No products in the cart.
कलावेध: स्पर्धा की पैसे कमावण्याचं साधन ?
जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी कलावेध चित्रकला स्पर्धा भरवण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना कलेची ओळख व्हावी, जेजे स्कूल ऑफ आर्ट काय आहे? तिथे नक्की काय शिकवले जाते, पुढील करिअरच्या शक्यता काय काय असू शकतात हा कलावेध चित्रकला स्पर्धेचा मूळ उद्देश. नील सालेकर या २०१२ ते २०१६ या काळात जेजेमध्ये शिकणाऱ्या आणि तत्कालीन जीएस असणाऱ्या विद्यार्थ्याच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली. मूळ उद्देश चांगला असल्याने या स्पर्धेला अनेकांचा आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या पातळीवर पाठिंबा मिळाला. हिमालय स्टोरच्या मालकांनी त्यावेळी स्पॉन्सरशिपही दिली होती. स्पर्धेची फी नाममात्र तीस रुपये ठेवण्यात यायची. यात विद्यार्थ्यांना छोटासा खाऊ, कागद अशा सुविधांची दिल्या जायच्या. जेजेची ओळख शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी हा सुंदर प्रयत्न होता.
पण कुठलीही चांगली गोष्ट प्रस्थापित होऊ लागली की त्यामध्ये वाईट प्रवृत्ती शिरू लागतात. त्याप्रमाणे या स्पर्धेचा उद्देशही पैसे कमावण्यासाठी होतोय की काय अशी शंका यावी असे काहीसे आयोजन यावर्षी करण्यात आले आहे. गेले काही वर्ष कोरोना आणि इतर कारणामुळे ही स्पर्धा आयोजित झाली नव्हती. काही वर्षाच्या गॅपनंतर ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली आणि तिची फी ठेवण्यात आलीये तब्बल २५० रुपये. आता या स्पर्धेत भाग घेणारी मुलं ही शाळेतली आहेत. त्यांना एवढी फी परवडणार आहे का? बरं एक वेळ सधन विद्यार्थी ही फी भरतीलही, पण स्पर्धा आयोजनासाठी प्रायोजक असताना एवढी फी ठेवण्याची आयोजकांनी गरज का भासावी ? ही स्पर्धा जेजे स्कूल ऑफ आर्ट या शासकीय संस्थेच्या नावाखाली आयोजित केली जाते. के आर्ट आणि कॉन्सुलेट जनरल ऑफ कोरिया या स्पर्धेचे प्रायोजक असताना स्पर्धेसाठी २५० फी घेणं संस्थेला शोभतं का? ही स्पर्धा जोपर्यंत विद्यार्थी आयोजित करत होते तोपर्यंत मनमानी कारभार करणं एक वेळ ठीक होतं. पण जेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्ट या बॅनरखाली स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा नियम पाळणे गरजेचे नव्हे तर अनिवार्यच आहे. कारण कुठलीही बारीकशी चूक संस्थेचं नाव खराब करू शकते.
या स्पर्धेत २००० विद्यार्थी भाग घेतात म्हणे २००० X २५० म्हणजे तब्बल पाच लाख रुपये या स्पर्धेतून गोळा होणार! हे पैसे जातात कुणाच्या खिशात? भ्रष्टाचाराची शंका यावी याचं दुसरं कारण म्हणजे या स्पर्धेचे पैसे परस्पर विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जात आहेत. व्हाट्सएपच्या माध्यमातून एक स्कॅनिंग बारकोड दिला आहे. तो कोणाचा आहे? या खात्यात परस्पर पैसे का भरले जात आहे याची चौकशी आणि विचार स्पर्धेचे आयोजक जे जे स्कूल ऑफ आर्टच्या प्रमुखांनी केला आहे का? शासकीय नियमाप्रमाणे कुठल्याही शासकीय संस्थेत जेव्हा रोखपाल असतो तेव्हा इतर कुणाही व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करून घेणे हे नियमबाह्य आहे. त्यामुळे या स्पर्धेची रीतसर फी ही रोखपालाकडे जमा करून घेणे आणि त्याची पावती देणे बंधनकारक असताना हा भोंगळ कारभार डीन कसे काय खपवून घेत आहेत? का त्यांची या प्रकाराला मूक संमती आहे? याची उत्तरे डीन आणि संस्थेकडून अपेक्षित आहे.
पाच लाख रक्कम जमा होणे ही काही छोटी गोष्ट नाही. जेजेसारख्या शासकीय संस्थेकडे शासकीय निधी येत असताना आणि डीन यांच्या कर्तृत्वामुळे खुद्द कोरियन कॉन्सुलेट जनरल यांचा स्पर्धेला पाठिंबा असताना, छोट्या विद्यार्थ्यांकडून अशी भरमसाठ फी घेणे नैतिक दृष्टीने चुकीचे आहेच. पण जर फी घेतलीच जात आहे तर त्याचा पूर्ण हिशोब देणे देखील बंधनकारक आहे. त्यामुळे संस्था तो नैतिक जबाबदारीतून देईल अशी अपेक्षा कलावर्तुळातून व्यक्त केली जात आहे .
*****
फिचर इमेजमधील फोटो प्रतीकात्मक आणि इंटरनेटवरून साभार.
Related
Please login to join discussion