Features

आता लता मंगेशकर महाविद्यालयाचा बट्ट्याबोळ?

(उत्तरार्ध)

ज्याच्या नेमणुकीवरून माध्यमांमध्ये सध्या प्रचंड गदारोळ चालू आहे असा अधिकारी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या सल्लागार मंडळाचा सदस्य सचिव आणि ज्याच्या कर्तृत्वामुळे जेजे स्कूल ऑफ आर्ट सारख्या १६६ वर्षाच्या कला महाविद्यालयाची मान्यता ए आय सी टी इ सारख्या केंद्र सरकारच्या विभागाने काढून घेतली काढून घेतली असा  महापराक्रमी अधिकारी याच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदावर नेमला गेला असल्याने  महाराष्ट्र सरकारला खरोखरच लतादीदींच्या स्मरणार्थ स्मारक उभारायचं आहे  का याविषयी मोठे प्रश्न उभे राहिले आहे ते…. त्याचाच हा परामर्श…

आता हे सारं लिहायचं कारण असं की, नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय कलामहाविद्यालयाची एक जाहिरात प्रसारित केली आहे. ती जाहिरात या लेखामध्ये प्रसिद्ध करत असल्यामुळं त्यावर मी अधिक मल्लिनाथी करू इच्छित नाही. पण या जाहिरातीच्या शेवटी या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून ज्यांचं नाव आहे ते पाहून मात्र माझे डोळे विस्फारले! या विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून चक्क प्रा. वि. डो. साबळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या वि. डो. साबळेंचं कर्तृत्व चित्रकला क्षेत्रातील सर्वांनाच ठाऊक आहे. पण संगीतक्षेत्रातील लोकांना मात्र प्रा. अशोक रानडे, प्रा. मिलिंद मालशे यांच्यासारखे वि. डो. साबळे हे कोणी संगीततज्ज्ञ किंवा बुवा किंवा पंडितजी आहेत असे गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण तसे काहीही नसून श्री साबळे हे जेजे स्कूल ऑफ आर्ट या १६६ वर्षाच्या जागतिक कीर्ती लाभलेल्या कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत हे सांगणे आम्हाला आवश्यक वाटते.

हीच ती जाहिरात...
उदघाटनाच्या दिवशी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचं हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्रानं प्रकाशित केलेलं छायाचित्र (सौजन्य: गूगल)

१६६ वर्ष जुन्या असलेल्या या कला महाविद्यालयाची मान्यता साबळे यांच्या कर्तृत्वामुळेच केंद्र सरकारच्या एआयसीटीई या संस्थेनं नुकतीच काढून घेतली आहे. अशा व्यक्तीची निवड उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केली आहे. आहे की नाही उच्च व शिक्षण तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांचं कर्तृत्व? खरं तर या अधिकाऱ्यांनाच आता महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे असं आम्ही सुचवू इच्छितो.

आता तुम्ही विचाराल की इतक्या तिरकसपणे तुम्ही का बोलता आहात? त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, श्री विश्वनाथ साबळे यांनी जागतिक कीर्ती लाभलेल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट या १६६ वर्षाच्या कला महाविद्यालयाची आपल्या कारकिर्दीत अगदी दशादशा करून टाकली आहे. इतकी की अलीकडेच केंद्र सरकारच्या एआयसीटीई या संस्थेनं जेजे स्कूल ऑफ आर्टची मान्यताच काढून घेतली आहे. आता तिथं जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते सारं अनधिकृत आहे. ही मान्यता काढून घेण्याची प्रक्रिया जर एआयसीटीईनं अशीच चालू ठेवली तर भविष्यात तिथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जगातच सोडा पण भारतातदेखील कुणीही विचारणार नाही. कुठल्याही महत्वाच्या पदावर त्यांच्या नेमणूका होऊ शकणार नाहीत. हे जे काही सारं घडलं आहे ते सारं विश्वनाथ साबळे यांच्या नाकर्तेपणामुळंच.

