Features

‘उत्तम’कथा – भाग २

नुकतंच  ज्यांचं निधन झालं ते शिल्पकार उत्तम पाचारणे हे चिन्हचे संपादक सतीश नाईक यांचे जेजे स्कूलमधले सहाध्यायी. आपल्या सहाध्यायाला  श्रद्धांजली वाहण्याच्या  निमित्तानं सतीश नाईक यांनी जो कलावंतांमधील  परस्पर नातेसंबंधांमधल्या ताण्याबाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे तो अनोखा ठरावा. या लेख मालिकेचा हा दुसरा भाग.  

———

जेजेमध्ये शिकत असतानाच शेवटच्या वर्षाला मला संधी मिळाली आणि मी पूर्ण वेळ पत्रकारितेत शिरलो. त्या काळात चित्रं काढून चरितार्थ चालवणं केवळ अशक्य होतं. माझं वाचन बऱ्यापैकी होतं. लेखन वाचनाचा भयंकर नाद होता. त्यामुळे मी मोठ्या हौसेनं पत्रकारिता हे  क्षेत्र स्वीकारलं. जेजेत शिकत असतानाच मी प्रायोगिक नाट्य चळवळीत शिरलो होतो. दिवसरात्र नाटकवाल्यांचा सहवास आणि मिळेल त्या वेळात नाट्यलेखन किंवा नाट्यविषयक लेखन मी मोठ्या हौसेनं करीत होतो. पण पत्रकारितेत शिरताच  एकेक पाश मी दूर करु लागलो. आता फक्त पत्रकारिता आणि उरलेल्या वेळात  फक्त आणि  फक्त चित्रकारिता करायची असा निर्णय मी घेतला.

 

पण माझा चळवळ्या स्वभाव मला काही स्वस्थ बसून देत नव्हता. कॉलेजच्या काळात प्रायोगिक नाट्य चळवळीत जे काही संस्थात्मक काम  मला शिकावयास मिळालं होतं ते चित्रकलेच्या क्षेत्रात आणायचंच असं माझ्या मनानं घेतलं. बॉम्बे आर्ट सोसायटी त्या काळात अत्यंत निस्तेज अवस्थेस आली होती. दोनचार हौशीगवशी मंडळी ती चालवत होती. या संस्थेत शिरून काही तरी करावं असं माझ्या मनानं घेतलं.  जेजेतला माझा मित्र अनिल नाईक, जेजेतले माझे शिक्षक प्रा सुधाकर लवाटे यांच्या कानावर मी माझं बेत घातला. त्यांनाही तो आवडला असावा. त्या दोघांमुळे  प्रा  शांतीनाथ आरवाडे, उमेश अहिरे, यशवंत शिरवडकर, दत्ता पाडेकर यांच्यासारखी  नव्या दमाची कलावंत मंडळी पुढे आली आणि आम्ही सोसायटी काबीज केली. जवळजवळ नऊ वर्ष आम्ही सोसायटीवर निवडून येत होतो. मधल्या काळात  जेजेतले शिल्पकला विभागाचे प्रा निळकंठ खानविलकर, प्रफुल्ला डहाणूकर हेही आमच्यात सामील झाले आणि दणक्यात आम्ही एकेक कार्यक्रम पार पडावयास सुरुवात केली. आता  सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात खरोखरच जान आली. अनिल नाईक आणि लवाटे  सरांमुळे जेजेतली तरुण मुलं मुली सोसायटीच्या कामात मोठ्या प्रमाणात  सहभागी होऊ लागली. वार्षिक प्रदर्शनं आणि उद्घाटन सोहोळे मोठ्या उत्साहात पार पडू लागले.

