Features

शून्यातून पिसुर्वो ! 

२००० सालापर्यंत जवळजवळ रोजच सायंकाळी जहांगीरला माझी एक फेरी असे. ऑफिस सुटलं का चालत चालत जहांगीर, आर्टिस्ट सेंटर आणि मग पुन्हा चालत चालत थेट व्हीटी स्टेशन, असा माझा रोजचा दिनक्रम असे. प्रख्यात चित्रकार के. एम. शेणॉय यांनी आर्ट प्लाझाची सुरु केलेली चळवळ मी अगदी जवळून पाहिली. त्यातले बहुसंख्य आर्टिस्ट माझ्या परिचयाचे होते. नोकरी सोडल्यानंतर मात्र जहांगीरला जाणं कमीकमी होत गेलं. त्याच काळात कधीतरी जितेंद्र सुरळकर उर्फ पिसुर्वो आर्ट प्लाझाच्या चळवळीत सहभागी झाला असावा. त्यामुळे त्याचा माझा फारसा परिचय असा झालाच नाही.
 
नंतर शनिवारी जहांगीरला जाऊ लागलो. आणि या काळात एक काळासा वर्ण असलेला तरुण आर्ट प्लाझामध्ये दिसू लागला. पण तोपर्यंत मी चित्रकलाविषयक सर्वच चळवळीतून दूर झालो होतो. त्यामुळे त्याच्याशी परिचय असा कधी झालाच नाही. के. एम. शेणॉय गेल्यानंतर तर आर्ट प्लाझाशी असलेला उरला सुरला संपर्क देखील तुटला. के. एम शेणॉय यांच्या निधनापूर्वी मात्र त्यांच्यावरचा एक प्रदीर्घ लेख ‘चिन्ह’मध्ये प्रसिद्ध करण्याची संधी मला लाभली. त्याच काळात आर्ट प्लाझा चळवळीविषयी तसेच के. एम. शेणॉय यांच्यासारख्या मनस्वी कलावंताला त्यातून कसे बाहेर पडावे लागले ? वगैरे ऐकून तर जहांगीरच्या पायऱ्या उतरून मी आर्ट प्लाझाकडून जाणं देखील कटाक्षानं टाळू लागलो होतो.
 
याच काळात एके दिवशी जहांगीरच्या पायऱ्यांवरच पिसुर्वोचा किस्सा कुणीतरी मला सांगितला. की उदाहरणार्थ हा जितेंद्र सुरळकर जो आहे त्याची सुमारे ५००० चित्रं २००५ सालच्या पावसात भिजून गेली वगैरे. ऐकून वाईट वाटलं ! पण का कुणास ठाऊक, त्याच्याशी संवाद साधणं हे मला काही जमलंच नाही. त्याच्याविषयी काहीना काही बातम्या कुणाना कुणाकडूनच मला कळत असत. पण सुमारे सहा महिन्यापूर्वी एके दिवशी मला त्याचा फोन आला. ‘सर, मला काही करून गायतोंडे यांच्या पुस्तकाची डिलक्स एडिशन हवी आहे !’, असं सांगणारा. पण म्हणाला, माझ्याकडे आता पैसे नाहीत. लॉकडाऊनमुळे सगळीच गडबड झाली आहे. माझी पेंटिंग गेली की मी तुम्हाला पैसे देईन. मी म्हटलं काहीच हरकत नाही, सावकाश दे. मी पाठवतो तुला पुस्तक. आणि मी लागलीच ते कुरियरनं पाठवलं देखील. पण त्याला काही ते मिळालं नाही, माझ्याकडे परत आलं. पुन्हा पोस्टानं पाठवावं लागलं तेव्हा कुठं त्याला मिळालं.
 
आणि मग नंतरचे काही दिवस दररोज वेळी अवेळी त्याचे फोन येऊ लागले, व्हॉट्सअप मेसेजेस येऊ लागले. ‘गायतोंडे’ ग्रंथ वाचून त्यांच्या व्यक्तिमत्वानं तो प्रचंड प्रभावित झाला होता. आणि म्हणून तो मला फोन करत होता, मेसेजेस पाठवत होता. त्याच्या दोन छोट्या मुलांनी देखील तो ग्रंथ हाताळला होता. इतकंच नाही तर ते वाचत देखील होते हे तो अत्यंत कौतुकानं मला सांगत होता.
 
