FeaturesNews

चित्र बघा, त्यात आकार शोधू नका!

ज्येष्ठ लेखिका आणि चित्रकार डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांचे ‘आत्मभान १’ हे प्रदर्शन डोंबिवली येथे दि. २१ व २२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. त्या निमित्ताने दि २२ जानेवारी रोजी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते आणि उमा कुलकर्णी यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रदर्शनात उमाताईंची मोठ्या कॅनव्हासवर काढलेली, नव्हे रंगवलेली, काही चित्रं तर होतीच आणि शिवाय तिथे बघायला न मिळालेली छोट्या कागदांवर रंगवलेलीही अनेक होती. अनेक रंगांचा मोकळा वापर या सर्वांतून केला आहे. सर्वांची मांडणीदेखील अशा प्रकारे केलेली होती की एकाच रंगसंगतीतून वेगवेगळे आकार दृश्यमान झालेली चित्रं एकत्र होती. काही निराळ्या रंगसंगतीची चित्रंही एकत्र होती. यामुळे दोन्हीतील साम्यभेद बघताना जशी मजा आली त्यापेक्षा जास्त काही आकळत आहे असं जाणवलं. (कोलतेसर जे म्हणाले ते पटलं. “चित्रं काढणं म्हणणं चूक आहे. चित्रं रंगवणं हे अधिक बरोबर आहे!”)

प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी उमाताई कुलकर्णी, दीपक घारे आणि आयोजक गणेश मनोहर कुलकर्णी.

हे आकळणं काय आहे बरं ? आपल्याला ते शब्दांत व्यक्त करता येईल का ? काही चित्रांमध्ये कारंज्यांचा उत्फुल्लपणा जाणवत होता काही चित्रांमधून वेगवेगळ्या दिशांनी जाणाऱ्या उंच – सखल वाटा दिसत राहिल्या. ह्या सर्व वाटा आपल्याला जणू उघड्या दरवाजांकडे नेत आहेत की काय ? त्यांच्या पलीकडे काय बरं असेल ?
अमूर्त चित्रांविषयी वाचलेलं आठवत राहिलं.’चित्र हे चित्र असतं, मूर्त वा अमूर्त असं नसतं. ज्यात आकार आहेत, रंग आहेत जे आपण नजरेने बघू शकतो, मग भले त्यात आपल्या ओळखीचे, आपल्याला माहिती असणारे आकार नाहीत तरी ते चित्र डोळ्यांना दिसतंच ना !
मग हा भेद कशासाठी?’
एकेक करत असे प्रश्न मनात येत राहिले खरे, पण ज्यांचं एकमेव उत्तर नंतर मिळणार आहे हे तेव्हा ठाऊक नव्हतं.

नंतरच्या गप्पांमध्ये कोलतेसर म्हणाले,
“चित्रं बघण्यासाठी असतात त्यातले ओळखीचे आकार शोधण्यासाठी नसतात.”
हे ऐकल्यावर आठवलं. लॉकडाऊन काळातल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात कोलतेसर अशा अर्थाचं म्हणाले होते, “आंबा खाल्ला की तो गोड आहे की आंबट इतकाच फक्त आपण विचार करू शकतो, करतो. त्याच्या चवीचं अधिक विश्लेषण आपण करतो का? हेच एखाद्या चित्रालादेखील लागू होतं.”
अलीकडच्या काळात जो विषय कोलतेसरांनी वारंवार मांडला आहे तो या गप्पांमध्ये येणं हे तसं स्वाभाविक वाटलं.
“आर्ट स्कूल / कॉलेज बंद करा. एखादा विषय देऊन चित्र काढणं म्हणजे विद्यार्थ्यांना बंदिस्त करणं आहे. प्रत्येक माणसाला ज्याच्यात्याच्या भावना संवेदना आहेत. त्या व्यक्त करण्यासाठी त्याला मोकळं ठेवलं पाहिजे.
मी जेव्हा असं म्हणतो त्यावेळी मी टीकेचा धनी होतो.
मी विद्यार्थी असताना मला हे असं अडकवून घेणं कधीच पटलं नाही. त्यामुळे शेवटून तिसऱ्या क्रमांकावर पास होऊन जेव्हा मी तिथून बाहेर पडलो तेव्हा मी गोंधळलेला होतो.
मात्र माझे गुरू शंकर पळशीकर आणि इतर चांगली माणसं भेटली. ‘तुझ्या मनाला जे आवडेल, पटेल ते तू काहीही कर’ असा सल्ला त्यांनी दिला तेव्हा माझी जणू सुटका झाली.”

उमा कुलकर्णी यांच्यासोबत लेखिका चित्रा राजेंद्र जोशी.

उमाताई म्हणाल्या, “माझे पती विरूपाक्ष यांच्या साथीने कन्नडमधल्या नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे अनुवाद मला करता आले. तिथे त्या त्या साहित्यकृतीच्या रूपाने जणू एक विषय मिळत गेला, ज्याला धरून माझ्यातल्या निर्मितीक्षमतेला वाव मिळत राहिला. मी मनाने आपोआप मोकळी होत गेले. शब्द आणि चित्र हे दोन्ही मी हाताळू शकते त्याचा थेट नाही पण असा अप्रत्यक्ष परिणाम असावा असं वाटतं.”

आपल्या जगण्याला अमुक एका साच्यात (उदा. फक्त अनुवाद करायचे) न अडकवता शक्य त्या सर्व मार्गांनी भिडायचे. शब्द – रंग – रेषा – आकार अशा माध्यमांतून आपल्या परिने स्वत:लाच आजमावत राहायचे आणि त्यात इतरांना सामील करून घ्यायचे. उमाताईंची ही कृतीशीलता अनुकरणीय आहे.

दोन दिग्गजांच्या विचारांची ही अनुभवसमृध्द मांडणी रसिकांनादेखील विचारसंपन्न करून गेली. तब्बल अडीच तास प्रेक्षक या कार्यक्रमात तल्लीन झाले. विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती ही कलेच्या भविष्याविषयी सर्वांच्या मनात आनंददायी चित्र निर्माण करणारी होती. संयोजक गणेश कुलकर्णी आणि ‘चिन्ह’च्या कनक वाईकर यांनी कोलतेसर आणि उमाताईंना नेमके व थोडक्यात प्रश्न विचारून जास्तीत जास्त बोलू दिलं. मुलाखतकार म्हणून हे महत्त्वाचं असतं कारण प्रेक्षक त्यांना नव्हे तर प्रमुख वक्त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी उत्सुक असतात.

‘आत्मभान म्हणजे निर्मितीक्षम मनाचं स्वातंत्र्य’ हे मनावर ठसवणारे असे दोन चित्रकार एकाच वेळी, एकाच ठिकाणी ऐकता येणं यासाठी आयोजकांचे खास आभार.

– चित्रा राजेंद्र जोशी

chitrarjoshi@gmail.com

Related Posts

1 of 149

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.