त्याच काळात चित्रकार के एच आरा यांचं निधन झालं. आर्टिस्ट सेंटर पोरकं झालं. बॉम्बे आर्ट सोसायटीमधली आमची कामगिरी पाहून केमोल्ड गॅलरीचे संचालक केकू गांधी प्रचंड खुश झाले होते. त्यांनी ‘आता आर्टिस्ट सेंटर देखील  आम्ही ताब्यात घ्यावे’ अशी सूचना केली. आणि आम्ही आर्टिस्ट सेंटर मध्ये शिरलो. कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रख्यात उपयोजित चित्रकार यशवंत चौधरी, ‘मार्ग’च्या संपादिका  डॉ शरयू दोशी, प्रफुल्ला डहाणूकर याना संस्थेत आणून नानाविध कार्यक्रम आयोजित करुन आम्ही या दोन्ही कला संस्था कलाविश्वात सातत्यानं  चर्चेत ठेवल्या.  ज्या सोसायटीच्या  निवडणुकांना हातावरच्या बोटावर मोजण्याइतके देखील सभासद येत नसत त्या सोसायटीच्या निवडणुकीस आता २० २० २५ तरुण  सभासद उभे राहू लागले. साहजिकच आमची लोकप्रियता सहन ना होणारी एक लॉबी आपोआपच  चित्रकला वर्तुळात उभी राहिली. एका ज्येष्ठ चित्रकारानं तर नंतर  निवडणुकीत आपलं पॅनल तयार केलं आणि आम्हाला साऱ्यांनाच पराभूत केलं. त्यासाठी त्यानं  काहीएक करावयाचं शिल्लक ठेवलं नाही. तो ज्येष्ठ चित्रकार संस्था ताब्यात घेण्यासाठी त्यावेळी इतकं घाणेरडं राजकारण  खेळला की त्यानं कला क्षेत्रातलं  सारंच वातावरण प्रदूषित  करुन टाकलं. नेहमी हसतखेळत राहणारे कलावंत एकमेकांकडे संशयानं पाहू लागले.

 

एकदा तर निवडणूक प्रकरण कोर्टात जायची वेळ आली. एका  निवडणुकीच्या वेळी एका कलावंताने माझ्या बोटाचा कडकडून चावा घेतला होता. त्या ज्येष्ठ चित्रकारानं अनेक तरुण कलावंतांना बळेबळेच आमच्या विरोधात उभं  केलं. (जणू काही  आम्ही  सोसायटी गिळंकृतच करणार होतो.) या कलावंतांमधला एक होता उत्तम. उत्तम पाचारणे. तोपर्यंत उत्तमनं आपल्या क्षेत्रात चांगलाच जम  बसवला होता. जेजेमधून बाहेर पडल्यानंतर  त्याला विवेकानंदांच्या शिल्पाचं काम मिळालं होतं. त्या कामानं त्याला प्रसिद्धीदेखील मिळवून दिली होती. ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील त्यानं पटकावला होता. बोरिवलीतल्या रस्त्यावरच्या झोपडीतून तो मालाडच्या रहेजा कॉम्प्लेक्समधल्या फ्लॅटमध्ये येऊन स्थिरावला होता. शिल्पांची मोठमोठाली कामं  त्याला मिळू लागली होती. भलीथोरली गाडी घेऊन तो फिरू लागला होता. स्वतःचा स्टुडिओदेखील त्यानं थाटला होता. कधी जहांगीरला दिसला तर हाय – हॅलो करण्यापलीकडे माझे त्याचे संबंध नव्हतेच. आधीही म्हणजे जेजेत शिकतानादेखील ते होते अशातला भाग नाही. पण तरीदेखील त्या ज्येष्ठ कलावंताच्या नादाला लागून तो माझ्याविषयी नकोनको त्या वावड्या उठवतो आहे हे माझ्या लक्षात येऊ लागलं. हा त्याचा प्रचार कला वर्तुळातच असेपर्यंत ठीक होता, पण नंतरनंतर तर तो माझ्या कार्यालयापर्यंतदेखील पोहोचू  लागला. अनेकदा पत्रकार मंडळी अभावितपणे चौकशा करू लागली तेव्हा कुठं ते माझ्या ध्यानी येऊ लागलं. पण मी काहीएक करू शकत नव्हतो.

