No products in the cart.
कलाकारांची वाट बघणारं ग्रंथालय
कलेच्या अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध होत नाहीत अशी ओरड अनेक अभ्यासक करत असतात. अशा कलाभ्यासकांसाठी मुंबईच्या नेहरू सेंटर लायब्ररीमध्ये विविध प्रकारची तीस हजार पेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यात चित्र, शिल्प, वास्तूकलेवर असलेली सहा ते सात हजार दुर्मिळ पुस्तकं असं हे ज्ञान भांडार, सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळात सगळ्या विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनाची गरज पूर्ण करायला आणि तीही अगदी मोफत… रोज खुलं असतं…पण हे इतकं मोठं ग्रंथालय विद्यार्थांच्या आणि वाचकांच्या प्रतिक्षेतच असतं. म्हणूनच हा प्रतोद कर्णिक यांनी लिहिलेला विशेष लेख प्रसिद्ध करत आहोत.
आपल्या देशाला ज्ञानोपासनेची खूप समृद्ध परंपरा लाभली आहे. आणि ज्ञानदानाचं महत्वाचं माध्यम हे “पुस्तकं” हेच राहिलं आहे. अगदी पाचव्या शतकातलं नालंदा विश्वविद्यालय हे याचं प्रमुख उदाहरण सांगता येईल. या नालंदा विश्व विद्यापीठात एकाच वेळी जगभरातले दहा हजार विद्यार्थी शिकत होते. दोन हजार शिक्षक असलेल्या नालंदात ज्ञानार्जनाचा खूप मोठा स्रोत जाणिवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक निर्माण केला गेला होता. तो म्हणजे नालंदाचे दुमजली भव्य ग्रंथालय. ज्यात लाखो विविध विषयांवरची पुस्तकं जतन केली गेली होती, ग्रंथालय, ज्याला आपण इंग्रजीत लायब्ररी म्हणतो, त्याचं महत्व अधोरेखित करणारं नालंदा विश्वविद्यालय. ज्ञानार्जनाची आंतरिक ओढ असणाऱ्यांसाठी कायमची प्रेरणा देणारी ही लायब्ररी होती. अगदी बदलत्या काळात, ई बुक्स, ऑडिओ बुक्स आली असली, पुस्तकांच माध्यम बदललं असलं तरीही ‘पुस्तक’ ही मूळ संकल्पना तशीच आहे आणि त्यासाठी अद्ययावत अशा लायब्ररीजची गरज ही आजही तितकीच महत्वाची आहे. जसजशी मुंबईची लोकसंख्या वाढत गेली तशी तशी घरे छोटी झाली. मग शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ येते, तसतशी चिंता भेडसावते ती आपण अभ्यास करायला लागणारी निवांत जागा कुठे शोधावी याची. यातूनच दिवस, रात्र अभ्यासिका ही मुंबईकर तरुण वर्गाची गरज बनली आणि अनेक अभ्यासिका मुंबईत आकाराला आल्या आणि त्या कार्यरत देखील आहेत. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, एक सामाजिक योगदान म्हणून अशा अभ्यासिका वर्षभर चालवतात, तर काही राजकीय पक्षांचे नेते, काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्तेही अशा अभ्यासिका मोठ्या नेटाने चालवत असतात. पण अशा अभ्यासिकांबरोबरच म्हणावी तशी अद्ययावत ग्रंथालयं मात्र आजही फारच कमी आहेत. खरंतर, ग्रंथालयं हा मुंबईच्या संपन्न वारशातला एक मोठा ठेवा. कितीतरी मराठी, इंग्रजी ग्रंथालयं आजही मुंबईत उभी आहेत, पण त्यांची शान, पूर्वीचा रुबाब आणि अद्ययावत पुस्तक संग्रह आज उरला नाही ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण मुळात वाचनाची आवड, सवय आणि गरज लोप पावत चालली आहे. खरं तर वाचनाची गरज लोप पावू शकतच नाही, पण वाचनाचं महत्व सांगणारे संस्कार आज मुलांवर होत नाहीत आणि त्यामुळे बदलत्या माध्यमाने छापील पुस्तकं वाचण्याकडे कल कमी कमी होत जातो हे सत्य आहे.
