Editorial

नव्यानं  सुरुवात … 

शिक्षक दिनानिमित्ताने काल आम्ही जो लेख प्रसिद्ध केला त्याला वाचकांचा प्रचंडच प्रतिसाद लाभला . सतत फोन येत होते , सतत व्हाट्सअप वर मेसेजेस येत होते. समाज माध्यमांवर देखील सतत कुणी ना कुणी व्यक्त होत होतं. यावरून हा विषय किती ज्वलंत होता किंवा आहे याची सहज कल्पना यावी. कला संचालनालयाची उरली सुरली अब्रू देखील या लेखानं धुळीला मिळवली आहे. या साऱ्यांचं श्रेय अर्थातच जिनं  हे सारं शोधून काढलं त्या विद्यार्थिनीला आणि तिच्या शिक्षकांना द्यायला हवं ! अर्थातच गोपनीयतेच्या कारणास्तव ती नावं आम्हाला जाहीर करता येत नाहीत. 
आम्ही फक्त निमित्त आहोत. आमच्या समोर आलेलं आम्ही फक्त धाडसानं मांडलं आहे एव्हडंच यातलं श्रेय फार फार तर आम्हाला घेता येईल. गेल्या महिनाभरातले चिन्ह आर्ट न्यूज मधले बदल नियमित वाचकांना सहज जाणवले असतील. गुढी पाडव्याला आम्ही मोठ्या उत्साहानं सुरुवात केली खरी, पण काहींना काही अडचणी आल्या आणि नियमितता पाळणं आम्हाला दुरापास्त होऊन बसलं. पण आता महिना होत आलाय बातम्या आणि लेख प्रकाशित करताना आम्ही नियमितपणा ही बाब प्रकर्षानं पाळतो आहोत हे नियमित वाचकांच्या एव्हाना ध्यानी आले असेलच .केवळ त्यामुळेच की काय आम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागल्याचं दिसून आलं आहे .
एकच उदाहरण द्यावंसं वाटतं. ‘चिन्ह’च्या वाचकांना ‘ गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमांचे तसेच आमच्या युट्यूब चॅनलवरचे नवे नवे व्हिडीओ यांच्या विषयी कळावे या हेतूनं आम्ही व्हाट्सअप वर सुमारे २० ग्रुप्स तयार केले आणि त्या द्वारे आमच्या कार्यक्रमांविषयी ‘चिन्ह’च्या चाहत्यांना कळवू लागलो. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. पण अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे मेसेजेस पोहोचत नसत वगैरे अडचणींना सामोरे जावे लागत होते, त्यातच ‘गप्पा’ १०० कार्यक्रमानंतर बंद करायचा निर्णय घेतलेला. अशा वेळी एकतर्फी व्हाटसअप ग्रुप तयार करण्याची कल्पना पुढं आली. ती प्रत्यक्षात आणून सोशल मीडियावर घोषणा करताच ५०० सदस्यांचा पाहिलं ग्रुप अवघ्या नऊ दहा दिवसातच  ‘हाऊसफुल्ल’  देखील झाला .
आता दुसऱ्या ग्रुप बाबत देखील तीच पुनरावृत्ती झाली तर आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आहे . खरं तर कुणी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करतो म्हटलं की आपल्या  पोटात गोळा येतो . पण तरीही कुणी आग्रह करुन ऍड केलंच तर त्या ग्रुपमधून ‘लेफ्ट’ होण्यासाठी  बहुसंख्यांची अक्षरश: स्पर्धाच चालते अशा पार्श्वभूमीवर आम्हाला आलेला हा प्रचंड प्रतिसाद अक्षरश: अभूतपूर्व ठरला, इतकंच नाही तर आमचा हुरूप वाढवणाराच ठरला .म्हणूनच प्रतिसादाचा हा वेग पाहता आम्ही आणखी तीन ग्रुप्स कार्यान्वित केले आहेत . त्या ग्रुप्सच्या लिंक्स आम्ही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करतो आहोत. आपल्याला जर ‘ चिन्ह’वर प्रकाशित होणाऱ्या लेख आणि बातम्या तसेच यु टयूब चॅनलवरच्या कार्यक्रमांचे अपडेट्स हवे असतील  तर आपण अवश्य या ग्रुपमध्ये सहभागी व्हा हे कळकळीचे आवाहन . याला कोणतेही शुल्क नाही किंवा भविष्यात देखील तसा काही आग्रह असेल असेही काही नाही. ग्रुप्सचे नियम मात्र कटाक्षानं पाळले जावे इतकीच अपेक्षा !
‘चिन्ह’ची सूत्रं आता नव्या पिढीकडं जावी या दृष्टीनं आम्ही आता अधिक प्रयत्नशील आहोत .गेल्या महिनाभरात ‘ कनक वाईकर ‘ हे नाव तुम्हाला अंकात  वारंवार दिसले असेल . अतिशय कमी वेळात तिनं ‘चिन्ह’च्या वाचकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे यात शंकाच नाही.  तिच्याच कडे ‘चिन्ह’ची सूत्र सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. तो किती योग्य होता ते तिच्या ताज्या लेखांमुळे सहज स्पष्ट व्हावे. कालच्या तिच्या स्टोरीनं जेजे स्कूलचा परिसर तिनं अक्षरश: गदगदा हलवून टाकला आहे. ती आपल्याच क्षेत्रातली आहे. तिनं औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातून उपयोजित कलेचं शिक्षण घेतलं. नंतर तिनं मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम मध्ये मास्टर्स केलं.  मुख्य म्हणजे कला महाविद्यालयात शिकत असल्यापासूनच ती ‘ चिन्ह’ला फॉलो करते आहे. ‘चिन्ह’ साठी काहीतरी करावयाची तिची तीव्र इच्छा होती. त्यामुळे यानंतर चित्रकलेच्या संदर्भात खूप काही तरी चांगलं वाचावयास मिळेल याची १०० टक्के खात्री बाळगा .
खूप नव्या कल्पना घेऊन आम्ही येतो आहोत . नवे नवे उपक्रम देखील आम्ही राबवत आहोत. जे जे साफसफाईचा विडा तर आम्ही उचललाच आहे. या सगळ्यात तुमची साथ तर आम्हाला मिळेलच याची खात्री आहे. तेव्हा असेच वरचेवर भेटत राहू !
– सतीश नाईक 
संचालक
chinha.in

Related Posts

1 of 3

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.