Features

आर्ट नाईट थर्सडे – एक सुंदर अनुभव!

‘आर्ट नाईट थर्सडे’ ही मुंबईतील समकालीन कला जोपासणाऱ्या कलादालनांनी राबवलेली, परस्पर सहकार्यावर आधारित असलेली कल्पना आहे, जी चांगलीच यशस्वी झाली आहे. विनील भुर्के यांनी या महिन्याच्या आर्ट नाईट थर्सडेला कलाप्रेमींच्या एक समूहासोबत विविध कलादालनांना भेट दिली आणि त्यांना आलेला सुंदर अनुभव कथन केला आहे. 

या वर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे या जुलैचा आर्ट नाईट थर्सडे (१३ जुलै) हा मुंबईतील पावसाच्या शिडकाव्याने मोहोरलेला या वर्षातील पहिलावहिला आर्ट नाईट थर्सडे असणार, अशी अपेक्षा होती. मुसळधार पावसात मेट्रोच्या कामांमुळे गुदमरलेल्या रस्त्यांवरून वाट काढत जावे लागेल या विचाराने मीही थोडासा त्रस्त झालो होतो. पण या आर्ट नाईट थर्सडेचा अनुभव एक सुंदर अनुभव ठरला. त्यासाठी ज्यांच्यासोबत मी फिरलो त्या कलाप्रेमींचे आभार मानायला हवेत.

आर्ट नाईट थर्सडेसंबंधी चिन्हमध्ये याआधीचे लेख प्रसिद्ध झाल्यापासून आम्हाला या कार्यक्रमाबद्दल वाचकांचे अभिप्राय मिळत आहेत, तर काही वाचक उत्सुकतेने चौकशी करत आहेत. काही वाचक या अनुभवाबद्दल उत्सुक होते आणि त्यांना प्रथमच हा अनुभव घ्यायचा होता. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी मदत होईल अशी काही माहिती मिळवण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठीच आम्ही या विषयावरील आमच्या याआधीच्या पोस्टमध्ये संपूर्ण तपशीलांसह एकूण १८ प्रदर्शनांची यादी (१३ जुलै रोजी असलेले ५ प्रदर्शनांचे प्रीव्यू आणि सध्या चालू असलेली अन्य १३ प्रदर्शने) आधीच दिलेली आहे. ज्यांनी यांच्याकडे चौकशी केली त्यांना आम्ही अधिक माहिती देखील दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये कलाप्रेमींच्या काही अनौपचारिक समूहांनी आर्ट नाईट थर्सडेचा उपक्रम नियमितपणे राबवण्याचा प्रयत्न केला असला तरी, लॉकडाऊनच्या काळात त्यात व्यत्यय आला. सुदैवाने मी श्री बालचंद्रन (मित्रपरिवार त्यांना प्रेमाने ‘बाला’ या लाडक्या नावाने संबोधतो) यांनी सुरू केलेल्या अशाच एका अनौपचारिक समूहाच्या संपर्कात आलो. बालचंद्रन हे अनेक दशकांचा कॉर्पोरेट करियरचा अनुभव असलेले ज्येष्ठ गृहस्थ आणि उत्कट कलाप्रेमी आहेत.

बाला अतिशय नर्मविनोदी स्वभावाचे आहेत आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या किश्श्यांचा न संपणारा साठा आहे. ते बारीकसारीक तपशीलांबद्दल विलक्षण जागरुक असतात. दिवसभरात करायच्या कामांची यादी तर ते बनवतातच, पण ठरवलेल्या त्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणण्याची तीव्र इच्छाशक्तीदेखील त्यांच्याकडे आहे. गुरुवारी काय करायचं, याची आखणी बाला यांनी सोमवारपर्यंत केलीदेखील. कोणत्या आर्ट गॅलरींना भेट द्यायची त्यांची यादी आणि ज्यांना गुरुवारी सहलीत सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते अशा कलाप्रेमी मित्रांची यादी. मी लगेचच त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सगळ्यांना संध्याकाळी ६ वाजता जहांगीर आर्ट गॅलरीत भेटायला बोलावले होते, जेणेकरून तिथून आम्ही ठरलेल्या क्रमाने वेगवेगळ्या आर्ट गॅलरींमध्ये जाऊ शकू. रिमझिम पावसातून वाट काढताना मला लक्षात आले की मी माझी छत्री घरीच विसरलो आहे!

