Features

‘लिलाव लीला’

गायतोंडेंच्या चित्रांना जेव्हा लिलावात कोटींची बोली लागू लागली तेव्हा महाराष्ट्राचं लक्ष या लिलाव प्रक्रियेवर गेलं. चित्रांना एवढी किंमत येते हे बघून लोकांना आश्चर्याचे धक्के बसू लागले. आणि चित्रांचे ऑक्शन हाउसेस असतात हे लोकांना माहित झाले. असेच एक भारतातील नामवंत ऑक्शन हाऊस म्हणजे ‘पंडोल’. सध्या दादीबा  पंडोल या ऑक्शन हाऊसचं नेतृत्व करतात. दिनांक १३ सप्टेंबर रोजी इथे काही चित्रांचा ज्यात एम. एफ हुसेन, गणेश पाईन, बर्वे यासारख्या दिग्गज चित्रकारांच्या चित्रांचा लिलाव होता.  लिलाव कसे होतात, त्यात कोण कोण येतं याचा आखो देखा वृत्तांत सांगितला आहे ई साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत यांनी.

त्या गॅलरीचं नाव पंडोल आहे हे मला आत्ताच कळलं. आधी मी त्याला पुंडोले म्हणायचो. मला चित्रांची आणि चित्रकलेची आवड असली तरी ज्ञान व जाण यथा तथाच आहे. त्यातही ही लाख, कोटी वगैरे किंमतीची चित्र असतात तरी कशी आणि का याचं कुतूहल होतं.  पंडोल आर्ट गॅलरीला आरा, हुसेन, प्रभाकर बरवे, नंदलाल बोस, टागोर बंधू, बेंद्रे  अशा चित्रकारांची चित्रं आणि स्कल्प्चर्स डिस्प्लेला आहेत आणि त्यांचे ऑक्शन होणार आहे हे कळलं, तेव्हा जायचा विचार केला. सतीश नाईक यांच्या सारख्या चार लोकांना विचारलं तेव्हा त्यातल्या तिघांनी ते प्रवेश देणार नाहीत असं सांगितलं तर एकाने जाऊन बघा असं सल्ला दिला. 

नारायण श्रीपाद बेंद्रेंच्या या चित्राला एक करोड साठ लाख किंमत मिळाली.

मी एका मित्राला सोबत घेऊन गेलो. कोणीही अडवलं नाही. स्वागतही नाही. साडेसहाची वेळ दिलेली होती. दहा मिनिटे आधीच गेलो. पांढऱ्याशुभ्र भिंतीवर सर्व चित्रं डिस्प्ले केलेली होती. आत गेल्यावर कॉफी टेबल बुक सारखं एक जाडजूड कॅटलॉग हातात दिलं. पुस्तकाच्या दुकानात तो दोन पाच हजाराला सहज पडला असता. मग सगळी चित्र बघून घेतली. स्वच्छ पांढरा प्रकाश होता आणि चित्रांवर थोडासा अधिक फ़ोकस लाइट होता. माझ्याबरोबरचा मित्र आधी चित्राखालची किंमत बघून पुढे सरकत होता. त्याला म्हटलं “प्रकाश, हॉटेल मधल्या मेनू कार्ड सारखं करू नकोस. चित्र व्यवस्थित बघ. ही चित्रं परत आपल्याला बघायला मिळतील अशी शक्यता नाही. तशीही ही शंभर कोटींची असली तरी आपल्याला काय त्याचं?” चित्र बघून झाल्यावर पांढर्‍या शुभ्र स्लीक लोखंडी खुर्चीत स्थानापन्न झालो. सुमारे शंभर एक खुर्च्या मांडल्या होत्या. साठेक लोक आलेले होते. कर्मचारी वर्ग सुमारे तीस होता. वीसेकजण पायांचा आवाज न होण्याच्या बेताने उभे किंवा फ़िरत होते. सहा जणी एका उंच ठिकाणी टेलिफोनवर होत्या. दोघे तिघेजण स्टेजच्या मागच्या कोपर्‍यात इंटरनेटवर काम करत होते. 

प्रभाकर बर्वेंच्या या चित्राला साडेतीन कोटी किंमत मिळाली.

