Features

समकालीन कला म्हणजे काय?

कलेचे स्वयंशिक्षण घेताना या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण समकालीन कलेचे शिक्षण देणाऱ्या ऑनलाईन कोर्सबद्दल माहिती घेणार आहोत. समकालीन कला नक्की काय असते, या अभ्यासक्रमामधून कलेमधील शक्यता काय असतात याचे भान विद्यार्थ्याला येते. ज्यांनी कलेचं अकॅडमिक शिक्षण घेतलं नाहीये त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहेच पण समकालीन कलेचं जागतिक भान येण्यासाठी सर्वच कलारसिक, चित्रकार यांच्यासाठी हा कोर्स महत्वाचा आहे हे या लेखातून कळते. महत्वाचं म्हणजे ज्यांना प्रमाणपत्र नको आहे ते हा जागतिक दर्जाचा कोर्स घरबसल्या अगदी मोफत पूर्ण करू शकतात.

MoMA च्या “Modern Art and Ideas” या पहिल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असताना, अशाच प्रकारे कलेचे मर्म समजावून घेत पुढील अभ्यासक्रम कुठले शिकता येतील, याची उत्कंठा होती. त्यामुळे लगेचच “What Is Contemporary Art?” हा दुसरा कोर्स शिकायला सुरुवात केली. आधुनिक कलेच्या पुढील पायरी असलेली “समकालीन कला” म्हणजे काय, याची ढोबळ कल्पना मला होती. त्या प्रकारचे अनेक कलाविष्कार मी स्वत: पाहिलेही होते, मला ते अतिशय आवडले होते. जी कला पाहून “ही कला आहे का?” असा प्रश्न पडतो, आणि “कला म्हणजे काय?” यासंबंधी आपल्या मनातील कल्पनांच्या पलीकडे असलेली कला ही समकालीन कला असते, असे वाचनात आले होते. शिकायला सुरुवात केल्यावर लगेचच लक्षात येऊ लागले की ते किती खरे आहे. कला म्हणजे काय, त्यात कशाचा समावेश होऊ शकतो, ती निर्माण करण्याची साधने कोणती आणि त्यातून जे निर्माण होते त्याने काय काय घडू शकते, या संकल्पना पारंपरिक कलेच्या तुलनेत आधुनिक कलेच्या बाबतीत कितीतरी विस्तारित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक कलेच्या तुलनेत समकालीन कला ही एक अजूनच मोठी विस्तारित कक्षा आहे. इतकी मोठी, की तिथे कला म्हणजे काय याबद्दल आपल्या मनात काही साचेबद्ध कल्पना असतील तर त्या ढासळून पडू लागतात. तसेच, चित्रकला, शिल्पकला किंवा अश्या कला प्रकारांमध्ये कलेची विभागणी करणे हेही किती वरवरचे आहे हे लक्षात येते.

कला निर्मिती करताना कुठली साधने वापरता येतात, त्याच्याही मर्यादा गळून पडतात. परंतु याचा अर्थ असा नाही, की समकालीन कला ही पारंपरिक कला किंवा आधुनिक कलेला नाकारते किंवा त्यांना तुच्छ मानते. उलट कलेचा आविष्कार अनेक नव्या प्रकारे आणि अनेक पटींनी परिणामकारक करण्याच्या नवीन शक्यता निर्माण करते, हे समकालीन कलेचे बलस्थान आहे. तसेच, कला ही कलाकाराचे एकट्याचे व्यक्त होणे न राहता जनसामान्यांच्या मनातील ज्या गोष्टी सार्वजनिकपणे व्यक्त होणे आवश्यक आहे, त्या व्यक्त करण्याचे प्रभावी साधन बनू शकते. त्या अर्थाने ती कला न राहता सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचे, आवाज उठवण्याचे, प्रसंगी जनआंदोलन करण्याचे बलवान साधन बनू शकते. समकालीन कलेतील या सर्व शक्यतांचे हे अतिशय महत्त्वाचे भान या अभ्यासक्रमातून मिळाले. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत कलाकृती निर्माण करणारा तो कलाकार आणि ती अनुभवणारा तो कलारसिक अशी जी विभागणी चालत आलेली आहे ती न राहता कलारसिकांना कलेच्या आविष्कारात सहभागी होण्याची शक्यता समकालीन कलेमध्ये निर्माण होते, हेही फारच महत्त्वाचे वैशिष्ट्य लक्षात आले. हे सगळे शिकताना अजून एक अनपेक्षित गोष्ट नकळत घडत होती. ती म्हणजे, पहिला आधुनिक कलेचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यात शिकलेल्या संकल्पना पुढील समकालीन कलेचा अभ्यासक्रम शिकत असताना पुन्हा वेगळ्या स्वरूपात समोर आल्या. त्यातील काही संकल्पना जेव्हा पारंपरिक कलेच्या संदर्भात लागू करून पाहिल्या तेव्हा पारंपरिक कलेतदेखील काही गोष्टी समकालीन कलेसारख्या आहेत असे लक्षात येऊ लागले आणि या तीनही कला कालावधीचे एकत्रित सिंहावलोकन करणे शक्य झाले.