मी आर्ट नाईटची सुरुवात १३ जुलैच्या गुरुवारी दुपारीच फोर्ट परिसरातील TARQ आर्ट गॅलरीला भेट देऊन केली. http://www.tarq.in/ तिथे ध्वनी गुडका यांनी क्यूरेट केलेल्या एफीमेरोप्टेरा: टाइम आफ्टर टाइमया शीर्षकाचे समूह चित्र प्रदर्शन सध्या चालू आहे. हे प्रदर्शन TARQ आणि Gallery XXL यांनी संयुक्तपणे सादर केले आहे. ‘एफीमेरोप्टेरा’ हा कीटकांच्या वर्गीकरणातील एक समूह आहे ज्यामध्ये मेफ्लाय किंवा माशीसारखे अल्पायुषी कीटक असतात. या प्रदर्शनात सादर केलेली कामे जीवनातील प्रतिमांचे जीवाश्म बनवण्याचा प्रयत्न करतात. नष्ट होत असलेल्या इमारती, नष्ट होणाऱ्या जीव-प्रजाती आणि बदलणाऱ्या जीवनपद्धतींचे प्रतिकात्मक स्मारक बनवून, होणाऱ्या या हानीचे अवशेष कलाकृतींच्या स्वरूपात जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. जीवनाचे हे असे अनुभव कृत्रिमरित्या तयार केलेले कीटक आणि रित्या कॅनव्हासवर धातूच्या असंख्य टाचण्या टोचलेल्या स्वरूपात सादर केले जाऊ शकतात, हे अतिशय रंजक आहे. खऱ्या अर्थाने समकालीन कलेची निश्चित ओळख असलेली अशी ही कलात्मक अभिव्यक्ती आहे.

 

त्यानंतर मी काला घोडा परिसरातील ‘द मेथड’ आर्ट गॅलरीत गेलो. https://themethod.art/ सध्या तिथे बॉडीज, स्पेस अँड टाइमनावाचे एक समूह प्रदर्शन चालू आहे, ज्यात अतिशय विविध प्रकारची कलात्मक चित्र अभिव्यक्ती अनुभवायला मिळते. गॅलरीत प्रवेश करत असताना तिथली अगदी जवळ असल्यासारखी भासणारी चित्रे आपले स्वागत करतात, परंतु या गॅलरीला वरचा मजलासुद्धा आहे हे पटकन लक्षात येत नाही. वरच्या मजल्यावर गेल्यावर मात्र आपल्याला चित्रांच्या दुनियेत पक्ष्यांसारखे उडत असल्यासारखा अनुभव येतो.

द मेथड काला घोडा येथील ‘बॉडीज, स्पेस अँड टाइम’ मधील एक चित्र 

त्यानंतर पुढे जात मी जहांगीर आर्ट गॅलरीत https://jehangirartgallery.com/ पोहोचताना बाला आणि त्याच्या मित्रपरिवाराला भेटायला उत्सुक होतो. तिथल्या पायऱ्या चढत असताना त्याच्या यादीतील किती कलाप्रेमी आले असतील, असा प्रश्न मला पडला. त्याचवेळी मला थोडासा दिलासा मिळाला कारण तोपर्यंत पाऊस आश्चर्यकारकरित्या कमी झाला होता.

जहांगीर आर्ट गॅलरीत नुकताच त्यांचा ‘४३ वा मान्सून आर्ट शो’ पार पडला, त्यावर मी चिन्हमध्ये लिहिले होते. आता तिथे ‘आर्ट फॉर कन्सर्न’ संस्थेतर्फे ‘द अॅन्युअल मान्सून शो’ नावाचे दोन दिवसांचे निधी उभारणीसाठीचे प्रदर्शन होते, ज्यामध्ये सिक्युअर गिव्हिंग’ यांच्याद्वारे आयोजित चित्रे व शिल्पांचे प्रदर्शन आणि विक्री असा कार्यक्रम होता. सिक्युअर गिव्हिंग’ संस्था धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारणी कार्यक्रमांची संकल्पना निर्मिती आणि आयोजन करते.

जहांगीर आर्ट गॅलरीत ‘द अॅन्युअल मान्सून शो’

इथे माझी बालाने निमंत्रित केलेल्या कलाप्रेमींच्या समूहाशी ओळख झाली. यामध्ये कलाकार, कलाप्रेमी आणि कलाक्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तींचा समावेश होता हे लक्षात आल्यावर मला आनंद झाला. आता बालाने त्या संध्याकाळच्या प्रिव्ह्यू शोजना भेटी देण्यासाठी जो क्रम ठरवला होता त्याप्रमाणे कूच करण्याचे आम्ही ठरवले. त्यानुसार आम्ही आमच्या मार्गावरील सर्वात दूर असलेल्या ठिकाणाकडे म्हणजेच कुलाब्यातील ‘थर्ड पास्ता लेन’कडे जायला सुरुवात केली, जेणेकरून आर्ट नाईट दरम्यान परतीच्या वाटेत आम्ही चर्चगेट आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांच्या जवळपास असलेल्या इतर ठिकाणी जाऊ शकलो असतो. त्यामध्ये रात्री उशीरा आपण ट्रेन स्टेशनच्या शक्यतो जवळ असायला हवं, असा बालासारख्या अनुभवी मुंबईकराचा पद्धतशीरपणे काम करण्याचा दृष्टिकोन दिसत होता. ‘थर्ड पास्ता लेन’मध्ये आम्ही ‘साक्षी गॅलरी’ आणि त्यानंतर ‘APRE आर्ट हाऊस’ला भेट देणार होतो. त्याच लेनमध्ये आणखी दोन आर्ट गॅलरी – गॅलरी मस्कारा आणि किस्मत आर्ट गॅलरी – असूनही या आर्ट नाईट थर्सडेच्या यादीमध्ये त्यांची नावं जाहीर झालेली नसल्यामुळे, त्या दोन गॅलरीज त्या संध्याकाळी खुल्या असतील की नाही, याची आम्हाला खात्री नव्हती.

जहांगीर आर्ट गॅलरीत कलाप्रेमींचा आर्ट नाईट थर्सडे समूह

साक्षी गॅलरीमध्ये https://www.sakshigallery.com/ १२ कलाकारांनी सादर केलेल्या ‘सेवन्थ चॅप्टर’ नावाच्या समूह प्रदर्शनामध्ये असलेल्या विविध कलाकृतींचा आम्ही अनुभव घेतला. किम सेओला यांची उत्कृष्ट जलरंग चित्रे, लक्ष्मण राव कोट्टुरू यांची लक्षवेधी धातूशिल्पे, नंदिनी वल्ली मुथिया यांची छायाचित्रे, रोशन छाब्रिया यांची सागवान लाकूड आणि जलरंगाची संमिश्र शिल्पे, सलिक अन्सारी यांचे कटआउट वुड पॅनल्स, तेजा गवाणकर यांनी साकारलेली धातूशिल्पे अशा काही कलाकृती विशेष लक्षवेधी होत्या. साक्षी गॅलरीच्या संचालिका श्रीमती गीता मेहरा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आर्ट नाईट थर्सडे संबंधी त्यांचे विचार आणि ते आयोजित करतानाचे त्यांचे  अनुभव सांगितले. त्यांच्या मते, मुंबईतील समकालीन कला जोपासणाऱ्या कला दालनांनी राबवलेली, परस्पर सहकार्यावर आधारित असलेली कल्पना आहे, जी चांगलीच यशस्वी झाली आहे. ही कल्पना मुंबई शहराच्या वातावरणाला अनुकूल आहे, कारण मुंबई शहर संध्याकाळ आणि रात्रीच्या बाहेर फिरण्यासाठी इतर शहरांच्या तुलनेत सुरक्षित मानले जाते.

लक्ष्मण राव कोट्टुरू – साक्षी गॅलरी येथे ‘प्लांटेशन फॉर पार्टिशन’ शिल्प

साक्षी गॅलरीत एक कलाकृतीबद्दलच्या चर्चेत मग्न आमच्या समूहातील कलाकार

साक्षी गॅलरीत ‘सेवन्थ चॅप्टर’ प्रदर्शनाचा आनंद घेणारे कलाप्रेमी

आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणाकडे म्हणजेच थर्ड पास्ता लेनच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ‘APRE आर्ट हाऊस’कडे निघालो तेव्हा रस्त्यावर लहान मुले चक्क गल्ली क्रिकेट खेळत होती. कारण पावसाने संध्याकाळची विश्रांती घेतली होती.

थर्ड पास्ता लेनमधून चालताना 

APRE Art House https://www.aprearthouse.com/ तरुण कलाप्रेमींच्या गर्दीने गजबजले होते. ‘इंटरिम II’ नावाचे १२ समकालीन कलाकारांचे समूह प्रदर्शन तिथे चालू होते. तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर पसरलेल्या वैविध्यपूर्ण कलाकृतींच्या दर्शनाने समकालीन कलेची ताजी अनुभूती दिली. तिथे आम्ही चैतन्य मोडक या कलाकाराला भेटून संवाद साधू शकलो. ‘कला ही भेटवस्तू आहे’ या त्यांच्या संकल्पनेअंतर्गत ‘कलाकाराने पैसे कमवू नयेत’ असे अतिशय वादग्रस्त ठरू शकेल असे विधान असलेल्या, त्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी पेट्या त्यांनी प्रत्येकाला भेट म्हणून दिल्या. आमच्या समूहातील अनेक सदस्य स्वत: कलाकार असल्याने त्यांनी त्यांच्याशी त्या धर्तीवर सखोल संवाद साधला. मला असे वाटते की त्यामुळे प्रेक्षकांना कलेशी जोडून घेण्यास प्रवृत्त करण्याचा समकालीन कलेचा उद्देश अतिशय चांगल्या प्रकारे साधला गेला. समकालीन कलेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे एक असे वैशिष्ट्य आहे, ज्याची मी प्रशंसा करतो.

