No products in the cart.
कोण फसवी कुणाला?
शनिवारचा ‘गच्चीवरील गप्पां’चा संपला आणि अचानक एक अनोळखी फोन आला. खरं तर मी काही फोन घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो, कारण प्रचंड उकाडा, घामाघूम अवस्था आणि त्यातच कार्यक्रम मनासारखा न झालेला. पण तरी देखील मी तो फोन घेतला. ‘मी आता कामात आहे, नंतर फोन करू’, असं सांगण्यासाठी.
फोनवरची व्यक्ती खूपच नम्रतेनं बोलत होती. ‘गच्चीवरील गप्पां’चे कार्यक्रम खूप आवडतात, नवीन ‘Chinha Art News’ देखील नियमितपणे वाचतो आहे, अशा उपक्रमाची गरजच होती वगैरे वगैरे ती व्यक्ती बोलत होती. मी त्यांना सांगणारच होतो की नंतर फोन करतो म्हणून, पण तितक्यात त्या व्यक्तीनं मला अतिशय आर्जवानं सांगितलं की, ‘मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय !’ व्यक्तीच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा कुठंतरी भिडला आणि मी फोनवरचं संभाषण चालूच ठेवलं.
‘सर, तुम्ही खूप मोठं काम करताय ! जेजेचा प्रश्न तुम्ही जसा लावून धरला आहात तसाच आता आमच्या अनुदानित किंवा विनाअनुदानित कलाशिक्षण संस्थांचा देखील प्रश्न हाती घ्या. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सर, खूप वाईट दिवस आले आहेत. जगायचं कसं तेच कळत नाहीये. तुम्ही काय करता विचारलं तर ती व्यक्ती म्हणाली की, ‘एका विनाअनुदानित विद्यालयात मी शिक्षक म्हणून काम करतो. कोरोना लॉकडाऊननं तर आमचं अगदी होत्याचं नव्हतं करून टाकलं आहे आणि त्यातच आता येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार आहे ? हेच अजून कळत नाहीये. नव्या धोरणात पूर्वीसारखं दहावी प्रकरण नसणार आहे. त्यामुळे आमच्यासारख्या पदविका देणाऱ्या कला महाविद्यालयांचं काय होणार आहे ? हेच नेमकं कळत नाही. दहावी परीक्षा बंद झाली, शालांत परीक्षा मंडळ बंद झालं तर आमच्या कला महाविद्यालयांना विद्यार्थी येणार तरी कुठून ? त्यातच तुम्ही जाहीर देखील करून टाकलंय की, कला संचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांना राष्ट्रीय पातळीवर कोणतीही मान्यता दिली जात नाही. त्यामुळं यंदा आमच्या कला महाविद्यालयात किती विद्यार्थी प्रवेश घेतील ? हेच कळेनासं झालंय.
अक्षरशः अंधार पसरलाय समोर… काय करावं काहीच कळत नाहीये. लग्न करून बसलोय, एक मुलगा आहे पदरात, त्यात कोरोना लॉकडाऊनचा प्रचंड फटका बसलेला आणि आता हे प्रकरण ! आमची कला महाविद्यालयं जगतात की मरतात हेच मुळी कळेनासं झालंय. बोलता बोलता तो तरुण अक्षरशः कोलॅप्स झाला आणि धाय मोकलून रडू लागला. सर, काहीतरी करा ! खूप वाईट परिस्थिती आहे. उद्याचा दिवस कसा जाणार हेच आज कळत नाही.