सौजन्य गुगल

एआयसीटीईनं काढून घेतलेल्या मान्यतेमुळं श्री साबळे यांची डिपार्टमेंटल चौकशी सध्या चालू आहे. ती चालू असतानाच उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं त्यांची नेमणूक लताबाईंच्या स्मरणार्थ सुरु होणाऱ्या संगीत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी करावी याला बेशरमपणाखेरीज दुसरा कुठलाही शब्दप्रयोग वापरता येणं अशक्य आहे. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या सचिवांपासून डेस्क ऑफिसरपर्यंत साऱ्यांनाच आम्ही जाहीरपणे प्रश्न विचारतो की, हे असले निर्णय घेताना तुम्हाला जनाची नसेल पण मनाचीसुद्धा लाज का वाटली नाही? का तुम्ही असले बिनडोक निर्णय घेताय? काय असं तुम्ही विश्वनाथ साबळेंमध्ये पाहिलंत की त्यांची अशी लतादीदींसारख्या दिग्गज कलावंताच्या स्मरणार्थ सुरु होणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करावी ?

काय असं जेजेमध्ये त्यांनी कर्तृत्व दाखवलं आहे की तुम्हाला का निर्णय घेणं भाग पडावं? जेजे स्कूल ऑफ आर्टमधले विद्यार्थी शिक्षणासाठी अक्षरशः तळतळाट करताहेत, आक्रोश करताहेत, तोदेखील तुमच्या कानावर जात नाही? तुम्ही बहिरे आहात का मतिमंद? असा प्रश्न आम्ही जर जाहीरपणे विचारला तर त्यात आमचं काय चुकलं? द्याल या प्रश्नाचं उत्तर? महाराष्ट्राच्या कला संचालकपदी एकाहून एक नमुनेदार नेमणूक करून गेल्या ३० वर्षात तुम्ही कला संचालनालायचं मातेरं करून टाकलंत. त्यानं तुमचं पुरेसं समाधान झालेलं नाही? आणि आता लतादीदींच्या स्मरणार्थ सुरु होणाऱ्या या कला महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच तुम्ही या असल्या नेमणुका करू लागला आहात? काय संबंध आहे श्री साबळे यांचा आणि संगीताचा? खरं तर चित्रकलेच्या बाबतीतसुद्धा हाच प्रश्न विचारावा असं भयंकर कर्तृत्व त्यांनी गेल्या १०-१५ वर्षात गाजवलं आहे.

सौजन्य गुगल

अधिव्याख्याता पदी नेमणूक, लगेचच प्राध्यापकपदी नेमणूक, त्या पाठोपाठ लगेचच विभाग प्रमुखपदी नेमणूक. ती नेमणूक कमी पडली म्हणून पाठोपाठ जेजेच्या अधिष्ठातापदी नेमणूक. ‘पुरुषस्य भाग्यम्’ या उक्तीचा प्रत्यय देणाऱ्या या साऱ्या नेमणूका आहेत. त्यांनी असं काय कर्तृत्व गाजवलं म्हणून तुम्ही गेल्या १० वर्षात त्यांना सारं काही देऊन टाकलं? त्यांना पदोन्नती देण्याच्या नादात श्रीकांत जाधव, अनंत निकम, अनिल नाईक यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांना तुम्ही अक्षरशः नामशेष करून टाकलंत. काय असं तुम्हाला दिसलं त्यांच्यात? सांगाल का एकदा आम्हाला?

हे गृहस्थ शिक्षण क्षेत्रात काय दिवे लावताहेत? विद्यार्थ्यांना नेमकं काय देताहेत? शिक्षण क्षेत्रात कोणते नवे अभ्यासक्रम आणताहेत? याची एकदा तरी तुम्ही चौकशी केलीत? यांना शिकवता येत नाही म्हणून त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी संप केला, केलीत तुम्ही विद्यार्थ्यांची चौकशी? ‘चिन्ह’नं त्यांच्या कर्तृत्वाची एकाहून एक प्रकरणं लागोपाठ प्रसिद्ध केली. केलीत तुम्ही त्यांची चौकशी? उदय सामंतांच्या काळात तर त्यांना कलासंचालक पद बहाल करून मोकळे झालात. प्रभारी कला संचालकपदी येताच त्यांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर शिक्षकांना बाहेरची कामं करण्यास परवानगी देणारा जीआर त्यांनी प्रसिद्ध केला.