APRE आर्ट हाऊस येथे कलाकार चैतन्य मोडक (बसलेले) यांच्याशी उत्कंठापूर्ण संभाषण

जसजशी रात्र होत होती, तसतसे आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणाकडे, म्हणजे बॅलार्ड इस्टेट भागात असलेल्या गॅलरी ISA कडे निघालो. संध्याकाळी उशिरा या भागात जायला टॅक्सी ड्रायव्हर्सना मनवणे थोडे अवघड होते. अथक प्रयत्न केल्यावर आम्ही त्यात यशस्वी झालो.

गॅलरी ISA मध्ये https://galerieisa.com/ आम्ही ‘डिफरंट रिअल्म्स’ या प्रदर्शनाचा प्रीव्यू अनुभवला यामध्ये डायना अल-हदीद आणि लुई डेस्पंट या दोन स्त्री कलाकारांचे एकत्र सादरीकरण आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये स्थापत्यशास्त्रातील तसेच इतर विविध संदर्भ आणि प्रेरणास्त्रोत आहेत. त्यामध्ये विश्वशास्त्र, गूढ वस्तू, धार्मिक कला, ऐतिहासिक प्रतिमा आणि कार्टोग्राफी यांचा समावेश आहे. पॉलिमर जिप्सम, फायबरग्लास, स्टील, तांबे आणि सोन्याचे वर्ख यांसारख्या माध्यमांचा आणि सामग्रीच्या अभिनव संयोजनाचा वापर डायनाच्या 3D कलाकृतींमध्ये केलेला दिसतो. हा वापर राहत्या घरांचे आणि त्यामधील अंतर्भागांचे चित्रण करण्यासाठी अद्भुत प्रकारे केला आहे. लुईसचे लिथोग्राफ अशा घरांच्या गोष्टी प्रेक्षकांना सांगू लागतात तेव्हा प्रेक्षकांची त्यांच्याशी मैत्री होत जाते. 

गॅलरी ISA मधील ‘डिफरंट रिअल्म्स’ प्रदर्शनात लुईस डेस्पंट आणि डायना अल-हदीद यांच्या कलाकृती 

गॅलरी ISA च्या वास्तूचे एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या काही भिंती आणि कमानी जुन्या आणि छिन्नीने घाव घातल्यासारख्या दिसतात पण त्याचवेळी इतर भिंती आणि आतील सजावट मात्र अतिशय आधुनिक आणि सुबक आहे. या दोन्हीमधील फरक एक वेगळीच गंमत आणतो. त्याचसोबत उत्तम प्रकारे डिझाइन केलेल्या प्रकाशयोजनेचा वापर करून अशा उत्कृष्ट कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी सुयोग्य वातावरणनिर्मिती केलेली आहे.

गॅलरी ISA मध्ये चर्चेत रमलेले कलाप्रेमी

आर्ट नाईट थर्सडे – एक सुंदर अनुभव!

श्री बालचंद्रन यांच्यासोबत कलाप्रेमी – बाला‘ (डावीकडून तिसरे)

आर्ट नाईट थर्सडेचा आनंद लुटण्यात आम्ही इतके तल्लीन झालो होतो, की कोणालाही वेळेचे भान राहिले नव्हते. रात्री ९:३० वाजता आम्हाला लक्षात आले की आज बघायच्या ठरवलेल्या इतर अनेक आर्ट गॅलरी बघायच्या राहून गेल्या आहेत आणि हे सर्व बघण्यासाठी एक नाईट थर्सडे पुरेसा नाही. त्यासाठी पुन्हा एकदा लवकरच भेटायचे सर्वानुमते ठरवून घरी परतीच्या वाटेला लागलो. घरी जाताना मी बालाला सहज म्हटले, “आपण नशीबवान आहोत, आज संध्याकाळी अजिबात पाऊस पडला नाही.” त्याने अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिले, “मला माहीतच होते की आज पाऊस पडणार नाही!”.

पाऊस थांबवणे हेही त्याने बनवलेल्या कामांच्या यादीमधील ठरवून घडवून आणलेले एक कामच होते की काय, असा प्रश्न मला पडला आहे!

******

विनील भुर्के

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.