No products in the cart.
ती बातमी कोणी फोडली ?
आमदार गिरीश बापट यांनी ‘अभिनव’च्या प्राचार्य पदावर असताना नांगरे यांनी जो जो म्हणून काही भ्रष्टाचार केला होता तो तो सारा अक्षरशः खणून काढला होता. पुरावे म्हणून त्यांनी जे कागदपत्र फाईलला लावले होते त्यांची संख्याच मुळी तीनशेच्या घरात पोहोचत होती. भ्रष्टाचाराचा अक्षरशः प्रत्येक पुरावा त्यांनी या फाईलमध्ये जमा केला होता. विकास निधीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून कसे पैसे जमा केले गेले, ते संस्थेच्याच खात्याखेरीज अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक खात्यावर कसे जमा केले गेले याच्या पावत्यानं पावत्या त्या फाईलमध्ये पद्धतशीरपणे लावल्या गेल्या होत्या. या भ्रष्टाचारामध्ये ‘अभिनव’ मधली जी क्लार्क मंडळी किंवा संस्थेचे शिपाई सहभागी झाले होते. कसे शारदा सहकारी बँकेच्या खात्यात पैसे भरले गेले होते. याचे बँकेच्या पावत्यांसकट पुरावे त्यात जोडले होते. त्या विशिष्ट कालावधीत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कला महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्यांच्या नावानिशीवार यादींसकट त्यांनी पुरावे जोडले होते.
या प्रकाराला जवळ जवळ तीस – पस्तीस वर्षे झाली असावीत. पण आमदार गिरीश बापट यांनी ती तयार केलेल्या त्या फाईलची एक प्रत आजही माझ्या संग्रही आहे. हा भ्रष्टाचार शोधून काढण्यासाठी किती मोठी यंत्रणा त्यांनी उभी केली असेल याची त्यावरुन कल्पना येते. या कालावधीत संस्थेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून संस्थेनं किंवा खरं तर नांगरे यानं किती किती पैसे घेतले आणि कुठल्या कुठल्या खात्यात ते जमा केले ? बँकेच्या स्लिपवर कुणा कुणा क्लार्कनं नोंदी केल्या, संस्थेच्या खात्यावर पैसे जमा करता करता स्वतःच्या खात्यावर देखील कुणा शिपायानं कसे पैसे जमा केले ते सारं पुराव्या सकट त्यात त्यांनी दिलं होतं. या लेखनाच्या निमित्तानं इतक्या वर्षानंतर ती फाईल हाताळली आणि त्यातली विद्यार्थ्यांची नावं वाचून मी अक्षरशः अवाक झालो.
प्रचंड अभ्यास गिरीश बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. आणि मग हे सारं प्रकरण विधानसभेत गाजू लागलं. गिरीश बापट यांनी नांगरेंचे अक्षरशः वाभाडे काढले. त्यांना साथ दिली ती आमदार किरीट सोमय्या यांनी. त्यांच्याकडे मी सारी माहिती पोहोचवलीच होती. नांगरे यांनी कला संचालक झाल्यावर त्यांनी जे जे काही गैरप्रकार केले होते ते सारे मी किरीटकडे दिले होते. दोघांनी नांगरेंच्या अक्षरशः चिंध्या केल्या. तेव्हा काही आता सारख्या चोवीस तास किंचाळणाऱ्या वाहिन्या नव्हत्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात काही बातम्या आल्या तरच विधानसभेत काय झालंय ते कळायचं. त्यामुळे त्याचा काही फारसा बभ्रा झाला नाही. या उभयतांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं.
परिणामी एके दिवशी सायंकाळी किरीटचा ऑफिसमध्ये मला फोन आला. म्हणाला ‘नांगरेंना अटक होतीये, कुठल्याही क्षणी आदेश निघेल. दस्तुरखुद्द मुंडे साहेबांनीच आदेश काढला आहे.’ ( गोपिनाथ मुंडे त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री देखील ) त्यांनी आदेश काढलाय म्हटल्यावर मी अगदी निर्धास्त झालो. किरीट म्हणाला न्यूज डेस्कला सांगून ठेव की अशी अशी बातमी येईल ती उद्या द्या. मी ऑफिसमधून निघण्याच्याच तयारीत होतो. चीफ रिपोर्टर अद्याप आले नव्हते. पण काही वार्ताहर मात्र तिथे बसले होते. त्यांना मी रात्री अशी अशी बातमी येईल ती अवश्य द्या अशी मी विनंती केली. चीफ रिपोर्टरना निरोप सांगावयाची विनंती केली. आणि मी ऑफिसमधून निघालो.
