Features

मुळाक्षर, रचना आणि कलात्मक दृष्टी

पहिल्या भागात चिन्मय जोशी यांनी कर्णबधिर शालेय मुलांसाठी एका सर्जनशील कार्यशाळेत एका मुलाचा अनुभव लिहिला होता. या दुसऱ्या भागात त्यांनी या कार्यशाळेतील कलाशिक्षक म्हणून आलेला अनुभव लिहिला आहे. आता चिन्मय जोशी यांच्या या प्रवासाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. कारण त्यांनी केवळ स्वतःच्या श्रवणदोषावर मात केली नाही तर आपल्यासारख्याच समस्यांना तोंड देणाऱ्या लहान मुलांना एकाच वेळी लिहिणे, रेखाटणे आणि बोलणे शिकण्यास मदत करण्यासाठी प्रयोगात्मक, नावीन्यपूर्ण आणि मजेदार पद्धतीदेखील तयार केल्या.

———-

कर्णदोषाचे निदान झाल्यावर मी मुंबईतील दादर येथील जानकीबाई शिक्षण संस्थेचे कर्णबधिर मुलांसाठी विकास विद्यालय या शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला. ही माझी सर्वात पहिली शाळा जिथे मी खऱ्या अर्थाने मुळाक्षरे गिरवायला, वाचायला, लिहायला, म्हणायला सुरुवात केली. बाळाचा जन्म झाल्यावर आजूबाजूकडून कानावर आवाज, शब्द पडतात त्यावरून मुलांना भाषा कळायला मदत होते पण कर्णबधिर मुलांचे ध्वनी आकलन वयाच्या मानाने उशिरा सुरू होते त्यात एकदा ते मूल श्रवणयंत्र वापरायला लागल्यावर सर्व शब्द, अक्षरे मुलांकडून म्हणून, गिरवून, वाचून घेण्यासाठी कर्णबधिर शाळेचे शिक्षक व आईबाबा सुरवातीपासून तयारीला लागतात जेणेकरून मुलांना भाषा लवकरात लवकर समजण्यास सोपे जावे. किंबहुना देवनागरी लिपी आणि रोमन लिपीतील सर्व मुळाक्षरे एवढ्या लहान वयात पूर्ण ऐकून म्हणून घेण्यास बराच कालावधी लागतो. जर मुलांवर अक्षरसंस्कार करताना नावीन्यपूर्ण संकल्पना वापरून खेळात सहभागी करून घेतलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतील हा विचार केला. त्याचाच एक प्रयोग म्हणून मुलांकडून अक्षररचना कलात्मक पद्धतीने गिरवून घेण्याचा प्रयत्न केला.

साधारणतः उन्हाळी परीक्षा झाल्यावर पालकांसमोर भलामोठा प्रश्न उभा ठाकतो की सुट्टीत मुलांचं मन कसं रमवावं? म्हणून शाळेने परीक्षा झाल्या झाल्या सुट्टीचा उपयोग कसा करावा यासाठी छंदवर्गाचे आयोजन केले होते. शाळेने मला कलामार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले होते. यात मुख्य म्हणजे मुलांना शिकवणे हे एक आव्हान होते.

प्रयोग करून पाहताना मी या मुलांना नक्की कशाकशाची आवड आहे, हे जाणून घेतले. ५ वी ते ८ वी इयत्तेतील मुलांसाठी अक्षरलेखन हा प्रयोग घेतला त्यात मुळाक्षरे काढताना अक्षर, त्याची रचना, रुंदी, जाडी याबरोबरच टूल अथवा ब्रश सांभाळणे, हातावरची पकड हेदेखील मुलांनी समजून घेतले. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील नाटक, सिनेमा कात्रण ज्यामध्ये expressive lettering असलेली शीर्षके मुलांना दाखवली. कुठलीही गोष्ट नीट समजून पाहिल्याशिवाय अशा मुलांच्या डोक्यात काल्पनिक किडा वळवळत नसतो, हे माहित असल्याने विविध अक्षरांसहित प्रात्यक्षिक (डेमो) करून दाखवले. एकच अक्षर वेगवेगळ्या पद्धतीने कसे काढू शकतो, हे मुलांना आवाजातील चढउतार व हावभाव करून दाखवले जेणेकरून अक्षरात दडलेली सुप्त भावना प्रत्यक्षात कागदावर काढण्याची मज्जासुद्धा ती मुले घेऊ शकतील. 

अक्षर खेळातून काळाची ओळख

अक्षर सरावासाठी भरपूर वर्तमानपत्रं, रंग व calligraphic टूल दिल्यावर मात्र मुले भांबावलेली दिसली.  लगेच त्यांना खुलेपणाने सांगितलं की भरपूर वर्तमानपत्रे आहेत. जे आवडेल ते अक्षर घ्या आणि मज्जा करा. झालं! मग मुलांच्या कल्पनेला पंखच फुटले. मुलं जो तो पेपर हक्काने मागून अक्षरे काढत बसली. जिथे आवश्यक तिथे अक्षरे नीट काढून घेतली. काना मात्रा वेलांटी काढताना किती अंतर ठेवावे तसेच अक्षर काढण्याचे मूलभूत नियम त्यांनी समजून घेतले. जी मुले मनमोकळेपणाने ओबडधोबड अक्षरे काढत होती त्यांना एखाद्या गोष्टीकडे नीट पाहण्याची दूरदृष्टी मिळून सुधारण्याचा मार्ग सापडला. अशा ओबडधोबड अक्षरात लपलेले शब्द शोधायला त्यांनाच सांगितले. एका मुलाने प काढताना त्यालाच पेला दिसला, बाजूच्या मुलाला कप दिसला, तेव्हा इतर मुलेसुद्धा स्वतःची चित्रे काढायची सोडून प अक्षराच्या मागे लागली. कुणी एकमेकांना हातवारे करून कपाट, पंखा, पलंग, झोपाळा असे प अक्षरात गुंफलेले शब्द पटापट सांगत होते. मुलांनी केलेल्या अक्षर-रचनेतील विविधता

घडलेल्या या प्रकरणातूनच तयार झालेला ‘वस्तूपासून अक्षरओळख हा खेळसुद्धा मुलांना एक आगळा आनंद देऊन गेला. त्यांना एक लाकडी खुर्ची दाखवून यातून किती अक्षरे तुम्हाला दिसतात हे विचारून मुलांना बोलते केले. यात खुर्चीपासून १० तरी अक्षरे मुलांनी ओळखली. यातून निरीक्षणक्षमता आणि visualization power या गोष्टी मुलांमध्ये विकसित होतात. बाहेरच्या जगात विविध गोष्टींकडे वेगळ्या कलात्मक नजरेने पाहण्याची वृत्ती तयार होते. खरे तर कर्णदोषामुळे ही वृत्ती त्यांना जन्मतः उपजत असते. फक्त अशा डोळस वृत्तीला खतपाणी घालण्याचे काम प्रत्येक पालकांचे, शिक्षकांचे आहे, हे महत्वाचे.

प्रात्यक्षिकासोबत मन लावून अक्षरे गिरवताना कर्णबधीर मुले

अशा प्रकारे एकदिवसीय छंदवर्ग यशस्वीरीत्या पार पडल्यावर छंदवर्गामध्ये मुलांनी केलेल्या कामाचे शाळेतच छोटेसे कलाप्रदर्शन मांडले होते. ते प्रदर्शन पाहण्यासाठी पालक व मुलांनी गर्दी केली होती. मुलांच्या चेहऱ्यावरचा अवर्णनीय आनंद, एकमेकांना आपापले काम दाखवण्याचा उत्साह, मुलांची चित्रे पाहताना उत्सुक पालक, यामुळे एक वेगळाच माहोल तयार झाला होता. 

प्रदर्शनात पालकांसोबत मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी संवाद

पालकसुद्धा अक्षरखेळ, शब्दरचना, मुळाक्षरापासून वस्तूओळख हे सर्व उत्सुकतेने समजून घेत होते. हे सर्व नाविन्यपूर्ण प्रयोग मुलांसाठी आपण शालेय शिक्षकांच्या मदतीने करू शकतो, याची पालकांना खात्री पटली. प्रदर्शन पाहून झाल्यावर आता पुढच्या वर्षी वेगळं करूया, तू शाळेत येणार ना” हा मुलांचा गोड हट्ट मला हसत हसत मान्य करावाच लागला.

छंदवर्गाची सांगता व क्षणचित्रे

या अनुभवातून एक कलामार्गदर्शक म्हणून मला स्वतःला खूप शिकायला मिळाले. मुलांना कसे शिकवावे, मुलांकडून एखादे प्रात्यक्षिक कसे करून घ्यावे, हे समजले. मुलांची कलेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची वृत्ती तयार होते की नाही हा विचार करूनच त्यादृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न केला. 

*******

चिन्मय कैलास जोशी

लेखक व्हिज्युअल डिझायनर आणि ब्रँड डिझायनर आहेत.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.