No products in the cart.
समकालीन कलेचा महोत्सव
मुंबईत हिवाळा असो किंवा नसो, हिवाळी मोसम ही मात्र इथल्या कला-रसिकांना पर्वणीच असते. कारण कला-क्षेत्रातील अनेक महत्त्वाची प्रदर्शने याच काळात होत असतात. करोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेला कला-व्यवहार आता कुठे सुरळीत होतो आहे. मुंबईचे सुप्रसिद्ध ‘काला घोडा आर्ट्स फेस्टिवल (KGAF)’, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमधील ‘इंडिया आर्ट फेअर’ प्रदर्शन, ‘व्हॅन गॉग ३६०°’ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रदर्शन, जहांगीर आर्ट गॅलरीमधील ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या वार्षिक स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन, नुकत्याच दिवंगत झालेल्या ललिता लाजमी यांच्या चित्रांचे NGMA मधील प्रदर्शन ही एकाहून एक वैशिट्यपूर्ण आणि कलात्मक दृष्टीचे विविध पैलू रसिकांसमोर उलगडून दाखवणारी प्रदर्शने पाहिली. परंतु समकालीन कलेच्या (Contemporary Art) प्रांतात ‘शहरी कला’ (Urban Art) शैलीमुळे स्वतःची वेगळी ओळख असलेले, सध्या मुंबईच्या ससून डॉकमध्ये चालू असलेले Mumbai Urban Art Fair (MUAF) पाहण्याचा अनुभव अद्वितीय आहे. मी २०१७ हे प्रदर्शन पाहिले होते आणि अतिशय वेगळा असलेला हा प्रयोग बघून हरखलो होतो.
या प्रदर्शनाचे वेगळेपण अनेक गोष्टींनी सिद्ध होते. सर्वात पहिले म्हणजे हे प्रदर्शन कुठल्याही आर्ट गॅलरी मध्ये किंवा पूर्णवेळ कलेला वाहिलेल्या वास्तू मध्ये होत नाही. हे होते मुंबई शहराच्या माणसांमध्ये, खरंतर या शहराचे नाव ज्यांच्या देवीचे आहे ते इथले मूळ रहिवासी असलेला मच्छिमार समाज जिथे आपला व्यवसाय करतो, त्या ससून डॉक (बंदर) मध्ये. म्हणजे थेट लोकांच्या जीवनाशी निगडीत असण्याची, त्यांच्या थेट संपर्कात असण्याची समकालीन कलेची पहिली ओळख इथेच सार्थ होते. ससून डॉक दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात १८७१ साली झाल्याचा उल्लेख मुख्य प्रवेश द्वारापाशी आजही पाहायला मिळतो. एखाद्या किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे तसे हे मजबूत दगडी बांधकाम असलेले आणि तोफांचा दिमाख सांभाळत उभे असलेले प्रवेशद्वार ओलांडून आत शिरताना इतिहासाच्या जिवंत पुस्तकात शिरतो आहोत असे वाटते. आणि लगेचच आपल्या स्वागताला सज्ज असलेली दिसतात ती प्रचंड आकारातील चित्रं! हे या प्रदर्शनाचे दुसरे वैशिष्ट्य! कारण ही चित्रे कुठल्याही कॅनव्हास वर रंगवलेली नाहीत, तर ती रंगवली आहेत चक्क इथल्या अतिशय जुन्या आणि मोठ्या आकारांच्या बराक-सदृश बैठ्या गोडाउनच्या बाह्य पृष्ठभागांवर! तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे की ही चित्रे इथल्या माणसांची, इथल्या जीवनाची आहेत. अश्या प्रकारे समकालीन कलेच्या सर्व वैशिष्ट्यांचा प्रत्यय आणून देणारी इथली कला आहे.
या वर्षी प्रदर्शनाची मांडणी तीन विभागांमध्ये केलेली आहे, पहिला Intuitions (अंतर्ज्ञान), दुसरा Illusions (भ्रम) आणि तिसरा ‘एशियन पेंट्स आर्ट हाऊस’ नावाचा स्वतंत्र विभाग आहे. प्रत्येक विभागामध्ये अनेक कलाकृती आहेत आणि त्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग आहे. तीनही विभाग तीन स्वतंत्र इमारतींमध्ये आहेत. त्याशिवाय ससून डॉकच्या विस्तीर्ण क्षेत्रावरील अनेक जुन्या-नव्या वास्तू, भिंती यांच्यावर मुक्तपणे बहरलेले कलेचे विविध प्रकारचे, विविध शैलींमधील सादरीकरण फिरून पाहायला दीड ते दोन तास लागतात. तेवढ्या काळात समुद्राची खारी हवा आणि तिथला ‘मत्स्यगंध’ यांची सवय नसेल तरी सवय होऊन जाते.
