Features

आम्ही नाही केलं तर कोण करणार?

अगदी कंटाळा आलाय. चित्रकला शिक्षणविषयक बातम्या आणि लेख वाचून वाचून. मारुतीच्या शेपटासारखं सारं प्रकरण वाढतच चाललंय. कलेच्या क्षेत्रातदेखील एवढा भ्रष्टाचार? काहीतरी सकारात्मक लिहा. असं सांगणारे व्हाट्सअप मेसेजेस किंवा फोन चिन्हकडे अलीकडे वारंवार येऊ लागले आहेत. त्या संदर्भात चिन्हची भूमिका स्पष्ट करणं आम्हाला आवश्यक वाटू लागलं आहे. म्हणूनच हा विशेष लेख. 

‘चिन्ह आर्ट न्यूज’वर आम्ही जेजे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय आणि शाकम छत्रपती संभाजीनगर यासारख्या कलाशिक्षण संस्था यांच्यासंदर्भात जे एकापाठोपाठ एक असे अनेक लेख प्रकाशित करत आहोत ते वाचून अनेक विद्यार्थी अस्वस्थ होत आहेत. महाराष्ट्रातील कलाशिक्षकांच्यादेखील या लेखनासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अनेकांना हे लेखन आवडतंय. तर अनेकजण या लेखनाविषयी नाराज आहेत. शिक्षणसंस्था चालकांच्या तर याविषयी अत्यंत प्रतिकूल प्रतिक्रिया आहेत. कलाशिक्षणसंस्थांमधले तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी मात्र कसे कुणास ठाऊक या लेखनावर अतिशय खुश आहेत. पालकांच्या प्रतिक्रिया मात्र संमिश्र आहेत. त्यांना यातलं काही कळतच नाही असं त्यांचं सांगणं आहे. ज्यांना कळतं ते पालक मात्र आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल भयकंपित आहेत.

‘चिन्ह’चा कलारसिक वाचक हे सारं लिखाण आवडीनं वाचतो आहे पण त्यातल्या असंख्य जणांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काहीतरी चित्रकलेसंदर्भात सकारात्मक लिखाण प्रसिद्ध करा. ज्याचा उपयोग आमच्यासारख्या असंख्य वाचकांना होऊ शकेल. तुमची लढाई योग्यच आहे यात वादच नाही. त्यावर तुम्ही सातत्यानं लिहिता आहात हेदेखील अतिशय महत्वाचं आहे पण आमच्यासारखा वाचक यातून दुरावला तर जाणार नाही ना याकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवं. एका विशिष्ट वयानंतर शिक्षणविषयक बातम्या लेख किंवा मजकूर वाचणं हे खूपच त्रासदायक असतं. आणि ‘चिन्ह’ ज्या प्रकारचं सडेतोड लेखन प्रसिद्ध करत आहे हे सतत वाचणं तर खूपच त्रासदायक ठरतं आहे.

इतकी जर भयंकर परिस्थिती महाराष्ट्रातल्या कलाशिक्षण संस्थांमध्ये असेल उच्च व तंत्रशिक्षण खात्यातले अधिकारी किंवा शिक्षण सचिव अथवा दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री करत आहेत तरी काय? असा प्रश्न ‘चिन्ह’चे वाचक नेहमीच विचारतात. त्याला काय उत्तरं द्यायची असा मला अनेकदा प्रश्न पडतो. आज महाराष्ट्रात जर एखाद्या तरुणाला चित्रकलेमध्ये करियर करायचं असेल तर त्याने कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा हेदेखील माझ्यासारख्या जाणकाराला जर सांगता येत नसेल तर परिस्थिती किती भीषण आहे याची सहज कल्पना यावी.

ती बदलावी म्हणून बेचाळीस वर्षांपूर्वी त्याच्या विरोधात बातम्या देणं मी सुरु केलं. पण परिस्थिती अधिकाधिकच बिघडत गेली. ‘शिक्षण देणं हे सरकारचं काम नाही’ असे निर्लज्ज उत्तर देणारे शिक्षणमंत्री महाराष्ट्राला लाभले. आणि तिथंच महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेचं वाटोळं होण्यास सुरुवात झाली. शिक्षण देणं हे सरकारचं काम नसेल तर तसं जाहीर करून एका दिवसात साऱ्याच्या साऱ्या शिक्षण संस्था त्यांनी बंद करायला हव्या होत्या. पण तेवढं धाडस त्यांच्या अंगात नव्हतं. त्यांनी मग सारीच्या सारी शिक्षणव्यवस्था क्रमाक्रमानं नष्ट करून टाकली. आणि राजकारण्यांच्या शिक्षणसंस्थांनी महाराष्ट्रात आपले पाय पसरले. त्यांचं खरं ध्येय तेच होतं आणि ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं. पण हे करताना जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या दीडशे वर्ष जुन्या संस्थांची जपणूक करायला हवी होती याचं भान त्यांना राहिलं नाही.

मुळात जिल्हा परिषदेसारख्या ठिकाणीदेखील काम करण्याची ज्यांची लायकी नव्हती अशा मंडळींची मंत्रीपदी निवड झाल्यामुळे आधी महाराष्ट्राच्या शिक्षणाचं आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्राचंच वाटोळं झाल्याचं पाहणं आपल्या नशिबी आलं. चार-चार पाच-पाच टर्म मंत्र्यांना सलग किंवा तुटक पद्धतीनं मिळाल्या तर आणखीन काय घडणार? तेच आता घडतंय आणि आपण असहाय्यपणे पाहतोय. त्याखेरीज आता आपण दुसरं काहीही करू शकत नाही इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

ज्या मंतरलेल्या परिसरात आपण आयुष्यातली मोलाची सहा-सात वर्ष घालवली तो परिसर असा या राज्यकर्त्यांना गिळंकृत करून द्यायचा का? असा प्रश्न जेव्हा वारंवार सतावू लागला तेव्हाच मग लेखणी उचलली आणि सपासप वार करत गेलो. सारेच वार काही यशस्वी ठरले नाहीत. अनेक वाया गेले पण जे वाया गेले नाहीत त्यांनी आपली कामगिरी बजावली. म्हणूनच नंतरच्या काळात जेजे आणि कला संचालनालयातला भ्रष्टाचार बऱ्यापैकी आटोक्यात आला. जेजेचा निसर्गरम्य परिसर बिल्डरांच्या घशात जाता जाता राहिला. अखेरीस केंद्र सरकारलादेखील याची दखल घ्यावी लागली. केंद्र सरकारकडून डिनोव्हो दर्जा देण्याचं जाहीर झालं. यात आपला खारीचा का होईना वाटा आहे याचं समाधान मोठं आहे.

मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या भावी चित्रकारांच्या असंख्य पिढयांना जे जे स्कूल ऑफ आर्ट दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवील. त्या संदर्भात इतकं प्रचंड दस्तावेजीकरण करून ठेवलं आहे की भविष्यात या क्षेत्रात काम करणाऱ्यांची भ्रष्टाचार करण्याची हिंमतच होणार नाही. हे जर ‘चिन्ह’ने पुढाकार घेऊन केलं नसतं तर जे जे आणि परिसराचं काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही. म्हणूनच ‘चिन्ह’च्या नियमित वाचकांना विनंती आहे की आजवर आपण जसा प्रतिसाद दिलात तसाच पुढंही द्या. लवकरच शिक्षणक्षेत्रातला भ्रष्टाचार या विषयाखेरीज चित्रकला विषयक, दृश्यकला विषयक खूप नवी माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय. कोरोनाचा तडाखा या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यातून हे क्षेत्र आता आता पुन्हा उभारी घेऊन येऊ लागलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आता पूर्वीसारखी प्रदर्शनं भरत नाहीत. कलाक्षेत्रातल्या बातम्यादेखील पूर्वीसारख्या येत नाहीत. त्यामुळेच काही काळ आम्ही शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष दिलं होतं. त्याचे परिणामही आपण पाहतो आहोत. दिवाळीनंतर परिस्थिती सुधरेल असं जाणकार सांगतायेत. तोपर्यंत आपण वाट पाहूया! काय?

सतीश नाईक 

संपादक, ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.