Features

अलिबाबाची गुहा

अलिबाबाची गुहा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एकाहून एक सर्वोत्तम वस्तूंचा अमूल्य खजिना. पण हा खजिना कोठे आहे ते जाणून घेण्यासाठी आतंरिक उर्मी आणि दृष्टी मात्र आपल्यापाशी हवी. असाच चित्रकलाक्षेत्रासाठी अत्यंत विस्मयकारक आणि अभिमानास्पद वाटेल असा खजिना आपल्या मुंबई मायानगरीतखुल जा सिमसिम’, म्हणायची वाट पाहत  गेली कित्येक वर्षे तुमची आतुरतेने वाट पाहतोय. भावी चित्रकारांच्या कित्येक पिढ्यांनी ऋणी रहावे अशा दिपशिखेप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, अशा या उपक्रमाची आजवर फारशी दखल घेतली गेलेली नाही.   

चित्रकलाक्षेत्रासाठी अमूल्य असो योगदान ठरावे असा नेहरू सेंटरच्या कला दालनात नीना रेगे यांच्या नेतृत्वाखाली गेली २७ वर्षे अविरतपणे सुरू असलेला एक अनोखा उपक्रम. रेगे मॅडमनी निर्माण केलेली हीकलाविश्वातील अलिबाबाची गुहाआज ठाणे येथील चित्रकार प्रतोद कर्णिक यांनी Chinha Art News च्या वाचकांसाठी खुली केली आहे. दृष्टीच्या तृटींवर मात करत भविष्यातील चित्रकारांसाठी नेत्रदिपक ठरेल असा हा आजवर अक्षम्य दुर्लक्षित राहिलेला हा उपक्रम प्रतोद कर्णिक यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक आपल्यासमोर मांडला आहे. 

लेखक : प्रतोद कर्णिक 

वरळीच्या डॉ. ऍनी बेझंट रोडवरुन आपण सगळेच अनेकदा जात, येत असतो. कुणी बसने प्रवास करतं, कुणी बाईकने तर कुणी कारने.  पण तिथून जातायेता दिसणारी ती उतारावरची लॉन आणि त्यावर असलेली अतिशय देखणी आकाशाला भिडलेली पांढऱ्या शुभ्र रंगाची विलक्षण आकर्षक अशी वास्तू. अगदी आजही आपण कुठल्या पाश्चात्य देशात तर नाही ना? असं वाटायला लावणारं ते मनोहारी दृश्य. 

गेल्या पस्तीस, चाळीस वर्षांत नेहमी बघून, त्यातलं सौंदर्य आजही यत्किंचितही कमी झालेलं नसलं तरीही आता नेहमी पाहून ते मोहक दृश्यही आपल्या एक सवयीचाच भाग बनलं आहे. या इतक्या देखण्या आणि नितांत सुंदर भव्य वास्तूत त्यांच्या सौंदर्याबरोबरच अनेक अविश्वसनीय अशा गोष्टी निर्माण  केल्या गेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेलच, मी हे सगळं बोलतोय ते मुंबईतल्या नेहरु सेंटर बद्दल.

या सगळ्यामुळेच ती वास्तू जितकी सुंदर आहे, तितकीच असंख्य विषयातल्या ज्ञानाचीही अक्षय भांडारं तिने आपल्या सगळ्यांसाठी जतन केली आहेत. त्यातली एक, एक गोष्ट, एक एक ज्ञानभांडार जेव्हा आपणं पहातो,  तसतशी नवनवीन अलीबाबाची गुहाच आपल्या समोर खुली झाल्याचा भास होतो. विज्ञान, खगोलशास्त्र, भारताचा अगदी प्राचीन कालापासूनचा इतिहास या सगळ्यांचा या ज्ञानभांडारांमधे समावेश आहे.  

पण या सगळ्या बरोबरच चित्र, शिल्प आणि वास्तू कलेतील अनेक दुर्मिळ अशा ठेवी गेली तीन दशकं या भव्य महालात निर्माण करुन जतन करुन ठेवल्या आहेत. पण आपल्या सगळ्यांना एकूणच, आपल्याकडे हे नाही, ते नाही, म्हणत सदा सर्वकाळ रडत बसायची खोडच जडलीं आहे.

इतरांना दोष देणं, खासकरुन, मग ते कुणाचही असो पण सरकारच्या नावाने बोंबलणं. आणि आपला पारावरच्या गप्पातला, अगदी आवडता विषय म्हणजे राजकारणी आणि राजकार. त्यांच्या नावाने (मग ते कुणीही असोत) सतत खडे फोडत बसायचीही आपल्याला सवयच लागली आहे.

पण आज, गेली तीस वर्षे सातत्याने, अथकपणे आणि अतिशय मेहनतीने, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीने कलाविश्वासाठी या संस्थेत जे अनमोल काम केलं जातंय, त्याकडे मात्र आपण पूर्ण दुर्लक्षच करत आलो आहोत. आपण कलाकारांनी या सगळ्या विनामूल्य आणि तेही आपल्यासाठीच निर्माण केलेल्या खजिन्याकडे जवळजवळ पाठच फिरवली आहे. यापेक्षा दुसरा करंटेपणा तो काय असू शकतो? गेली सत्तावीस वर्षे अखंडपणे नेहरु सेंटर एक उपक्रम राबवतयं. आपल्यापैकी काही मोजके कलाकार या उपक्रमाचा आवर्जून लाभ घेतात. 

दरवर्षी एका महान भारतीय चित्रकाराच्या मूळ कलाकृतींच प्रदर्शन या नेहरु सेंटरच्या आर्ट गॅलरीत तीन आठवडे भरवलं जातं. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्या महान चित्रकारांची मूळ पेंटिंग्ज अथवा चित्रे प्रदर्शनात ठेवलेली असतात, त्यांचा शोध‌ घेऊन, जिकडे ती मूळ चित्र असतील तिथे संपर्क केला जातो. ठराविक कालावधीत ती सगळी आहेत त्या स्थितीत परत करण्याच्या करारावर मुंबईत आणली जातात. या सर्व मूळ असामान्य कलाकृतींचे प्रदर्शन नेहरु सेंटरच्या कलादालनात भरवले जाते. आणि ते आपल्याला विनामूल्य पहाण्यास, अभ्यासण्यास तीन आठवडे ठेवले जाते. प्रत्येक वर्षी डिसेंबरचे शेवटचे दोन आठवडे आणि जानेवारीचा पहिला आठवडा असं हे प्रदर्शन आयोजित केलं जातं. 

हा उपक्रम एवढ्यावरच न थांबता, त्या कलाकृतींवर आर्ट पेपरवर उत्तम दर्जाची छपाई असलेले एक पुस्तक प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केले जाते. यात त्या कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतींची माहिती, काही अभ्यासू आणि अधिकाराने लिहू शकतील अशा दिग्गज कलाकारांचे लेख, मुलाखती असं सगळं आवर्जून असतं. जेणेकरुन त्या कलाकृतींची ओळख, त्यातले बारकावे हे पहाणाऱ्याला, वाचणाऱ्याला सहज उमगतील. 

आजवर सलग सत्तावीस वर्ष हा उपक्रम दरवर्षी अतिशय उत्साहानी, प्रचंड मेहनत घेऊन राबवला जातो. यात एखाद्या होऊन गेलेल्या कलाकारांच्या मूळ कलाकृती आज नेमक्या कुठे आहेत, यांचा शोध घेणं हेच किती महाकठीण काम आहे. आणि त्या त्या व्यक्तीला, संस्थेला संपर्क करणं, तिकडे जाऊन त्यांना भेटणं, त्यांना राजी करणं आणि त्या मुळ कलाकृती काही काळासाठी त्यांच्याकडून आपल्या ताब्यात घेणं, त्या सुखरुप मुंबईत आणणंनंतर तशाच सुखरुप परत करणंबापरे, हे सगळंच अती महाकठीण आणि जिकीरीचं आहे, यांची आपण सगळेच निदान कल्पना तरी नक्कीच करु शकतो.

या सत्तावीस वर्षातथेट राजा रवी वर्मां पासून ते अगदी अलिकडचे मारिओ मिरांडा आणि आर. के. लक्ष्मण यांच्यापर्यंत सर्वार्थाने महान कलाकारांचा समावेश आहे. नुसती या चित्रकारांच्या यादीवर जरी नजर टाकली तरीही आपण थक्क होतो. श्री. गोविंद सोलेगांवकर, श्री. . . रायबा, श्री. दिनानाथ दलाल, श्री. जे. बी. दीक्षित, श्री. गोपाळराव देऊसकर, श्री. विनायक करमरकर, श्री. जी. एन. जाधव, श्री. हरेन दास, श्री. पी. एन. धोंड, श्री. के. बी. कुलकर्णी,  श्री. विनायक मासोजी, श्री. नागेश सुभानवार, श्री‌ नारायण सोनावडेकर, श्री. डी. जी. कुलकर्णी, शिल्पकार तालिम बंधू, श्री. एस. एल. हळदणकर, श्री.रविंद्र मेस्त्री. 

