Features

कला संचालनालयावर ‘नांगर’ ?

सुहास बहुळकर यांनी व्हाट्सअप वर पाठवलेल्या मेसेजमध्ये जो पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचा उल्लेख केला होता त्यानं माझ्या तळपायाची आग अक्षरशः मस्तकात गेली ! असा जो उल्लेख मी पहिल्या लेखात केला होता त्याला असंख्य कारणं होती. खरं तर त्याविषयी मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये मी मोठ्या प्रमाणावर लिखाण केलं आहे. इतकंच नाही तर ‘चिन्ह’चा २००८ सालचा संपूर्ण तीनशे पानांचा अंक मी चित्रकलेतल्या ‘कालाबाजार’ या विषयावर काढला होता. त्या अंकात ज्यांनी ज्यांनी कला संचालनालयाची पर्यायानं महाराष्ट्राच्या कला शिक्षण व्यवस्थेची वाताहत केली होती त्यांचा नावानिशीवार (प्रसंगी त्यांच्या फोटोसकट देखील) समाचार घेतला होता.

ज्यांना तो पुन्हा वाचावयाची इच्छा असेल किंवा नव्या पिढीतल्या ज्यांना तो अंक वाचता आला नसेल तर तो अंक पीडीएफच्या स्वरुपात आता आम्ही ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिला आहे. त्याची लिंकही या लेखात अखेरीला दिली आहे. त्यामुळे त्या विषयावर आता पुन्हा काही मी लिहिणार नाही. पण त्याचा जर वारंवार उल्लेख आला तर तो देखील मी टाळू शकणार नाहीये.

कोणे एके काळी जे जे स्कूल ऑफ आर्ट नंतर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचंच नाव मोठ्या गौरवानं घेतलं जात असे. सत्तर – ऐंशीच्या दशकात संस्थेचे प्राचार्य आणि सर्वेसर्वा चित्रकार दिवाकर डेंगळे यांनी ही संस्था नावारूपाला आणून ठेवली होती. स्वभावानं अतिशय कडक असलेल्या डेंगळे यांनी या संस्थेसाठी काहीही करायचं शिल्लक ठेवलं नव्हतं. त्यांनी संस्थेचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं तर होतंच पण मोठी दूरदृष्टी दाखवून पाषाण येथे संस्थेची शाखा सुरु केली होती. टिळक रोडवरच्या त्यांच्या वास्तुपासून पंधरा किलोमीटर अंतरावर संस्थेच्या विस्तारासाठी थोडी थोडकी नाही तर तब्बल पंधरा एकर जागा घेऊन ठेवली होती. ( या जागेसंदर्भात न्यायालयीन लढाई चालू असल्यानं त्याविषयी मी आता काही लिहू इच्छित नाही. ) पण धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत नोंदल्या गेलेल्या संस्थांचं अंतिमतः जे काही ती चालवणाऱ्या कार्यकर्त्यांकडून होतं तेच तिथंही झालं. ज्यांनी ही संस्था नावारूपाला आणली त्या दिवाकर डेंगळे यांना अपमानित होऊन या संस्थेतून बाहेर पडावं लागलं. या साऱ्या घटनाक्रमात संस्थेतल्या कला शिक्षकांचा फार मोठा वाटा होता. खरं तर डेंगळे यांनीच या साऱ्यांना पुढं आणलं होतं. पण तेच त्यांच्यावर उलटले आणि अभिनवच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.

गुंड पुंड प्रवृत्तीच्या शिक्षकांच्या हातात ही संस्था गेली. आणि तिथं उघडपणे भ्रष्टाचार सुरु झाला. खरं तर पुणे आणि आसपासच्या परिसरातील ही सर्वात मोठी संस्था. तिचा नावलौकिक देखील मोठा. डेंगळे यांनी स्वकर्तृत्वानं तो उभा केला होता. त्यामुळे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला नाही की विद्यार्थी इथं येत. डेंगळे गेल्यावर ज्या गुंड प्रवृत्तीच्या शिक्षकांच्या हातात ही संस्था आली त्यांनी लागलीच शिक्षणाचा बाजार मांडावयास सुरुवात केली. संस्थेच्या आजवर कमावलेल्या नावलौकिकावर, प्रतिष्ठेवर त्यांनी ‘नांगर’ चालवायला देखील कमी केलं नाही. पुणे जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना देखील अक्षरशः लुबाडलं. कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे तर एवढे पैसे टाक. इतकं सांगण्यापर्यंत मजल गाठली गेली. ज्या विद्यार्थ्यांकडे पैसे नसत त्या मुलांच्या विधवा आयांकडून दागिने काढून घ्यायला देखील त्यांनी कमी केलं नाही.

या साऱ्याचा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. नुकतेच दिवंगत झालेले पुण्यातले भाजपचे नेते गिरीश बापट हे त्यावेळी आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी गेल्या. त्या तक्रारींची त्यांनी त्वरित दखल घेतली. आणि ‘नांगर’ चालवणाऱ्या त्या शिक्षकावर सारं लक्ष केंद्रित केलं.

दरम्यानच्या काळात बाबुराव सडवेलकर सेवानिवृत्त होऊन त्यांच्या जागी प्रा शांतीनाथ आरवाडे हंगामी कला संचालक म्हणून काम करू लागले होते. तेही सेवानिवृत्त होताच
भा बा चोपणे यांनी काही काळ कला संचालक पदाचा भार सांभाळला. आणि त्यांच्या नंतर लगेचच शासनानं ती जागा भरली आणि त्या जागी पुण्याच्या अभिनवच्याच प्राचार्यांची म्हणजे प्रा मुरलीधर नांगरे यांची नेमणूक झाली.