काही महिन्यानंतर असाच एकदा पुन्हा त्याचा फोन आला. म्हणाला, सर खूप पेंटिंग विकली गेली. ‘गायतोंडे’ ग्रंथाचे पैसे द्यायचे आहेत. कुणातरी मित्र किंवा कलेक्टरला ‘गायतोंडे’ ग्रंथ भेट द्यायचा आहे. मी तुमच्याकडे येऊ का न्यायला ? मला विचारत होता. लॉकडाऊनचा तो काळ होता. तो कसा प्रवास करणार हा मला प्रश्न पडला होता, पण पठ्ठ्या आला ! कल्याणहून थेट रिक्षा घेऊन ठाण्यापर्यंत आला. लवकर जायचंय असं सांगून जवळजवळ तास दोनतास गप्पा मारत बसला होता. बाहेर रिक्षा तशीच वेटिंगवर. तेव्हा जितेंद्र सुरळकर उर्फ पिसुर्वो हे काय प्रकरण आहे हे मला उमगलं. भडाभडा तो बोलत होता. आयुष्यातले सगळे कडू गोड प्रसंग त्यानं मला तेव्हा ऐकवले. तो निघायला उठला तेव्हाच मी त्याला ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंही ते लगेचच स्वीकारलं देखील.
 
अजिंठ्यापासून ३४ किलोमीटरवर असलेल्या सोनारी गावचा तो खिरोद्याच्या सप्तपुट कला महाविद्यालयातून त्यानं त्याचं कलेचं शिक्षण पूर्ण केलं. चित्रकार गुलजार गवळी यांचा तो लाडका विद्यार्थी. शिक्षण पूर्ण होताच तो मान्सून शोच्या निमित्तानं मुंबईला पहिल्यांदा आला. मुंबईत तो आला त्यादिवशी बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली होती आणि मुंबईतल्या गाड्या बंद पडल्या होत्या. बंद पडलेल्या एका गाडीत हा अडकला होता.
 
 मुंबईत पहिल्यांदा आलो आणि हा अनुभव ! तो अगदी भेदरून गेला होता. पण तो तसाच बसून राहिला. खूप वेळ गेल्यावर गाड्या सुरु झाल्या पण घाटकोपरजवळ गाडी आली आणि गाडीवर प्रचंड दगडफेक झाली. डब्यावर पडलेल्या दगडांचे आवाज आजही जसेच्यातसे आठवतात, तो सांगत होता.
 
मान्सून शोमध्ये त्याची सर्वच चित्रं पहिल्या दोन-तीन दिवसातच विकली गेली. मुंबई त्याला आवडली, पण घरातून मुंबईला यायला विरोध झाला. अखेरीस एका एनिमेशन कंपनीमध्ये जळगावातली दोनशे तीनशे मुलं आली त्यातला एक बनून तो मुंबईला आला. सात महिने काम केलं, पण त्यात काही तो रमला नाही. एका मित्रानं त्याची आर्ट प्लाझाचे जनक के. एम. शेणॉय यांच्याशी गाठ घालून दिली. त्याला शेणॉय देखील आवडले आणि आर्ट प्लाझादेखील. विशेषतः जहांगीरसमोरची झाडं वगैरे बघून तो भलताच खुश झाला ! गावच आठवला त्याला. २००१ साली त्यानं आर्ट प्लाझामध्ये पहिलं स्केच केलं, सात रुपये मिळाले त्याचे त्याला. चार वर्ष त्यानं आर्ट प्लाझामध्ये काम केलं. भरपूर पोर्ट्रेट्स केली, भरपूर स्केचेस केली, पण तो तिथंच थांबला नाही. तो पेंटिंग देखील करत राहिला.
 