त्याचबरोबर समकालीन या थीमवर एकाचवेळी पाच समकालीन चित्रकारांच्या पेंटिंग्जचं एकत्र प्रदर्शन आणि पुस्तक केलं गेलं होतं. यात थोर चित्रकार श्री. कृष्णाजी केतकर, श्री. विनायकराव वाघ, श्री. राजाराम पानवलकर, श्री. दत्ताजीराव दळवी, श्री‌. गोविंद मालवणकर यांच्या चित्रकृती, त्या चित्रकारांची माहिती आणि त्यातली मर्मस्थाने उलगडून दाखवणारे लेख आहेत.

अशी इतक्या वैविध्यपूर्ण शैलीने आपली कलेची कारकिर्द गाजवलेले हे सगळे दिग्गज कलाकार. त्यांची चित्रं, माहिती, त्यांच्या कलाकृतींवर अभ्यासू, जाणकारांचे सहज सोप्या भाषेतील विवेचन, असा हा शब्दश: चित्र,शिल्प कलेतल्या अलीबाबाच्या गुहेतलामुंबईतल्या नेहरु सेंटरमधील खजिनाच आहे.

मी इकडे जर प्रत्येक पुस्तकाची माहिती किंवा प्राचिन काळी ज्याला रसग्रहण वगैरे म्हणत, ते लिहीत बसलो तर एक वर्ष पण पुरणार नाही. आणि ज्यांच्यासाठी ही धडपड करेन, ते आजचे तरुण कलाकार, “ज्याम बोर करतो“, म्हणत त्यातली एक ओळ पण वाचणार नाहीत.आणि मुख्य म्हणजे कला विश्वातील या दुर्मिळ खजिन्याला आपण सगळ्यांनी भेट द्यावी, तो अभ्यासावा हा मूळ हेतूही यामुळे  साध्य होणार नाही.

राजा रवी वर्मा, दिनानाथ दलाल, यांची चित्रं प्रत्यक्ष पहाण्याची संधी जेव्हा प्रदर्शन भरवलं गेलं होतं, तेव्हा होती, आज ती या पुस्तक रुपाने आहे. चित्रकार दीक्षित म्हणजे ज्यांनी गळ्यात वीणा घेतलेल्या आणि आपल्या अभंग गायनात तल्लीन झालेल्या संत तुकाराम महाराजांचं खूप गाजलेलं चित्र चितारलंय ते चित्रकार, समोर बसलेला मंत्रमुग्ध श्रोतृवृंदतुकाराम महाराजांचा दरबार म्हणून अतिशय लोकप्रिय झालेलं आणि त्या काळात घराघरात पोहोचलेल्या त्या चित्रांचे हे चित्रकार. आज त्यांची कितीतरी चित्र त्यांच्या या पुस्तकात आपल्याला अभ्यासता येतात.

नीना रेगे

हे सगळं अफाट काम दिवसरात्र अथकपणे आणि उत्साहात गेली सत्तावीस वर्षे करणाऱ्या नेहरु सेंटरच्या उप संचालिका रेगे मॅडमची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्या आजही या प्रत्येक चित्रकारांबद्दल, त्यांच्या कलाकृतींबद्दल तितक्याच उत्साहात आणि अगदी भरभरुन बोलतात. आपण काहीतरी महाकठीण आणि खऱ्या अर्थांनी ज्याला आपण लिजंडरी वर्क म्हणतो, ते केलयं, करतोय याचा कुठलाही मोठेपणा त्यांच्या बोलण्यात जाणवत नाही. या सगळ्याची सुरुवात पण मोठी रंजक झाली आहे.

साधारण तिस वर्षांपूर्वी नुकतंच जे जे मधून उपयोजित कलेचं शिक्षण पूर्ण केलेली नीना नावाची चित्रकार युवती एकदा नेहरु सेंटरला भेट द्यायला गेली. सगळं पाहून ती फारच अस्वस्थ झाली. तडक नेहरु सेंटरचे एक संचालक आणि इतकी नितांत सुंदर वास्तू ज्या वास्तू रचनाकाराने निर्माण केली आहे, त्या आर्किटेक्ट काद्री साहेबांनाच जावून भेटली. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की आदरणीय श्री. जवाहरलाल‌ नेहरुंना चित्रशिल्प कलेचं वावडं होत? असं थेटच सवाल त्यांना केला. 

शांत, संयमी काद्रीसाहेब, त्या मुलीच्या या प्रश्नाने अवाक आणि थक्क झाले. त्यावर एवढ्या प्रचंड, अवाढव्य वास्तूत तुम्हाला एखादं कलादालन कसं करावसं नाही वाटलं? या तिच्या पुढल्या प्रश्नाने प्रभावित होऊन, त्यानी हसून सांगितलं कीचल, तू कला दालन सुरु कर. लागेल ती यंत्रणा आणि इथे‌ जागा मी देतो’! तर पहिली आर्ट गॅलरी ही अशी सुरु झाली आणि तेव्हा ती, जिथे आत्ता पुस्तक विक्री होते, त्याला लागून असलेल्या बंदिस्त अशा लहान दालनात होती. 

आर्किटेक्ट कादरी

आपल्या मेहनतीने आणि नियोजनबद्ध कामांनी याचं नीना रेगे मॅडमनी आज तीच गॅलरी समोरच्या प्रशस्त जागेत उभी करुन, मुंबईतच नाही तर देशात, परदेशात नावारुपाला आणली आणि त्यात इतके छान विविध प्रकल्प त्या आजही अव्याहतपणे राबवत आहेत.

यात त्यांची मेहनत, व्हिजन, ध्यास आणि नियोजनबद्ध काम करण्याची हातोटी आहेच, पण त्या याचं श्रेय त्यांच्यावर प्रथमत: ज्यांनी ही जबाबदारी सोपवली आणि आजवर त्यांच्या विविध नवंनवीन संकल्पना साकारण्यात त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहिले, त्या आर्कीटेक्ट काद्री साहेबांना आणि नेहरु सेंटरचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांना देतात.

श्री. शरद पवार नेहरु सेंटर आर्ट गॉलरीतील कला प्रदर्शन पहाताना.

माझा राजकारणाशी तीळमात्रही संबंध नाही’, रेगे मॅडम बोलत होत्या. “पण, ज्या प्रकारे श्री. शरद पवारांनी माझ्या प्रत्येक नवीन प्रकल्पाला सर्वतोपरी मदत केली, कामाचं स्वातंत्र्य दिलं आणि प्रत्येक नवीन संकल्पना, उपक्रम सुरु करताना पूर्ण विश्वास ठेवला. कितीही व्यस्त असले, तरीही प्रत्येक प्रकल्पाच्या प्रत्येक टप्यावर खूप आस्थेनी कामाची चौकशी केली, काही हवं नको विचारलं त्यामुळेच श्री. शरद पवारांच या सगळ्यात, म्हणूनच खूप मोठं योगदान आहे”. 

अरे, माणसं अचूक हेरुन, त्यांच्यावर जबाबदाऱ्या देत, पूर्ण विश्वास टाकणं, हीच केवढी दुर्मिळ गोष्ट आहे. आणि म्हणूनच आजवर हे एवढं सगळं उभं राहू शकलं”, रेगे मॅडम खूप तळमळीने बोलतं होत्या आणि मी ऐकत होतो. ‘अशा प्रकारचा प्रकल्प, तोही सातत्यानी इतकीं वर्षे, आजवर आपल्या देशात तरी कुठेच राबवला गेला नाहीये’, रेगे मॅडम म्हणाल्या. मीही मान डोलावली  आणि म्हटलं, अगदी खरं आहे. 

पण, आपण कलाकार या सगळ्यांचा फारसा उपयोग करुनच घेत नाही, ही त्यांची खंतही त्यांनी बोलून दाखवली. हे वास्तव‌ लवकरच बदलेल या आशेवर‌ त्या आजही कार्यमग्न आहेत. यावरुन मला एक घटना आठवली‌. माझा एक सोशल मिडियावरचा मित्र म्हणजे हे साहेब तेव्हा नुकतेच जे. जे. मधून पासआउट झाले  होते. अतिशय उत्तम ईलस्ट्रेशन. तो त्याच्या कॉलेजपासूनच माझ्या संपर्कात होता. 

जे. जे. मधे शिकवायला सरच नाहीत असं तो म्हणे. सिनीयर्सकडून म्हणे ही मुलं तेव्हा शिकत. माझ्याकडून त्याची जवळजवळ ऑनलाईन शिकवणीच सुरू होती. ठरलेल्या वेळी ऑनलाईन किंवा नेट स्लो असेल तर चॅटवर येत असू. मग एक, एक असाईंमेंटवर त्यांनी केलेलं काम, त्यावर डिस्कशन वगैरे. 

या गोष्टीलाही आता आठनऊ वर्ष झाली असतील. मी त्याला सतत सांगत असे, तू नेहरु सेंटरला जात जा. तिकडे बसून एक, एक पुस्तक अभ्यास. पण तो नुसता, हो दादा, जातो दादा करत टोलवत होता. 

साधारण तीन एक वर्षाच्या नोकरीनंतर त्याची नोकरीतली उमेदवारी बऱ्यापैकी संपली आणि त्याला एक उत्तम पगाराची नवी नोकरी मिळाली. घरच्या अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीत त्यांनी त्या मानानी, इतकं महागडं शिक्षण पूर्ण केलं होत. तो मला भेटायला माझ्या घरी आला. कमीत कमी सहा वर्षतरी आम्ही नित्यनेमाने रोज संपर्कात होतो. तरीही प्रत्यक्ष ती पहिलीच भेट होती. सोशल मिडियाची खरी गंमत यातच तर आहे. साहेब मला द्यायला मोठा पेढ्याचा बॉक्स घेऊन आले होते. मग, दादा तुझ्या मुळेचवगैरे 

मग गप्पा सुरु झाल्या. मी म्हटलं, तू तेव्हापासून मी सांगेन ती प्रत्येक गोष्ट ऐकत होतास. फॉलो करत होतास. म्हणून तुला उपयोग झाला. फक्त एक सल्ला सोडून सगळं ऐकलस.

त्यानी अधीरपणे विचारलं, कुठला सल्ला? मी म्हटलंनेहरु सेंटर.

त्याचा चेहरा जरा पडला. पण पटकन स्वतः:ला सावरत तो त्याची बाजू सांगायला लागला 

विथ ड्यु रिस्पेक्ट दादा, पण तुमच्या वेळचं वेगळं होत. आता गुगलबाबा एका क्लिकवर सगळं भसाभस समोर ठेवतो. मग तिकडे जा, दिवसभर बसा, पुस्तक पहा, म्हणजे तुझ्या भाषेत अभ्यासासांग ना खरंच यांची काही गरज आहे”? 

 यावर पुढे मी काही बोलण्यातच अर्थ नव्हता 

अगदी हायरेझ स्कॅनरवर प्रोफेशनली स्कॅन केलेल्या ओरिजीनल पेंटिंग्जच्या ईमेजेस, उत्तम दर्जाच्या आर्ट पेपरवर छापलेल्या मुळ रंगांच्या खूप जवळ जाणाऱ्या चित्रांची / पेंटिंग्जची पुस्तकं आणि गुगलवर येणाऱ्या ईमेजेस, यातला फरक जर कलाकारांना आणि कला विद्यार्थांना सांगावा लागणार असेल, तर मग खरचं काहीही करु नये. आपल्या गरजे इतकं ज्यांनी त्यांनी कमवावं आणि मी, माझं करत दिवस ढकलावेत, असं मला वाटायला लागतं.

या लेखाची सुरुवातच माझ्या मनात, त्या क्षणीच त्याच्या त्या उत्तरानी झाली होती. पुढल्या भागात आपण नेहरु सेंटरमधील लायब्ररी या अजून एका आश्चर्याचा मागोवा घेऊयात. 

तसेच, दिव्यांग आणि त्यातही दृष्टिहीन मुलांच्या चित्रकला स्पर्धाही रेगे मॅडम सुरवातीपासून आजवर घेत आल्या आहेत. या उपक्रमाबद्दल आणि थक्क करायला लावणाऱ्या या मुलांच्या चित्रांबद्दल आपण त्या पुढल्या भागात बोलूयात. हे सगळं वाचून, तुमची पण उत्सुकता नक्कीच वाढली असेल ना? आणि खऱ्या अर्थाने आपलं मुंबईतलं नेहरु सेंटर हे कलाविश्वातली अलीबाबाची गुहाच आहे, हेही तुम्हाला नक्कीच पटलं असेल.

******

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएपवर लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

लेख कसा वाटला ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन जरूर सांगा.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.