आज हे गृहस्थ कोट्यवधी रुपयांची कामं जेजेमध्ये बसून करतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? जेजे स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठात्याची केबिन त्यांनी टेबल स्पेस म्हणून वापरली आहे, हे तरी तुम्हाला ठाऊक आहे का? सरकारनं कोट्यवधी रुपये जेजे स्कूल ऑफ आर्टला दिले, पण या गृहस्थांना ३०० मुलींसाठी साधं टॉयलेट बांधण्याचीदेखील बुद्धी सुचली नाही. विद्यार्थ्यांना त्यासाठी संप करावा लागला. तरीदेखील तुम्हाला या गृहस्थाच्या कारभाराची चौकशी करावीशी वाटली नाही? आणि आता लतादीदींच्या नावे जे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय तयार होतंय त्याच्या प्रभारी प्राचार्यपदी तुम्ही त्यांची नेमणूक करता? थोडी सुद्धा लाज किंवा शरम तुम्हाला कशी वाटत नाही यांचं खरोखरच आश्चर्य वाटतं. या संगीत महाविद्यालयाच्याच सल्लागार मंडळाच्या सचिवपदी सदस्य सचिव म्हणून राजीव मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या नेमणुकीच्या आणि आजवरच्या कर्तृत्वाच्या अक्षरशः चिंध्या चिंध्या ‘मॅक्स महाराष्ट्र’नं करून ठेवल्या आहेत त्या सध्या कला वर्तुळात मोठया प्रमाणात चर्चिल्या जात आहेत. त्यावर सुद्धा तुम्ही गप्पच बसणार आहात?

मला कल्पना आहे की मी अतिशय जहाल भाषा वापरतोय, पण माझा केवळ नाईलाज झालाय. कारण श्री साबळे यांनी चित्रकला शिक्षण क्षेत्रात जे अराजक माजवलंय ते पाहिल्यावर माझी भाषा ही सौम्यच वाटेल. हे जर असंच चालू राहणार असेल तर ‘चिन्ह’ शांत बसणार नाही हे निश्चित. माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागवतोय, पण त्यासाठी अनेक सबबी सांगितल्या जाताहेत. आणखीन किती काळ त्या सांगितल्या जाणार आहेत हे देखील आम्ही पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही या प्रकरणाचा निकाल लावावा हे बरे!

आश्चर्य मंगेशकर कुटुंबीयांचं वाटतं. त्यांना हे सारं ठाऊक नसेल? नसेलही कदाचित. पण आदिनाथ मंगेशकर हे त्या जेजेचेच माजी विद्यार्थी. त्यांनी तरी निदान चौकशी करायला नको होती का? या असल्या गृहस्थांना प्राचार्यपदी ठेऊन तुम्ही भावी संगीतकारांना सामोरे जाणार आहात का? महाराष्ट्र शासनाला आमचा जाहीर सवाल आहे की महाराष्ट्राच्या आधीच्या मंत्रिमंडळातील एक माजी मंत्री (जो आताच्या मंत्रिमंडळात देखील आहे) म्हणतो की, ‘शिक्षण देणं हे शासनाचं काम नाही.’ म्हणून तुम्ही जेजे स्कूल ऑफ आर्ट बंद करायला निघाला होतात. मग आता लता मंगेशकर यांच्या नावे संगीत महाविद्यालय, ते देखील आंतरराष्ट्रीय स्थापन करायला का निघालात? आहे या प्रश्नांचं उत्तर तुमच्यापाशी? महाराष्ट्रातल्या किती पिढ्यांशी तुम्ही हे असले अघोरी खेळ करणार आहात? द्याल उत्तर?

समाप्त

सतीश नाईक 

संपादक

चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.