Features

हृदयविकाराच्या झटक्याची गोष्ट !

[‘चिन्ह’नं काही महिन्यापूर्वी जेजेच्या हेरिटेज वास्तूत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या एक कंत्राटी शिक्षक आणि एक अधिकारी यांची बातमी दिली होती. बातमी प्रसिद्ध होताच नेहमी प्रमाणे कोणतीच कारवाई झाली नाही. पण त्या दोघांनीही तिथं राहणं थांबवलं. पण वातावरण पूर्वपदावर येताच सदर अधिकारी पुन्हा तिथे राहू लागला आणि दुर्दैवानं त्याच अधिकाऱ्याला दि १३ एप्रिल रोजी कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आला असं सांगितलं जातं. त्या अधिकाऱ्याचं नशीब मोठं ताठ. जर ही गोष्ट रात्री साडेआठ ऐवजी जर रात्री दोन अडीच वाजता घडली असती तर….]

कला संचालनालयात काल परवाच घडलेल्या एका घटनेनं काहीशी खळबळ माजली आहे. उदाहरणार्थ संभाजीनगरच्या शासकीय कला महाविद्यालयाचे रजिस्ट्रार म्हणून काम पाहणारे श्री विनोद दांडगे ( वय वर्ष म्हणे ५० )  यांना म्हणे दि १३ एप्रिल रोजी ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका आला. तोही रात्री ८.३० वाजता कला संचालनालयात काम करत असतानाच.

आता तुम्ही विचाराल की ते जर संभाजीनगरच्या शासकीय कला महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आहेत तर ते इथं मुंबईत कला संचालनालयात रात्री ८.३० वाजता काय करत होते ? १०.०० ते ०६.०० ही कला संचालनालयाची कामाची वेळ असताना रात्री ८.३० पर्यंत ते असं कुठलं महत्वाचं काम करत होते ? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जरी ते संभाजीनगरच्या शाकमचे रजिस्ट्रार असले तरी त्यांची कामातली एकूण धडाडी, हुशारी आणि दिलेलं काम कसंही करुन यशस्वी करण्याची त्यांची हातोटी पाहून त्यांना म्हणे मंत्रालयातल्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे डेप्युटी सेक्रेटरी सतीश तिडके यांनी कला संचालनालयात उप कला संचालक म्हणून नेमले.

गेले दोन तीन वर्ष ते संभाजीनगर आणि मुंबई इथल्या दोन्ही कार्यालयांचं काम सांभाळत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल एकच माणूस एकाच वेळी संभाजीनगर आणि मुंबई अशा दोन ठिकाणांची कामं कशी बरं पाहत असेल ! तर त्यासाठी म्हणे तिडके साहेबांनी खास व्यवस्था केली. ती अशी की उदाहरणार्थ तीन दिवस त्यांनी मुंबईत कला संचालनालयाचं उप कला संचालक म्हणून काम पाहायचं आणि उरलेले तीन दिवस संभाजीनगरात शाकमच रजिस्ट्रार म्हणून काम पाहायचं. (उरला रविवार. या वारी त्यांनी मंत्रालयातल्या आणि कला संचालनालयातल्या साहेबांची ‘विशेष कामं’ पाहायची असं मुंबई आणि संभाजीनगरमधले अनेक जण कुजकटपणं म्हणतात. खोटं वाटत असेल तर अनुदानित कॉलेजवाल्याना विचारा असं ते आव्हानं देखील देतात. असो ! हे आपलं सहज जाता जाता)

असं जरी असलं तरी कुणालाही प्रश्न पडेल की इतक्या रात्री ते कार्यालयात काय बरं करत होते ? कला संचालनालयातले अधिकारी असं जर रात्र रात्र जागून काम करत असतील तर कला संचालनालयाचा कारभार असा सतत ढेपाळत कसा बरं चालला आहे ? या प्रश्नाचं उत्तर आम्ही पामरे काय बरे द्यावे. आम्ही यावर इतकेच सांगू की सदर विनोद दांडगे नावाचे अधिकारी संभाजीनगरमध्ये आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असतील पण इथं मुंबईत मात्र ते नेमणुक झाल्यापासून कला संचालनालयाच्या हेरिटेज वास्तुतच अनधिकृतपणे राहात होते. वास्तविक पाहता अशा हेरिटेज वास्तूमध्ये वास्तव्य करण्यासाठी सरकारचे निश्चित असे नियम आहेत. पण ते सारे धाब्यावर बसवून श्री दांडगे हे दांडगटपणे तिथे राहात होते.

कल्पना करा जेजे स्कूल ऑफ आर्ट सारख्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात नव्हे आशियात मानाचं स्थान असलेल्या कला शिक्षण संस्थेच्या आधुनिक परिसरात चट्ट्यापट्ट्याच्या चड्ड्या, भोकाभोकाचे सॅन्डोज बनियान आणि स्लीपर घातलेले कर्मचारी रात्रीअपरात्री किंवा दिवसा कॉलेज सुरु होण्याआधी जर सैरावैरा फिरत असतील तर त्या संस्थेची पाहणाऱ्यांच्या मनात काय प्रतिमा होत असेल ?

एक माजी कला संचालक तर वर वर्णन केलेल्या अवस्थेतच कला संचालनालयाच्या परिसरात दिवसा ढवळ्या वावरत असत. यांच्या सर्व पराक्रमाला वाचा फुटूनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही परिणामी कला संचालनालयावर आज ही वेळ आली ही वस्तुस्थिती आहे. याकडे सरकारनं कधीही लक्ष दिलं नाही. त्यांचं सारं लक्ष होतं ते त्या किंमती जागेवर आणि ती त्यांना रिकामी करुन हवी होती. आणि म्हणूनच त्यांनी कला संचालनालय आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट कुजवायचा घाट घातला. त्यालाच आलेली ही विषारी फळं आहेत.

या संबंधीची बातमी आम्ही काही महिन्यांपूर्वी ‘चिन्ह’च्या पोर्टलवर दिली होती. आणखीनही एक शिक्षक असेच तिथे अनधिकृतपणे राहात होते ते देखील संभाजीनगरचेच होते. हे देखील त्या बातमीत आम्ही नमूद केले होते. ती बातमी प्रसिद्ध झाली आणि एकच पांगापांग झाली. दोघंही तिथून गायब झाले. आम्हाला वाटलं होतं की चला यांच्यापासून आता कला संचालनालयाच्या ऐतिहासिक वास्तूला आता मुक्ती मिळाली.

पण कसले काय आणि फाटक्यात पाय ! काही दिवस उलटताच सारे काही शांत झाले असे समजून दांडगे साहेब हेरिटेज वास्तूत अवतीर्ण झाले असावेत. ही बातमी ‘चिन्ह’पासून लपवली गेली खरी पण अशा प्रकारे का होईना तिला वाचा ही फुटलीच.

चार सहा महिन्यापूर्वी ती बातमी देतांना आम्ही असं म्हटलं होतं की असं अनधिकृतपणे राहात असताना एखाद्या दिवशी तिथं अपघात झाला, घातपात झाला, कुणी अचानक भयंकर आजारी पडला तर त्याची जबाबदारी कुणाची ? त्या तिथं राहणाऱ्यांची का त्याला तिथं राहण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची ? आहे या प्रश्नाचं उत्तर सचिवांकडे, उपसचिवांकडे किंवा कला संचालकांकडे ? का याही प्रश्नांची उत्तरे शिक्षणमंत्र्यांकडेच मागायची ?

कोणालाच याची लाज आणि शरम कशी वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. भारतातल्या सर्व राज्यातलं चित्रकलेचा प्रसार करणारं हे एकमेव खातं पण या खात्याची उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं पार धूळधाण करून टाकली आहे. १९९४ सालापासून या खात्यावर पद्धतशीरपणे ‘नांगर फिरवला गेला’ १९६५ सालापासून १९९८ सालापर्यंत अवघी २० – २५ कला महाविद्यालय होती पण नांगर चालवणाऱ्यांनं वर्षभरातच महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात सुलभ शौचालयांप्रमाणे विनाअनुदानित कला महाविद्यालयं स्थापली. आणि तिथूनच कला संचालनालयाच्या विनाशाला सुरुवात झाली.

एकाहून एक भ्रष्ट आणि आचरट लोकांच्या इथं कला संचालक म्हणून नेमणूका झाल्या. २००५ साली नेमणूक झालेले एक तथाकथित कला संचालक (बहुदा कला संचालनालयाची ही भीषण अवस्था पाहून) कार्यालयातच कोसळले आणि तिथंच त्याच क्षणी त्यांचा अंत झाला. ही अशी पार्श्वभूमी असताना देखील श्री विनोद दांडगे यांना जेजेच्या हेरिटेज वास्तूमध्ये राहण्याची परवानगी दिली कोणी ? याची चौकशी आता तरी रस्तोगी साहेब करणार आहेत का ? का आपलं नाही ते काम म्हणून त्यातून नेहमीप्रमाणे अंग काढून घेणार हे आता पाहायचं.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.