रात्री घरी पोहोचल्यावर मी ऑफिसमध्ये फोन केला की अशी काही बातमी आली आहे का हे विचारायला. पण मला नकार मिळाला. कदाचित माहिती मिळाली नसेल अशी मनाची समजूत घातली आणि मी झोपी गेलो. सकाळी उठल्यावर उत्सुकतेने पेपर वाचला तर बातमी आली नव्हती. अन्य पेपर बघितले तर त्यातही ती बातमी नव्हती. किरीटला फोन केला तर तो म्हणाला चौकशी करुन सांगतो. पण त्याचा फोन काही आलाच नाही. म्हटलं ऑफिसला जाताना त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि विचारु. कारण किरीट माझ्या समोरच्याच इमारतीत राहत होता. त्याच इमारतीत त्याचं खाली ऑफिसही होतं. ( म्हणजे आजही आहे. मीच मुलुंड सोडून ठाण्यात शिफ्ट झालो आहे. ) पण तोपर्यंत किरीट निघून गेला होता.
नंतर कळलेला धक्कादायक प्रकार असा होता. अर्थात हे सारं मी आठवून आठवून सांगतो आहे कारण तीसपेक्षा अधिक वर्षे उलटून गेली आहेत. वयोमान परत्वे स्मृती विरळ होत जातात. त्यातली अनेक माणसं आज हयातही नाहीयेत. त्यामुळे आणखीन नवीन वाद निर्माण करण्यात मला कुठलाही रस उरलेला नाही.
झाला प्रकार असा होता मी कार्यालयातून बाहेर पडल्यावर बहुदा त्या बातमीची न्यूज डेस्कवर चर्चा झाली असावी. त्यातल्या एखाद्या उत्साही वार्ताहराने ‘कुणाला सांगू नको हं !’ असं म्हणत ती बातमी बहुदा एका कलावंताला सांगितली असावी. तो कलावंत बहुदा नांगरे यांचा विद्यार्थी असावा. साहजिकच त्याला नांगरे यांचा पुळका आला असावा. आपल्या गुरूला चांगली गुरुदक्षिणा द्यावी या हेतून तो बहुदा तिथून उठला आणि भाजपच्या एका खासदाराच्या कार्यालयात जाऊन उभा राहिला असावा. हा कलावंत त्यांच्या बैठकीतलाच. जवळ जवळ घरचाच. साहजिकच या खासदार महाशयांनी पुढली सारी सूत्रं हलवली आणि नांगरेंच्या अटकेतली हवाच काढून टाकली.
हा साराच प्रकार भयंकर होता. वृत्तपत्रातल्या ज्या वार्ताहरानं ती बातमी फोडली त्याला त्यावेळी कळलं ही नसेल की आपण नेमकं कलाक्षेत्राचं काय नुकसान केलंय. त्याला वाटलं असेल की त्यानं माझ्यावर सूड उगवला. पण सूड उगवण्यासारखं देखील मी काहीच केलं नव्हतं. ऐक्यांशी सालापासून मी जे जे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय आणि कला शिक्षण संबंधीच्या बातम्या एखादं व्रत घ्यावं अशा पद्धतीनं देत होतो. ( आजही या वयातही देतो आहे ) बहुदा ते त्याला आवडलं नसावं. किंवा असंही असेल की वृत्तपत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच वाटत असतं की ‘आपण देतो तीच खरी बातमी आणि अन्य कुणी देतात त्या साऱ्या पेड न्यूज किंवा फ्रॉड न्यूज.’ त्यामुळे देखील त्यानं ते कृत्य केलं असावं. परिणामी नांगरेंना अटक झालीच नाही. साहजिकच त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. परिणामी नंतरच्या वर्षात दीड पावणे दोनशे विनाअनुदानित कला महाविद्यालयं महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात सुलभ शौचालयांसारखी उभी राहिली आणि महाराष्ट्राच्या कोणे एके काळी पहिल्या क्रमांकावर असलेल्या कला शिक्षणाची कबरच खणली गेली.
हे प्रकरण संपलं का ? नाही इथून तर ते सुरु झालं. त्याविषयी पुढल्या लेखात लिहीन.
*****
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion