No products in the cart.
‘डी-नोव्हो’ पुराण !
मुंबईच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्याच कला वर्तुळात सध्या फक्त एकच विषय गाजतोय, तो म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या डी-नोव्होचा ! समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चा चालू आहे, वृत्तपत्रातून उलट सुलट बातम्या येत आहेत. ज्यांना याविषयी काहीच ठाऊक नाही ते लोकं या बातम्यांच्या आणि चर्चांच्या माऱ्यानं अक्षरशः गोंधळून गेले आहेत.
जे जे स्कूल ऑफ आर्टच्या माजी विद्यार्थ्यांना जे जे स्कूल ऑफ आर्टला डी-नोव्हो दर्जा मिळावा असं प्रामाणिकपणं वाटतं तर विरुद्ध बाजूला जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये बहुतांशी न शिकलेले लोक एकत्र आलेत ( एखाद दुसरा अपवाद (?) वगळता ) आणि त्यांनी डी-नोव्हो नको, राज्यस्तरीय विद्यापीठच हवं, कला विद्यापीठच हवं आणि या कला विद्यापीठाला जेजेचंच नाव द्यावं असा धोशा चालवलाय. आणि त्यासाठी उलट सुलट किंवा खोटा मजकूर छापून आणणं, राळ उठवणं, समाजमाध्यमात आपल्याला हवे तसे मजकूर पेरणं आणि लाईव्ह कार्यक्रमांचा मारा करणं अशा अनेक गोष्टींचा वापर केला आहे.
तर इकडे जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी ( आता त्यांना माजी विद्यार्थी असा शब्दप्रयोग करणं खरंतर चुकीचंच आहे ) जे आता पन्नाशी किंवा साठी पार आहेत, काहीतरी सत्तरीतलेच आहेत, असे सारे जेजे वाचवण्यासाठी एकत्रित आले आहेत. ( त्यांचा कलाशिक्षण क्षेत्राशी कुठलाही संबंध नाही, त्यातले सारेच विविध व्यावसायिक आहेत ) त्यांचं म्हणणं एकच आहे, ‘ज्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आम्ही शिकलो आणि कलेच्या क्षेत्रात थोडंफार नाव मिळवलं त्याच सारं श्रेय जेजे आणि त्या परिसरालाच आहे. त्या साऱ्याचं आम्ही ऋण मानतो आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही या आंदोलनात उतरलो आहोत. आम्हाला कुणीही बोलावलं नाही. समाजमाध्यमांवर काहीतरी वाचलं, व्हॉट्सअपमधून कोणीतरी पाठवलेला मजकूर वाचला, तो आम्हाला मनापासून पटला, म्हणून आम्ही या आंदोलनात उतरलो. आम्हाला वैयक्तिकरित्या यातून काहीही मिळवायचं नाही. जे काही मिळवायचं होतं ते सारं भरून पावलो आहे. म्हणूनच ज्या संस्थेनं आम्हाला जे दिलं त्या संस्थेच्या उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्रातल्या चित्रकारांच्या भावी पिढ्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं ते अगदी स्पष्टपणे सांगताहेत.
ते स्पष्टपणे कुणावरही टीका करत नाहीत, पण या साऱ्यामागे महाराष्ट्रातील अनुदानित विशेष करून विनाअनुदानित कला महाविद्यालयाचे संचालक आणि काही शिक्षक आहेत याची मात्र त्यांना कल्पना आहे. म्हणूनच ते स्पष्टपणे सांगतात की, ‘आमची कुठेही दुकानं नाहीत किंवा आमच्या कुठेही शाखा देखील नाहीत. साहजिकच त्यामुळे आम्हाला यातून काहीही मिळवायचं नाही, केवळ निस्वार्थी भावनेनं आम्ही एकत्र आलो आहोत. आमचं हे एकत्र येणं काही जणांना जर मानवलं नसेल तर त्याला आमचा काही इलाज नाही. भले आज आम्ही २०० असू, पण आवाहन केलं तर एका रात्रीत २००० माजी विद्यार्थी देखील जेजेत जमवू. इतकंच नाही तर वेळ आलीच तर १९७० सालापासूनच्या जेजेच्या साऱ्याच्या साऱ्या माजी विद्यार्थ्यांना या आंदोलनात उतरवायला आम्ही कमी करणार नाही ! वेळ पडली तर उपोषणाला देखील बसायचं आम्ही निश्चित केलं आहे, पण ती वेळ आमच्यावर येईल असं आम्हाला वाटत नाही. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आमच्याच जेजेचा एक विद्यार्थी बसला आहे. ज्यानं आंदोलन सुरु झालं त्याच्या २४ तासाच्या आत आमच्या प्रतिनिधींना मंत्रालयात बोलावून घेतलं होतं आणि सविस्तर चर्चा देखील केली होती.’
