Features

पिक्चर अभी बाकी है !

येत्या शनिवारी दि. २ एप्रिल २०२२ म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ०५.३० वाजता ‘चिन्ह’च्या ‘गच्चीवरील गप्पा’ या लोकप्रिय कार्यक्रमात आपण भेटणार आहोत मूळचे चित्रकार, पण आता सिनेमॅटोग्राफर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरीष देसाई यांना. त्या निमित्तानं त्यांच्यावर सतीश नाईक यांनी लिहिलेला हा विशेष लेख.
शिरीष देसाईंचे वडील यशवंत सीताराम देसाई हे पणजीचे पहिले आमदार. युनाइटेड गोवन्स या पक्षातर्फे ते निवडून आले होते. गोव्यात त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. गोव्यात ट्रान्सपोर्ट सोसायटीची स्थापना त्यांनीच केली. भरपूर गाड्या आणि बसेस होत्या त्यांच्या. अतिशय दिलदार माणूस ! अल्तिनोमध्ये त्यांचा २५ – ३० खोल्यांचा मोठाच्या मोठा बंगला. हा सारा पसारा सांभाळून देखील हा माणूस त्या काळात फोटोग्राफी करायचा ! घरात छोटीशी लॅब देखील होती. तिथंच ते रोल धुवायचे, एन्लार्जमेंट वगैरे करायचे. त्यांनी आपल्या चिरंजीवाला म्हणजे शिरीषला तो सात-आठ वर्षांचा असतानाच मामियासारखा कॅमेरा देखील घेऊन दिला होता. त्यामुळे शिरीषला बालवयातच छायाचित्रण कलेचा नाद लागला नसता तर नवलच ठरलं असतं.
 
सातवी-आठवीत असतानाच त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी त्याला सिनेमा दाखवायला थिएटरमध्ये नेलं, पण जो सिनेमा बघायला म्हणून ते गेले होते तो सिनेमा दाखवला गेलाच नाही, त्याऐवजी गुरुदत्तचा ‘कागज के फूल’ दाखवला गेला. पण तो चित्रपट पाहून शिरीष अतिशय प्रभावित झाला. विशेषतः त्यातली फोटोग्राफी पाहून तो अचंबित झाला. दुसऱ्या दिवशी त्या सिनेमाला पुन्हा नेण्याचा त्यानं वडिलांजवळ आग्रह धरला. पण तो शो एकच दिवसासाठी होता. वडिलांनी शिरीषला विचारलं, तुला तो पुन्हा बघायचाय का ? तर शिरीष म्हणाला, हो ! मग वडिलांनी पणजी फिल्म अर्काइव्ह मार्फत पुण्याच्या फिल्म अर्काईव्हकडून ती फिल्म मागवली आणि आपल्या घरात त्याचं स्पेशल स्क्रीनिंग केलं. व्ही. के. मूर्ती या प्रख्यात सिनेमॅटोग्राफरची शिरीषची झालेली ही पहिली ओळख. तेव्हाच शिरीषनं ठरवलं की याच माणसाकडे आपण सिनेमॅटोग्राफी शिकायची.
 
एसएससी झाल्यावर त्यानं ठरवलं की फाईन आर्ट कॉलेजला जायचं. वडील म्हणाले, त्याआधी वेगळं काहीतरी कर. त्यांनी याचं नाव सायन्स कॉलेजमध्ये टाकलं. पण हा कधी त्या कॉलेजमध्ये गेलाच नाही. त्या कॉलेजच्या शेजारी असलेल्या फाईन आर्ट कॉलेजच्या कॅंटीनमध्ये तो बसू लागला. तिथंच त्याला चित्रकार सुहास शिलकर, फ्रान्सिस डिसुझा, दिगंबर सिंगबाळ वगैरे भेटले. त्यांच्या सहवासात तो रमला. त्यांच्या सहवासात तो वाचन करू लागला. मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्य वाचू लागला. आणि नंतरच्या वर्षी मात्र त्यानं फाईन आर्टला प्रवेश घेतला. चित्रकार बैजू पार्थन, विद्या कामत हे त्याचे वर्गमित्र. बैजू तर पाच वर्ष त्याच्याचकडे राहिला.
 
त्याच्या घराचा वरचा मजला हा या साऱ्या मित्रांचा अड्डा होता. खाणं, पिणं, झोपणं सगळं तिथंच चालायचं . तिथं त्यांनी खूप ऍक्टिव्हिटीज केल्यात. म्हणजे फिल्म सोसायटी काढली, मराठी नाटकं बसवली, प्रदर्शनं वगैरे भरवली. पैसे कमी पडले की शिरीषचे बाबा असायचेच स्पॉन्सरर. याच काळात शिरीषनं ‘नवहिंद टाइम्स’साठी फोटोग्राफी सुरु केली. गोव्यात काही घडलं की त्याचे फोटो काढून तो टाइम्ससाठी द्यायचा. विक्रम होरा त्यावेळी संपादक होते. त्यांनीच शिरीषला इलस्ट्रेशन वगैरे काढण्यास प्रवृत्त केलं.
 