स्टेजवर दादीबा पंडोल सह चार जण बसलेले होते. त्यांनाही सतत फ़ोन येत होते. मागे भिंतीवर ऑक्शन होणार्‍या चित्राचा क्रमांक आणि फ़ोटो व त्याची बदलत जाणारी किंमत प्रोजेक्ट होत होती. एक मुलगी डायसमागे उभी होती. संपूर्ण कार्यक्रमात ती मुलगी सोडून कोणीही एकही शब्द उच्चारला नाही. तिचा आवाज हळू पण स्पष्ट उच्चार होते. अघळपघळ एकही शब्द ती बोलत नव्हती. चित्राचा क्रमांक, नाव आणि चित्रकाराचं नाव. पुढे किंमत. कार्यक्रम सुरू होता होता शाम्पेनचे ग्लास आले आणि साठा पैकी पाच-सहा जणांनी ते घेतले. त्यात अस्मादिकही होते. बाकी लोकांपैकी एक दोघांनी कॉफी आणि दोन चार लोकांनी पाणी घेतले. प्रकाशने आणि इतरांनी काहीही घेतले नाही. 

धुरंधरांचं पाठारे प्रभू चित्र १५ लाखांवरून ५० लाखांवर गेलं.

बिडींग सुरू झाली. चित्रावर लावलेल्या किमतीच्या वर किंमत येऊ लागली. संपूर्ण कार्यक्रमात खोलीत बसलेल्या लोकांपैकी साठा पैकी फार तर सहा सात लोकांनी बोली लावल्या. बोली लावताना फक्त हातातला कार्डबोर्ड वर करायचा असे. आकड्यांचे टप्पे ठरलेले होते; म्हणजे एक लाखाच्या वर एक लाख दहा हजार वीस हजार असेच टप्पे होते. दोन लाखाच्या वर वीस हजार, चाळीस हजार असे टप्पे होते. पाच लाखाच्या वर 50 हजाराचे टप्पे होते. दहा लाखाच्या वर एकदा हात वर केला की एक लाख समजले जायचे. कोटीच्या वर गेल्यावर एक टप्पा दहा लाखाचा असे. म्हणजे एकदा हात वर करण्याचे दहा लाख पडत असत. दोन कोटीच्या वर एक टप्पा वीस लाखांचा होता. कोणीही एकही शब्द उच्चारत नव्हते. लोक अधून मधून उठून फ़्रेश वगैरे होऊन येत जात होते. पण कोणीही शब्दही उच्चारत नव्हते. बाथरूमवर छोटेसे M व W लिहिले होते. एक पुरूष चुकून W मधे गेला व थोड्या वेळाने बाहेर आला. कोणी हसले वगैरे नाही. एकंदर असा सभ्य माहोल होता.

आदी दावीएरवालांच्या ‘पिकासो हेड’ स्कल्प्चरला १२ लाखावरून ६५ लाख किंमत मिळाली.

साधारणपणे सर्वच चित्रे दाखवलेल्या किमतीच्या किमान तीन ते चार पट आणि कमाल 10 पट किमतीत विकली गेली.  तीस हजाराचं एक पोस्टकार्ड साईझ पेनाने काढलेलं चित्र साडेतीन लाखाला गेलं. धुरंधरांचं पाठारे प्रभू चित्र १५ लाखांवरून ५० लाखांवर गेलं. जेमिनी रॉयचं एक चित्र ५ वरून १५ लाखांवर गेलं. रझांचं एक चित्र ८ लाखांवर सुरू होऊन २२ लाखावर गेलं. आरांचा ब्रेकफ़ास्ट आठ लाखांवरून पासष्ट लाखांवर गेला. आरांचीच फुले तीन  लाखांवरून १७ लाखांवर गेली तर बाटल्या दोन वरून सहा लाखांवर. आदी दाविएरवालाचं पिकासो हेड स्कल्प्चर १२ वरून ६५ लाखांवर गेलं. जहांगीर साबावालाचं एक (मला) अगम्य चित्र चार कोटी वीस लाखांना गेलं. त्याची मूळ किंमत ८० लाख मला कायच्याकाय वाटली होती. जाऊ दे. गणेश पायनेंचं तीन करोड आणि नारायण श्रीपाद बेंद्रेंचं एक करोड साठ लाखाला गेलं. प्रभाकर बरवेंचं साडेतीन करोड आणि हुसेनचे घोडे दोन करोड वीस लाखाला गेले. साधारण सर्वच बीड २-३ सेकंदांत होत होते. ४ सेकंदपर्यंत कोणी उंचावली नाही तर पाचव्या सेकंदाला हातोडा वाजत होता. पण हुसेनच्या घोड्यांसाठी मात्र एक बिडर २ करोड २० वरून २ करोड तीस लाखाला तयार झाला होता. नियमाप्रमाणे २० नंतर चाळीस (म्हणजे २० लाखाची जंप) होती. ती घ्यायला (म्हणजे अजून दहा लाखाचा विचार करायला) त्याला थोडे अधिक सेकंद हवे होते. म्हणून चार सेकंद अजून दिले. अखेर तो निर्णय करू शकत नसल्याने त्याला अधिक वेळ न देता हतोडा आपटून दोन करोड वीसला डील फ़ायनल झाली. (मी असतो तर ते दहा लाख असे सोडले नसते.) 