अन्य पर्यायानं त्या साऱ्यांचा विरोध नाही. ते म्हणतात, ‘राज्यस्तरीय विद्यापीठ किंवा कला विद्यापीठ करण्याला आमचा कुठलाही विरोध नाही. तसं पाहिलं तर १९६५ साली स्थापन झालेलं कला संचालनालय म्हणजे तरी दुसरं काय होतं ? महाराष्ट्राची कलाशिक्षण व्यवस्था पाहण्यासाठीच स्थापन केलेला तो विभाग होता ना ? त्याला ‘विद्यापीठ’ असं फक्त नाव नव्हतं, बाकी त्याचं कार्य तर विद्यापीठाचंच होतं ना ? मग त्याची अशी वासलात का लावली गेली ? का नाही महाराष्ट्राला बाबुराव सडवेलकरांच्या नंतर एखादा लायक कलासंचालक मिळू शकला ? का वारंवार प्रभारींची तिथं भरती केली गेली ? कला संचालनालयानं दिलेल्या प्रमाणपत्राला का नाही शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय पातळीवरील एकाही संस्थेनं मान्यता दिली ? कला संचालनालयानं दिलेल्या जीडी आर्ट सर्टिफिकेटची किंमत मार्केटमध्ये आज शून्य आहे, असे का ? का कला संचालनालयातली भ्रष्टाचारा
तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या कलाशिक्षण क्षेत्रातले संस्था संचालक आणि काही शिक्षक मंडळी मात्र सारं वातावरण बिघडवू पाहत आहेत. खोटा प्रचार करणं हे तर यात सर्रास घडतं आहे. ‘चिन्ह’नं ठरवलं आहे की डी-नोव्हो लागू होईपर्यंत या साऱ्याचा मागोवा ‘आर्ट न्यूज’मध्ये सातत्यानं घ्यायचा. त्याच मालिकेतला हा पहिला लेख ! तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. तुमच्या प्रतिक्रिया देखील नोंदवा. लक्षात घ्या की अल्पावधीतच ‘चिन्ह आर्ट न्यूज’नं कलाशिक्षण क्षेत्रातील संबंधितांना बातम्या आणि लेखांनी अक्षरशः खडबडून जागं केलं आहे. या क्षेत्रातले सारेच आता ‘चिन्ह’ आपल्या मोबाईलवर नियमितपणानं वाचू लागले आहेत, प्रतिक्रिया देऊ लागले आहेत, प्रतिक्रिया कळवू देखील लागले आहेत आणि ‘चिन्ह आर्ट न्यूज’ देखील डी-नोव्होचाच पुरस्कार करीत असल्यानं या ‘आर्ट न्यूज’मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या प्रत्येक शब्दाची समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंकडून दखल घेऊ लागले आहेत. ‘चिन्ह’वर काही लोक टीका देखील करताहेत, ‘काय सारखं डी-नोव्हो डी-नोव्हो करताय?’ म्हणून, पण जे जे स्कूल ऑफ आर्ट ही भारतीय कलेची मातृसंस्था आहे हे मात्र टीका करणारे सोयीस्कररीत्या विसरताहेत. या त्यांच्या विसराळूपणाला आवर घालण्यासाठीच आम्ही सातत्यानं डी-नोव्हो प्रकरण लावून धरलं आहे हे कृपया लक्षात घ्या ! एरवी देखील कलाक्षेत्रात तसं काहीच फारसं बरं चाललेलं नाही, गॅलऱ्यांमध्ये फारशी प्रदर्शनं होत नाहीयेत, प्रदर्शन भरवणाऱ्यांमध्ये हौशी चित्रकारांचाच भरणा अधिक आहे. चित्रकला क्षेत्र पूर्वपदावर यायला हा पावसाळा जाणार हे निश्चित, तोपर्यंत हे डी-नोव्हो पूर्ण असंच सुरू राहणार हे देखील निश्चितच ! तेव्हा असेच वरचेवर भेटत राहू.
Related
Please login to join discussion