हा अभ्यासक्रम शिकत असताना काही समकालीन कलाविष्कार मी या आधी अनुभवलेल्या कलाविष्कारांची आठवण करून देणारे होते. त्यापैकी एक मला विशेष भावलेला म्हणजे अमेरिकन कलाकार Sheila Hicks यांनी सादर केलेला Pillar of Inquiry / Supple Column. कापडाच्या धाग्यांपासून बनवलेला, कलाकाराच्या मनात उमटलेल्या अनेक प्रश्नांचे मूर्त रूप असलेला, १७ फूट उंचीचा, खोलीचे छत फाडून आभाळापर्यंत जाणारा हा विचारांचा प्रवाह पाहाणाऱ्याला अंतर्मुख करतो.

Sheila Hicks. “Pillar of Inquiry / Supple Column”, 2013-14

यातून कलेविषयी गुणात्मक शिक्षण काय मिळाले?
कलाविषयक ऑनलाईन शिकण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे शिकताना खूप आनंद मिळाला. या अभ्यासक्रमात Quiz आणि Assignments मध्ये प्रत्येकी कमीतकमी ८०% गुण मिळाले तरच उत्तीर्ण घोषित करतात. त्यामुळे कलाशिक्षणाची पार्श्वभूमी माझ्याकडे नसल्यामुळे मला हे जमेल की नाही, अशी शंका वाटत होती. त्यामुळे असेल किंवा एकंदरीत दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करत अगदी आज्ञाधारकपणे अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे असेल, दोन्ही कोर्समध्ये माझी ग्रेड १००% आली. अर्थातच मी स्वत: शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे, परीक्षेत मिळालेले गुण हे शिकताना मिळालेल्या ज्ञानाचे गुणात्मक प्रतिनिधित्व करतीलच असे नाही, किंबहुना अनेकदा तसे नसते, याची मला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे मिळालेल्या गुणांचे कौतुक बाजूला ठेवून मी यामधून मला गुणात्मक असे काय शिकायला मिळाले, याचाही आढावा घेतला. त्यामध्ये काही गोष्टी लक्षात आल्या, त्या अशा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकूणच  कलेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन विस्तारला. आधुनिक  कला व समकालीन कलाप्रकार कसे अनुभवावे याचे भान जागृत झाले. एखादा कलाविष्कार त्या कलाकाराचे वैयक्तिक मनोगत असले तरीही ते अनुभवताना प्रेक्षकही ते आपल्या वैयक्तिक परिप्रेक्ष्यातून  अनुभवत असतात. असे असले तरीही ती संपूर्ण प्रक्रिया एकमेकांशी जोडलेली असते आणि त्यासाठी काही संकल्पनांचा अभ्यास केल्यास प्रेक्षकाला कलाकृतीशी स्वत:ला जोडून घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो, कलारसिकाने कलाकाराच्या भूमिकेत जाऊन कलेकडे पाहिले, तर त्याला अजून खूप काही दिसू शकते हेही लक्षात आले.

मी गेल्या ९-१० वर्षांमध्ये एक स्वयंशिक्षित चित्रकार होण्याचा प्रयत्न करत असताना कलेविषयी आतापर्यंत जे काही समजावून घेऊ शकलो, त्याचा पुन्हा आढावा घेण्यासाठी एक Framework मिळाले. काही संकल्पना लक्षात आल्या, त्यांचा उपयोग करून आणि दिलेले संदर्भ वाचून पुढचा अधिक अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण झाली. आता पुढे अजून काय शिकता येईल? असा प्रश्न पडला आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले.
Modern Art and Ideas हा अभ्यासक्रम “Modern and Contemporary Art and Design Specialization” चा भाग असून त्यात या व्यतिरिक्त “What is Contemporary Art?”, “Fashion As Design” आणि “Seeing Through Photographs” हे प्रत्येकी ५ ते ७ आठवडे कालावधीचे एकाहून एक सुरेख असे अन्य तीन अभ्यासक्रम आहेत असे एकूण चार अभ्यासक्रम आहेत आणि ते सर्व पूर्ण करायला एकूण २५ आठवडे (६ महीने) लागतात. ते पूर्ण केले तर शुल्क (सहा महिन्यांत चार कोर्सेस करण्याचे सुमारे ९००० रुपये) भरून “Modern and Contemporary Art and Design Specialization Certificate” मिळवता येते. परंतु कोणाला चारपैकी केवळ कुठल्याही एक किंवा दोन अभ्यासक्रमांचा केवळ अभ्यास करायचा असेल, पण सर्टिफिकेट नको असेल तर काहीच शुल्क भरावे लागत नाही. तसेच, यापैकी कुठलाही एक किंवा दोन पूर्ण केले तरीही चालते, संपूर्ण Specialization पूर्ण करण्याची सक्ती नाही. परंतु पहिला अभ्यासक्रम करत असताना मला जो शिकण्याचा सुंदर अनुभव मिळाला त्यामुळे मी एकामागोमाग एक असे सर्व चार अभ्यासक्रम पूर्ण करत गेलो आणि specialization मिळवले. कसलीच सक्ती नसताना अजून शिकत राहावेसे वाटेल असा आराखडा हे या अभ्यासक्रमाच्या यशाचे रहस्य आहे. चारपैकी पहिल्या दोन अभ्यासक्रमांमधून मला काय मिळाले याचा हा आढावा होता. तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजे “Fashion As Design” आणि “Seeing Through Photographs” बद्दल यापुढील लेखात लिहिणार आहे.

MoMA ने तयार केलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची अधिक माहिती मिळवण्यासाठी ही लिंक पहा: https://www.moma.org/research-and-learning/classes#courses

*****

– विनील भुर्के

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.