अशा सगळ्या परिस्थितीत, मुंबईत एक असं वाचनालय आहे, जिथे आजही अतिशय वेगवेगळ्या विषयांची हजारो दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध आहेतच, पण त्याच बरोबर, ती अभ्यासण्यासाठी अतिशय देखणं, अविश्वसनीय असं प्रचंड मोठं दालन, या पुस्तकांचा अभ्यास करायला मिळावा म्हणून एका अभ्यासिकेच्या रुपात सुसज्ज आहे. इतकं सुंदर की आपण भारतात नसून पाश्चात्य देशात तर नाही आलोत ना? असा भास होतो. विद्यार्थ्यांना बसायला सुंदर टेबल, खुर्च्या… पेन, पेन्सिल स्टॅंड, समोरच्या कॉंप्युटरवर उपलब्ध पुस्तकांची यादी. पण आता हातातल्या ऍंड्रॉईडनी कॉंप्युटरची जागा घेतली असल्याने आवश्यकता असलेल्यांसाठी काही टेबल्सवरच कॉंप्युटर ठेवण्यात आले आहेत.
एकूण विविध विषयांवरची तीस हजार पेक्षा जास्त पुस्तकं. त्यात चित्र, शिल्प, वास्तूकलेवर असलेली सहा, ते सात हजार दुर्मिळ पुस्तकं असं हे ज्ञान भांडार, रोज सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा या वेळात सगळ्या विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनाची गरज पूर्ण करायला आणि तीही अगदी मोफत… रोज खुलं असतं…
पण… …
विद्यार्थांच्या आणि वाचकांच्या प्रतिक्षेत.
भलं मोठं वातानुकूलित दालन, अतिशय नयनरम्य प्रकाशयोजना, मन प्रसन्न करणारा माहोल… सगळं दिवसभर वाट पहात असतं ते ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या अभ्यासकांची, विद्यार्थांची…पण दिवसेंदिवस तिथला वाढता शुकशुकाट काळीज चीरत जातो. ज्या प्रकारच्या सुविधा आर्थिक सुबत्ता असणाऱ्यांनाच फक्त आजवर मिळत आल्यात, त्या इथे, सर्वच स्तरातल्या ज्ञानोपासकांसाठी विनामुल्य उपलब्ध आहेत. नालंदा सारख्या आपल्या वैभवशाली ज्ञानपीठाकडून प्रेरणा घेत वरळीच्या नेहरु सेंटर येथील ग्रंथालयातीलं ज्ञानभांडार फार कष्टाने आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करत, उभं केलं आहे. कला, साहित्य, इतिहास, सामान्य ज्ञान अशा अनेकविध विषयांवरची पुस्तकं इथे आहेत. अलीकडच्या काळात, तरुण वर्गाचा स्पर्धापरिक्षांचा वाढता ओढा लक्षात घेऊन, त्या विद्यार्थांसाठी सुध्दा ही नेहरु सेंटरची लायब्ररी आता उपलब्ध करुन दिली गेली आहे.
मी चित्रकार असल्याने कला विषयक पुस्तकांवरच मी आज सविस्तर बोलणार आहे. कलेच्या क्षेत्रात चित्रकला, शिल्पकला आणि वास्तूकलेवरील जगभरातली अनेक अत्यंत दुर्मिळ पुस्तके आणि ग्रंथ इकडे अभ्यासण्यासाठी उपलब्थ आहेत. या ग्रंथालयाचं कामकाज देसाई मॅडम फार काळजीपूर्वक सांभाळत असतात. इथे त्यांनी निर्माण केलेल्या सिस्टिम्स अतिशय वाखाणण्यासारख्या आहेत. अगदी प्रत्येक पुस्तकावर प्रिंटेड बारकोड स्टिकर आहे. आणि पुस्तकांच्या कॅटलॉगची लींक आपल्याला एका सुंदर बुकमार्कवर दिली जाते. जेव्हा आपण ती लिंक ओपन करुन हवं असलेल्या पुस्तकाचा बारकोड स्कॅन करतो, तेव्हा त्या पुस्तकाचा विषय, लेखक याच बरोबर ते पुस्तक आतील अति भव्य दालनांमधील रॅक्स मधे नेमकं कुठल्या रॅकमधे, किती नंबरवर आहे इथपर्यंतची माहिती आपल्याला उपलब्ध होते. डेस्कवर आपण डिटेल्स पाठवले की पुढल्या काही मिनीटांमध्ये आपण मागितलेली, सदर पुस्तके नेहरु सेंटरच्या ग्रथालयाचे कर्मचारी आपल्याला तत्परतेने उपलब्ध करुन देतात.