एकच  उदाहरण सांगतो. प्रफुल्ला डहाणूकर यांना त्या काळात चित्रकला वर्तुळात मोठा मान होता. सोसायटी आणि सेंटरच्या कामामुळे आमची वरचेवर जहांगीर किंवा सेंटरमध्ये भेट होत असे. तर यानं एके दिवशी उठवलं की ‘सतीश नाईक हा प्रफुल्ला डहाणूकरांचा हुजऱ्या आहे. बाई गॅलरीत आल्या की हा त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडतो’ वगैरे… हे सारं  एका सहकारी पत्रकार महिलेच्या तोंडून ऐकलं आणि मी अतिशय अस्वस्थ झालो.  पण अस्वस्थ होण्यापलीकडंदेखील मी काहीच करू शकत नव्हतो. वास्तविक पाहता माझा स्वभाव थोडासा भिडस्त आहे साहजिकच  समोरची व्यक्ती मोकळी झाली तरच मी पुढं संवाद साधू शकतो. अन्यथा माझा संवाद तिथंच संपतो. आणि दुसरा मुद्दा असा की समोरच्या मोठ्या व्यक्तीचा मोलाचा वेळ आपण वाया तर घालवत नाही आहोत ना याचं भान मला सतत असतं. त्यामुळे शक्य असूनही,  मनात असूनही मी अनेक बड्या लेखक, दिग्दर्शक, नाटककार, चित्रपटकार, चित्रकार, पत्रकार,  समाजसेवक यांच्याशी  संबंध वाढवू शकलो नाही ही  वस्तुस्थिती आहे. प्रख्यात चित्रकार प्रभाकर बरवे तर माझ्या घरापासून फक्त १५ मिनिटाच्या अंतरावर रहात, पण मी कधीच बरव्यांच्या मित्रपरिवारातला म्हणून ओळखला गेलो नाही. साहजिकच प्रफुल्ला डहाणूकरांसंदर्भात केल्या गेलेल्या  या प्रचारामुळे मी अतिशय अस्वस्थ झालो होतो. खरं तर  जहांगीर, सोसायटी किंवा सेंटरच्या  मीटींग्जमधले आमच्या दोघांमधले  संबंध सतत ताणलेले असत. कारण त्यांच्या अनेक भूमिका किंवा निर्णय मला पटत नसत आणि ते नाही पटले की  मी त्यांना सतत विरोध करायला मागे पुढे पाहत नसे. एकदा तर आमच्यातले  मतभेद इतके  विकोपाला गेले होते की ‘सर्वानुमते’ ठराव करुन त्यांनी मला सेंटरमधून काढून टाकलं होतं. असं सगळं असताना त्यानं अशा प्रकारे माझ्याविषयी सतत वदंता उठवाव्यात  याचं  मला खरोखरच वाईट वाटत असे. पण यावर मजपाशी उपायदेखील नव्हता हेदेखील खरं होतं.

 

ज्या ज्येष्ठ कलावंतानं हे सारं घडवून आणलं होतं त्यानं काही काळ यश मिळवलं खरं. पण नंतर त्याच्या विक्षिप्त वागणुकीमुळं त्यानं जमवलेले सारेच कलावंत त्याच्या विरोधात गेले आणि एकेक करुन त्याला सोडून गेले. त्यातले एकदोन तर त्या राजकारणातले ताणतणाव सहन न झाल्याने आजारी पडून निधन पावले किंवा व्यसनात गुरफटून गेले आणि त्यातच मरण पावले. आमचा रवींद्र साळवी नावाचा शिल्पकार-चित्रकार मित्र होता. तो त्या ज्येष्ठ कलावंताची भयंकर चेष्टा करायचा. त्या ज्येष्ठ कलावंताला मोठेपणा मिरवायची अतिशय हौस होती. त्याने नाना खटपटी करुन त्याच्या संपर्कांत येणाऱ्या तरुण  कलावंताना भेटले का पाया  पडायची सवय लावली होती. हा साळवी मोठा इब्लिस. ते ज्येष्ठ कलावंत येताना  दिसले की हा साळवी जहांगीरच्या पायऱ्यांवर किंवा आत गॅलरीत कुठंही असू हा माझे पाय धरायचा, दहा दहावेळा मला वाकून नमस्कार करायचा  आणि त्या ज्येष्ठ कलावंताला खिजवून दाखवायचा. पुढं त्या ज्येष्ठ कलावंताला सोसायटीमधूनदेखील अतिशय अपमानित अवस्थेत पायउतार व्हावं लागलं. त्यांनी जे पेरलं होतं तेच नंतर उगवलं. उत्तमच्या निधनानंतर जे मला लिहावंसं वाटलं त्यातला हा दुसरा लेख. आणखी बरंच लिहावयाचं आहे पण ते नंतर.

 

दुसरा लेख समाप्त ….

 

सतीश नाईक

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.