मी गडबडून गेलो होतो. खरं तर मी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतोच, पण माझ्या लक्षात आलं की आता मला बोलायलाच हवं. मी त्याची समजूत काढू लागलो, पण तो त्या पलीकडं गेला होता. एक क्षण थांबलो, विचार केला आणि त्याला म्हटलं, ‘घाबरून जाऊ नकोस मित्रा… चित्र काढतोस ना ? मग घाबरायचं कशाला ?’ तो सावरून हो म्हणाला. म्हटलं, ‘पाठव ती चित्रं माझ्याकडे, आपण करू काहीतरी.’ हे ऐकल्यावर तो थोडासा शांत झाला. म्हणाल, ‘मी पाठवतो सगळं, पण आमच्यासाठी काहीतरी करा. आमचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. खूप उमेदीनं आलो होतो या क्षेत्रात, पण नंतर नंतर खरं काय ते कळत गेलं आणि हताश होत गेलो. तुमच्यासारखी माणसं काहीतरी करताहेत म्हणून जगण्याची थोडीशी उमेद वाटते, अन्यथा…’
मी ऐकत होतो सारं, पण भयंकर संकोचून गेल्यासारखं झालं होतं. अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयांमधील शिक्षकांचं भेसूर रूप आज मला प्रत्यक्षात दिसलं होतं. कशीबशी मी त्या व्यक्तीची समजूत घातली. लवकरात लवकर पुन्हा बोलूया, असंही त्याला म्हटलं, पण या नव्या आंदोलनाच्या गडबडीत ते बोलायचं मात्र अद्याप राहून गेलंय.
नवीन शैक्षणिक धोरणानं अनेक नवीन प्रश्न उभे केले आहेत. त्यासंदर्भात आम्ही ‘कलाशिक्षण महाचर्चा’ घडवून जागृती आणण्याचा प्रयत्न केला, पण तरीदेखील त्यावर शासकीय पातळीवर काही कारवाई झाली आहे, असं वाटत नाही. त्यातच आता कला विद्यापीठाचं वारं वाहू लागलं आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यात पुढाकार घेतला आहे आणि त्यांना साथ लाभली आहे ती अनुदानित आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयांच्या संचालक, प्राचार्य आणि शिक्षकांची.
जे जे स्कूल ऑफ आर्ट वाचवायची ही शेवटचीच संधी आहे, असं समजून आम्ही काही जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी एकत्र आलो आणि त्या अनुषंगानं पावलं टाकू लागलो. अपेक्षित नव्हतं, पण प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच सभेला जेजेमध्ये दोन अडीचशेची उपस्थिती मिळाली. आणि आता तर सोशल मीडियावर अक्षरशः हंगामा झाला आहे. यासंदर्भात लिहिलेली प्रत्येक पोस्ट व्हायरल होते आहे. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर ती शेयर होते आहे. आणखीन काही दिवसातच १९७० सालापासूनचे माजी विद्यार्थी एकत्र येतील आणि तिन्ही कला महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना उभी होईल ! आणि या कामी पुढाकार घेणाऱ्यांना मात्र अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयातील शिक्षकांकडून दूषणं दिली जात आहेत. तुम्ही आम्हाला फसवलं म्हणून दोष लावले जात आहेत.
जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि तिचे माजी विद्यार्थी हे एका बाजूला आणि जे जे स्कूल ऑफ आर्टमधून न शिकलेले किंवा डीपएडसारखे कोर्स करून एक दोन वर्ष शिकलेले आणि अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयं चालवणारे किंवा त्यात कलाशिक्षकाची नोकरी करणारे दुसऱ्या बाजूला, अशी आता कलाशिक्षण क्षेत्राची विभागणी झाली आहे.
अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयं महाराष्ट्रभर पसरली आहेत. ३० – ३५ वर्षांपूर्वी ती सुरु झाली तेव्हा दोन अडीचशे होती, आता त्यातली किती शिल्लक राहिली आहेत हे दस्तुरखुद्द प्रभारी कला संचालक देखील सांगू शकत नाहीत इतकी या क्षेत्राची भीषण अवस्था आहे. ही अवस्था कुणी केली ? या साऱ्याला कोण जबाबदार आहे ? या दोन प्रश्नातच त्याची स्पष्ट उत्तरं दडलेली आहेत. ती आपली आपण मिळवायची की जेजे वाचवू पाहणाऱ्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्याच माजी विद्यार्थ्यांना दोष द्यायचा ते आता ज्याचं त्यांनी ठरवायचं. आमचं एवढंच म्हणणं आहे की आता आम्हाला तोंड उघडायला लावू नका. ‘क(।)लाबाजार २’ काढायला लावू नका. यातच तुमचं भलं आहे !
Related
Please login to join discussion