर्गाची कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या कामाचं तांत्रिक अतांत्रिक स्वरुप पदाशी निगडीत पर्यवेक्षकीय व कार्यकारी जबाबदाऱ्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार शैक्षणिक अर्हता , त्या संवर्गाचं सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेतील स्थान व सेवेचं महत्व इत्यादी बाबी विचारात घेऊन मूल्यमापनाअंती योग्य ती वेतनश्रेणी निश्चीत केली जाते. उक्त वस्तुस्थितीचा विचार करता पदांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभाग व गृह विभागातील छायाचित्रकार / कलाकार पदांना राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या खंड २ नुसार मंजूर करण्यात आलेली एस -१२ ( ३२०००-१०१६०० ) ही सुधारित वेतनश्रेणी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील संचालनालय , वैद्यकीय शिक्षण व संशोधन या विभागातील छायाचित्रकार / कलाकार या पदांना लागू करणं अभिप्रेत नाही”

थोडक्यात शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या खात्यात काम करणाऱ्या छायाचित्रकारांचं काम तेवढं महत्वाचं मानत नाही जेवढं माहिती व जनसंपर्क विभाग आणि गृह खातं या विभागात काम करणाऱ्या छायाचित्रकारांचं मानतं. खरं तर कोरोना काळात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय या विभागात काम करणाऱ्या छायाचित्रकारांनी कोरोना रुग्णांची छायाचित्रं काढून वैद्यकीय विभागाला मोलाची मदत केली. हे किती जोखमीचं काम होतं हे सर्वांनाच माहित आहे. असं असताना शासन या दोन भिन्न शासकीय विभागात काम करणाऱ्या एकाच पदनामाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय का करतं हा ना समजणारा विषय आहे. या लेखच्या माध्यमातून शासन या विषयावर विचार करेल आणि कलाकारांवर होणार अन्याय दूर करेल ही अपेक्षा !

असो, या पदासाठी परीक्षा देणाऱ्या सर्व परीक्षार्थीना ‘चिन्ह’च्या शुभेच्छा ! छान तयारी करा आणि निवड झाल्यास आम्हाला पेढे जरूर द्या !

*******

– कनक वाईकर,
चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 71

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.