इकडे पुण्यात नांगरे यांच्या विषयीची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया चालूच होती. उघडपणे कुणीच बोलावयास तयार नसल्यामुळं माहिती गोळा करण्यास विलंब लागत होता. कला संचालक पदावर आरूढ होताच नांगरे यांनी आपले पुणेरी रंग इथंही दाखवावयास सुरुवात केली. आणि कला संचालनालयात देखील भ्रष्टचाराचा प्रवेश झाला. त्यांना साथ द्यायला पुण्याच्या अभिनव मधलेच काही शिक्षक व्हाया नागपूर मुंबईत येऊन दाखल झाले. या सर्वांनी मिळून आपआपले कारनामे दाखवावयास सुरुवात केल्या बरोबर इथले शिक्षक, विद्यार्थी आणि कला शिक्षणसंस्थांचे प्रमुख जागृत झाले आणि माझ्याकडे त्यांचे प्रश्न मांडू लागले. माझ्याकडेच का ? मी काही या शिक्षण क्षेत्राशी संबंधित नव्हतो. पण जेजेचा माजी विद्यार्थी असल्यानं आणि मोठ्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करत असल्यानं बहुदा त्यांना माझा आधार वाटला असणार.

मी तो सारा प्रकार पाहून चक्रावून गेलो. ज्या परिसरात आपण शिकलो त्या परिसरात हा असा एवढा भ्रष्टाचार सुरु झालाय हे पाहून मी अक्षरशः हैराण झालो. आणि त्या विरोधात बातम्या द्यावयास लागलो. त्या बातम्या येताच नांगरे साहेबांकडून हस्ते परहस्ते निरोप येऊ लागले. ‘जरा बसुया, ‘जरा भेटूया’. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या काळात मोबाइल फोन वगैरे नव्हते. त्यामुळे ऑफिसमध्ये फोन करून देखील ते आमंत्रण देऊ लागले. शेवटी एके दिवशी त्यांना मला अतिशय कठोर शब्दात सांगावं लागलं. की मी असा ‘कुणा’ बरोबरही ‘बसत’ नाही. तेव्हा कुठे येणारे फोन थांबले.

दरम्यानच्या काळात त्यांचे सारेच धंदे चालू होते. जिथून जिथून पैसा काढता येईल तिथून तिथून ते काढत होते. त्या काळात अनुदानित कला महाविद्यालयांची संख्या होती एकोणीस किंवा वीस. पण कला संचालनालयात नांगरेंचा प्रवेश झाला आणि ती संख्या भराभर वाढू लागली. अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शंभर सव्वाशे विनाअनुदानित कला महाविद्यालयं सुरु झाली. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमदार, मंत्री, खासदार, रॉकेलचा काळाबाजार करणारे, रस्त्यावर गुंडगिरी करणारे साऱ्यांनीच या संधीचा फायदा घेतला आणि गावागावात कला महाविद्यालयांचा धंदा उघडला. या बहुसंख्य तथाकथित कला महाविद्यालयांची दुकानं चक्क गोठ्यात, देवळात, चावडीत, खाटीकखान्यात, ओसरीत, पडवीत, वडाच्या झाडाखाली जिथं जिथं म्हणून जागा मिळेल तिथं टाकली गेली.

वास्तविक पाहता चित्रकला निरीक्षकानी त्या जागांची पाहणी करून शासनाला अहवाल द्यायचा असतो. पण त्यांनी देखील नागपूरकरांची ‘मेहमान नवाजी’ केलेली असल्यामुळं साहजिकच त्यांनी देखील या वाहते गंगेत हात धुतले नसते तर नवलच ठरलं असतं. त्यात तेही पडले पुण्याचे, त्यात अभिनवचे. साहजिकच महाराष्ट्र्रात दीडशे विनाअनुदानित महाविद्यालयांची साखळी निर्माण झाली. सगळ्या कला महाविद्यालयात आर्ट टीचर डिप्लोमाचे वर्ग उघडले गेले. इथं शिकलात तर लगेचच कुठल्याही शाळेत चित्रकला शिक्षकांची नोकरी मिळेल अशी आमिष दाखवून विद्यार्थ्यांना फसवले गेले.

खूपच मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या तेव्हा मी हा सारा प्रकार भाजपचे आमदार श्री किरीट सोमय्या यांच्या कानावर घातला. किरीट सोमय्या आणि मी मुलुंडला एकाच सोसायटीत राहत होतो. एकमेकांच्या घरी आमचं नेहमीच येणं जाणं होत. साहजिकच सोमय्यांनी या प्रकरणी जातीनं लक्ष घातलं. विधानसभेत प्रश्न देखील विचारला. आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागात पळापळ सुरु झाली.

एके दिवशी किरीटनं माझ्या हातात एक जाडजूड फाईल दिली आणि म्हणाला वाच. ती वजनदार फाईल पाहून मी चकित झालो. अभिनव कला महाविद्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराचा कागद नं कागद त्या फाईलमध्ये व्यवस्थित पद्धतीनं लावून ठेवलेला होता. फाईलवर नाव पाहिलं तर कुणाचं होतं, ठाऊक आहे ? नुकतेच दिवंगत झालेले भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं. बापट यांनीच जातीनं लक्ष घालून ती फाईल करून घेतली होती. सुमारे तीनशे ते साडेतीनशे कागदपत्र होती त्यात.

पुढं काय झालं ते वाचा पुढच्या भागात.

*******

– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.