‘Intuitions’ मध्ये ‘Intuitions – Between the sea and the city’ या सह-शीर्षकाअंतर्गत एकूण २३ कलाकारांनी २० कलाकृती सादर केल्या आहेत. यांपैकी १४ कलाकार मुंबईचे, ५ भारतातील अन्य ठिकाणचे तर स्पेन, फ्रांस आणि घाना येथील प्रत्येकी एक असे ३ आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत. या थीम अंतर्गत बंदरामध्ये असलेले समुद्राचे पाणी हा मुंबई शहर आणि समुद्राला जोडणारा मुख्य दुवा या नात्याने प्रमुख कथानायक आहे अशी कल्पना करून या सर्व कलाकृती येथील जीवन आणि समुद्र यांच्या नात्याचे पदर उलगडत जातात.
‘Illusions’ मध्ये ‘Illusions – Between the sea and the city’ या सह-शीर्षकाअंतर्गत एकूण १६ कलाकारांनी १६ कलाकृती सादर केल्या आहेत. यांपैकी ३ कलाकार मुंबईचे, ८ भारतातील अन्य ठिकाणचे तर अर्जेंटीना, नेदरलँड्स, नेपाळ, फ्रांस येथील एकूण ५ आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत. अंधारापासून प्रकाशापर्यंत प्रवास करत आपल्या समाजातील अनेक गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या कलाकृती इथे सादर केल्या आहेत.
इथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) प्रगत प्रकार असलेल्या Generative Artificial Intelligence मधील chatGPT वर आधारित Superintelligence नावाचे एक Art installation आहे. त्यात अंधारमय पार्श्वभूमीवर आपल्या समोर एका प्रचंड मोठ्या स्क्रीनवर chatGPT सतत काहीतरी लिहत जात असते आणि आपण त्या स्क्रीनच्या आत आत आत खोल खोल खोल चालत जाऊ शकतो. हा अनुभव अत्यंत भन्नाट आहे! सध्या जगात chatGPT चा बोलबाला आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करत आहे. भविष्यात मानव म्हणून आपले जीवन आमूलाग्र बदलून जाणार आहे. मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील द्वैत कमी कमी होत जाणार आहे. त्या स्थित्यंतरचीच ही एक नाट्यमय झलक यातून मिळते.
दोन्ही विभागांमधील प्रत्येक कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण आहे, सौंदर्याचे स्वतःचे परिमाण निर्माण करण्याची क्षमता असलेली आहे. संकल्पना, वापरलेली माध्यमे आणि सादरीकरण या तिन्ही निकषांवर नावीन्यपूर्ण अशी ही सर्वच कामे आहेत. इथल्या जीवनाला भिडणारी असल्यामुळे बघणाऱ्यांच्या मनाला भिडणारी आहेत. दृष्टी, स्पर्श, गंध, ध्वनी या वेगवेगळ्या संवेदनांना जाग आणणारी आहेत. शहरांचे प्रश्न – तिथली गर्दी, प्रदूषण, बकालपणा, स्थानिकांची घुसमट, पर्यावरणाचा ऱ्हास – हे सगळे सहजासहजी न सुटणारे असल्यामुळे खरंतर त्रासदायक आहेत पण कलाकार त्यातील वेदना, आर्ततासुद्धा एका वेगळ्या सौंदर्यदृष्टीने पाहू शकतो. त्यातूनच Urban Art तयार होते. यामधील बहुतांश कलाकृती या इंस्टॉलेशन प्रकारच्या आहेत, काही Immersive art प्रकारच्या आहेत, ज्यात प्रेक्षकांना त्या कलाकृतीच्या आत स्वतःला विसर्जित करत ती अनुभवता येते, तर काही Participatory art प्रकारच्या आहेत ज्यात प्रेक्षकांना तिथे दिलेल्या सूचनांचा अवलंब करत स्वत: काहीतरी कृती करून त्या कलाकृतीमध्ये आपला वैयक्तिक सहभाग नोंदवता येतो.
