FeaturesGachhivaril Gappa

२ नोव्हेंबरला भेटूया?

संपूर्ण आशिया खंडात ज्या कला महाविद्यालयाचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जात असे त्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टविषयी कुणी काही प्रश्न विचारला की मी मला असलेली सारीच माहिती सांगून मोकळा होत असे. पण माझ्या उत्तरावर समोरच्यानं जर ‘पण पुढं काय?’ असा प्रश्न जर विचारला तर मात्र मी काहीसा निरुत्तर होत असे. कारण त्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापाशीदेखील नव्हती. अनेकदा माझी चिडचिड होई पण येत्या २ नोव्हेंबर रोजी चित्रकार गायतोंडे जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनेलवर होणाऱ्या लाईव्ह कार्यक्रमात मात्र मी जेजे संदर्भातल्या प्रत्येक प्रश्नांची अगदी रोखठोक उत्तरं देणार आहे. कारण जे जे स्कूल ऑफ आर्टकडे भविष्यात कुणीही वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाहीये. त्यासाठी जे काही करायला हवं होतं ते सारं काही आमच्या पिढीनं करून दाखवलं आहे. ही काही श्रेय घेण्याची किंवा फुशारकी मारण्याची गोष्ट नव्हे कारण जेजेची पुण्याई किंवा महत्ताच तेवढी प्रचंड होती.

जेजेप्रमाणेच ‘ जे जे जगी जगले’ या महत्वाकांक्षी ग्रंथाचं कामदेखील आता शेवटच्या टप्यात येऊन पोहचलं आहे. ग्रंथ जाहीर झाला तेव्हा त्याची पृष्ठसंख्या होती फक्त २००. आता बहुदा ३०० पेक्षा अधिक पानांचा तो होऊ घातलाय. ‘चित्रकार प्रभाकर बरवे’ या २०२४ सालाच्या उत्तरार्धात प्रकाशित होणाऱ्या ‘चिन्ह’च्या शेवटच्याच प्रकाशनाविषयी देखील माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ते मी सांगणारदेखील आहे. हे दोन्ही महत्वाचे प्रकल्प चालू असताना ‘चिन्ह’नं आणखीन एक मोठी उडी मारण्याचं धाडस केलं आहे. २०१६ साली प्रकाशित झालेल्या ‘गायतोंडे’ या मराठी ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्षातच प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. आणि हा इंग्रजी ग्रंथ आम्ही जगभरच्या चित्ररसिकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्याविषयीदेखील मी अगदी सविस्तर बोलणार आहे.

आता पूर्वीसारखे ऑनलाईन संवाद साधता येत नाहीत. त्याची तशी गरजदेखील भासत नाही कारण ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या माध्यमातून मी जवळजवळ रोजच वाचकांशी संवाद साधतोच आहे. समाज माध्यमांद्वारे ‘चिन्ह’च्या प्रत्येक चाहत्याशीदेखील संपर्क साधून आहे. पण तरीदेखील २ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्षाचं औचित्य साधून ‘चिन्ह’च्या चाहत्यांशी संवाद साधणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं आहे आणि म्हणूनच २ नोव्हेंबर रोजी ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनेलवर मी ऑनलाईन संवाद साधणार आहे. आपणही या संवादात सहभागी व्हावं यासाठीच हे खास निमंत्रण.  जर आपले काही प्रश्न असतील, आपली काही निरीक्षणं असतील तर ‘चिन्ह’च्या ९००४०३४९०३ या व्हाट्सअप नंबरवर कार्यक्रमाआधी अवश्य नोंदवा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.

धन्यवाद!

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 74

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.