ही सगळी व्यवस्था थक्क करायला लावणारी आहे. आणि देसाई मॅडमकडे जेव्हा मी चित्रकलेतील काही विषयांवरील पुस्तकांची माहिती विचारली, तेव्हा लक्षात आलं, की प्रत्येक पुस्तकाच्या फक्त बारकोडमधेच ही माहिती नाहीये, तर मॅडमच्या लक्षातही आहे. आतल्या पुस्तकांच्या रॅक्स पहाण्याची विशेष संधी त्यांनी मला दिली होती. क्षणार्धात त्या मला म्हणाल्या, प्रतोद, व्हाईल यु गो ईनसाईड, गो स्ट्रेट, देन टेक लेफ्ट, ऑन थर्ड रॅक,ऍट मिडल सेकंड सेगमेंट यु विल गेट धीस बुक… मी हे ऐकुन शब्दशः अवाक झालो !
मागच्या भागात आपण उपसंचालिका रेगे मॅडमचं अफाट कार्य बघितलं, इथे या देसाई मॅडमच हे काम आणि त्यातली कल्पनेपलिकडली त्यांची ईंव्हॉल्व्हमेंट… असे कर्मचारी ज्या संस्थेला लाभतात, त्यांच्या कडूनच अशी समाजासाठी विविध क्षेत्रातली, मैलाचा दगड ठरणारी असंख्य कामं नित्यनेमाने होत असतील तर नवल ते काय!
इथे आपल्याला ईंडियन मास्टर्स… या नेहरु सेंटरच्या उपक्रमातील, ज्या बद्दल आपण मागील भागात सविस्तर जाणून घेतलयं, ती गेल्या सत्तावीस वर्षात नेहरु सेंटर, मुंबई यांच्यातर्फे निर्माण केलेली दिग्गज चित्र, शिल्पकारांच्या कलाकृतींवरची पुस्तकं तर अभ्यासायला उपलब्ध आहेतच. पण फ्युजन या मालिकेतील भारतातील विविध राज्यातील, विभिन्न परंपरेतील वेगवेगळ्या शैलीत काम करणाऱ्या चित्रकारांच्या चित्रशैली उलगडून दाखवणाऱ्या नेहरु सेंटर निर्मित, पुस्तकांचा पण समावेश आहे.
नेहरु सेंटरच्या या प्रकाशनांबरोबरच इतरही अनेक भारतीय चित्रकला, शिल्पकला आणि धातूकलेवरची अती दुर्मिळ अशी हजारो पुस्तकं इथे आहेत. इथे पहाडी शैलीतील चित्रांवर एक फार मोठा ग्रंथच उपलब्थ आहे. तसेच वारली पेंटिंगवरही पुस्तके आहेत. राजस्थानी पेंटिंग्ज, मिनिएचर पेंटिंग्ज पासून मध्ययुगीन चित्र, शिल्पकला, हिमालयीन भटक्या जमातींची परंपरागत चित्रशैली अशा अनेकविध कलाकृतींवरची पुस्तकं या ग्रंथालयात अभ्यासण्यासाठी उपलब्ध आहेत.
राजा रवी वर्मा, गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, एस. एम पंडित, अमृता शेरगील, दीनानाथ दलाल, मुळगांवकर, एम एफ हुसेन अशा देश विदेशात आपल्या कलेची पताका फडकावणाऱ्या अनेक भारतीय कलाकारांची, त्यांच्या कलाकृतींसहीत, बाजारात सहसा उपलब्ध नसलेली आणि यातील काही पुस्तकं बाहेर बुक डेपोंमधे उपलब्ध असलीच तरीही अतिशय महाग असणारी ही पुस्तकं अगदी विनामुल्य कितीही वेळ पहायला, अभ्यासायला उपलब्ध आहेत.
