Features

चिपळुणात रंगला ‘चित्रयज्ञ’ !

चिपळूणमध्ये दि.14 ते 16 मे दरम्यान सलग 48 तास चित्रयज्ञ साकार झाला. या चित्रयज्ञामध्ये चिपळूणच्या अनेक हौशी आणि व्यावसायिक चित्रकारांनी मनापासून सहभाग घेतला. या चित्रयज्ञाची कल्पना प्रत्यक्षात आणणारे संतोष केतकर यांनी मनोगताच्या माध्यमातून ‘चित्रयज्ञ’ संकल्पनेची माहिती या लेखात दिली आहे. या मनोगतामुळे प्रेरणा घेऊन जर असे चित्रयज्ञ गावोगावी झाले तर या लेखाचा उद्देश सफल होईल.

चिपळूणमध्ये दि.14 ते 16 मे दरम्यान सलग 48 तास चित्रयज्ञ साकार झाला. सातत्यानं काहीतरी वेगळं…वेगळ्या वाटेनं करत शिकायचा माझा प्रयत्न असतो. मुंबई पुण्याचे कलाकार बोलावून त्यांचं चित्र प्रदर्शन करता आलं असतं. कलाकारांना घरी चित्रं काढून आणायला सांगून चित्र प्रदर्शन झालं असतं. पण अशी प्रदर्शनं सर्वत्र होतात. म्हणून मनात विचार घोळू लागला…सगळ्या कलांचं एकत्रित सादरीकरण करायचं, सगळ्या कलाकारांना एकत्र काम करायला सांगायचं. कलेचं माध्यम, वेळ यांचं बंधन ठेवायचं नाही. त्या निमित्तानं सगळे कलाकार एकत्र येतील. कलेची देवाण घेवाण होईल. स्थानिक कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळेल. हा उपक्रम केला तर नक्कीच यशस्वी होईल याची खात्री होती. या निमित्तानं माहीत नसलेले अनेक कलाकार लोकांसमोर येतील असंही मनापासून वाटत होतं.

हा विषय मुकुंद काणे यांना बोललो. त्यांनाही कल्पना आवडली. लगेचच राजेशिर्के सर, माणिक यादव, परीट सर, नंदकुमार साळवी या ज्येष्ठ कलाकारांशी बोललो. त्यांनाही यातलं वेगळेपण भावलं. अगदी सहजपणं त्यांनी या चित्रयज्ञाला पाठिंबा दिला…नव्हे दिवस रात्र चित्रयज्ञात आपली कला सादर केली. नियोजनासाठी दोन सभा घेतल्या. त्यातील उपस्थिती पाहून हा उपक्रम यशस्वी होणार याची खात्री पटली.

परशुराम एज्युकेशन सोसायटीने गुरुदक्षिणा सभागृह देऊन मोठा हातभार लावला. संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा व रंगकर्मी ग्रुपने 14 ते 16 कार्यकर्त्यांची रसद पुरवली. कलाकार मागतील ती वस्तू हातात मिळत होती.

या चित्रयज्ञात वेगवेगळ्या कलांचे कलाकार एकाच ठिकाणी काम करत होते. लँडस्केप, पोर्ट्रेट, स्केचिंग, स्टील लाईफ, मण्डल आर्ट, वॉल हँगिंग, वारली पेंटिंग, सिरॅमिक आर्ट, बॉटल आर्ट, कॅरिकेचर, शाडू शिल्प, क्लॉथ पेंटिंग, पेपर क्वीलिंग, रचना चित्र, लिंपन आर्ट, गोंड चित्रकला, मेटल एम्बॉसिंग, कॅलिग्राफी, कागद कात्रण, ओरिगामी, थ्रेड आर्ट, रांगोळी, असे नानाविध प्रकार साकारले गेले. 15 वर्षापासून 76 वर्षापर्यंत सर्व वयोगटातले 70 कलाकार एकत्र काम करत होते. एकत्र काम करण्याचा वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. कलेला सुद्धा भावना असतात कलाकारांच्या मनातील भाव त्यांच्या चित्रात उमटत होते.

हायस्कूलच्या गेटवर यादव सर, परीट सर लँडस्केप करत होते, अमेय भावे व सह्याद्री आर्ट स्कूल मधील विद्यार्थी पोर्चमध्ये व्हरांड्यात बसून काम करत होते. चिपळूणचा हरहुन्नरी रमेश गोंधळेकरचा सर्वत्र संचार होता. त्याने लँडस्केप, पोर्ट्रेट आणि  मातीकामात पोर्ट्रेट केलं, भाग्यश्री वाडकर, आयुष भैरवकर, हेमंत कुलकर्णी, संजय कारेकर, सतीश कदम, मुकुंद काणे, प्रांजली चितळे, डॉ. वर्षा थत्ते, नातू मॅडम, पल्लवी भावे, धामणकर, शेट्ये, दुब्बावर, भावे आजी ….क्या बात है. आणखी किती नावं घेऊ. सगळेच भारी होते. साळवी सरांची उठावाची रांगोळी, गालिचा अजून डोळ्यासमोर आहे. अनुजा कानिटकर फार मोठं नाव करेल कोकणचं. राजेशिर्के सर दिवस रात्र काम करत होते. मी मात्र रात्रीचा मानकरी. Anomorphy ड्रॉइंगचा प्रयत्न केला. बऱ्याचदा वेळ वाचवण्यासाठी कॉम्प्युटरवर करतो. पण इथे वेळ द्यायचा असल्याने स्केच केलं ज्यांना शिकायचं होतं त्याना त्यातलं low of reflection कसं वापरलं जातं ते सांगितलं. अगदी चित्रयज्ञ संपता संपता पेनने पुलंचं अर्कचित्र करायचा प्रयत्न केला.

या चित्रयज्ञाने कलाकारांना, रसिकांना, आयोजकांना वेगळाच आनंद दिला. एक वेगळा अनुभव सर्वांनी घेतला. चतुरंगचे विद्याकाका म्हणतात त्याप्रमाणे कोकणला कलावंतांची खाण म्हणायला चित्रयज्ञाचा हा आरसा पुरेसा स्पष्ट आहे.

मला जरी चित्रयज्ञाची कल्पना सुचली असली तरी तो साकार झाला कलाकार व कार्यकर्ते यांच्यामुळे आणि सर्वमुखी झाला रसिक प्रेक्षकांच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे. मी निमित्त मात्र.

पुन्हा अशा नवीन संकल्पनांसह लवकरच भेटू !

********

– संतोष केतकर
9850888274.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.