पहिल्या दोन विभागांमधील कलाकृती बहुतांश conceptual (संकल्पनाधारित) असल्यामुळे त्या अनुभवायला आवडल्या तरी त्यांचे भव्य स्वरूप आपण आपल्या घरात नेऊ शकत नाही. तिसऱ्या विभागात मात्र समकालीन कला आपल्या घरामध्ये नेऊन त्याचे सौंदर्य सतत कसे अनुभवता येईल याचे आदर्श उदाहरण दाखवते. तिथे Asian Paints ने एका दुमजली बंगल्याचे नूतनीकरण केले आहे आणि आत सर्व प्रकारची Contemporary Art installation लावली आहेत. यामध्ये हवा भरून फुगवलेले सुंदर कृत्रिम आकार देऊन घराची शोभा वाढवणारे Silver escapades, The Magic Cube नावाचे घरच्या आतील अवकाशाचे मुक्त आकारांमध्ये रूपांतर करणारे आर्टवर्क आणि Toy Faces नावाची अत्याधुनिक NFT आर्ट शैलीतील पाच कलाकृती यांचा समावेश आहे. हे बघून अनेकांना आपल्या बंगल्यात तशी आर्ट वर्क्स असावीत अशी इच्छा होणार! कलेची उपयोजित आणि आर्थिक संधी असलेली बाजू इथे स्पष्ट होते.
हे अतिभव्य आकाराचे आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग असलेले प्रदर्शन पाहण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागत असली तरीही इथे प्रवेश विनामूल्य आहे. याचे श्रेय मुख्य आयोजक एशियन पेंटस आणि संयुक्त आयोजक Start Foundation For Art And Culture (SFAC) यांना जाते. तसेच यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी म्हणून नेदरलँड्स व ऑस्ट्रेलिया यांचे मुंबईतील दूतावास, Spanish Cooperation ही संस्था यांचे, तसेच कला क्षेत्रातील नामवंत Saffronart Foundation, संग्रहालये आणि कला व मनोरंजन क्षेत्रातील अनेक कंपन्या, प्राणी कल्याण संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, उद्यानविद्या (Horticulture) क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रांमधील सहकार्य देणाऱ्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. सध्या मुंबईत चालू असलेल्या ‘व्हॅन गॉग ३६०°’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा विचार केला तर तिथले तिकिटाचे चढे दर सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नाहीत. MUAF मध्ये अतिभव्य स्वरूपात आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती अनुभवण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे तसे काहीतरी ‘व्हॅन गॉग ३६०°’ च्या बाबतीत होऊ शकेल का, असे वाटले. व्हॅन गॉगच्याच नेदरलँड्स देशाच्या मुंबईतील दूतावसाचा सुद्धा सहभाग इथे आहेच. अर्थात व्हॅन गॉगची आधुनिक कला (Modern Art) आणि ही समकालीन कला (Contemporary Art) यांची तुलना करणे योग्य नाही परंतु समकालीन कला लोकांसमोर यावी यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, त्यांची पुनरावृत्ती अनेक ठिकाणी व्हायला हवी, हीच अपेक्षा कला रसिकांच्या वतीने व्यक्त करतो.
या संदर्भात चिन्ह मध्ये अलिकडेच प्रकाशित झालेले दोन लेख ‘कलेचे स्वयंशिक्षण घेताना’ या लेखमालिकेतील लेख पहिला – ‘मॉडर्न आर्ट अँड आयडियाज – आधुनिक कलेविषयी आधुनिक अभ्यासक्रम’ आणि लेख दुसरा – ‘समकालीन कला म्हणजे काय?’ हे अवश्य वाचावेत.
जाताजाता
समकालीन कलेचे जिवंत स्वरूप अनुभवण्यासाठी या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. त्यासाठी दीड दोन तासांचा वेळ काढून जा. ससून डॉक मुंबईच्या दक्षिण भागात कुलाबा येथील आझाद नगर भागात असून, चर्च गेट रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून तिथे जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी उपलब्ध असतात. प्रदर्शन २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १२ ते रात्री १० पर्यंत, शनिवार व रविवारी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत असून रात्री ९ वाजता प्रवेश बंद केला जातो. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी या लिंकवर जा. नोंदणी करणे बंधनकारक आहे पण प्रवेश विनामूल्य आहे.
https://insider.in/mumbai-urban-art-festival-dec22-feb-22-2022/event
– विनील भुर्के
Related
Please login to join discussion