२००५ साली शेणॉय यांनी आर्ट प्लाझा सोडल्यावर तो देखील त्यांच्यासोबत तिथून बाहेर पडला आणि काळा घोडामध्ये चित्र लावू लागला. काळा घोडा फेस्टिव्हल संपल्यानंतर त्यानं त्या जागेवर नव्यानं संसार मांडला. स्केचेसच नाही तर पेंटिंग देखील तो तिथंच करू लागला. ‘आर्ट प्लाझामुळेच पेन्सिलीच्या ताकदीवर मी मुंबईमध्ये उभा राहिलो’, असं तो अभिमानानं सांगतो. ‘काळा घोडामध्ये एके दिवशी मी ९० स्केचेस काढली. मिळालेले पैसे मोजायला देखील वेळ नसायचा. मी ते शर्टाच्या आत बनियनमध्ये टाकून द्यायचो. किती पैसे कमावले त्याची मोजदादच केली नाही.’
तो कल्याणला राहत होता, मावशीकडे, वरपगावात. २००५ सालीच २६ जुलैला जो महाप्रलय झाला त्यात तो सापडला. १९ फूट पाणी चढलं होतं. पाणी कुठून येतंय ? कसं येतंय ? काहीही कळत नव्हतं. अचानक सहा-सहा फूट उंच पाणी चढायचं ! मी ज्या चाळीत राहत होतो ती लोडबेरिंग ची चाळ होती. राहतो का वाचतो ? असाच प्रश्न आम्हाला पडला होता. मी चांगली पोर्ट्रेट्स करतो पण त्यावेळचे कुणाचेच चेहरे आता आठवत नाही. त्या पुराच्या पाण्यात माझी कागदावर काढलेली ५००० चित्रं आणि ३५-४० कॅनव्हास नष्ट झाले. पाच वर्षात चित्रकलेचं असं जे जे काही कमावलं होतं ते सारं पावसानं नष्ट केलं होतं. तो अतिशय शांतपणे सगळं सांगत होता.
नंतर मी जी चित्रं रंगवली ती सारी पुरावरचीच होती. ती सारीच्या सारी विकली गेली. काळा घोडा मधूनच मी ती विकली. कला साहित्याची विक्री करणाऱ्या सदाशिवनं मला खूप मदत केली. त्याचंही पुरानं नुकसान केलं होतं, पण त्यानं मला बोलावलं. म्हणाला, तू खूप चांगलं काम करतोस, तुला कुठलं हवं ते आर्ट मटेरियल घेऊन जा ! चित्रकार दत्ता बनसोडेंनी देखील मला मदत केली. काळा घोडाला तर एक संग्राहक मला असा भेटला की माझी ही सारी पुराची कहाणी ऐकून त्यानं एकदम माझे जवळजवळ ५० एक कॅनव्हास विकत घेतले. त्यातून मिळालेल्या पैशानं मी स्वतःचं घर आणि स्टुडियो घेतला. अशी माणसं पाठीशी उभी राहिल्यामुळेच मी पुन्हा उभा राहू शकलो, हे तो अगदी मनापासून सांगत होता.
 
त्यानंतर एकेका संधीचं दार मला आपोआपच उघडत गेलं. फक्त दोन प्रदर्शनं मी माझ्या पैशानं केली. पण बाकी सारी १२-१३ प्रदर्शनं हे स्पॉन्सर शोज होते आणि ते केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही झाले. काळा घोड्यावर काम केलेल्या माझ्यासारख्या छोट्या कलावंताला मोठ्या मोठ्या संधी प्राप्त झाल्या त्या केवळ निष्ठेनं केलेल्या कामामुळेच ! ज्या हुसेन यांना मी खूप मानतो, त्यांच्याच दोशी – हुसेन गुंफेमध्ये काम करण्याचा, प्रदर्शन करण्याचा अनुभव तर केवळ अद्भुतच होता. अहमदाबादचे कला संग्राहक अनिल रेलिया यांच्यामुळे तो मला मिळाला. माझं भाग्य थोर त्यामुळे अशा लोकांच्या सहवासात मी येत गेलो. आज जे काही थोडंबहुत मी मिळवलं आहे, शून्यातून दोन वेळा जो काही उभा राहिलो आहे त्याचं श्रेय पिसुर्वो या साऱ्यांनाच देतो. पिसुर्वोविषयी अजून खूप लिहिण्यासारखं आहे, पण त्याच्या तोंडून ते ऐकण्यात अधिक मझा आहे. येत्या शनिवारी म्हणजे, १९ मार्चला सायंकाळी ०५.३० वाजता मी त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका !
 
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.