कॉलेज संपल्यावर त्याच्या मनानं घेतलं की, पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटला जावं. तिकडे गेलं तर प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन यांनी त्याला मुलाखतीत रिजेक्टच करून टाकला. जा म्हणले तू गोव्याला, चित्रं बित्र काढत बस, इथं वेळ घालवू नकोस. हा बिचारा हिरमुसला होऊन परतला. गोव्यात आला तर त्याचे वडील आजारी होते. त्यांना सांभाळायला एक मुलगी नेमली होती. तिला अचानक फिट आली म्हणून त्यांनी तिच्या बहुतेक भावाला मुंबईला फोन केला. तो भाऊ तातडीनं गोव्याला आला. तो भाऊ म्हणजे ‘चैत्र’ या त्या काळातल्या मोठ्या ऍड एजन्सीचे डायरेक्टर वगैरे. 
 
त्यांनी शिरीषला विचारलं काय करतोस वगैरे. तर शिरीषनं त्याला सारं सांगितलं. ते म्हणाले, इथं काय करतोयस ? मुंबईला ये !’
 
शिरीष मुंबईला आला. त्यांनी थेट नंदू घाणेकरांशीच त्याची ओळख करून दिली. नंदुनी शिरीषला आपल्या ऑफिसात बोलावलं. त्यांच्या ऑफिसात गेला. पाहतो तर काय, तिथं शाम बेनेगल, गोविंद निहलानी, भानुदास दिवकर ( ३६ चौरंगी लेन फेम ) वगैरे बडी माणसं ! ज्यांना तो प्रचंड मानत होता. शाम बेनेगलांनी त्याचं सारं काम पाहिलं आणि म्हणाले, तू तयारच आहेस, काही शिकायची गरज नाही तुला ! नंदू घाणेकरांसोबत त्यानं कामाला सुरुवात केली. अशा तऱ्हेनं त्यानं मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकलं, तेही दिग्गज कलावंतांसोबत. शाम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासोबत त्यानं अनेक चित्रपट आणि सिरियल्स केल्या. त्यांची जंत्री देत बसत नाही. ज्यांना याविषयी उत्सुकता आहे त्यांनी शिरिषचं नाव गुगल करावं.
 
तो वांद्र्यात एका बंगल्यात भाडेकरू म्हणून राहत होता. चांगलं चाललं होतं त्याचं. पण अचानक त्या बंगल्याच्या चिनी मालकिणीने त्याला वाईट वागणूक दिली. रागावून किंवा वैतागून त्यानं तो बंगला सोडला आणि वांद्र्यातच मीरा मधुरामध्ये राहायला गेला. तिथं त्याला विनय मागडी नावाचा मित्र भेटला. हा सिनेमातला आहे हे जाणून तो म्हणाला, माझे आजोबा सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांना एक साहाय्यक हवा आहे. येतोस का ? यानं त्याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा त्या विनयनं आपल्या आजोबांचं नाव व्ही. के. मूर्ती सांगितल्यावर मात्र हा उडालाच ! लहानपणापासून त्याला त्यांनाच तर भेटायचं होतं. दुसऱ्या दिवसापासूनच हा मूर्तींचा साहाय्यक झाला. दहा वर्ष त्यानं मूर्ती साहेबांबरोबर काम केलं. तो आणि त्याचं काम दोन्ही मूर्तींना आवडलं. जाताना म्हणाले, माझ्यासोबत साहाय्यक म्हणून दहा वर्ष काम केलंस, आता कुणाचाही साहाय्यक होऊ नकोस. इथनं त्याचा नवा प्रवास सुरु झाला.
 
जाहिरातपट, अनुबोधपट, चित्रपट, सर्वच क्षेत्रांत तो काम करत गेला. सरदारी बेगम, धारावी, १९४२ लव्ह स्टोरी, यंग इंडियाना जॉन्स, एक कहानी, सुरभी, पिंपळपान, शकिरा, बंध नायलॉनचे, चकवा इत्यादी गाजलेल्या तब्बल ५० चित्रपट, मालिका, अनुबोधपट किंवा जाहिरातपटांशी शिरीष संबंधित होता. त्याचा नावलौकिक ऐकून पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटनं त्याला वर्कशॉप घेण्यासाठी आमंत्रित केलं. हा गेला तर तिथं ८०च्या दशकात ज्यांनी त्याला रिजेक्ट केलं होतं तेच प्रख्यात दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन बसले होते. वर्कशॉप झाल्यावर अडूर गोपालकृष्णन यांनी त्याला आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा पुन्हा येण्याची विनंती केली. तेव्हा त्यानं ८०च्या दशकात घडलेला तो प्रसंग ऐकवला. त्यानं त्यांना काय उत्तर दिलं ते इथं सांगण्यात मझा नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी तो ‘गच्चीवरील गप्पांमध्ये आजवरचे जे सारे अनुभव सांगणार आहे त्यात तो ते सारे सांगेलच ! पण इथून त्याच्या करियरला आणखीन एक कलाटणी मिळाली. त्याचं या क्षेत्रातलं कर्तृत्व पाहून पुण्यातल्या अनेक मोठ्या चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी त्याला पुण्यात आपापल्या संस्थांमध्ये आमंत्रित केलं. विद्यार्थी घडवणं हे त्याला अतिशय आवडलं. M.E.T., I.M.E, SAAM, S.F.M.I. आणि सरतेशेवटी तो भारती विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ फोटोग्राफी’मध्ये स्थिरावला आहे. लवकरच सबकुछ म्हणजे स्क्रिप्ट रायटर, डिरेक्टर, सिनेमॅटोग्राफर – शिरीष देसाई असलेला त्याचा महत्वाकांक्षी चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची आपण नक्कीच वाट पाहूया.
 
– सतीश नाईक ( संपादक ‘चिन्ह’ )

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.