Editorial

तरंगत्या आर्ट गॅलरीच्या वाटेनं ?

दैनिक लोकसत्ताच्या आजच्या ठाणे पुरवणीमध्ये ठाणे महापालिकेने उभारलेल्या कापूरबावडी भागातील ठाणे कला भवन या आर्ट गॅलरीची सध्याची परिस्थिती दाखवून देणारी एक विशेष बातमी प्रसिद्ध केली आहे. आकांक्षा मोहिते यांनी दिलेल्या या बातमीत छायाचित्रांसोबत गॅलरीची जी काही दुरावस्था झाली आहे त्याचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे, जे कुणाही कलाप्रेमीला अस्वस्थ करून टाकील.

२००९ साली हे ठाणे कला भवन मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलं, पण कलादालन बांधतानाच जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती न घेतली गेल्यामुळं या कला दालनाकडं कलावंतांनी जवळजवळ पाठच फिरवली. याचं पहिलं कारण असं, या कला दालनाची इमारत वर्तुळाकार पद्धतीनं बांधण्यात आली आहे. त्यामुळेच तीच-चार फुटाचे कॅनव्हास लावले म्हणजे कॅनव्हास आणि भिंतीच्या मधोमध उंदीर मोकळेपणाने फिरू शकतील एवढी मोकळी जागा राहते. खरं तर कुठल्याही कला दालनात कॅनव्हास किंवा चित्रांच्या फ्रेम्स या भिंतीला समांतर असाव्या लागतात, पण हीच प्रमुख काळजी इथं न घेतली गेल्यामुळं कलावंतांचा प्रथम दर्शनीच अपेक्षाभंग झाला. त्यातच चित्र टांगण्यासाठी अत्यंत अव्यावसायिक पद्धतीची रचना, तीच बाब प्रकाश योजनेबाबत देखील. यामुळे ज्यांनी सुरुवातीला तिथं चित्रं प्रदर्शित केलीत ते पुन्हा कधीच गॅलरीकडे फिरकले नाहीत.

वास्तविक पाहता ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर नामवंत आणि तरुण चित्रकार राहतात. त्यांच्या सल्ल्यानं इमारतीची रचना ठरवता आली असती ती घ्यायची नसती तर निदान जहांगीर आर्ट गॅलरी किंवा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टसारख्या कला दालनांची कामं करण्याचा ज्यांना अनुभव आहे अशा आर्किटेक्ट लोकांच्या सल्ल्यानं हे करणं अत्यावश्यक होतं, पण ते इमारत बांधणाऱ्यांनी लक्षात घेतलं नाही हे अगदी स्पष्टपणानं दिसतं. किंवा नंतरच्या व्यवस्थापनासाठी देखील चित्रकारांची मदत घेता आली असती. पण या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्या गेल्यामुळं एका चांगल्या संकल्पनेची वाताहत झालेली पाहण्याचे ठाणेकर कलावंतांच्या नशिबी आले. खरं तर ठाणे महापालिकेने चांगल्या योजना सुरु केल्या होत्या. उदाहरणार्थ भारतातली पहिली तरंगती आर्ट गॅलरी ठाणे महापालिकेनं सुरु केली होती, पण तिथं देखील कला दालनाच्या व्यवस्थेकडेच दुर्लक्ष केल्यामुळं ते कला दालन बंद करून टाकण्याची वेळ आली. याचा फायदा अन्य व्यावसायिकांनी घेतला नसता तर नवलच ठरले असते, त्यामुळेच नंतर त्या कला दालनाचे रूपांतर हॉटेलमध्ये झाले आणि कालांतरानं ते हॉटेल आगीच्या भक्षस्थानी देखील पडले. ते सर्वच प्रकरण एक गूढ आहे हे मात्र निश्चित.

पूर्वानुभवानुसार सांगायचे तर ठाणे कला भवनच्या या वास्तुबाबत देखील तसेच घडले तर आश्चर्य वाटू नये. त्याच दिशेनं या कला दालनाची पावलं पडताहेत असे वाटू लागले आहे. या कला दालनाबाबतचा एक अनुभव अतिशय वाईट आहे. प्रख्यात चित्रकार गायतोंडे यांच्यावरच्या सुनील काळदाते यांनी तयार केलेल्या फिल्मचे ( सुनील काळदाते आता जरी फ्रान्समध्ये असले तरी ते मूळचे ठाण्याचेच ) तीन शो या कला दालनात ‘चिन्ह’तर्फे आयोजित करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशीचा शेवटचा शो कला दालनाच्या व्यवस्थापनानं रद्द करायला लावला होता कारण काय तर त्या दिवशी ठाण्यातल्या डॉक्टरांची म्हणे पार्टी होती. आता असं जर कला दालनात चालणार असेल तर त्या कला दालनाला कुठलंही भवितव्य नाही हे उघड आहे.

खरं तर ठाणे कला दालनाची जागा ही अत्यंत मोक्याची आहे. आजूबाजूचे मॉल्स, थिएटर्स, कार्यालये हे सारं काही त्या परिसरात जमून आलंय. काही वर्षांपूर्वी त्या परिसरातून सायंकाळी जाता येताना भीती वाटायची, पण आता मात्र सारंच स्वरूप बदललंय. ठाणे महापालिकेनं चित्रकला क्षेत्रातील मान्यवरांचे सल्ले घेतले किंवा एखाद्या चांगल्या चित्रकाराची समिती स्थापन करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर अजूनही त्या कला दालनाचं रूपांतर यशस्वी कला दालनात होऊ शकेल. पण त्यासाठी तिथं कलेची जाणकारी असलेला एक पूर्णवेळ व्यवस्थापक नेमायला हवा तरच हे शक्य आहे. आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून हे कला दालन लोकाभिमुख करायला हवं आहे. अन्यथा तरंगत्या कला दालनाचं जे काही झालं तेच इथं घडलं तर मुळीच आश्चर्य वाटायला नको.

संपादक

Related Posts

1 of 3

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.