एम. एफ. हुसेनच्या या पेंटिंगला दोन कोटी वीस लाख किंमत मिळाली

हे सर्व सुरू असताना ऑक्शनर मुलगी कांटेकी टक्कर च्या आवॆशात बोलत होती व तिची देहबोलीही तशीच होती. आवाज न चढवताही माहोल गरम करण्याची तिची कला वाखाणण्यासारखी होती. बहुतांश बोली (अबोलपणे) या नेट व फोनवरून येत होत्या. मुली फ़ोन घेऊन हात वर करत होत्या. खुद्द पंडोल वाले सुद्धा बोली लावत होते. त्यांनाही बहुधा कोणाचे तरी फोन किंवा मेसेजेस येत असावेत. त्याप्रमाणे ते हात वर करत होते. किंमत डिस्प्ले होत होती. ती रुपये, डॉलर, पौंड आणि येन मध्ये होती. प्रेक्षकात बसलेल्या बिडर्सच्या हातात A4 साईझच्या कार्डवर त्यांचा (बिडरचा) नंबर होता. ते कार्ड किंवा नुसता हात वर केला की बीड  वाढवली जाई. अंगाला आळोखेपिळोखे द्यायची सोय नव्हती. जे पाच-सहा बिडर  होते त्यातील तिघे चौघे अगदी साधे, चार चौघांसारखेच दिसत होते. हे लोक असे दहा लाख वीस लाख वगैरे इतक्या सहजपणे हात वर करून वाढवत होते, की ते नक्की देणार आहेत की चुकून हात वर केला शंका यावी. दोन बिडर थोडेसे वेगळे होते. एक होती 90 पार केलेली काहीशी जोहरा सहगल सारखी दिसणारी पारशीण. ती जेव्हा बोली लावण्यासाठी हात वर करत असे तेव्हा तिच्याबरोबर असलेली साठीची (तुम मिलो तो सही मधल्या डिंपल सारखी दिसणारी)  मुलगी (किंवा सून असेल) तिचा हात खाली खेचत होती. अखेर तिने म्हातारीच्या हातातील बिडिंगचा कार्डपेपरच हिसकावून घेतला. बिडिंग फ़ायनल झाल्यावर स्टेजवरची मुलगी हातातला ठोकळा टेबलावर आपटत असे. त्यावेळी ही म्हातारी आनंदाने लहान मुलासारखी टाळ्या वाजवत असे. तसा टाळ्य़ा वाजवण्याचा मोह मलाही होत होता. पण इतर कोणी तसे करत नाही हे बघून मी तो आवरला.  दुसरा एक बिडर सर्वात शेवटच्या रांगेत बसला होता त्याने समोरच्या खुर्चीला उलटे करून टीपॉय सारखे समोर ठेवले होते व त्यावर एका भल्या मोठ्या बाऊलमध्ये वेफर्स ठेवून बकाबका खात होता. लाख दोन लाख वाढवताना त्याचा अविर्भाव एक वेफ़र तोंडात टाकल्याइतकाच असे. बहुतांश लोक मध्यमवयीन होते. एक कपल कॉलेजमधली मुलगा मुलगी होते. 

साबावालांच्या या पेंटिंगला चार कोटी २० लाख किंमत मिळाली

कर्मचारी वर्गातील एक दोन मध्यमवयीन सोडले तर बाकीची सगळे पोरं पोरी होत्या. व्हिडिओ शूटिंग वा फ़ोटोंना मनाई होती. पण तसं कुठे लिहिलेलं नव्हतं.त्यामुळे मी ते केलं. तेव्हा त्यांनी अत्यंत नम्र शब्दांत मला विनंती केली. इतकी नम्र विनंती ऐकण्याची सवय नसूनही मी ती मान्य केली आणि थांबलो.

एक संध्याकाळ छान गेली. आपल्या आयुष्यात असे चित्रांसाठी लाखो कोटी रुपये मोजणारी माणसे आणि त्या किमतीची चित्रे आपण तरी कधी पाहणार होतो. शाम्पेनने नशा येत नाही. पण त्या माहोलने मात्र नशा आली.

– सुनील सामंत, ठाणे

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

या लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.