याच बरोबर भारतीय आणि जागतिक शिल्पकला, त्यातील विविध शैली,अगदी प्राचीन काळापासून आजवर जतन केलेली देश, विदेशातील शिल्प या सगळ्यांवर असंख्य पुस्तक इथे आहेत. तसेच वास्तूशास्त्रातील अगदी प्राचिन वास्तूकला, शैली पासून ते आजच्या आधुनिक वास्तूशैली आणि तंत्रज्ञान यावरही या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तकें जतन करुन ठेवली आहेत.
भारतीय दिग्गज चित्रकारांबरोबरचं जगभरातल्या विविध चित्रकार, त्यांच्या शैली, त्यातील मर्मस्थाने , त्यांच्या कलाकृती यावरही असंख्य पुस्तक इकडे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये
GOTTO DI BONDONE (1267-1337),
PAOLO UCCELLO (1397-1475),
LEONARDO DA VINCHI (1452-1519)
MICHELANGELO (1475-1564)
FRANSISCO DE GOYA (1776-1828),
EDOUARD MANET (1832-1883),
VINCENT VAN GOGH (1853-1890),
CLAUDE MONET (1840-1926),
PABLO PICASSO (1881-1979) या आणि अशा दिग्गज चित्रकारांची चित्र, त्यांची शैली, चित्रांमागची संकल्पना, त्यांचे वैयक्तिक जीवन आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन असे विविध पैलू उलगडणारी पुस्तकं आणि ग्रंथ आहेत.
आमच्या आधीची पीढी ही जास्त करुन एकदा जी. डी. आर्ट पूर्ण केले की नोकरी, व्यवसायाकडे वळली. माझ्या पिढीत बी. एफ. ए. ला ऍडमिशन घेण्याकडे कल वाढला होता. आज बी. एफ. ए. नंतर एम्. एफ. ए. ( मास्टर्स डिग्री) आणि त्यापुढे जाऊन पी.एच.डी करण्याकडे कल दिसतो. बी. एफ. ए. च्या फायनल ईयरलाच कलेच्या कुठल्या विषयात संशोधन करुन डॉक्टरेट मिळवायची याचे विद्यार्थांना वेध लागलेले असतात. मग याला विचार, त्याला विचार, काही ज्येष्ठ कलाकारांचे सल्ले घे, असं सगळं सुरु होतं. पण… कलेतील कुठल्या विषयावर संशोधन करायला आवडेल, या पूर्वतयारी पासून, ते प्रत्यक्ष प्रवेश परिक्षा देऊन संशोधनाला सुरुवात होते, तेव्हा लागणारे विविध संदर्भग्रंथ… तेही अगदी दुर्मिळ... हे सगळं या नेहरु सेंटरच्या ग्रंथालयात उपलब्ध आहे.
तेही विनामुल्य आणि उत्तम अशा वातावरणात, अतिसुंदर, भव्य अशा कलात्मक दालनात.
एवढं सगळं आपल्यासाठीच उपलब्ध करुन, खरतर नेहरु सेंटरनी आपल्यावर खूप मोठे उपकार करुन ठेवले आहेत. आणि जर एवढं सगळ असूनही आपण याकडे पाठ फिरवत असलो, तर आपल्या सारखे करंटे आपणच. या आधीच्या नेहरु सेंटरवरील लेखात, मी या एक एक थक्क करायला लावणाऱ्या उपक्रमांचं वर्णन… “अलीबाबाची गुहा”, असं केल होतं.
पण नेहरु सेंटरचे सगळे उपक्रम आणि हे अवाढव्य, अद्ययावत असं ग्रंथालय बघितल्यावर, मला आता ही अलीबाबाची गुहा नाही, तर अगदी कष्टानी, दूरदृष्टीने आणि “देता किती घेशील दो कराने” या प्रेरणेतून आणि सद्भावनेतून निर्माण केलेलं ज्ञानदानाचं अक्षय भांडार… आधुनिक काळातलं नालंदाच वाटायला लागलय!
– प्रतोद कर्णिक, ठाणे
नेहरू सेंटर लाइब्ररीवरील लेखाचा पहिला भाग :
****
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion