Features

‘ अकु ‘ शैलीचे निर्माते : अनंत कुलकर्णी

अनंत कुलकर्णी सर गेल्याची बातमी  ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकरांकडून समजली. तत्क्षणीच मन मागे गर्रकन जात काळाच्या ‘ अनंत ‘ आठवणींचा मागोवा घेतला गेला. अनंत कुलकर्णी आम्हांला १९८७ ते १९८९ या कालावधीत सर जे जे उपयोजित कला महाविद्यालयात चौथ्या आणि पाचव्या वर्षाला इलस्ट्रेशन विषयासाठी होते. एकदम शांत , मितभाषी आणि सौम्य प्रकृतीचे कुलकर्णी सर लेक्चर नसेल तेव्हा रेस्ट रूममध्ये निवांतपणे पॅडवर स्केचिंग किंवा नोटिंग करताना हमखास आढळत.

बोधचित्रे म्हणजे इलस्ट्रेशन विषयावर दिलेली त्यांची लेक्चर्स अद्याप लक्षात आहेत. अगदी थोडक्यात नेमके बोलून हा विषय ते समजावून देत. जोडीला भारतीय तसेच परदेशी प्रकाशनं ,पुस्तकांमधील नामवंत इलस्ट्रेटर्सची कामे दाखवत. त्याचबरोबर धर्मयुग , इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया , रीडर्स डायजेस्ट अशा नामवंत प्रकाशनांमधून प्रसिद्ध झालेली त्यांची स्वतःची इलस्ट्रेशन्स देखील वानगीदाखल दाखवत. ही विशेष महत्वाची गोष्ट आहे. ती अशासाठी की, कला महाविद्यालयात अध्ययन करणाऱ्या अध्यापकांकडून बाहेरील कमर्शियल जगात स्वतः उल्लेखनीयरित्या केलेली कामे तशी खूपच अभावाने असतात. अर्थात याला अपवाद आहेत आणि ते देखील अगदी थोडे म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. अशावेळी कला महाविद्यालयाबाहेरील कमर्शियल जगात स्वतःचे दर्जेदार व्यावसायिक कामांचे सातत्य राखत दुसऱ्या बाजूला कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी इलस्ट्रेशन्स विषय उलगडून दाखवणारी विविधांगी लेक्चर्स देणं ही त्यांची विशेष गोष्ट अद्याप स्मरणात राहिली आहे. त्यासाठी आजूबाजूच्या जगात सततच्या निरीक्षणांतून आढळणारे विश्व पॅडवर स्केचिंग नोंदींसह उमटत असे. आतापर्यंत अशी शेकड्याने भरून गेलेली पॅड्स असतील की त्यातील अगणित नोटिंगच्या नोंदी हा तर पीएचडी साठीच्या अभ्यासाचा विषय होऊ शकेल. यात मुख्यत्वे इलस्ट्रेशन आणि टायपोग्राफी यावरील अभ्यासपूर्ण नोंदी आहेत. इलस्ट्रेशन्स खेरीज त्यांची स्वतःची वेगळी अशी टायपोग्राफीवरची शैली होती. या स्वतःच्या शैलीतून कथा , कादंबऱ्यांच्या विषयांवर केलेल्या बोधचित्रांबरोबर उल्लेखनीय टायटलस / शीर्षके सजवत.

अनंत कुलकर्णी सरांच्या दर्जेदार कामांना ‘ अकु ‘ शैली असे कायम कौतुकानं म्हणत आलो आहे. ग्राफिक पद्धतीचे निरनिराळे आकार , काटकोनात्मक व वर्तुळाकार वळणदार रेषा आणि तजेलदार रंगसंगती ही ‘ अकु ‘ शैलीची वैशिष्ट्ये होती. मुळात स्वतःची अशी उपजत स्वतंत्र शैली असणारी कलावंत मंडळी फारच थोडी असतात. दलाल, गोडसे, मिरांडा , फडणीस, कवडी , मुळगांवकर , परांजपे , दाभोळकर अशा अनेक भारतीय बोधचित्रकारांनी आजपर्यंत आपल्या कलेतून स्वतःची खास अशी शैली निर्माण केली आहे. यात अनंत कुलकर्णी यांनी स्वतःचे वेगळे स्थान आहे हे निःसंशय. कुलकर्णी सरांनी काही वास्तुचित्रांच्या रेखाटनांची बोधचित्रे चितारलेली आहेत. मनावर घेतले असते तर कदाचित यथार्थदर्शन घडवणाऱ्या वास्तुचित्रणाच्या क्षेत्रात ‘ अकु ‘ शैलीचा ठसा ते नक्कीच उमटवू शकले असते असे आजही अनेकदा ठामपणे राहून राहून वाटते.

मी मूळ रत्नागिरीचा असल्याने फेसबुकवर बरेचदा विषयानुरूप गावाकडील भटकंतीची क्षणचित्रे सादर केली आहेत. त्याचबरोबर स्वतःची काही बोधचित्रांची , शीर्षकांची व्यावसायिक कामं शेअर केली आहेत. बोधचित्रे आणि शीर्षके असणाऱ्या पोस्ट्सवर सरांच्या उत्तेजनात्मक प्रतिक्रिया येत असत. पुढे अशाच काही रत्नागिरीच्या फोटो – माहितीच्या पोस्ट्स पाहिल्यावर स्वतः कुलकर्णी सरांचा कौतुकाने प्रेमळ चौकशी करणारा फोन आला आणि पुढे तो सातत्याने अधून मधून येत राहिला. त्यांच्या आग्रहानुसार अंबरनाथला त्यांच्या घरी गेलो होतो. घरात पाऊल पडताक्षणीच त्यांच्या खास ग्राफिक पद्धतीच्या ‘ अकु ‘ शैलीच्या बोधचित्राने सजवलेली हॉलमधील एक डिझाइनर भिंत बराच वेळ पाहत राहिलो होतो. जे जे चं जग , प्रसिद्ध झालेली बोधचित्रे , आपल्या कामांवरील निश्चित विचार अशा बऱ्याच विषयांवर गप्पा झाल्या. ज्योस्त्ना प्रकाशनानं प्रकाशित केलेली त्यांची पुस्तके पाहिली. ‘ क्रिएटिव्ह गागा ‘ सारख्या मासिकाने त्यांच्या कामावर प्रसिद्ध केलेला विशेष अंक पाहिला.

या गप्पांदरम्यान त्यांची सासुरवाडी खुद्द रत्नागिरीची आहे असे समजल्यावर मग सगळा उलगडा झाला. रत्नागिरीतील फगरवठार भागातीलप्रिंटिंग प्रेसवाल्या श्री दत्तभक्त नाटेकरांचे ते जावई. नाटेकरांच्या शेजारी फार पूर्वीपासून साठे मंडळींनी स्थापन केलेले पवित्र श्री दत्तस्थान आहे. या स्थानावर साक्षात श्री टेंबे स्वामींनी दिलेल्या पादुकांची स्थापना करून साठे मंडळींची अविरत सेवा सुरु आहे. स्वतः वृत्तीने अनंत कुलकर्णी सर धार्मिक होते. फगरवठार भाग डोंगरात असल्याने आंबा , नारळ, केळी आणि सुपारीच्या बागांनी नटलेला आहे. त्यामुळे त्यांना रत्नागिरीचे , पर्यायाने कोंकणाचे अप्रूप राहिले होते. कोंकणातल्या सासुरवाडीवर ते भरभरून बोलले. सरांना व्यंगचित्रे रेखाटण्याची आवड होती. त्यांनी अफलातून रेखाटलेला सर जे जे कॅन्टीनमधला ‘ रत्न्या ‘ नामक गडी हा रत्नागिरीचा होता. कधीतरी माझ्यासमवेत रत्नागिरी परिसरातील अद्याप न पाहिलेल्या विविध निसर्गरम्य भागांत जाऊन स्केचिंग , नोटिंग करण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी अनेकदा ही इच्छा बोलून दाखवली होती.पण तो योग कधीही जुळून आलाच नाही.

भारतीय शैलीची लघुचित्रे , बोधचित्रे हा विषय यापुढे कधीही निघाला तर त्यात ‘ अकु ‘ शैलीवर नक्कीच प्रशंसनीय चर्चा होईल याची खात्री आहे.
या अफलातून ‘ अकु ‘ शैलीचे मानकरी अनंत कुलकर्णी सर यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली.

– अनीश दाते
dateaneesh@gmail.com

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.